“साक्षी तू पार्टीला जाते आहेस तर रेवतीलाही घेऊन जा ना सोबत.बिचारी नेहमी घरातच बसलेली असते” वसुधाताई मेकअप करत बसलेल्या आपल्या लेकीला म्हणाल्या.
“काही काय सांगतेस गं आई” साक्षी आईवर जोरात डाफरत म्हणाली.”एकतर तिला निमंत्रण नाहिये. दुसरं एवढ्या शानदार पार्टीत त्या लंगडीला घेऊन कशी जाऊ मी?किती लाजीरवाणं होतं मला जेव्हा सगळेजण तिच्याकडे बघून काहीबाही कमेंटस् पास करतात तेव्हा!”
“हळू बोल,तिने ऐकलं तर रडत बसेल”
“रडू दे.अगं आई माझ्या पार्टीत तिचा काय संबंध?”
वसुधाताई काही बोलल्या नाहीत पण दुःखी जरुर झाल्या.रेवती त्यांची धाकटी मुलगी.तिच्या जन्माच्या वेळेस गरोदर असतांना त्यांना अपघात झाला.रेवती जन्माला आली ती वाकडा पाय घेऊनच.तिचा पाय व्यवस्थित व्हावा म्हणून अनेक उपचार झाले पण उपयोग झाला नाही.बिचारीचं अख्खं बालपण लोकांच्या कुत्सित नजरा झेलण्यात आणि ‘लंगडी लंगडी” हे शब्द ऐकण्यात गेलं.सातत्याने तिची चेष्टाच झाल्याने ती बहुतेक वेळा घरातच असायची.खरं तर आपली मोठी बहिण साक्षीपेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर होती,हुशार होती पण साक्षी नेहमी तिच्या या व्यंगाला लक्ष्य करुन बोलायची.रेवतीला खुप दुःख व्हायचं.या व्यंगामुळे निर्माण झालेल्या न्युनगंडामुळे तिला जवळच्या अशा मैत्रिणीही नव्हत्या.अभ्यासाची पुस्तकं आणि टिव्ही यापलीकडे तिचं विश्व नव्हतं.
साक्षी निघाली आणि तिचा मोबाईल वाजला.
ज्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती त्या अंजलीचाच फोन होता.
“साक्षी अगं आईने तुझ्या बहिणीला,रेवतीलाही घेऊन यायला सांगितलंय”
साक्षीच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“काsss?अगं तिथे तिचं काय काम ?”
“अगं मागे माझी आई तुझ्याकडे आली असतांना रेवतीने खुप छान गाणी म्हंटली होती.म्हणून आईने गाणी म्हणण्यासाठी तिला बोलावलंय”
“ओहो.आता राहू दे.मी आता निघालेय.तिला आणायचं म्हंटलं तर उशीर होईल”
” नो प्राँब्लेम.असाही पार्टीला एक तास उशीरच होणार आहे.ये तिला घेऊन”फोन कट झाला तशी साक्षी चरफडली.तिने रेवतीला हाक मारुन तयार व्हायला सांगितलं. रेवतीने आढेवेढे घेतले तशी ती तिच्यावर खवळली.
“ए बाई मुकाट्याने तयार हो बरं.तू आली नाहीस तर ती अंजली माझा जीव घेईल”
दोघी हाँटेलवर पोहोचल्या.रेवतीच्या किंचीतशा लंगड्या चालीकडे लोकांच्या नजरा वळलेल्या पाहून साक्षीला मेल्याहून मेल्यासारखं झालं.तेवढ्यात अंजली आणि तिची आई समोर आल्या.
“वा खुप छान आणि गोड दिसतेय गं रेवती”अंजलीच्या आईने म्हंटलं तसं साक्षीने नाक मुरडलं.
केक वगैरे कापून झाल्यावर सुत्रसंचालकाने रेवतीला स्टेजवर गाणं म्हणायला बोलावलं.रेवतीने साऊंड ट्रँकवर गाणं म्हणायला सुरुवात केली तसा सगळा गलका एकदम शांत झाला.तिचं गाणं जसं संपलं संपूर्ण हाँल टाळ्यांच्या कडकडाटाने भरुन गेला.’वन्स मोअर,वन्स मोअर’च्या घोषणा होऊ लागल्या.रेवतीने तेच गाणं रिपीट न करता दुसरं गाणं म्हटलं.या गाण्याला तर अजूनच जास्त प्रतिसाद मिळाला.परत वन्स मोअर झालं पण सुत्रसंचालकाने दुसऱ्याही कार्यक्रमांना चान्स हवा म्हणून रेवतीला बसायला सांगितलं.प्रसन्न चेहऱ्याने रेवती खाली जाऊन बसली.
“हँलो”
रेवतीने मान वरुन पाहिलं.एक देखणा तरुण तिच्यासमोर उभा होता.
“मी अक्षय.साक्षीचा मित्र.खुप छान गाणी म्हंटलीत तुम्ही.शिकलाहात का कुठे?”
“नाही तर.जस्ट आवड आहे”
“वा खुप छान.तुमचा आवाजही खुप गोड आहे”
तेवढ्यात त्याचा मित्र आला.
“अरे चल अक्षय.अंजलीबरोबर फोटो काढायचेत”
“बरं भेटू या”रेवतीकडे पहात अक्षयने हात हलवला.रेवतीने स्मित केलं.
दोन दिवसांनी अक्षयचा फोन आला
“फेसबुकवर मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीय.बघितली नाही का?”
“अहो बऱ्याच दिवसात मी फेसबुकच बघितलेलं नाहीये”
“ओके ओके.मग आता तोंडीच विचारतो.माझ्याशी फ्रेंडशिप कराल ना?”
रेवती अडखळली.आजपर्यंत कोणत्याही मुलाने तिला फ्रेंडशिपबद्दल विचारलं नव्हतं
“ठिक आहे चालेल.मात्र एक अट आहे.असं अहोजाहो करायचं नाही”तिच्या तोंडातून निघून गेलं
अक्षय जोरात हसला.
“ओके रेवती.बाय. भेटू नंतर” आणि फोन कट झाला.
रेवतीला खुप आनंद झाला. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर तिची कुणाशी फारशी मैत्री नव्हती.मुलांशी तर नाहीच नाही.तिचं व्यंग पाहून मुलंच तिच्याशी मैत्री करायला उत्सुक नसायची.
“काय अक्षयचा फोन होता?”साक्षी जवळच उभी होती हे रेवतीच्या लक्षातच आलं नव्हतं
“आश्चर्य आहे.तुझ्यासारख्या अपंग मुलीशी त्याने मैत्री करावी.तू त्याच्या नादी लागू नकोस.तुला माहितेय किती श्रीमंत आहे तो. त्याच्या वडिलांच्या दोन फँक्टरीज आहेत.आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मेडीसीनची डिस्ट्रीब्युटरशीप त्याच्या मोठया भावाकडे आहे.मोठा बंगला आहे.घरात चार गाड्या आहेत.अशी श्रीमंतांची मुलं मुलींना नुसतं फिरवतात आणि वापरुन सोडून देतात.तू तर अगदी इझी टार्गेट आहे त्याच्यासाठी”
रेवतीला एकदम धक्का बसला.अक्षय असं करु शकतो यावर तिचा विश्वास बसेना.यापुढे त्याच्यापासून सावध रहावं लागणार होतं.
अक्षय त्यानंतर दोनतीनदा घरी आला.पण तो संध्याकाळी सगळी घरी असतांना यायचा आणि सगळ्यांशीच गप्पा मारायचा.रेवती त्याच्याशी मोजकंच बोलायची.साक्षीने दिलेल्या वाँर्निंगचा तो परीणाम होता.
एक दिवस तो आला तेव्हा वसुधाताई हाँलमध्ये बसल्या होत्या .रेवती किचनमध्ये काहीतरी काम करत होती.थोडंसं जुजबी बोलल्यानंतर तो वसुधाताईंना म्हणाला
“काकू तुम्हांला नाही वाटत रेवतीमध्ये न्युनगंड आलाय तिच्या अपंगत्वामुळे?”
“वाटतं ना!त्याच्यामुळे ती कुठेच घराबाहेर निघत नाही रे.मलाही तिची तिच काळजी वाटते बघ.”
“तुम्ही काही काळजी करु नका.मी करतो सगळं व्यवस्थित.फक्त तुम्ही मला साथ द्या”
तेवढ्यात रेवती बाहेर आली.
“रेवती आम्ही चाललोय भंडारदऱ्याला.तिथून आम्ही कळसूबाईला जाणार आहोत.चलतेस माझ्यासोबत?”
” मी आणि कळसूबाईला?नाही रे बाबा.खुप चढावं लागतं असं ऐकलंय मी”
“अगं काही खास नाही.मी जाऊन आलोय दोनदा.आणि मी आहे ना तुझ्यासोबत.बऱ्याच मुलीसुद्धा आहेत बरोबर”
“हो गं रेवती.ये जाऊन.खुप छान आहे भंडारदरा.मीसुद्धा जाऊन आलेय”वसुधाताई बोलल्या.
“नको ना.आई प्लीज समजून घे ना”रेवती काकुळतीने म्हणाली.अक्षयला तिच्या भावना कळल्या.तो म्हणाला.
“मला समजलं, तू का नाही म्हणतेस ते!तुला सांगतो मागच्या वर्षी मी हिमालयात ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत दोन अंध मुलं होती.त्यांना मी व्यवस्थित सुखरुप घरी आणलं.तू तर चांगली डोळस आहे.ते काही नाही तुला यावंच लागेल.पैशाची काही काळजी करु नको”
“अरे पण अक्षय मी…. “
“हो कळलं मला.तू मनाने तर अपंग नाहीयेस ना?मग झालं तर”
हो नाही करता करता रेवती तयार झाली.
अक्षयचा ग्रुप भंडारदऱ्याला पोहोचला.तिथलं निसर्गसौंदर्य पाहून रेवती वेडावून गेली.
दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळे कळसूबाईकडे निघाले.अक्षयने अगोदरच सगळ्यांना रेवतीच्या व्यंगावर कोणीही काँमेंट करायची नाही उलट तिला चिअर अप करत रहायचं असं बजावून सांगितलं होतं.त्यामुळे सगळेच तिला प्रोत्साहित करत होते.कळसुबाई शिखराकडे पाहिलं की रेवतीच्या मनात धडकी भरायची,आपण तिथे पोहोचू शकू का अशी शंका वाटायची.पण हळूहळू ते चढ चढतांना तिला त्रास वाटेनासा झाला.अर्धा डोंगर चढल्यावर तिला उत्साह वाटू लागला.’येस आपण करु शकतो’ हा आत्मविश्वास तिच्या नसानसात खेळू लागला.अक्षय सतत तिच्यासोबत होता.ती थकली,मागे राहिली की तो तिच्यासाठी थांबायचा.तिला हिंमत द्यायचा.दोन्ही पाय नसतांनाही एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या न्युझिलंडच्या मार्क इंग्लिस या गिर्यारोहकाची गोष्ट त्याने तिला सांगितली. ती ऐकल्यावर रेवतीला दुप्पट उत्साह आला
दुपारी सगळा ग्रुप शिखरावर पोहोचला.रेवतीला आपण इतक्या उंचीवर पोहोचलो यावर विश्वासच बसेना. आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू आले.
“काँग्रँट्स रेवती.यु डिड इट”अक्षयने तिच्या हातात हात मिळवून तिचं अभिनंदन केलं.बाकी सगळ्यांनीही तिचं अभिनंदन केलं.आयुष्यात पहिल्यांदाच तिला आपल्या अधू पायाचा राग आला नाही.
भंडारदऱ्याला परतल्यावर रात्री जेवणानंतर कँप फायरचा कार्यक्रम झाला.रेवतीने आपल्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं.कार्यक्रम संपल्यावर ग्रुप लिडर सगळ्यांना उद्देशून म्हणाले”कळसूबाई ट्रेक यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो.पण आज मी रेवतीचं विशेष अभिनंदन करेन.काल तिला पाहिल्यावर ती ट्रेक पुर्ण करेल का अशी शंका वाटत होती.पण तिने जिद्देने ट्रेक पुर्ण केला.देव जेव्हा काही आपल्यापासून हिरावून घेतो तेव्हा वेगळी काही गोष्ट आपल्याला देत असतो.देवाने रेवतीला गोड गळा देऊन ते सिध्द केलंय.रेवती पुढे ये”रेवती पुढे जायला उठली.’या सगळ्याचं क्रेडीट अक्षयला आहे.त्याच्यामुळेच मी हे करु शकले’असं सांगायचं तिने ठरवलं
” ट्रेक पुर्ण केल्याबद्दल आणि सुरेख गाण्यांसाठी मी रेवतीला एक हजार रुपयाचं बक्षीस देतोय”रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं.तिने अक्षयकडे पाहिलं आणि तिला साक्षीचे शब्द आठवले.”अशी श्रीमंत मुलं मुलींना वापरुन सोडून देतात”तिने डोळे पुसले.ग्रुप लिडरकडून बक्षीसांचं पाकीट घेतलं आणि सर्वांना धन्यवाद देऊन ती आपल्या जागेवर येऊन बसली.
घरी परतल्यावर आईने तिला विचारलं
“काय कशी झाली सहल?”
“खुप छान. आता मी नेहमी जात जाईन”ती उत्तरली तसं वसुधाताईंना समाधान वाटलं.तेवढ्यात साक्षी तिथे आली.
“रेवती अगं किती काळजी वाटत होती तुझी!तो अक्षय काही वाईट तर नाही ना वागला तुझ्याशी”
“काही काय बोलतेस ताई!अगदी सभ्यपणे वागला तो ” रेवती वैतागून म्हणाली.
“साक्षी बस झालं हं अक्षयबद्दल नेहमीनेहमी वाईट बोलणं”वसुधाताई रागावून म्हणाल्या.”मला तरी खुप चांगला मुलगा वाटतो तो”
“सुरुवातीला सगळी मुलं अशीच वागतात.मग दाखवतात हळूहळू आपले रंग.”साक्षी रागाने फणफणत निघून गेली.
साक्षी आणि अक्षयने एम.काँम.पुर्ण केलं तर रेवतीने आपलं बी.काँम. बिझनेस मँनेजमेंटच्या डिग्रीसाठी अक्षय इंग्लंडला जाणार असल्याचं साक्षीने रेवतीला सांगितलं. रेवतीला एकदम उदास वाटू लागलं.आपलं मन अक्षयमध्ये गुंतत चाललंय हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं.पण अक्षयच्या मनात काय आहे हे तिला कळत नव्हतं.त्याच्या नजरेतून किंवा वागण्या बोलण्यातून कोणत्याही तशा भावना प्रकट होत नव्हत्या.शेवटी तो श्रीमंत बापाचा देखणा आणि धडधाकट मुलगा आहे आणि आपण अशा मध्यमवर्गीय आणि त्यातून अपंग.अक्षयच्या मागे अनेक सुंदर मुली फिरत असतात हे साक्षीनेच तिला सांगितलं होतं.या विचारांनी तिचं मन अधिकच उदास होत होतं.
एक दिवस संध्याकाळी अक्षय घरी आला.रेवती तिच्या आईवडिलांसोबत बसली होती.रेवतीच्या वडिलांना तो म्हणाला
“काका सहा महिन्यांनी मी दोन वर्षांसाठी इंग्लंडला चाललोय.तोपर्यंत रेवती आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली मला पहायचंय.तुम्ही तिला कुठे जाँबला लावणार आहात का?”
“आजकाल जाँब मिळणं कठीण झालंय”रेवतीचे वडील म्हणाले.”तरी पण आम्ही प्रयत्नशील राहूच”
“रेवती गाण्याव्यतिरीक्त अजून काही कला आहेत तुझ्याजवळ?”अक्षयने विचारलं.
“अरे ती लहानपणी खुप छान पेंटिंग्ज काढायची.आताही ती खुप सुंदर रांगोळ्या काढते.आणि हो लग्नामध्ये सगळ्या बायकांची मेहंदी काढण्याचा काँन्ट्रँक्ट तिच्याकडेच असतो”रेवतीऐवजी वसुधाताईंनीच त्याचं उत्तर दिलं.”का रे?तुझ्या मनात काय आहे?”
अक्षय विचारात पडला.मग थोड्यावेळाने म्हणाला
“रेवती तू ड्रेस डिझायनिंग करु शकशील?.आजकाल डिझायनर ड्रेस आणि साड्यांचं फार प्रस्थं आहे.श्रीमंत घरातल्या बायका तर कितीही पैसे द्यायला तयार असतात.आपल्या शहरातल्या बऱ्याच बायका लग्नाची खरेदी पुण्यामुंबईला जाऊन करतात ते त्याचं कारणाने”
रेवती विचारात पडली.तसा अक्षय म्हणाला.
“तू नेट सर्च केलंस तर तुला अनेक डिझाईन्स मिळतील.आणि जर तू मनाने सुंदर रांगोळ्या आणि मेहंदी काढत असशील तर तुला ड्रेस डिझायनिंग अवघड नाही.आपल्याकडे खुप मार्केट आहे.तू एक साडी आणि एक ड्रेस डिझाइन तर करुन बघ.कपड्यांचे काही दुकानदार माझ्या परीचयाचे आहेत.त्यांना आपण दाखवू.त्यांना पसंत पडले आणि त्यांनी विक्रीची तयारी दाखवली तर आपण पुढे जाऊ.नाही का?”
रेवतीला काय बोलावं ते कळेना.ती उठली आणि म्हणाली
“थांब मी चहा करुन आणते मग बोलू”ती गेल्यावर अक्षय म्हणाला
“काकाकाकू,रेवतीबद्दल सहानुभूती वाटते म्हणून माझी ही धडपड सुरु आहे.तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ प्लीज काढू नका.इतकी गुणी मुलगी पण तिच्या अपंगपणामुळे तिला न्युनगंड आलाय.त्या न्युनगंडातून आपल्याला तिला बाहेर काढायचंय.माझे एक काका असेच अपंग आहेत.अतिशय हुशार माणूस पण न्युनगंडामुळे आयुष्यात काही प्रगती करु शकले नाहीत.रेवतीचं असं काही होऊ नये असं वाटतं”
“हो रे मला पटतं तुझं म्हणणं” वसुधाताई म्हणाल्या.तेवढ्यात रेवती चहा घेऊन बाहेर आली.टेबलवर चहा ठेवून अक्षयला म्हणाली
“मी ड्रेस डिझाईनिंगचा तर काही कोर्स केलेला नाही.मला कसं जमेल ते?”
” रेवती जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी कधीही आपल्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं नाही तरी त्या व्यवसायामुळे ते करोडपती आहेत.प्रयत्न करुन पहा.मला खात्री आहे तुला जमेल”
अक्षय गेल्यावर रेवतीने सर्वांशी चर्चा केली.नेहमीप्रमाणे साक्षीने विरोध केला पण रेवतीच्या आईवडिलांनी मात्र तिला सहकार्य करायची तयारी दाखवली.
पंधरा दिवसाच्या परीश्रमानंतर रेवतीने एक डिझायनर साडी आणि एक डिझायनर ड्रेस तयार केला.वसुधाताईंना तो खुप आवडला.रेवतीने मग अक्षयला बोलावून दाखवला.अक्षयला साडी जास्त आवडली पण तो दोन्ही घेऊन गेला.दोन दिवसांनी रेवतीला त्याचा फोन आला.दुकानदारांना साडी खुप आवडली होती आणि पाच दुकानदारांनी १०-१० साड्यांची आँर्डरही देऊन टाकली होती.ड्रेसमध्ये मात्र अजून नाविन्य आणायची गरज असल्याचं त्यांचं मत पडलं.लग्नाचा सिझन लवकरच सुरु होणार होता.त्यामुळे घाई केली तर रेवतीला चांगली आँर्डर मिळाली असती.रेवतीला आता हुरुप आला होता.तिने तिच्या ज्या मोजक्या मैत्रिणी होत्या त्यांना बोलावून घेतलं.साड्यांच्या डिझाईन्स तयार केल्या आणि मैत्रिणींवर साड्या तयार करायची जबाबदारी टाकून ती ड्रेसेसच्या मागे लागली.इंटरनेट,पुस्तकांचा आधार घेत तिने पाच ड्रेसची डिझाइन तयार केली.तिला स्वतःला ड्रेस शिवता येत नव्हते.तिने ते बाहेरुन शिवून आणले.मग अक्षयला घेऊन ती दुकानदारांकडे गेली.आता मात्र तिचे ड्रेसेस दुकानदारांना खुप आवडले.त्यांच्याकडून ५० ड्रेसेसची आँर्डर घेऊन ती परतली.आता तिला फुरसत नव्हती.तिचं घर मात्र तिला अपुरं पडत होतं.पण ईलाज नव्हता आहे त्या परीस्थितीत काम पुर्ण करायचं होतं.रात्रीचा दिवस करुन तिने,सिझन सुरु झाला तशी आँर्डर पुर्ण करुन दुकानदारांना नेऊन दिली.आँर्डरची अर्धी रक्कम तिला मिळाली.अर्धी विक्री झाल्यावर मिळणार होती.
