त्या गावकुसाबाहेरच्या सुंदर तलावा शेजारी कुणा पुण्यश्लोक दानशूर व्यक्तीने अनाथ लेकरांसाठी अनाथालय बांधले होते, ‘ बालोद्यान ‘ … तलावा भोवतालच्या गर्द राईतल्या पक्ष्यांच्या किलबिलाटासारखाच बालोद्यानात अखंड किलबिलाट चालायचा. तिथे अगदी तान्ह्या बाळापासून ते 10-11 वर्षे वयोगटातील मुलं … बालोद्यानात दंगा, मस्ती, इतर खेळ आणि त्याच बरोबर अभ्यासही व्हायचा. सकाळच्या प्रार्थनेपासून ते संध्याकाळच्या शुभमं करोति आणि रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा सगळं न चुकता म्हटलं जायचं. अनाथालयातील सगळे कर्मचारी हेच त्या मुलांचे मायबाप. बालोद्यानातील एक पाखरू मात्र इतरांपेक्षा वेगळं …
सचिन … वय जेमतेम 9-10 वर्ष. पण दैवदुर्विलासाने जन्मानंतर डोळे उघडले तेच मुळी ह्या बालोद्यानात.एका अंधारलेल्या रात्री आई दरवाज्यात ठेऊन गेली ते न परतण्यासाठी.त्या अभागी तान्हुल्याच्या जन्मदात्या बापा बद्दल सगळ्यांनाच प्रश्न होता. नंतर मात्र बालोद्यानातील माई, अक्का ह्याच त्याच्या माय-बाप झाल्या. त्यांनीच त्याचं नामकरण केलं आणि त्याला स्वतःची ओळख दिली. सचिनचं जग म्हणजे माई आणि बालोद्यान. जन्माला यायच्या अगोदर पासूनच सचिन जणू नियतीचे फटके खात होता. जन्मला तोच ओबडधोबड कुरूप असं रूप घेऊन. बटबटीत डोळे, फेंदारलेले नाक, आणि काळ्या रंगा कडे झुकणारा वर्ण. ह्याच कारणामुळे सचिनची बालोद्यानाशी नाळ जुळली गेली. आश्रमातील कर्मचारी हेच त्याचे नातेवाईक.आज मात्र सचिन परावलंबी होता. नशिबाने त्याला अजून एकदा फटकारले होते. 3 वर्षाचा असतानाच बाह्य रुपाबरोबरच नियतीने सचिनला अजून एक कडू जहरी डोस पाजला होता. सचिन विकलांग होता. इतर कुणाच्या मदती शिवाय तो धड उभा राहू शकत नसे. स्वतःहून चालणे तर फारच दूर. बालोद्यानात त्याच्यावर उपचार चालू होते. माई स्वतःहून त्याकडे लक्ष ठेऊन होत्या. कारण एकच… सचिनला लाभलेली तीक्ष्ण बुद्धी. नियतीने एका हाताने रंगरूप काढून घेतले मात्र, दुसरा हात सरस्वतीच्या रूपाने सचिनच्या मस्तकी ठेवला होता. आशीर्वाद दिला होता … नियती तिचा लाडका खेळ खेळून गेली होती.
