तो वड एक महान
घालून प्रदक्षिणा ज्याला
परत मिळवले सावित्रीने
आपल्या प्रिय पतीचे प्राण
तो आणि असे अनेक वड
अजूनही उभे आहेत
पाय जमिनीत रोवून घट्ट
ऐकतात दरवर्षी ते
नवसावित्रींचें पतीहट्ट
वडाला फेऱ्या मारणाऱ्या
दोरीचे बंध बांधणाऱ्या
सगळ्या स्त्रिया का सावित्री असतात ?
ज्यांच्यासाठी त्या व्रत करतात
सगळे का ते सत्यवान असतात ?
सात जन्मी हाच मिळावा जोडीदार
यासाठीच होते जरी प्रार्थना
मनात दोघांच्या असतात का
नक्की तशाच भावना ?
सावित्रीला आजच्या हवा आहे खरंच का
तो सत्यवान जन्मोजन्मी ?
आणि ज्याच्यासाठी उपास करतात
सत्यवानाला त्या हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!!
सावित्री -सत्यवान महती त्यांची थोर
त्यांच्यापुढे आपण सारे लहानथोर
महत्वाची आहे तरी प्रेम -भावना
सात जन्म कोणी पाहिलेत ?
हाच जन्म महत्वाचा
मिळाली ती सावित्री
आहे तो सत्यवान जपायचा
संस्कार म्हणून वटपौर्णिमा
सण साजरा करत राहूया …
पतीपत्नी सारे विश्वास अन् प्रेमाचं रोप सतत फुलवत ठेऊया