गेली काही वर्षे, जागतिक मराठी दिन २७ फेब्रुवारीला किंवा जागतिक मातृभाषा दिनी अनेक चांगल्या पोस्ट्स, कविता, चित्रं पहायला मिळतात. छान वाटतं.
एक मैत्रीण म्हणाली आजच का मराठी… रोज का नाही?
खरंच मराठी रोजच का नाही?…..कमीत कमी मराठी माणसासाठी तरी?
आणि असंही वाटलं… की काय हरकत आहे? मराठी दिन साजरा करायला ? आपण रोज थोडेसे वाढत असतो- मोठे होत असतो पण तरी वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस आपण साजरा करतोच ना ? मग मराठी रोज बोलणाऱ्या आपण मराठी जनांनी “गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!!!” असं लिहिणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून मराठी भाषेची पताका गगनाला भिडवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यकार “कुसुमाग्रज” वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवशी २७ फेब्रुवारीला जर मराठी दिन साजरा करणं ही तर अभिमानाचीच गोष्ट आहे की ?
पण तरीही काही प्रश्न, विचार डोक्यात आले…
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठा तितुका मिळवावा , मराठी पाऊल पडते पुढे, इये मराठीचिये नगरी ” इत्यादी फक्त काही जणांनी म्हणून , लिहून मराठीचा झेंडा खरंच किती फडकत राहील ?
खरंच वर्षातून एका २७ फेब्रुवारीला काही पोस्ट टाकून, गाणी ऐकून, शुभेच्छा देऊन खरोखर मराठी दिन साजरा होईल? इंग्रजी,जर्मन ,फ्रेंच ,जॅपनीज इत्यादी अनेक जागतिक भाषांच्या गराड्यात रेट्यात आपली मराठी तिचं वैभव टिकवू शकेल का? भारताच्या अनेक राज्यात, उदा. गुजराथी, राजस्थानी, तामिळ, कानडी, बंगाली अशा तिथल्या भाषेचा मातृभाषा , रोजची बोलण्यातली भाषा म्हणून जशा बोलल्या जातात तशा आपल्या महाराष्टार्त मराठी बोलली जाते का ? का इतर वेळी इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिश नाहीतर अगदीच नाईलाज झालाच तर इतर भाषेतले शब्द मिसळून धेडगुजरी मराठी बोलायची आणि मराठीत बोलणाऱ्यांना व्हर्नाक्युलर म्हणून क्षुल्लक समजायचं ? किंवा मराठीत बोलले तरी व्याकरण , शुद्धता धाब्यावर ठेऊन ?
जगभरात ९-१० कोटी लोक जी भाषा बोलू शकतात आणि महाराष्ट्राची राज्यभाषा व भारतातही मान्यताप्राप्त असलेल्या मराठीला भविष्य काय ? कुठलंही शिक्षण मग ते प्राथमिक-माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा पदवी-उच्चशिक्षण घेताना इंग्रजी शिक्षण आवश्यक आहेच पण हे करताना मराठी दुर्लक्षित राहणार नाही ना ? मराठी मातृभाषा असूनही चार वाक्य मराठीत बोलता येत नाही किंवा साधं मराठी वाचताही येत नाही हे किती जणांना लाजिरवाणं वाटतं ? ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ, रामदासांसारख्या संत मंडळींपासून राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर, वसंत बापट, पुल देशपांडे, गदिमा , शांता शेळके, सुरेश भट आणि इत्यादी अनेक प्रभुतींनी समृद्ध केलेल्या मराठीचं आयुष्य किती ? ग्यानबा तुकाराम -जय हरी विठ्ठल करत पंढरीची वारी करणारे मराठीची पालखी किती दिवस वाहतील ?
हे आणि असे प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडत असतील पण नुसते प्रश्न पडून , वाईट वाटून काहीच होणार नाही हेही खरंच.
यापेक्षा मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो? असा विचार प्रत्येक मराठी माणसाने केला तर?
