माझ्या स्वप्नांसाठी
स्वतःची स्वप्नं ते विसरले
माझ्या वाट्यावरचे काटे
ते कायमच उचलत आले
काबाडकष्ट करुन त्यांनी
घाम सतत गाळला
भविष्याच्या फुलबाग माझा
त्यांनीच की हो फुलवला
खेळ गमतीजमती साठी
ते मित्र जरी बनले
अडचणीच्या प्रसंगी
देवबाप्पाही तेच झाले
चुकलो अनेकदा मी
बाबांचे बोलही ऐकले
माझ्या साठी अनेकदा
मूक अश्रू ढाळलेलेही पाहिले
आईने धरली सदा
वेड्या मायेची ती छाया
कुटुंबाला संपूर्ण माझ्या
बाबांचाच भक्कम पाया
बाबांचा अवतार जसा
नारळ, काटेरी फणस ते खरे
करारी चेहऱ्यावर राग जरी
अंतरी काळजी, आपुलकीचे झरे
सर्व संकटात आमच्या
दारात उभे ते, जणू काही ढाल
खंबीरपणाची त्यांच्या
खरंच आहे हो कमाल
आईसंगे मनमोकळे
बोललो, हसलो रडलो
बाबांसमोर मात्र सदा
घुमाघुमाच राहिलो
अंतरीची त्यांची माया
कस्तुरी अत्तराचा जणू फाया
दिसे वरुन काही नाही
सुगंध पसरवी नुसती छाया
बाबांसाठी वृद्धापकाळी
बनेन का मी आधाराची काठी
मनातला बाबा माझ्या
होईन का माझ्या मुलासाठी
सुंदर 👌👍