“वा रेवती जमलं तुला.मी म्हंटलं नव्हतं तुला नक्की जमेल म्हणून”अक्षय तिच्याकडे समाधानाने पहात म्हणाला.
“थँक्स अक्षय.तुझ्या प्रोत्साहनामुळे झालं”रेवती म्हणाली. खरं तर तिला अक्षयला कडकडून मिठी माराविशी वाटत होती.पण तिने स्वतःला सावरलं.
“रेवती तू अजून स्वतःला ओळखलं नाहीस.खुप गुणी आहेस तू.आता सध्या हाच बिझिनेस चालू ठेव.पण ज्यावेळी स्लँक सिझन सुरु होईल त्यावेळी पेंटिंग्ज काढायचा प्रयत्न कर.मला खात्री आहे तू खुप चांगली पेंटर होशील”
“तू नेमका आता इंग्लंडला चालला आहेस.तू नसशील तर मला प्रोत्साहन कोण देईल अक्षय?”रेवती गहिवरुन म्हणाली.
“डोंट वरी रेवती मी फोनवर तुझ्याशी नेहमी बोलत राहीन.बरं ते जाऊ दे.तुझ्या या यशाबद्दल आपण काँफी पिऊया”
ती दोघं हाँटेलमध्ये बसल्यावर रेवतीला वाटलं त्याने दोन शब्द प्रेमाचे बोलावे पण तो वेगळ्याच विश्वात होता.
“रेवती तुझी सेटलमेंट तर आता होऊन जाईल.आता मला माझं बघावं लागेल.तुला सांगतो रेवती,आईवडिल आणि नातेवाईकांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण माझ्यावर आहे.आणि मला स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं आहे”
“माझा विश्वास आहे तुझ्यावर अक्षय!तू नक्कीच यशस्वी होशील”
“बघूया काय होतं ते”
हाँटेलमधून बाहेर पडल्यावर दोघंही वेगवेगळ्या दिशांना निघून गेले.
अक्षय लंडनला गेला त्यादिवशी रेवती खुप रडली.खरं तर त्याला निरोप देण्यासाठी जायची तिची खुप इच्छा होती.पण एवढ्या मोठ्या लोकांत आपल्यासारख्या अपंग मुलीने जाणं योग्य दिसणार नाही या विचाराने ती घरीच थांबली.
लग्नाचा सिझन ऐन भरात आला आणि एक दिवस एका दुकानदाराचा रेवतीला फोन आला.
”बहेनजी आपका दिया हुआ माल सब खतम हो गया।बहुत डिमांड बढी है आपके माल की।जितना जल्दी हो सके और माल पहुचा दिजीये ।मुहमांगी रकम देंगे आपको” रेवतीला घाम फुटला.तिच्या साड्या आणि ड्रेसेस इतक्या लवकर विकल्या जातील याची तिने अपेक्षाच केली नव्हती.तिने १५ दिवसांची मुदत मागून घेतली.दुकानदाराने ती मोठ्या नाराजीनेच दिली.यावरुन एक गोष्ट रेवतीच्या लक्षात आली ती म्हणजे बिझनेसमध्ये रिलँक्स होऊन चालत नाही. तिने घाईघाईने आपल्या मैत्रिणींना बोलावून घेतलं.नशीबाने काही डिझाईन्स तिने तयार करुन ठेवल्या होत्या.तिने टेलरला गाठलं पण सिझनमुळे एकही टेलर ड्रेसेस शिवून द्यायला तयार होईना.आपणच आपल्याकडे एखादा टेलर ठेवून घ्यावा असं रेवतीला वाटू लागलं पण आता उशीर झाला होता.शहरात टेलर मिळेना म्हणून तिने जवळच्या एका खेड्यातून ड्रेसेस शिवून आणले.पण त्यातले बरेच ड्रेसेस चुकीचे शिवले गेले.या प्रकरणात रेवतीला खुप मनःस्ताप झाला.
रेवतीला आता जागा कमी पडू लागली होती.त्यातच साक्षीला तिची होणारी प्रगती जणू बघवत नव्हती.ती रेवतीला होणाऱ्या पसाऱ्याबद्दल घालूनपाडून बोलायची.शेवटी रेवतीने एक घर भाड्याने घ्यायचा निर्णय घेतला.साक्षीने त्यालाही विरोध केला.पण तिच्या आईवडीलांनी तिला पाठिंबा दिला.
आता रेवतीचं छान बस्तान बसलं.काही आणखी मुलींना तिने कामावर ठेवलं.शहरातले दुसरे अनेक दुकानदार तिला आँर्डर्स देऊ लागले.रेवतीला आता नफाही चांगला मिळू लागला.लग्नाचा सिझन संपला.या सिझनमध्ये रेवतीला दोन लाखाचा फायदा झाला होता.
एक दिवस अक्षयचा फोन आला.त्याचा आवाज ऐकून तिला खुप आनंद झाला.तिच्या बिझनेसची त्याने चौकशी केली.
”खुप छान चाललंय अक्षय.या सिझनमध्ये तब्बल दोन लाखाचा फायदा झाला बघ.आईबाबा दोघंही खुष आहेत.पण खुप धावपळ होतेय रे.थोडा आराम करावसा वाटतोय आता.”
”नाही रेवती धंद्यात कधीच आराम नसतो.आपण रिलँक्स झालो की मागे पडतो.इथे आपल्या नावावर चालत असतात बिझनेस. नांव खराब झालं की आपला धंदा कधी बसेल सांगता येत नाही.आता सिझन आँफ आहे तोपर्यंत नव्या घरात फर्निचरचं काम करुन घे.कपाटं झाली की माल सुरक्षित ठेवणं सोयीस्कर होईल.मार्केट ट्रेंडचा अभ्यास कर.स्वतःला अपडेट ठेव.मला काय वाटतं ,स्माँल स्केल इंडस्ट्रीजसाठी तुला कर्ज मिळेल.ते घेऊन एखादं दुकान टाकलं तर?आपला मालही तिथे विक्रीसाठी ठेवता येईल आणि दुकानदारांना कमिशन द्यावं लागणार नाही.म्हणजे पुर्ण प्राँफिट आपल्याला मिळू शकेल.अर्थात जोपर्यंत आपण सेटल होत नाही तोपर्यंत दुकानदारांना आपला माल द्यावाच लागणार”
रेवतीला ही कल्पना खुप आवडली.
” छान आयडिया दिलीस.मी बघते प्रयत्न करुन.बरं तुझं कसं चाललंय?”
”तसं सगळं व्यवस्थितच चाललंय गं.पण खरं सांगू कधी एकदा भारतात येतोय असं झालंय.
” मलाही तुझी खुप आठवण येते रे”असं म्हणायची तिला खुप इच्छा झाली पण मोठ्या प्रयासाने तिने ते शब्द गिळून टाकले.जुजबी बोलून त्याने फोन ठेवला.
रेवती आता कामाला लागली.धडपड करुन तिने व्यवसायासाठी कर्ज मिळवलं.एका मोक्याच्या ठिकाणी असलेलं एक दुकान तिला आवडलं.भाडं जास्त होतं पण लोकेशन महत्वाचं होतं.वडिलांची मदत घेऊन तिने त्यातलं फर्निचर करुन घेतलं.मुंबईला जाऊन स्त्रीपुरुष आणि लहान मुलांचे कपडे ती घेऊन आली.त्यासोबत स्वतः डिझाइन केलेल्या साड्या आणि ड्रेसेसही तिने “रेवती”या ब्रँड नावाने विकायला सुरुवात केली.थोड्याच दिवसात तिचा चांगलाच जम बसला.दुकानात दिवसभर गर्दी राहू लागली.ते पाहून तिने ३-४ सेल्सगर्ल दुकानात ठेवल्या.
एक दिवस साक्षी एका तरुणाला घेऊन घरी आली.सगळ्यांना तिने बोलावून घेतलं.”आई बाबा हा किशोर.माझा फेसबुक फ्रेंड.आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय”
वसुधाताईंना धक्काच बसला.साक्षी लहानपणापासूनच बंडखोर होती.मनात येईल तेच करायची पण आईवडिलांना विश्वासात न घेता लग्न ठरवणं चांगलंच धक्कादायक होतं.
” कधीपासून चाललंय तुमचं हे प्रकरण?आणि कुठे झाली तुमची ओळख”वडिलांनी विचारलं.
”अहो प्रकरण काय म्हणता बाबा?प्रेम आहे आमचं एकमेकांवर सहा महिन्यांपासून. वर्षभरापुर्वीच तर आमची फेसबुकवर ओळख झाली होती.आणि तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही बरं!किशोर चांगला ग्रँज्युएट आहे.त्याचं स्वतःचं चष्म्याचं दुकान आहे.सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्या जातीचा आहे.त्यामुळे तुम्हांला आँब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही.आणि तुम्ही ते घेतलं तरी मी किशोरशीच लग्न करणार आहे”
”साक्षी जर तुझं ठरलंच होतं आमच्याकडे आलीच कशाला?सरळ लग्नच करुन यायचं होतंस”वसुधाताईंनी संतापून तिला विचारलं.
”अगं किशोरला मी तेच म्हणत होते पण त्याचे संस्कार त्याला तसं करु देत नव्हते.दोघांच्या आईवडिलांची संमती घेतल्याशिवाय लग्न करायचं नाही असं त्याचं म्हणणं होतं”
”तुमचे आईवडिल तयार आहेत का?”साक्षीच्या बाबांनी किशोरला विचारलं.”हो आहेत.पण त्यांना तुम्हाला भेटायचंय.लग्नाची बोलणी करावी लागतील ना!”