आपण दिवसातून अनेक वेळेस ‘सॉरी’ , हॅलो, थँक्स , प्लीज म्हणत असतो, या ऐवजी मराठी शब्द धन्यवाद, नमस्कार, वगैरे शब्द सहज वापरु शकतो का?
विविध कारणास्तव आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. अशावेळी भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके / काव्यसंग्रह / नाटय़कृती यांचा आपण विचार करु शकतो का?
महिन्या दोन महिन्यांत किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचतो का?
बँका, विमा कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती-सूचना पुस्तिका-प्रपत्रे (फॉर्म्स) इत्यादी देण्याचा आग्रह नाही पण ती असतील तर ती वापरु शकतो का?
मराठी विषय शिक्षणासाठी शाळेत दहावीपर्यंतच तेही फक्त मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी, कारण मी त्यातला एक… ११-१२वीत इलेक्ट्रॉनिक्स हा व्यावसायिक विषय स्वीकारल्यामुळे मराठी नाही.. कला किंवा वाणिज्य शाखा स्विकारली तर मराठी शिकायचं तेही परत एक विकल्प म्हणूनच. शास्त्र घेणारे नाराजीनेच हा विषय घेतात, कारण गणितासारखे वा संस्कृतसारखे मराठी विषयाला भरपूर गुण मिळत नाहीत हा गैरसमज.
बाकी कला..वाणिज्य शाखेतली विद्यार्थी सुध्दा मराठी घेतात कारण इंग्रजीच्या तुलनेत मराठी समजायला सोपी वाटते , मराठीची, मराठी साहित्याची आवड आहे म्हणून नाहीच.
मला स्वतःला शास्त्र… इंजीनियरींगला गेल्याने दहावीनंतर मराठीचा विषय म्हणून अभ्यासला न गेल्याची खंत आहे.
पध्दतशीर शास्त्रोक्तपणे आणि विषयात रस घेऊन अभ्यास केल्यास मराठी ही चांगले गुण मिळवून देते याचा अनुभव मला स्वतःला दहावीच्या परिक्षेत आला आहे
शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही या विषयावर. बौध्दिक घेतले गेले पाहिजे.
मराठी विषयाच्या पदवीधराला ..काही ठिकाणी शिक्षक प्राध्यापक वगळता इतरत्र कोणतीच नोकरी मिळत नाही, हेही मराठी न निवडण्याचे कारण. मराठी योग्य पध्दतीने शिकल्यामुळे मिळणाऱ्या संधी वाढल्या पाहिजेत.
मराठीचा इंटरनेटवर वापर वाढतो आहे त्यादृष्टीने इंग्रजी साईट्सप्रमाणे स्पेलचेकस किंवा इतर सोयी वाढवणे हा एक उपाय आणि व्यावसायिक संधीही … यासाठी इ-मराठीचा विस्तार होतोय, तो वाढला पाहिजे.
टोकाची मराठी अस्मिता किंवा अगदी विरुध्द भूमिका म्हणजे मराठी टिकणार का नाही असे विचार आणण्यापेक्षा आजच्या हाय- टेक युगात मराठी मागे पडतेय हे स्वीकारले तरच भाषेच्या उत्कर्षाचे नवीन मार्ग सापडतील. ते सापडण्यासाठी समविचारी आधार समूह तयार व्हायला होतील.
मराठी चिरंतर राहावी ही आपली सर्वांचीच मनापासून इच्छा आहे तर प्रयत्नही आपणच करायला हवेत – आपल्या स्वतःपासून , आपल्या घरापासून , मित्रपरिवारापासून सर्वांनी – प्रत्येक मराठी माणसाने –
मग मराठी दीन तर राहणार नाहीच पण मराठी भाषा ही चिरायू होईल .
मराठी दिन तर साजरा करूच मराठी बरोबर आपणा मराठी माणसांचीही मन कशी उंच राहील ते ही पाहू !!!
मग खरंच सुरेश भटांनी लिहून ठेवलेलं ” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी ।।” ही रचना फक्त २७ फेब्रुवारीला नाही तर रोज जगातला प्रत्येक मराठी माणूस आनंदाने अभिमानाने म्हणेल – ऐकेल !!!