माँलमध्ये काहीतरी घेत असतांना तो मला दिसला. हो. नक्की तोच होता. मी दोनतीनदा त्याच्याकडे बघून खात्री केली. हो. तो पीकेच होता. पुर्वीसारखा तो अजागळ आणि बावळट दिसत नव्हता. पहिल्यापेक्षा त्याची तब्येतही चांगली झालेली दिसत होती. डोळ्यांवरचा फ्रेमलेस चष्मा आणि पायातले स्पोर्ट्स शुज त्याला स्मार्ट बनवत होते. उंची मात्र तेवढीच होती. असेल साडेपाच फुट. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. तो कपडे बघण्यात मग्न होता आणि मलाही त्याचं लक्ष वेधून घ्यायचं नव्हतं. तो इथे पुण्यात काय करतोय हेही त्याला विचारायची मला इच्छा नव्हती. काँलेजमध्ये एकत्र होतो तेव्हापासूनच मला तो आवडत नव्हता. मी काँलेजचा हिरो होतो. सणसणीत सहा फुटाची उंची आणि कुठल्याही बाँलिवूड हिरोसारखा देखणा चेहरा. त्यातून रोजच्या व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी. त्यामुळे मी काँलेजमध्ये लोकप्रिय होतो. विशेषतः मुलींमध्ये. आमचा एक श्रीमंत मुलांचा ग्रुप होता. सगळे उंच आणि देखणे.सगळे आमच्या महागड्या बाईक्सनी काँलेजमध्ये येणारे.या ग्रुपमध्ये बुटक्या, स्मार्ट नसणाऱ्या मुलांना प्रवेश नव्हता. सायकलने काँलेजात येणाऱ्या पीकेने आमच्या या ग्रुपमध्ये यायचा बऱ्याचदा प्रयत्न केला पण आम्ही त्याला हाकलून द्यायचो. साहजिकच होतं, राजहंसांच्या ग्रुपमध्ये आम्हांला हा कावळा नको होता.
माझं सामान घेऊन मी कँश काऊंटरकडे निघालो. तेवढ्यात…
“अजिंक्य. ए अजिंक्य” आवाज आला तसं मी वळून बघितलं तर पी.के.माझ्याजवळच उभा होता.
“तुम्ही अजिंक्य देसलेच ना?”
“हो. तुम्ही?”माहित असुनही मी त्याला मुद्दामच प्रश्न केला.
“अरे मी प्रथमेश काळे. तुम्ही मला पीके म्हणायचे बघा”
मी मुद्दामच प्रश्नार्थक चेहरा केला.
“पीके? आठवत नाही बुवा. कधीची गोष्ट आहे ही?”
“अरे आपण धुळ्याच्या जयहिंद काँलेजमध्ये नव्हतो का एकत्र? तुम्ही सायन्सला होतात. मी काँमर्सला होतो. पण बऱ्याच कार्यक्रमानिमित्ताने आपण एकत्र येत होतो. अमित भंडारी, सुदेश साखला, सुमित देशमुख असे तुमचे मित्र होते बघा”
आता ताणण्यात अर्थ नाही हे पाहून मी म्हणालो
“अच्छा अच्छा! आलं लक्षात. पीके! येस आठवलं. पण तू इथं पुण्यात काय करतोयेस पीके?”
“माझी बदली झालीये इथे कलेक्टर आँफिसला. अजून जाँईन नाही झालो. सोमवारी होणार आहे.तू सध्या कुठे आहेस?”
“मी ग्रँज्युएशन नंतर एमसीए केलं .चारपाच वर्ष नाशिकला होतो. गेल्या दोन वर्षांपासून इथं साँफ्टवेअर इंजीनियर आहे. इथं नऊ लाखाचं पँकेज आहे मला “मी अभिमानाने सांगितलं.
“अरे वा! खुप छान!”
मग आमच्या थोड्या फार गप्पा झाल्या लग्न, मुलं, घर, जुने मित्र यांच्याबद्दल जुजबी बोलणं झाल्यावर तो म्हणाला
“तुझा पत्ता दे. एखाद्या रविवारी येतो तुझ्याकडे. मस्त गप्पा मारु. पुण्यातल्या आपल्या मित्रांनाही बोलावून घे”
मी न बोलावताच पीके माझ्या घरी यायचं म्हणत होता. त्याच्या लोचटपणाचा मला रागच आला. काँलेजमध्ये असतांनाही तो असाच लोचटपणा करायचा.
“तू येणार असशील त्याच्या दोनतीन दिवस अगोदर मला फोन कर. मी तुला पत्ता सांगेन “मी त्याला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणालो. मग त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. औपचारिकता म्हणून मग मीही त्याचा मोबाईल नंबर सेव्ह करुन घेतला.