”ठिक आहे मग.उद्याच पाठवून द्या त्यांना”वसुधाताईंनी सांगितलं.तसे ते दोघं आनंदाने बाहेर निघून गेले. ते गेल्यावर वसुधाताई म्हणाल्या
”फार हट्टी आणि हेकेखोर पोरगी आहे ही साक्षी.आईवडिल,बहिणीला मुलगा कसा आहे, हे विचारायचीसुध्दा गरज भासली नाही तिला.तुला कसा वाटला मुलगा रेवती?”
”मुलगा स्मार्ट आहे गं पण त्याच्या नजरेत तेज नाही.सुस्त वाटते त्याची नजर”रेवती म्हणाली
”मलाही तेच वाटतंय गं.पण जाऊ दे स्वभावाला चांगला असला म्हणजे झालं”
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किशोरचे आईवडील आणि मामा आले.लग्नाची बोलणी सुरु झाली आणि त्या बोलण्यावरुन रेवतीला जाणवलं की मुलाकडची मंडळी अतिशय हावरट आहेत.हुंडा नको पण त्याबदल्यात त्यांनी अनेक वस्तू मागून घेतल्या.ते पाहून रेवतीचे वडील म्हणाले
”अहो हे लव्ह मँरेज आहे की अँरेड मँरेज?साँरी मी तुमच्या इतक्या मागण्या पुर्ण नाही करु शकत.मी एक खाजगी नोकरी करणारा माणूस.माझी इतकी क्षमता नाही”
”अहो साहेब”किशोरचे मामा बोलू लागले”मुलाला काय कमी आहे?एकूलता एक आहे.वडिलानंतर सगळी प्राँपर्टी त्याचीच होणार आहे.कशाला एवढ्याशा गोष्टीवरुन लग्न मोडता?आणि तुमच्या धाकट्या मुलीची कमाई काही कमी नाहीये.बहिणीच्या लग्नासाठी थोडीफार वापरली तर काय फरक पडणार आहे?”
रेवतीच्या वडिलांना त्यांचा खुप संताप आला.ते संतापात काही बोलणार तेवढ्यात वसुधाताईंनी त्यांना नजरेने शांत बसायला सांगितलं.
बैठक आटोपली.साक्षीच्या आईवडिलांना मनसोक्त ओरबाडून तिच्या सासरची मंडळी निघून गेली.साक्षीचे वडिलही काही कामानिमित्त बाहेर निघून गेले.वसुधाताईंनी आत बसलेल्या साक्षीला हाक मारली.ती आल्यावर त्या म्हणाल्या
”साक्षी हा काय प्रकार आहे.लव्ह मँरेज म्हणायचं आणि भिकाऱ्यासारखं काहीबाही मागतच सुटायचं”
”अगं आई मग काय झालं?एवढा तर त्यांचा हक्कच आहे आपल्यावर.शेवटी आपण मुलीकडचे ना?”
”अस्सं!तू आता तिकडची झाली वाटतं.आणि काय गं,तुझ्या वडिलांच्या परीस्थितीचा अंदाज नाहीये का तुला?कुठून आणतील ते एवढे पैसे?”
”अगं आई आपली रेवती आहे ना!धबधब्यासारखं चालतंय तिचं दुकान!सहज देईल ती ४-५ लाख रुपये”
”तिच्या पैशावर तू नजर ठेवू नकोस.काडीचीही मदत केली नाहीस तू तिला.सगळं स्वतःच्या मेहनतीवर केलंय तिने”वसुधाताई रागारागाने म्हणाल्या.
”आणि त्या दुकानावर कर्जही आहे ताई”रेवती मध्येच म्हणाली.
”शी.. बाई!मी ना लग्नाआधी प्रेग्नंट राहिले असते ना तेव्हा तुम्हांला समजलं असतं.झक मारुन तुम्ही माझं लग्न लावून दिलं असतं.आणि तुम्ही माझं लग्न लावून दिलं नाही ना तर बघा तो किशोर काय करतो ते!”
”म्हणजे?काय करेल तो?”वसुधाताईंनी धास्तावून विचारलं.
साक्षी पाय आपटत गेली आणि मोबाईल घेऊन आली.गँलरी उघडून तिने तिचे आणि किशोरचे एकमेकांना मिठ्या मारत असलेले,चुंबनं घेत असलेले फोटो दाखवले.बहुतेक फोटो समुद्रावरचे होते आणि साक्षी अतिशय तोकड्या कपड्यात दिसत होती.वसुधाताईंना आणि रेवतीला ते फोटो पाहून घाम फुटला.
”क..धी क..धी काढलेत हे फोटो आणि कुठले आहेत”थरथरत्या आवाजात त्यांनी विचारलं.
”मागे मी तुला म्हंटलं होतं ना की मी माथेरानच्या सहलीला मैत्रिणींसोबत चाललेय म्हणून.मी तिकडे गेलेच नव्हते.मी किशोरसोबत गोव्याला गेले होते”
साक्षी हसत हसत म्हणाली.
“निर्लज्ज!लाज नाही वाटली तुला आईवडिलांच्या डोळ्यात धुळ फेकायला?”वसुधाताई संतापून म्हणाल्या.
“काम डाऊन मम्मा.आता तुम्ही जर लग्नाला नाही म्हंटलं तर किशोर हे सगळे फोटो व्हायरल करेल.म्हणजे समाजात तुम्हांला तोंड दाखवायला जागा रहाणार नाही”
“नालायक”वसुधाताईंनी तिच्या थोबाडीत मारायला हात उचलला पण रेवतीने त्यांना अडवलं.
“जाऊ दे आई.शांत हो.देईन मी तुम्हाला पैसे”
साक्षी छद्मीपणाने हसत निघून गेली.
साक्षीचं लग्न झालं.तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या आईवडिलांना खुप छळून घेतलं.मान पान,रुसवेफूगवे निस्तरतांना त्यांच्या नाकी नऊ आले.
साक्षी सासरी गेली तसं रेवतीला एकदम हायसं वाटलं.साक्षी तिची कायम उपेक्षा करायची.येताजाता तिचा पाणऊतारा करायची.तिला “लंगडी लंगडी”म्हणून चिडवायची.रेवती ते निमुटपणे सहन करायची.आता हे सगळे प्रकार बंद झाले होते.
एक दिवस अक्षयचा फोन आला.त्याचा काँल पाहून ती मोहरली.
“रेवती अगं जानेवारीमध्ये माझ्या चुलतबहिणीचं लग्न आहे.लग्नाचे सगळे कपडे तुझ्या दुकानातून घ्यायला मी काकाकाकूंना सागितलंय.खुप धोधो चालतंय म्हणे तुझं दुकान.मागे माझा एक मित्र तुझ्या दुकानात आला होता.तिथली गर्दी पाहून त्याने मला रिपोर्ट दिला”
रेवती हसली.म्हणाली”तुझ्या प्रोत्साहनामुळे आणि देवाच्या दयेने सगळं व्यवस्थित चाललंय”
अक्षय हसला.
“माझं कसलं प्रोत्साहन?लंडनमध्ये बसल्याबसल्या शाब्दिक फुगे मी सोडत असतो.बरं ते जाऊ दे.तुझे कर्जाचे हफ्ते फिटले असतील तर नवीन कर्ज घे आणि ते दुकानच खरेदी करुन टाक.तुला तो जागामालक दाद देणार नाही.अवाच्यासवा पैसे मागेल.मी पप्पांना सांगतो त्यांच्याशी बोलायला.आणि हो काही वेस्टर्न कपड्यांचे व्हिडीओ पाठवतो तुला.आपल्या ट्रेडिशनल कपड्यांशी फ्युजन करता आलं तर बघ”
“बरं बघते.मी आता आँनलाईन बिझीनेस सुरु करतेय.रेवती डिझाईनर्स नावाने एक व्हाँट्सअप ग्रुपही सुरु केलाय. त्यालाही प्रचंड प्रतिसाद आहे.बरं तू येतो आहेस ना लग्नाला?”
“हो पण मी दोनच दिवसांकरीता येतोय.ते दोन्ही दिवस लग्नातच जातील.आपली भेट तिथेच होईल.लग्नात तुला गाणी म्हणायची आहेत बरं का!मी त्यांना सांगून ठेवलंय.बरं ठेवतो.जरा गडबडीत आहे”
त्याने फोन ठेवला तसा रेवतीला त्याचा रागच आला.किती बोलायचं होतं तिला त्याच्याशी.सुखदुःखाच्या गप्पाही मारायच्या होत्या पण त्याला फक्त तिच्या भवितव्याची काळजी होती.
अक्षयच्या सांगण्यावरुन त्याच्या वडिलांनी जागामालकाशी बोलणं केलं आणि ते दुकान रेवतीच्या नावावर झालं.
जानेवारी उजाडला तसे अक्षयचे काका,काकू आणि चुलतबहिण रेवतीच्या दुकानात येऊन तीन लाखाच्या कपड्यांची खरेदी करुन गेले.”रेवती”ब्रँडच्या साड्या आणि ड्रेसेस त्यांना फार आवडले.जातांना रेवतीला लग्नाची पत्रिका आणि आग्रहाचं निमंत्रण द्यायला विसरले नाहीत.
एक दिवस साक्षी घरी आली.लग्नानंतर तिचं येणं कमीच झालं होतं त्यामुळे वसुधाताईंना आनंद झाला.
“काय मजेत चाललंय ना सर्व?”त्यांनी तिला विचारलं.
“माझं मजेत चाललंय गं.किशोर सध्या गडबडीत आहे.दुकानाचं रिनोव्हेशन करायचंय ना त्यासाठी पैशाची जमवाजमव सुरु आहे.आई तू मला देशील काही पैसे?”
ही भेटण्यासाठी नाही तर पैसे घेण्यासाठी आलीये हे कळल्यावर वसुधाताईंचा चेहरा पडला.
“साक्षी तुझ्या लग्नात किती खर्च झाला तुला माहितेय ना?तुझ्या सासरच्या लोकांनी अगदी छळून छळून आम्हांला खर्च करायला लावला.आता कुठून येणार आमच्याकडे पैसे?”