“ सचिन … ए सचिन… अरे कुठे आहेस तू ?” माईंची हाक बागेत व्हिलचेअरवर बसलेल्या सचिनच्या कानी पडली. त्याने आज जाणून दुर्लक्ष केलं. पण अनुभवी माईंच्या ते लक्षात आलं. त्या जवळ आल्या आणि त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाल्या,” काय रे ? आज रागावलायस माझ्यावर? “ सचिनने मान फिरवली आणि तो दुसरीकडे पाहू लागला. “ काय झालं बाळा ?” माईंनी अत्यंत प्रेमाने विचारलं. “ मला सगळ्यांचा म्हणजे आक्ख्या जगाचाच राग आलाय.” सचिन उत्तरला. माईंना हसू आलं पण तसं न दाखवता त्या म्हणाल्या “ बापरे ..! म्हणजे त्या जगात तुझी ही माईपण आहे का? “ सचिन निरुत्तर झाला. त्याला माईंच्या विचारण्यातली खोच कळली. पण काय बोलावे ते सुचेना. सचिन गप्प बसलेला पाहून माई हसल्या. त्याच्याकडे पहात माईंनी विचारलं “ आज काय झालंय तुला ? नेहमीचे व्यायाम, दूध, ब्रेकफास्ट काहीच केलं नाहीस तू ? मला नाही सांगणार का ?” सचिनने माईंकडे तिरपा कटाक्ष टाकला. म्हणाला “ नाही ..मी तुलाच काय कोणालाच काही सांगणार नाही .” माईंना पुन्हा हसू आलं. त्या परिस्थितीत सुद्धा त्यांना बरं वाटलं. कारण बालोद्यानात माईंना कुणीही अगं तुगं करत नव्हतं … सगळेजण त्यांना अहो माई अशी हाक मारायचे. सचिन मात्र हक्काने त्यांना ए माई अशीच हाक मारायचा, अगदी कळायला लागल्यापासून. आश्रमातल्या इतरांना माई म्हणायच्या देखील… ह्या पोराचं आणि माझं काय नातं आहे ते त्या ईश्वरालाच माहीत. एक मात्र होतं … सचिनने मारलेली हाक माईंना सुखावून जायची. त्या नकळत शहारायच्या. अश्यावेळी त्यांच्या डोळ्यांत मात्र एक प्रकारची खंत दिसायची. मनाशीच म्हणायच्या … “ काय नशिबात वाढून ठेवलंय देव जाणे…” माईंनी पुढ्यात असलेल्या सचिनकडे पाहिलं. “ बरं बाबा ..! नको सांगूस. अरे, मी कोण लागते रे तुझी.? कोणीच नाही ना …?” इतकं बोलून माई परत जाण्यासाठी वळल्या. पाठमोऱ्या असलेल्या सचिनला त्याची चाहूल लागली. भरकन व्हीलचेयर वळवून माईंना सामोरा आला. त्याचा चेहरा उतरला होता. कावराबावरा झालेल्या सचिनकडे माईंचं लक्ष गेलं आणि त्या त्याच्या खुर्चीसमोर गुढग्यावर बसल्या. सचिनला माईंच्या चेहऱ्यावरची वेदना कळली आणि पुढच्या क्षणीच तो माईंच्या मिठीत विसावला. त्याच्या गदगदणाऱ्या शरीरावरुन हात फिरवत असलेल्या माईंनी त्याला शांत होण्यास वेळ दिला. सचिन शांत झाला आणि झालेला प्रकार त्याने माईंना सांगितला.
आजचा दिवस उजाडला तोच एका विचित्र प्रसंगाने. इतका वेळ बाकीच्या समवयस्क मुलांबरोबर खेळत असलेला सचिन अचानक संतापाने पेटून उठला. मूळचाच ओबडधोबड कुरूप असा चेहरा विचित्र दिसत होता. लाल झालेले डोळे अजूनच बटबटीत झाले होते. झालेल्या अपमानाने थरथरत बसलेला सचिन व्हीलचेयरच्या हँडलवर डोकं आपटत होता. कुणीतरी माईंना घेऊन आलं. शिपायाला सांगून सचिनला आत ऑफिसमध्ये आणलं. पाणी पिऊन सचिन शांत झाला, नव्हे माईंनी त्याला शांत होऊ दिला. त्याच्या चिडण्याचं कारण ऐकून त्याही हेलावून गेल्या. पिंट्याने सचिनला त्याच्या व्यंगावरून सगळ्या मुलांसमोर चिडवले होते. बटबटीत डोळे आणि ओबडधोबड शरीरावरुन पिंट्याने फुगलेला बेडूक म्हणून सचिनला हिणवले. पिंट्याबरोबरच्या मुलांनी