घरी जाताजाता पीकेच्या काँलेजमधल्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. एका नाटकाच्या रिहर्सलच्या वेळी माझी आणि त्याची पहिली भेट झाली होती. मी नाटकाचा हिरो होतो तर पी.के.आँफिस बाँयच्या भुमिकेत होता. इनमीन दोनतीन मिनिटाची त्याची फालतू भुमिका होती. त्यानंतर पीके भेटत गेला. त्याच्या पीके नावावरुन आम्ही त्याची खुप टिंगलटवाळी करायचो. पण पीके कधी रागावला नाही. चिडला नाही. सगळे त्याची चेष्टा जरी करत असले तरी तो विद्यार्थ्यांमध्ये बराच लोकप्रिय होता हे मी बऱ्याचदा अनुभवलं होतं. याला कारण म्हणजे पीके सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा. त्याची स्वतःची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती तरीही तो अडल्यानडलेल्यांना जमेल तशी मदत करायचा.
मी घरी आलो. बायकोने उशीर झाल्याचं कारण विचारल्यावर मी तिला पीके भेटल्याचं सांगितलं. तिलाही पीके या नावाची मोठी गंमत वाटली. रात्री पीकेचा विचार करताकरता मला स्वप्ना आठवली आणि मन हळवं होऊन गेलं. काँलेजमध्ये असतांना मी या स्वप्नासाठी वेडा होऊन गेलो होतो. ती होतीच तशी अप्रतिम सुंदर, गोरीपान, पाणीदार बदामी डोळ्यांची,लांबसडक केसांची. मीच काय आख्ख्या काँलेजची पोरं तिच्यावर मरत होती. तिला पटवण्यासाठी मी काय काय उद्योग केले होते. मेसेजेस काय, चिठ्ठ्या काय, फुलं काय पण पोरीने शेवटपर्यंत दाद दिली नव्हती. नोकरी लागल्यावर स्वप्नाच्या तोडीची मुलगी मिळावी म्हणून मी तब्बल ५२ मुली बघितल्या. शेवटी कंटाळून मी अर्पिताशी लग्न केलं. अर्पिताही स्मार्ट होती पण स्वप्नाची सर तिला कधीच येणार नव्हती. तसा मी आता सुखी होतो. तीन वर्षाची गोड मुलगी मला होती. बायको, मुलीसोबत मी सुखाने संसार करत होतो. पण कधीतरी स्वप्नाची आठवण यायची आणि मन हळवं होऊन जायचं.
चारपाच दिवसांनीच पीकेचा मला फोन आला.
“अजिंक्य उद्या रविवार आहे. फ्री असशील तर येऊ का तुझ्याकडे? आणि आपल्या जयहिंद काँलेजच्या मुलांपैकी जे पुण्यात आहेत त्यांनाही बोलावून घे. तेवढंच जुने मित्र भेटल्याचं समाधान मिळेल”
“मी जरा बायकोला विचारुन घेतो. ती फ्री असेल आणि आम्हांला कुठं बाहेर जायचं नसेल तर मग तसं सांगतो तुला “मी त्याला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणालो. खरं तर रविवारी अर्पिताला काय आम्हांलाही कुठंच जायचं नव्हतं. पण पीकेशी मला मैत्री वाढवायची नव्हती.
“अहो येताहेत तर येऊ द्या ना तुमच्या मित्राला. असंही इथे पुण्यात कोण कुणाकडे जातंय? प्रत्येक जण आपापल्या कोषात गुरफटलेला. येऊ द्या त्यांना, आपल्यालाही चांगलं वाटेल “शेजारीच उभी असलेली अर्पिता म्हणाली. तिचं बोलणं कदाचित पीकेने ऐकलं असावं या भितीने मी पटकन त्याला म्हणालो.
” ये रे पीके. माझी बायको हो म्हणतेय”
” ठिक आहे. मी संध्याकाळी शार्प सहाला येतो. तुझा पत्ता मला व्हाँटस्अपवर पाठव आणि हो वहिनींना सांग मी फक्त चहा घेई
“बरं बरं. सांगतो”
संध्याकाळी मी माझ्या काही मित्रांना पीके बद्दल सांगितलं. पण कुणालाच पीकेत इंटरेस्ट नव्हता. कुणीच यायला तयार झालं नाही.