‘अगं मी तुला जास्त मागत नाहिये. फक्त तीन लाख दे”
“काय्यsss फक्त तीन लाख?साक्षी तुला वेड लागलंय का?तीन लाख काही कमी रक्कम आहे का?तुझ्या बाबांची अशी प्रायव्हेट नोकरी.कसं शक्य आहे”
“अगं रेवतीकडून घेना!एवढी कमवतेय ती.थोडेसे बहिणीला दिले तर काय बिघडलं?”
“आणि तिच्या लग्नाला कुठून आणणार?शिवाय तिने नुकतंच कर्ज घेतलंय त्याचे हफ्ते सुरु आहेत”
“आई तू पण ना जोक करतेस.अगं त्या लंगडीशी कोण लग्न करणार आहे?केलंच तर एखादा लूळा,पांगळा,आंधळा करेल.त्याला तुला हुंडा थोडाच द्यायचाय.शिवाय रजिस्टर मँरेज.कशाला हवेत पैसे?”
” ते काही नाही.यावेळी तुला पैसे मिळणार नाहीत.पुढे पाहू” वसुधाताई ठामपणे म्हणाल्या।
“मला वाटलंच”साक्षी संतापून म्हणाली “तरी किशोर म्हणत होता,तुझ्या माहेरचे हलकट आहेत,पैसे देणार नाहीत.पण मीच वेडी.खुप अपेक्षा घेऊन आले होते”
” साक्षी तोंड सांभाळून बोल.आम्ही हलकट काय?”वसुधाताई संतापल्या”तुझं एवढं लग्न लावून दिलं तरीसुध्दा तू…..”
“काही उपकार नाही केले माझ्यावर.नसतं करुन दिलं!राहिले असते मी किशोरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये!”
वसुधाताईंना संताप अनावर झाला. त्यांनी एक तिच्या थोबाडीत ठेऊन दिली.आईचा तो अवतार पाहून साक्षी स्तब्ध झाली.मग जोरजोरात रडत आणि आईकडे रागाने बघत ती बाहेर जाण्यासाठी वळली.
“लक्षात ठेव आई यापुढे मी तूझ्या घरी कधीच पाय ठेवणार नाही.मी असंच समजेन की माझ्या माहेरचे मेले आहेत” आणि ती रागारागाने घराबाहेर पडली.तिच्या शेवटच्या वाक्याने वसुधाताईंना रडू अनावर झालं.
रात्री रेवती आणि वडिल घरी आल्यावर वसुधाताईंनी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला.रेवतीचे वडिल गंभीर झाले.
“असं व्हायला नको होतं पण साक्षी लहानपणापासूनच स्वार्थी आहे.मी बघतो.एक लाख तरी जमवून द्यावे लागतील त्यांना नाहीतर जावई नाराज होतील”
“तुम्ही राहू द्या बाबा.माझ्याकडे आहेत एक लाख.देऊ ते आपण”रेवती म्हणाली.साक्षी एवढे तिच्याबद्दल अपशब्द बोलून गेली तरी रेवती इतका मोठेपणा दाखवतेय हे पाहून वसुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं.
दोन दिवसांनी वसुधाताईंनी साक्षीला “एक लाखाची व्यवस्था झाली आहे”हे सांगायला फोन केला.फोन तिच्या सासुबाईंनी उचलला.
“कुठपर्यंत आलंय रिनाँव्हेशन?”वसुधाताईंनी विचारलं.
“रिनाँव्हेशन?कसलं रिनाँव्हेशन?”
“अहो तुमच्या चष्म्याच्या दुकानाचं.साक्षी सांगत होती”
“छे हो!अहो मागच्या वर्षीच तर नविन फर्निचर केलं होतं.आता कशाला करणार रिनाँव्हेशन?”
याचा अर्थ साक्षी खोटं बोलत होती.
“बरं साक्षी कुठे आहे?”
“ती आणि किशोर गेलेत ट्रँव्हल एजंटकडे.त्यांना सिंगापूर मलेशियाला जायचंय ना!त्याचं बुकींग करायला गेलेत.आता तुम्हीच सांगा दुकान सांभाळायचं सोडून हे असं म्हाताऱ्या बापाच्या अंगावर दुकान टाकून यांचं भटकणं बरं दिसतं का?बरं फिरायला जायचं तर स्वतःच्या कमाईने फिरा.आम्हांला कशाला पैसे मागता?मी सरळ नाही सांगितलं. तुम्हीही पैसे दिले नाहीत असं साक्षी सांगत होती.फार छान केलंत.मग साक्षीने तिच्या बांगड्या आणि किशोरने अंगठी मोडून पैसे जमा केलेत.चाललेत आता उधळायला!”
वसुधाताईंना धक्काच बसला.थोडं जुजबी बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.रेवती जवळच उभी होती होती.तिने “काय झालं”असं विचारताच त्या कडवट स्वरात म्हणाल्या
“तिला दुकानासाठी नाही तर फिरायला जाण्यासाठी पैसे हवे होते.झालंय तिचं आता पैशाचं काम.आपल्याला पैसे द्यायची गरज नाही”
अक्षयच्या चुलतबहिणीचं लग्न एका थ्री स्टार हाँटेलमध्ये होतं.लग्नाच्या आदल्या रात्री म्युझिकल नाईटचा कार्यक्रम होता त्यात रेवतीला गाणी म्हणायची होती.रेवतीला त्या गाण्यांपेक्षा अक्षयला भेटायची ओढ लागली होती.ती आणि तिची आई हाँटेलवर पोहोचल्यावर अक्षयच्या आईनेच त्यांचं हसून स्वागत केलं.रेवतीचा हात धरुन त्या दोघींना आत घेऊन गेल्या.आतला झगमगाट बघून रेवतीचे डोळे दिपून गेले.एवढ्या उच्चभ्रू लोकांच्या लग्नात ती पहिल्यांदाच आली होती.तिथल्या हाय हिल्स सँडल घालून ऐटीत चालणाऱ्या पोरी पाहून तिला त्यांचा मत्सर वाटला.टिव्हीवरच्या फँशन शो मध्ये रँम्पवर चालणाऱ्या पोरी पाहिल्या की तिला असाच आपल्या अधू पायाचा संताप यायचा.विषादाने तिने आपली नजर त्या पोरींवरुन हटवली.तेवढ्यात समोरून अक्षय आला.तो इतका देखणा दिसत होता की त्याला मिठी मारायची इच्छा रेवतीच्या मनात तरळून गेली.पण तिने स्वतःला सावरलं.त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात उमटू न देण्याचा ती आटोकाट प्रयत्न करु लागली.
“नमस्कार काकू.हाय रेवती. कशा आहात तुम्ही?या ना बसू आपण जरा गप्पा मारत”त्याने दोघींना सोफ्यावर बसवलं.
” दुकान व्यवस्थित चाललंय ना?”रेवतीकडे पहात त्याने विचारलं.”तुझे ड्रेसेस आणि साड्या सगळ्यांना खुप आवडल्या बरं का!सगळे विचारत होते रेवती कुठून शिकलीय ड्रेस डिझाईनिंग म्हणून.मी त्यांना म्हंटलं शी इज ए बोर्न डिझायनर” सगळे हसले.
“तू कधी येतोयेस भारतात परत?”रेवतीने विचारलं.
“बस सहा महिन्यांनी” तेवढ्यात स्टेजवर गाणं सुरु झालं.ते ऐकून अक्षय म्हणाला
“अगं रेवती,केव्हाची ही मंडळी बोर करताहेत.तू जरा २-३ गाणी म्हणून मुड तरी रिफ्रेश कर सगळ्यांचा.चल जाऊ या स्टेजकडे?” ती दोघं स्टेजवर पोहोचल्यावर अक्षयने रेवतीचा परीचय करुन दिला.शुन्यातून सुरुवात करुन तिने स्वबळावर व्यवसायात किती उत्तूंग भरारी घेतलीये याचीही त्याने माहिती दिली.
रेवतीने गाणं म्हणायला सुरुवात केली तसे हाँलमधले सर्वजण स्तब्ध झाले. लागोपाठ तीन गाणी म्हणून रेवतीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.
टाळ्यांच्या कडकडात रेवती आईजवळ येऊन बसली.तेवढ्यात एक वयस्कर माणूस तिच्याकडे आला.
“नमस्कार.मी अनिल पाटील.मी म्युझिक डायरेक्टर आहे.बऱ्याच मराठी चित्रपटांना मी संगीत दिलंय.फार सुंदर गाणी म्हंटली तुम्ही.नुकतीच दोन चित्रपटांना संगीत देण्याची जबाबदारी माझ्यावर पडलीये.मला त्यासाठी एक वेगळा आणि फ्रेश आवाज हवा होता.मला वाटतं तुम्ही त्यासाठी योग्य आहात.”
रेवती एकदम आनंदीत झाली.ती एकदम उत्साहाने म्हणाली.
“हो मी तयार आहे.पण तुम्ही आज इथे कसे?म्हणजे इथे कुणी नातेवाईक आहेत का तुमचे?”
“नाही नाही.अक्षयच्या मित्राचा मी नातेवाईक. मागे एका कार्यक्रमात तुम्ही म्हंटलेली गाणी त्याने मोबाईलवर रेकाँर्ड केली होती.ती त्याने मला पाठवली.तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता .अक्षयशी बोलल्यावर त्याने सरळ आजच्या कार्यक्रमाचा निमंत्रण दिलं.मी तुम्हांला रेकॉर्डिंगच्या तारखा कळवतो तुम्ही मुंबईला या.खुप ब्राईट फ्युचर आहे तुमचं.ही संधी वाया घालवू नका.”
रेवतीची नजर अक्षयला शोधू लागली.तो जवळच एकाशी गप्पा मारत होता.पण त्याची नजर रेवतीकडेच होती.तिने त्याच्याकडे बघताच त्याने बोटांनी ” व्ही”आका़र केला.
रात्री दोघी मायलेकी घरी परतल्यावर वसुधाताईंनी तिला विचारलं.
“रेवती अक्षय आवडतो ना तुला?”
रेवती अवघडली.कसंबसं म्हणाली “हो”
” तुझं प्रेम आहे त्याच्यावर?”