त्याची री ओढली. सगळ्यां- समोर झालेल्या अपमानामुळे सचिन असाह्यतेने आणि अगतिकपणे व्हील चेअरवरच कोलमडला. त्याच्याबद्दल डोळ्यांत अपार कणव आणि ममत्व वसलेल्या माईंनी मनाशी एक निश्चय केला. त्यांना सचिनच्या बुद्धीची कुवत माहीत होती. त्याच दिवशी माई सचिनशी बोलल्या. खूप वेळ बोलत होत्या. सचिन आता पूर्णपणे शांत झाला होता. बालोद्यानातल्या संगीत शिकवणाऱ्या बाईच्या गळ्यातून निघणारे गाण्याचे सूर कानावर ऐकू येत होते… एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक… माईंचं अत्यंत आवडतं गाणं . पण त्यापेक्षा त्या गाण्याची शेवटची ओळ त्यांना अत्यंत प्रिय होती … तो राजहंस एक… माई सचिनबद्दल ह्या गाण्या इतक्याच आशावादी होत्या. त्या प्रसंगानंतर सचिन आमूलाग्र बदलला. त्याच्या दृष्टीने बाह्य रूप-रंग आता गौण होते. कुणी कितीही चिडवलं तरी तो हसून दुर्लक्ष करायचा. माईंच्या बोलण्याचा सचिनवर खोलवर परिणाम झाला होता. एका विशिष्ट ध्येयाने पछाडून सचिनने त्याची दिशा ठरवून वाटचाल सुरु केली होती. माई भक्कमपणे पाठीशी होत्याच. त्याची उत्तरोत्तर होत असलेली शैक्षणिक प्रगती वाखाणण्यासारखी होती. आज सचिनकडून एक दैदिप्यमान अशी कामगिरी झाली. त्याच्या शाळेत आणि बालोद्यानात जणू दिवाळी साजरी झाली. सचिन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकला होता. गळ्यात सुवर्ण पदक घेऊनच तो परतला होता. सचिनने त्याच्या शाळे बरोबरच बालोद्यानचे नाव उज्ज्वल केले. माईंना त्याचा सार्थ अभिमान होता. दिवस पुढे सरकत होते आणि बालोद्यान सचिनच्या नव्या नव्या प्रगतीचा सोहळा साजरा करीत होते.
आज, माई त्यांच्या ऑफिसमध्ये आश्रमाच्या कामासंदर्भात इतर स्टाफशी चर्चा करीत होत्या. इतक्यात शिपाई दार ढकलून आत आला. “कुणी बाई भेटायला आल्यात, इथे काम मिळेल का असं विचारतायत”. इतकं सांगून शिपाई निघून गेला. हातातले काम संपवून माई बाहेर आल्या. खिडकीतून बालोद्यानाचा परिसर पाहण्यात मग्न असताना त्या बाईंच्या कानावर आवाज आला ‘ कोण आपण ‘? आणि काय हवंय तुम्हाला ?” बाईंनी वळून पाहिलं, त्या दोघिंची नजरानजर झाली मात्र माई तिथेच मटकन खाली बसल्या. विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच्या नाकी डोळी नीटस असलेल्या बाई कडे पहात राहिल्या. शालू …! माई स्वतःशीच कुजबुजल्या. त्यांच्या समोर 12-13 वर्षांपूर्वी घरातून एका पुरुषाचा हात पकडून पळून गेलेली त्यांची लहान बहीण उभी होती. अचानक पणे समोर उभ्या ठाकलेल्या बहिणीला बघून मिनिटांपूर्वी अस्वस्थ झालेल्या माई आता सावरल्या होत्या . अजून शालूने माईंना ओळखले नव्हते. तसंही माईनी सुद्धा नशिबाचे फटके सोसले होते. असह्य झाल्यावर मात्र नवऱ्याच्या बाहेरख्याली पणाची किळस येऊन माईंनी घर सोडलं तेव्हा शालू जेमतेम 9-10 वर्षाची होती. त्या दोघींच्या वयात बरंच अंतर होतं. माईंनी घरादारावर पाणी सोडलं, नाती बाजूला सारली आणि त्या थेट बालोद्यानात येऊन थडकल्या. तिथे असलेल्या मुलांच्या आयुष्याची वाताहत बघता त्या आपलं दुःख विसरल्या आणि सगळ्या बालोद्यानाच्या माई होऊन राहिल्या. आणि आज …,
