एक थर वाहतोय ज्वालामुखी रसाचा
सापडत नाहीय त्याला बाहेर पडण्याचा मार्ग
आतल्या आतच मुरवायचंय त्याला सारं
कसं तेच कळेनासं झालंय
कारण हे सांगायला तरी बाहेर पडावं लागणारच
मग घेईल का कोण ही ऊब चोरुन
स्वत्वाची…तत्वांची…विचार लाटांची
ही भीती त्या ज्वालामुखीपेक्षा दाहक
आपण असे नव्हतो…मग असं का घडलं…
याच फे-यात अडकलाय मेंदू
गुडगाभर पाण्यातच बुडण्याची भीती वाटतेय
समुद्राचा गहिरेपणा पहायची इच्छा नव्हतीच असं नाही
पण काठावरच समाधान मानायचं हे बाळकडू आडवं येतं
वाटतं कधीकधी बेभानपणे जगावं…घेतला निर्णय तडिस न्यावा
उधळावं चैतन्य सख्यावर..जीवलगावर
पण मग इतर जीवलगांची जाणीव माघारी ओढते
पुसट होतात स्वतःच्या इच्छा..अपेक्षा
हे आपलं प्रारब्धच आहे
या जुन्याच अन् पारंपारिक कारणाचा आधार मिळतो
अन् शिळं होऊन जातं एक आयुष्य