आता मात्र रेवती गंभीर झाली.
“आई माझं असून काय उपयोग?त्याचं तर असायला पाहिजे ना माझ्यावर?”
“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये रेवती”
“हो” रेवतीने अवघडून उत्तर दिलं.
“मग तू त्याला सांगून का नाही टाकत”
“कसं सांगू आई मी त्याला?तो एवढा देखणा, श्रीमंत. आपली आणि त्याची बरोबरी होऊच शकत नाही आई.”
“रेवती तू सुध्दा सुंदर आहेस बेटा “
“हो पण मी अपंग आहे ना”एकदम तिच्या डोळ्यात पाणी आलं.”तू पाहिलं ना किती सुंदर आणि धडधाकट मुली त्याच्यासोबत फिरत होत्या.माझ्यासारख्या अपंग मुलीशी त्याने का लग्न करावं?मी शोभून तरी दिसेन का त्याला?.आणि मला कधीही त्याच्या नजरेत माझ्याबद्दलचं प्रेम आढळून आलं नाही.”
” मग तुझ्यासाठी त्याने आजपर्यंत केलं ते काय होतं?”
“ती फक्त सहानुभूती होती आई!एका लंगड्या मुलीबद्दल चारचौघांना वाटणारी सहानुभूती”
बोलता बोलता ती रडू लागली.वसुधाताईंनी तिला जवळ घेतलं.
“बस रडू नको.आपण तुझ्यासाठी चांगली स्थळं पाहू.पण मला वाटतं तुझ्या मनातलं त्याला सांगून टाकावं”
“नाही आई,तो नाही म्हंटला तर मी मरुन जाईन.पुन्हा कधी आयुष्यात मी उठू शकणार नाही”
“ठिक आहे मग,उद्यापासूनच तुझ्या बाबांना स्थळं बघायला सांगते.चालेल ना?”
“आई पण लग्न केलंच पाहिजे का?अक्षय सोडून दुसऱ्या पुरुषाशी संसार करणं मला फार अवघड जाईल गं”रेवती काकुळतीने म्हणाली.
“बाईला नेहमीच तडजोडी कराव्या लागतात बेटा!तुही त्या करशील”
वसुधाताईंच्या सांगण्यावरुन रेवतीच्या वडिलांनी स्थानिकच नव्हे तर पुणे,मुंबईच्या वधुवर सुचक केंद्रात रेवतीची नोंदणी केली.नातेवाईक,मित्र,परिचित यांना रेवतीसाठी स्थळ पाहण्याचे मेसेज पोहोचले.
एक दिवस साक्षी मोठी बँग घेऊन घरी आली.आल्याआल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली.
“अगं काय झालं साक्षी.का रडते आहेस.”
“आई मी घर सोडून आलीये.माझ्या सासूसासऱ्यांनी आम्हांला घराबाहेर काढलं”
“बापरे पण असं झालं तरी काय?आणि जावईबापू कुठे आहेत?”
“नांव नको घेऊ त्याचं!एक नंबरचा ऐदी कुठला!त्याच्याचमुळे झालं हे सगळं!काहीच काम करत नाही गं.जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल घेऊन बेडवर पडलेला असतो.मस्त सकाळी दहा वाजता उठायचं.अकरा वाजता अंघोळ करायची.मनाला आलं तर दुकानात जायचं नाही तर घरीच लोळत पडायचं.माझे सासरेच दुकान सांभाळतात.आता त्यांचंही वय झालं.त्यांनाही वाटतं मुलाने दुकानाची जबाबदारी घ्यावी.पण या साहेबांना फक्त लोळत पडायला पाहिजे.वरुन माझ्यावर रुबाब करायचा ‘मला हे खायला करुन दे ते करुन दे”मी त्याला म्हंटलं की तुला नाही जायचं दुकानात तर नोकरी तरी कर.काही तर कमव.तर म्हणतो ‘माझ्या खानदानात कुणी नोकरी केली नाही.मीही करणार नाही.माझ्याऐवजी तूच नोकरी कर’.मग आमचं खुप भांडण झालं.माझे सासूसासरेही त्यात पडले.आम्हां दोघांनाही खुप बोलले आणि आम्हांला दुसरं घर बघायला सांगितलं”आणि ती परत जोरजोरात रडू लागली.
” अगं पण जावईबापू कुठे गेलेत?”
“मसणात जाऊ दे त्याला!मला काही देणंघेणं नाही त्याच्याशी.मला नाही रहायचं आता त्याच्याबरोबर”
“अगं पण ताई तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना?”
रेवती म्हणाली तशी साक्षी उसळली
” बोडख्याचं प्रेम!लग्नाअगोदर मला तो मला सांगायचा की त्याच्याकडे तीन पिढ्या बसून खातील इतकी इस्टेट आहे.पण कसंचं काय!एक फ्लँट सोडला तर काहीच नाही त्याच्याकडे.अगं ते चष्म्याचं दुकानही त्यांचं स्वतःचं नाही ,भाड्याचं आहे.फसवलं त्याने मला.मी त्याच्या चेहऱ्यावर आणि खोट्या इस्टेटीवर भाळले.”
“तरी किशोरला पाहून रेवती म्हणतच होती की मुलगा आळशी दिसतोय म्हणून”वसुंधराताई म्हणाल्या तशी साक्षी रेवतीकडे रागारागाने बघत म्हणाली.
” तू तेव्हाच का नाही सांगितलं मला?माझ्या या परीस्थितीला तूच जबाबदार आहेस.आता तूच दे मला कुठेतरी पाचदहा हजाराची नोकरी !”
” तिला बोलू नकोस साक्षी.तिचं काहीच चुकलं नाही.तू तेव्हा ऐकण्याच्या तरी मनस्थितीत होती का?”वसुधाताई कठोरपणे म्हणाल्या.
“मला वाटलंच तू तिचीच बाजू घेशील म्हणून.सध्या नोटा छापतेय ना ती!”
साक्षी दोघींकडे रागाने पहात म्हणाली. मग तिने आपली बँग घेतली आणि पाय आपटत रेवतीच्या रुमकडे निघून गेली.
“बापरे ही तर जबरदस्तीच घुसलीय.आता काय करायचं रेवती?”
“माझ्या एका कस्टमरच्या आँफिसात क्लार्कची जागा आहे.परवाच तो मला सांगत होता.तिथे लावून देते तिला नोकरीला.उद्या बाबा गांवाहून आले की तिच्या सासूसासऱ्यांकडे जाऊन त्यांना समजावून या.थोडं किशोरपंतांनाही समजावण्याची गरज आहे.त्यांनी अती केलं असेल म्हणून तर एकुलत्या एक मुलाला त्यांच्या आईवडिलांनी बाहेर काढलं असेल”
लेकीचा समजूतदारपणा पाहून वसुधाताई भारावल्या.
आठवडाभरात वातावरण निवळलं.साक्षीला रेवतीच्या ओळखीने नोकरी मिळाली. रेवतीच्या बाबांच्या सांगण्यावरुन किशोरचे आईवडील किशोरवर दुकान सोपवून तिर्थयात्रेला निघून गेले.नाईलाजास्तव का होईना किशोर नियमित दुकानात जाऊ लागला.वसुधाताई साक्षीला ती नाही म्हणत असतांनाही तिच्या सासरी सोडून आल्या.
अक्षय भारतात परतला.रेवतीला आनंद झाला.एकदोनदा त्याच्याशी फोनवर बोलतांना रेवतीने त्याला घरीही बोलावलं.पण एका प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने जमेल तसा येऊन जाईन असं त्याने सांगितलं.
रेवतीला आता स्थळं येऊ लागली होती.त्यात काही धडधाकट मुलांचीही होती.रेवतीचं सौंदर्य आणि तिची कमाई पाहून ही स्थळं येत होती यात शंका नव्हती.एकदा असंच एक स्थळ चालून आलं.मुलगा खाजगी कंपनीत होता पण रेवतीच्या कमाईच्या तुलनेत त्याचा पगार निम्मासुध्दा नव्हता.शहरातलाच होता म्हणून रेवतीही तयार झाली.एका संध्याकाळी मुलगा आईवडिलांसोबत रेवतीला पहायला आला.रेवती पोह्यांच्या डिशेस घेऊन आली.त्यांनी तिला बसायला सांगितलं. तिच्या शिक्षण आणि व्यवसायाबद्दल त्यांनी प्रश्न विचारले.मग मुलाची आई म्हणाली.
“जरा चालून दाखव बरं.आम्हांला तू किती अपंग आहेस हे बघायचंय”
ती विचित्र मागणी ऐकून रेवती अचंबित झाली.काय करावं या संभ्रमावस्थेत असतांनाच मुलाचे वडील म्हणाले
“अगं उठ ना!काय लाज वाटते का तुला अपंगपणाची?”रेवतीला अपमान वाटला तरी ती उठली.त्यांनी तिला हाँलमध्ये तीन चकरा मारायला लावल्या.
“चांगलीच अपंग आहे हो ही.तिच्याबरोबर फिरतांना किती आँकवर्ड वाटेल मुलाला!
ठिक आहे.चालवून घेऊ आम्ही पण देण्याघेण्याचं काय?”
मुलाच्या आईने विचारलं.
“तुम्ही सांगा” रेवतीचे वडील म्हणाले.
“लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करायचा”मुलाची आई बोलू लागली ” मुलामुलीचे दागिने, कपडा तुम्हीच करायचा.आम्ही फक्त लग्नाला येऊ.शिवाय आम्ही मुलासाठी एक फ्लँट घेतोय.पन्नास लाखाचा.त्यातले पंचवीस लाख तुम्हांला द्यावे लागतील”
रेवतीच्या वडिलांना घाम फुटला.
“बापरे,अहो एवढं तुम्हांला द्यायचं म्हंटलं तर माझ्यावर भीकच मागायची वेळ येईल”
“कमाल करता .तुमच्या अपंग मुलीला आम्ही मरेपर्यंत सांभाळणार आहोत त्याची किंमत द्यायला नको?”मुलाची आई रागात म्हणाली.
“मला माफ करा.माझी तितकी क्षमता नाही”रेवतीचे बाबा दुःखाने म्हणाले.