समोर बसलेल्या शालूला माईंनी तिचाच भूतकाळ वर्णन केला. शालू हादरली. तिला कळेना ही ह्यांना आपल्याबद्दल इतकी माहिती कशी. मात्र इतकावेळच्या बोलण्यातून शालूने आपल्या मोठ्या बहिणीला ओळखलं. रक्ताची ओळख पटली. नोकरी साठी मोठ्या आशेने शालू आपल्या बहिणीकडे पहात होती. ह्या बाबतीत माई हतबल होत्या. “ हे बघ शालू, ह्या आश्रमाच्या नियमानुसार स्वतःच्या नात्यांमध्ये नोकरी देता येणार नाही “ माई उत्तरल्या आणि गप्प झाल्या. शालू निराश झाली. आपल्या मोठ्या बहिणीकडे ती अपेक्षेने आली होती. घोर निराशा पदरात पाडून ती बालोद्यानातून निघून गेली. माईंनी मुद्दामहून आश्रमाचा नियम पुढे केला होता की त्त्यांनाच ती इथे आश्रमात आणि नजरेसमोर सुद्धा नको होती …? बाजूलाच बसलेल्या आक्कांनी प्रश्नार्थक मुद्रेने माईंकडे पाहिले. माई अस्फुटसे हसल्या. त्यांनी अक्कांना जे सांगितलं त्याने आक्का नखशिखांत हादरल्या. माईंनी स्वतःच्या नवऱ्याच्या अनेक किळसवाण्या प्रसंगातील अत्यंत नीच प्रसंग अक्कांना सांगितला. त्या हलकट माणसाने 8-9 वर्षांपूर्वी शालूला आपल्या जाळ्यात ओढले, अनेक वेळा जबरदस्ती केली आणि एक जन्मजात शिशु बालोद्यानाच्या दरवाजात ठेवलं गेलं.आजच हे किळसवाणे सत्य शालूच्या तोंडून माईंना समजलं. 8-9 वर्षांपूर्वी ज्या पुरुषाबरोबर शालू पळून गेली तो माईंचा नवरा. माई तिरमिरल्या. एक जळजळीत कटाक्ष शालूकडे टाकून त्यांनी तिला निघून जाण्यास सांगितले होते. मागेच उभ्या असलेल्या आक्काना हात जोडून माईंनी समजलेला प्रकार गुप्त ठेवण्यास सांगितले.” आक्का, अहो टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. ह्या सटवीला अक्कल नको कां ? इतकं मोहात पडायचं म्हणते मी?” माई उसळल्या. त्यांच्या सहकारी, आक्कानी माईंना सावरलं, त्यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांना गुप्ततेचं वचन दिलं. आता माई शांत झाल्या. आक्का बोलल्याप्रमाणे करतील ह्याबद्दल त्यांना खात्री आणि विश्वास होता. तसंही माईंनी त्यांच्या मागे उत्तराधिकारी म्हणून आक्कांची निवड कधीच केली होती. माईंनी मात्र त्या नवजात शिशुला, म्हणजेच त्यांच्या लाडक्या सचिनला बालोद्यानात आणल्या बद्दल नियतीचे भरभरून आभार मानले. काय नातं होतं सचिन आणि माईंचं. मावशी की ….? एक मात्र नक्की होतं … सचिनचं नशीब जोरदार होतं.
त्या दिवशी पिंट्याकडून केल्या गेलेल्या आगळिकी नंतर सचिनला शांत करून माई एकट्याच बसल्या होत्या. शालू आणि त्यांच्या नवऱ्याने केलेले उद्योग त्यांच्या डोळ्यासमोरून झरकन निघून गेले. आपण काय सोसलं ह्या विचारांनी माई विषष्णतेने हसल्या आणि त्यांनी पुढ्यातली फाइल ओढली. आज पुन्हा सचिनने सर्वाना बालोद्यानात दिवाळी साजरी करावयास लावली. संपूर्ण राज्यातून सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत सचिन प्रथम आला होता. माईंना जणू त्यांचीच कूस धन्य झाल्यासारखी वाटली. सचिनचं करियर उत्तुंग आहे ह्या बद्दल माईंना कुठलीही शंका नव्हती. माईं सचिनवर घेत असलेली मेहनत आता फळाला आली होती . सचिन बद्दलचा त्यांचा विश्वास द्विगुणित झाला होता आणि …
त्यांचा ‘ राजहंस ‘ आता स्वतःच्या विकलांग परिस्थितीवर मात करून ह्या दुष्ट आणि व्यावहारिक जगात झेप घेण्यास सज्ज होता.