काळ अव्याहतपणे चालतच असतो. त्याची पाऊले वाजत नाहीत. पण चाल मात्र जाणवत असते. कालचा दिवस संपून आजचा दिवस उजाडला की काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. या अक्राळविक्राळ काळाला कवेत घेण्यासाठी माणसाने कालगणना सुरू केली. बारा महिन्यांचे एक वर्ष बनवले आणि काळाची मोजदाद सुरू झाली. एक महिना म्हणजे काळाचे जणू एक पाऊलच. अशी अकरा पावले चालून झाली की काळ बारावे पाऊल टाकतो शेवटच्या महिन्यात आणि वर्ष संपत आल्याची जाणीव होते. हा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना, म्हणजेच काही दिवस कार्तिकाचे आणि काही दिवस मार्गशीर्षाचे !
दसरा दिवाळी सारखे आनंददायी सण होऊन गेलेले असतात. एकंदरीतच सणांची गडबड संपत आलेली असते. पण सुगीचे दिवस मात्र सुरू झालेले असतात. साखर कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणा- या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर यांनी रस्ते ताब्यात घेतलेले असतात. त्यातच ऊस पळवणा-या बाल गोपालांच्या टोळ्या आपल्याच नादात असतात. बाजारातही वेगवेगळ्या फळांची रेलचेल असते. हवेतला गारवा वाढू लागलेला असतो. मागच्या वर्षीची थंडी, यंदाची थंडी अशा थंडीच्या गप्पा मारण्यासाठी मात्र शेकोटीची आवश्यकता वाटत असते. उबदार कपड्यांना आणि गोधडी,वाकळ यांना बरे दिवस आलेले असतात. झाडांची पाने गळून ती मात्र ओकीबोकी दिसू लागतात.
अशा या गोठवणार-या थंडीत दूर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकू येतात आणि लक्षात येते, अरे,दत्तजयंती आली वाटते. खेड्यापासून शहरापर्यंत श्रद्धेने साजरी होणारी दत्त जयंती एक नवा उत्साह निर्माण करते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या नियमांची जाणीव करून देते. त्या दरम्यानच येतो तो नाताळचा सण. येशूचा प्रकटदिन. प्रार्थना मंदिरे आणि परिसर सुशोभित झालेला असतो. छोट्या छोट्या झोपड्या, येशूचा जन्म सोहळा हे सगळे देखावे लक्ष वेधून घेत असतात. बच्चे मंडळीचे लक्ष असते ते मात्र सांताक्लाॅजकडून मिळणा-या गिफ्टवर. हे साजरं होत असतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू होते.
गत वर्षाचा हिशोब मनात मांडत असतानाच आपण सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आंतरराष्ट्रीय नवे वर्ष सुरू होत असते. आपणही त्यात सामील होत असतो. नव्या वर्षाचे संकल्प मनात सुरू झालेले असतात. ते सिद्धीस नेणे आपल्याच हातात असते. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ घालून आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी आपणही गेल्या वर्षाला बाय बाय करत नव्या वर्षात पाऊल टाकायचे आणि नवी आव्हाने स्वीकारायची. काळाचा हात धरून त्याच्या पावलाबरोबर चालायचे हे तर ठरलेलंच. नव वर्षाच्या शुभेच्छा देत चला एक नवा प्रवास सुरू करूया !