“मग राहू द्या तुमच्या मुलीला जन्मभर तुमच्याचकडे.चला हो.निष्कारण वेळ घालवला आपला या फालतू लोकांनी”असं म्हणून मुलाची आई पोहे अर्धवट टाकून उठली.तिच्यामागे तिचा मुलगा आणि नवराही उठले आणि निघून गेले.आता मात्र रेवतीला रडू आवरलं नाही.वडिलांना मिठी मारुन ती रडू लागली.
“नका हो बाबा मला असं अपंगत्वाचं प्रदर्शन करायला लावू”तिचे बाबाही गहिवरले.तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.”रडू नकोस बेटा.त्या देवाने तुझ्यावर अन्याय केलाय ना तोच एक दिवस तुला सोन्याचा दिवस दाखवेल”
रेवती काहीच बोलली नाही पण कितीतरी वेळ रडत राहीली.त्यादिवसानंतर रेवतीच्या आईवडिलांनी अपंग स्थळांवर जास्त भर द्यायचं ठरवलं.खरं तर कर्तृतत्वान असलेल्या मुक,बधीर, अंध,अपंग मुलांसोबत लग्न करायलाही रेवती तयार होती.पण तशी मुलंच मिळत नव्हती.जी स्थळं यायची ती मुलं आत्मविश्वास गमावलेली,परीस्थितीने खचून गेलेली दिसायची.आणि तेच रेवतीला नको होतं.
या सगळ्या घडामोडीत वर्ष उलटून गेलं.रेवतीला आता या सगळ्याचा कंटाळा आला होता.बऱ्यापैकी आर्थिक परीस्थिती असलेल्या कोणत्याही अपंग मुलाशी लग्न करुन मोकळं व्हावं असं तिला वाटू लागलं होतं.
एक दिवस मात्र एक चांगलं स्थळ तिला सांगून आलं.मुलगा एका सरकारी खात्यात अधिकारी होता.एका हाताने अधू होता.त्याला वडील नव्हते.रेवतीला तो पहायला आला तेव्हा त्याच्यासोबत त्याची आई,भाऊ आणि वहिनी आली होती.मुलाला जाड भिंगाचा चष्मा होता.आणि चेहऱ्यावरुन उर्मट वाटत होता.रेवतीला तो अजिबात शोभून दिसत नव्हता.चहा पोह्याचा कार्यक्रम झाल्यावर त्याची आई म्हणाली.
“आम्हांला पसंत आहे मुलगी.पण आमच्या काही अटी आहेत.आमची जाँइंट फँमिली आहे आणि आमच्याकडचे पुरुष घरातील कोणत्याही कामाला हात लावत नाहीत.आमच्या घराण्याची रीतच आहे तशी.त्यामुळे तुमच्या मुलीला व्यवसाय सोडावा लागेल.तशीही तिच्या कमाईची आम्हांला गरज नाही.आमच्या मुलाला वरकमाई भरपूर आहे.आणि हो तुमच्या मुलीच्या पायात व्यंग असल्याने आमचा मुलगा तिला पार्ट्या, फंक्शनला नेणार नाही.त्याचा तुमच्या मुलीने इश्यू करता कामा नये”
वसुधाताईंना संताप आला.’ जर बायकोच्या अपंगत्वाची इतकीच लाज वाटते तर तिच्याशी लग्न करताच कशाला?आणि जरा स्वतःचं थोबाड पहा.माझ्यामुलीला जरा तरी शोभतं का ते बघा ‘असं बोलायचं अगदी त्यांच्या ओठावर आलं होतं पण त्यांनी संयम पाळला.
त्या अटींनी एकदम शांतता पसरली.मग रेवतीचे वडील तिचा भंग करत म्हणाले.
“ठिक आहे.एवढा भरभराटीला आलेला व्यवसाय सोडणं कठिणच आहे.तरीही आम्हाला आठ दिवसांचा अवधी द्या.मी कळवतो तुम्हांला”
“लवकर कळवा.खुप स्थळं सांगून येताहेत त्याला.आठ दिवसात तुमचं उत्तर आलं नाही तर आम्ही दुसरी स्थळं बघायला सुरुवात करु”मुलाचा भाऊ उर्मटपणे बोलला.
ते निघून गेल्यावर रेवतीच्या वडिलांनी तिला विचारलं “काय म्हणतेस रेवती?कसा वाटला तुला मुलगा?”
“मी तयार आहे बाबा लग्नाला”रेवती म्हणाली तसा दोघांनाही धक्काच बसला.
“अगं रेवती किती उर्मट माणसं आहेत ती!तुझ्या व्यंगावर बोट ठेवतात. त्यांचा मुलगा कसा आहे ते नाही बघत”वसुधाताई थोडं चिडूनच बोलल्या.
“असू दे आई.माझं बाहेगांवी लग्न ठरलं असतं तरी मला दुकान सोडावंच लागलं असतं.तुम्हांला मी सगळं समजावून देईन.तुम्ही दोघं मिळून आरामात चालवू शकाल दुकान.दुसरं मला मनासारखं स्थळ मिळणार नाही याची मला कल्पना होती आई.तुही त्यादिवशी म्हणत होतीच की बाईच्या जातीला तडजोडी कराव्याच लागतात.मग आताच तडजोड केलेली काय वाईट.काही काळजी करु नका.मी करेन लग्न”
दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघत असतांनाच ती निघून गेली.
चार दिवसांनी अक्षयचा घरी फोन आला.वसुधाताईंनी तो उचलला.
“काकू रेवतीचा मोबाईल बंद लागतोय आणि दुकानातला फोन सारखा एंगेज लागतोय”
“हो अरे तिचा मोबाईल खराब झालाय.काही काम होतं का तिच्याशी?”
“काकू परवा साक्षी भेटली होती.ती सांगत होती रेवतीचं लग्न जवळपास पक्कं झालंय म्हणून.मी विचारल्यावर तिने मुलाचं नांव आणि माहिती दिली. मी त्या मुलाची माहिती काढली तो एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी आहे शिवाय त्याच्या घरातलं वातावरण ठिक नाहीये.मुलाच्या भावाच्या पहिल्या बायकोने आत्महत्या केलीये.त्याची दुसरी बायको त्याच्याच घरात मोलकरणीचं काम करत होती.”
वसुधाताईंना धक्का बसला.
“रेवतीला आवडला का तो मुलगा?”अक्षयने विचारलं
“आवडला असं नाही.पण धडधाकट मुलं तिच्याशी लग्न करायला तयार नाहीत.मग व्यंग असलेल्या मुलांशीच तडजोड करणं भाग आहे म्हणून खुप वैतागून ती तयार झालीये.”
“दोन दिवस थांबा काकू.मी तुमच्याकडे एक स्थळ पाठवतो.ते तुम्हांला नाही आवडलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता”
“ठिक आहे.थांबतो आम्ही.पाठव तू.कोण आहेत ते?”
“ते तुम्हांला आल्यावर सांगतीलच सगळं”
रात्री रेवती घरी आल्यावर वसुधाताईंनी अक्षयशी झालेलं बोलणं तिला सांगितलं
“बघ मी तुला म्हंटलं नव्हतं त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये म्हणून!मला नकोय आई त्याची सहानुभूती. तू याच मुलाशी माझं नक्की कर”भरलेल्या डोळ्यांनी रेवती म्हणाली.
“हट्टीपणा नको करुस रेवती.दोन दिवस वाट बघू.बघूया कसं स्थळ पाठवतोय तो”
रेवतीने अश्रू पुसत मान डोलावली.
दोनाचे तीन दिवस होऊन गेले तरी कुणी आलं नाही.अक्षयचा फोनही नव्हता.रविवारच्या संध्याकाळी रेवती आईवडिलांसोबत बसली असतांना तिचे वडिल म्हणाले
“काय करायचं?अक्षयला फोन लावायचा की त्या मुलाच्या घरी कळवून टाकायचं?त्यांनी दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे”
“खरं तर अक्षय फसवणारा मुलगा नाहिये.काहीतरी प्राँब्लेम असावा.रेवती दे तर तुझा मोबाईल. मी करते अक्षयला फोन”
रेवती अक्षयला फोन लावणार तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ बेल वाजली.वसुधाताईंनी जाऊन दरवाजा उघडला.बाहेर अक्षयचे आईवडिल उभे होते.
वसुधाताईं त्यांना पाहून आश्चर्यचकीत झाल्या पण त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि आत बसवलं.रेवती किचनमध्ये पाणी आणायला गेली.
” तुमच्या अकस्मात भेटीने खूप आनंद झाला पण इकडे कुठे आला होतात की आमच्याचकडे यायचं होतं?कारण अक्षय दुसऱ्या कुणाला तरी पाठवणार होता.”रेवतीच्या वडीलांनी अक्षयच्या आईवडिलांना विचारलं.त्यांनी एकमेकांकडे सुचक नजरेने पाहिलं मग अक्षयचे वडिल हसून म्हणाले
“तुमच्याचकडे यायचं होतं.स्पष्टच सांगायचं तर आम्ही रेवतीला मागणी घालायला आलोय”
“हो पण कुणासाठी?म्हणजे मुलगा कोण आहे?”वसुधाताईंनी विचारलं.
अक्षयचे वडिल जोरात हसले.
“अहो दुसरा कोण असणार?आमच्या अक्षयसाठी रेवतीचा हात मागायला आलोय”
“काय्यsss”रेवतीचे आईवडिल एकदमच आश्चर्याने ओरडले.रेवती ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन निघाली होती.ते ऐकून तिचे हात थरथरले.एक ग्लास पडतापडता वाचला.तिचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना.
“हो रेवतीच्या आई.आठवड्यापुर्वीच अक्षयने आम्हाला “मला रेवतीशी लग्न करायचंय”असं सांगितलं. त्याचं रेवतीवर प्रेम असेल याची आम्हांला कल्पनाच नव्हती”अक्षयच्या आई सांगू लागल्या.”त्याला रेवतीची खुप काळजी असायची हे मात्र आम्हांला माहित होतं.तिचा ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि नंंतर त्या व्यवसायात जम, बसविण्यासाठी तो खुप झटला.आम्हांला सर्वांनाच रेवती खुप आवडायची.मी एकदा त्याला रेवती आवडते का हे विचारलं देखील.
तेव्हा त्याने ती गोष्ट हसण्यावारी नेली.यावेळी मात्र त्याने ती सिरीयसली घेतलीये”
रेवती पाण्याचे ग्लास घेऊन आली.तिने पाणी ठेवताच अक्षयच्या आईने उठून तिला मिठीत घेतलं.रेवतीला गहिवरुन आलं होतं.डोळ्याबाहेर पडू पहाणारे अश्रू तिने कसेबसे थांबवून ठेवले होते.दोघी खाली बसल्यावर अक्षयचे वडिल म्हणाले “अक्षयची पसंती तर आपल्याला कळली.पण रेवतीला अक्षय पसंत आहे की नाही?”
रेवती काही चुकीचं बोलेल या भितीने वसुधाताई घाईघाईने म्हणाल्या “अहो अक्षयसारखा मुलगा कुणाला आवडणार नाही.रेवतीलाही तो आवडतो फक्त तिने ते कधी सांगितलं नाही” सगळे एकदमच हसले.रेवतीने संकोचून मान खाली घातली.
“जा बेटा घरात काही गोड असेल तर घेऊन ये”अक्षयची आई रेवतीला म्हणाली.रेवती आत जाताच रेवतीचे वडिल काळजीने म्हणाले
“सर आमची तुमच्याशी कसलीही बरोबरी नाही.आपण हे लग्न ठरवतोय तर खरं पण तुमच्या काही अटी तर नाहीत ना?विशेष म्हणजे रेवतीचा व्यवसाय तर बंद होणार नाही ना?”
“तुमच्या म्हणण्याचा अर्थ हुंडा,मानपान,देणंघेणं असाच आहे ना?अहो इतकी गोड,सुंदर,गुणी मुलगी तुम्ही आम्हांला देताय.अजून काय हवं आम्हांला?तुम्ही काही काळजी करु नका.तुम्ही फक्त लग्नाला यायचं बाकी सगळा खर्च आम्ही करु.आणि एवढ्या मेहनतीने वाढवलेला व्यवसाय बंद का करायचा?”
“तुमची काही अट नसेल पण माझी एक अट आहे”अक्षयच्या आई म्हणाल्या तसं वसुधाताईंच्या काळजात धस्स झालं.
“माझी,माझ्या मोठ्या सुनेची आणि माझ्या पुतणीची लग्नातली साडी रेवतीने डिझाईन करायची.अर्थात त्यांचे पैसे आम्ही देऊ”सगळे जोरात हसले.रेवतीने घरातून लाडू आणले.सगळ्यांनी एकमेकांना भरवले.रेवती दोघांच्या पाया पडली तसं अक्षयच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं.खिशातून पाच हजार काढून तिच्या हातात ठेवले.लवकरच मुहूर्त काढून साखरपुडा करायच ठरवून ते दोघं निघून गेले.ते गेल्याबरोबर रेवतीचा आतापर्यंत दाबून ठेवलेला बांध फुटला.आईच्या गळ्यात पडून ती हमसून हमसून रडू लागली.
रात्री दहा वाजले तरी रेवतीला झोप येत नव्हती.अक्षय आपल्याशी फक्त सहानुभूतीपोटी लग्न करतोय ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती.त्याला जाब विचारायला तिने दोनदा फोन लावला पण निर्णय न झाल्याने कट करुन टाकला.ती तिसऱ्यांदा फोन लावणार तेवढ्यात त्याचाच फोन आला.
“साँरी रेवती फँक्टरीतल्या कामामुळे मला तुझ्या घरी येता आलं नाही.अजूनही मी फँक्टरीतच आहे.बरं मम्मी पप्पा येऊन गेले ना?काय निर्णय झाला तुमचा?”
“काय निर्णय होणार?एवढं मोठं श्रीमंत स्थळ आपणहून चालून आल्यावर कोणत्या मुलीचे,त्यातून एका अपंग मुलीचे आईवडील नाही म्हणतील?पण अक्षय तू जर फक्त माझ्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे लग्न करणार असशील तर मला नकोय असं लग्न!काही दिवसांनी ही सहानुभूती ओसरेल आणि माझ्या वाट्याला येईल फक्त तिरस्कार!एखादी धडधाकट मुलगी अपंग मुलाशी लग्न करुन सुखी राहू शकते पण अपंग मुलीशी लग्न करुन सुखी रहाणारे धडधाकट तरुण जवळजवळ नाहीतच.तू याला अपवाद असशील की नाही हे काळच ठरवेल.पण तसं झालं नाही तर माझ्या वाटेला येणारी उपेक्षा जिवघेणी ठरेल”
” अगं वेडे,अंजलीच्या वाढदिवशी जेव्हा आपली भेट झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो.त्यानंतर आपली दोनतीनदा भेट झाली तेव्हा मला जाणवलं की अपंगपणाचा न्युनगंड तुझ्यात ठासून भरलाय.तो काढून टाकण्यासाठी मी तुला ट्रेकिंगला घेऊन गेलो.नंतर मला वाटायलं लागलं की तुला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं की तुझा आत्मविश्वास खुप वाढेल.म्हणून मग तुला व्यवसाय सुरु करुन दिला.तुझी सेटलमेंट झाली पण माझी राहिली होती.भावाची मेडिकल एजन्सी असल्यामुळे दोन फँक्टरीज मी सांभाळाव्या अशी पप्पांना अपेक्षा होती.त्यांनी मला लंडनला पाठवलं.तिथून आल्यानंतर माझं स्वतःचं कर्तृत्व काय हा प्रश्न मला भेडसावू लागला.म्हणून मग मी कर्ज काढून नवीन प्रोजेक्ट सुरु केला.नवीन प्राँडक्ट लाँच केलं.मग त्याला मार्केट मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली.सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळाल्यामुळे मी फार टेन्शनमध्ये होतो.पण हळूहळू प्रतिसाद छान मिळू लागला.सध्या आपलं प्राँडक्ट टाँपवर आहे.या सगळ्या गडबडीत तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं राहून गेलं.सगळं स्थिरस्थावर झाल्यावर आठवड्यापुर्वीच मी आमच्या कुटुंबात तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली.कारण माझ्या कुटूंबाला अगोदर प्रायोरीटी देणं मला गरजेचं वाटत होतं.त्यांच्याशी संघर्ष करुन मला लग्न नव्हतं करायचं.त्यातून आपली जात वेगळी.सुदैवाने आमच्या कुटुंबात तू सर्वांना आवडत होती त्यामुळे जातीचा प्रश्न निर्माण झाला नाही.एका अपंग मुलीला जन्माची सोबतीण करुन घ्यायचा निर्णय त्यांनी माझ्यावरच सोपवला.मग मीही मनाची चाचपणी केली.तू म्हणते तशी फक्त सहानुभूती किंवा फक्त आकर्षण तर नाही हे मी मनाला शंभरदा विचारलं.मग माझ्या लक्षात आलं की माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे.मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही.तुझ्यामुळे नातेवाईक, मित्र,समाज यांनी मला मारलेले टोमणे मी सहन करु शकतो.मनाची तयारी झाली आणि त्याचवेळी तुझं लग्न एका भ्रष्ट, तुला न शोभणाऱ्या,बायकांना गुलाम समजणाऱ्या माणसाशी जमत असल्याची बातमी साक्षीने दिली.मग मी घाई केली.फक्त मीच नाही तर माझ्या कुटुंबियांनीसुद्धा तुला स्विकारलंय हे सांगण्यासाठी मी आईवडिलांना पाठवण्याचा पारंपारिक मार्ग स्विकारला’
अक्षय बोलायचा थांबला तेव्हा रेवतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या. अक्षय इतक्या मोठ्या मनाचा आहे हे तिला आजच कळत होतं.गहिवरल्या स्वरात ती त्याला म्हणाली
“साँरी अक्षय मी तुला ओळखू शकले नाही.आता कधी एकदा तुला भेटते आणि कडकडून मिठी मारते असं झालंय रे”
“मलाही तेच वाटतंय रेवती पण साँरी याबाबतीत मी थोड्या जुन्या विचारांचा आहे.आपली भेट आता साखरपुड्यातच.चालेल ना?”
“चालेल अक्षय.मला ही उतावळेपणा आवडत नाही.”
एका मोठ्या हाँलमध्ये खुप गर्दी जमली होती.स्टेजवर साखरपुड्याचे विधी सुरु होते.स्वतःच डिझाईन केलेल्या साडीत रेवती खुप आनंदी आणि सुंदर दिसत होती.तिनेच डिझाईन केलेल्या कुर्त्यात अक्षयही विलक्षण देखणा दिसत होता.आपल्या अपंग लेकीला इतका छान नवरा मिळालाय आणि तिचा साखरपुडा इतक्या थाटामाटात होतोय हे पाहुन रेवतीच्या आईवडिलांचे डोळे वारंवार भरुन येत होते.आपल्या “लंगड्या”बहिणीचं नशीब असं फळफळलेलं पाहून साक्षी मनातून जळून खाक झाली होती.
विधी संपले तशी गुरुजींनी एकमेकांना अंगठी घालायची सुचना केली.रेवतीने अक्षयच्या बोटात अंगठी घातली.अक्षय तिच्या बोटात अंगठी सरकवत असतांनाच दोघांची नजर एक झाली.अक्षयचे डोळे भरुन आले होते.
“रेवती याच क्षणाची वाट बघत होतो ना आपण इतकी वर्ष!” अक्षय म्हणाला आणि रेवतीला एकदम भडभडून आलं.आवेगाने तिने अक्षयला मिठी मारली.त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली.तिच्या डोक्यावर हात फिरवता फिरवता अक्षयही रडू लागला.ते द्रुश्य पाहून सगळे अवाक झाले.हाँलमध्ये शांतता पसरली.
“सगळं तर चांगलं झालं.आता कशाला रडताहेत ही दोघं?”साक्षी फणफणत म्हणाली.
“तुला नाही समजायचं ते साक्षी”वसुधाताई डोळे पुसत म्हणाल्या “तुझ्यासारखं उथळ प्रेम नाहीये ते.समजून उमजून केलेलं,गेली ४-५ वर्ष व्यक्त न झालेलं,आज कुटुंब आणि समाजाच्या संमतीने आणि साक्षीने व्यक्त होणारं,आजन्म टिकणारं प्रेम आहे ते!”