दुसऱ्या दिवशी बरोबर सहा वाजता पीके आला. तो रिक्षाने आला की कँब करुन आला हे विचारायचं मनात असूनही मी त्याला विचारलं नाही. मी त्याची आणि अर्पिताची ओळख करुन दिली. माझी स्मार्ट बायको, गोड मुलगी आणि पुण्यासारख्या शहरातला माझा टू बीएचके चा फ्लँट याचं मला खुप कौतुक होतं. मी मोठ्या गर्वाने त्याबद्दल पीकेला सांगत होतो. पीके ते ऐकून “अरे वा!छान “असं वारंवार म्हणत होता. माझं स्वतःची स्तुती करणं झालं तसं पीकेने सोबत आणलेली बँग उघडली. त्यातून एक सुंदर बार्बी डाँल आणि कँडबरी चाँकलेटस् चा मोठा गिफ्ट पँक काढून माझ्या मुलीच्या हातात दिला. मुलगी एकदम खुश झाली. मग बँगमधून पर्स काढून माझ्या बायकोकडे पहात तो म्हणाला
“वहिनी ही तुमच्यासाठी.मला बायकांच्या वस्तूतलं काही कळत नाही. जशी असेल तशी गोड मानून घ्या “
” अहो खुप छान पर्स आहे आणि चांगलीच महागडी दिसतेय. याची काय गरज होती भाऊजी?”
“असं कसं ?पहिल्यांदाच अजिंक्यच्या फँमिलीला भेटायला येतोय म्हंटल्यावर काहीतरी गिफ्ट आणायलाच पाहिजे ना?”
” थँक्स् भाऊजी मला आणायचीच होती नवी पर्स ही कितीची आहे?”
“जाऊ द्या वहिनी. किंमत सांगितली की गिफ्टची व्हँल्यू कमी होते”
बायको हसून आतमध्ये गेली.असं अनपेक्षित गिफ्ट मिळालं की बायका प्रचंड खुश होतात हे मला अनुभवावरुन माहित होतं.तेवढ्यात पीकेने दोन अजून छोटे गिफ्ट बाँक्स काढले आणि माझ्या हातात देत म्हणाला.
“हे तुझ्यासाठी परफ्युम आहेत. काँलेजमध्ये असतांना तू रोज परफ्यूम मारुन यायचास हे मला चांगलं आठवत होतं म्हणून तेच घेऊन आलो. तुझा चाँईस मला माहित नव्हता पण आणलेत अंदाजाने”
मलाही आनंद झाला कारण मला खरोखरच परफ्यूमसची आवड होती. रोज परफ्यूम लावल्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नव्हतो.
मग पीकेने फरसाणचा आणि काजू कतलीचा मोठा बाँक्स काढून टेबलवर ठेवला. अपेक्षा नसतांनाही पीकेने आमच्यासाठी भरपूर काही आणलं होतं. मी मनातून खुश झालो पण मी ते चेहऱ्यावर दाखवलं नाही.
पीके मग मला कंपनीबद्दल विचारु लागला. मी त्याबद्दल सांगत असतांनाच अर्पिता पोहे घेऊन बाहेर आली. खरं तर फक्त चहाचं ठरलेलं असतांना तिने पोहे करावे याचा मला रागच आला. या बायका नको तेव्हा आणि नको त्या व्यक्तीला जास्तच आदरातिथ्य दाखवतात.
“अहो वहिनी कशाला त्रास घेतलात. मी अजिंक्यला फक्त चहाचं म्हणालो होतो”
“असू द्या भाऊजी. तुम्हीही पहिल्यांदाच आमच्याकडे आला आहात. फक्त चहावर कसं पाठवणार तुम्हांला ?”
पीके हसला. पोह्याचा एक घास घेऊन म्हणाला
” व्वा !मस्तच झालेत पोहे “
अर्पिताचा चेहरा त्या स्तुतीने चांगलाच खुलला.
चहा झाल्यावर पीके म्हणाला.
” दहाबारा दिवसांनी मी फँमिलीला इथे आणणार आहे. मग मी तुम्हांला निमंत्रण देईन तेव्हा जरुर या बरं का वहिनी. काय अजिंक्य येशील ना?”
” हो.येऊ येऊ “मी औपचारिकता म्हणून म्हणालो खरा पण पीकेशी असे संबंध वाढवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. थोड्या वेळाने पीके गेला. मी काही त्याला निरोप द्यायला खाली गेलो नाही. फ्लँटच्या दारातच आम्ही त्याला निरोप दिला.
आतमध्ये आल्यावर मी अर्पिताला म्हणालो
“पोहे करायची काय गरज होती अर्पिता? असाही काँलेजमध्ये पीके काही माझा मित्र नव्हता”
“अहो त्यांनी एवढे महागाचे गिफ्ट्स आणले. मग आपल्याला त्यांना फक्त चहावर पाठवणं बरं दिसलं असतं का?. मी हिशोब केला. जवळपास पाच हजाराची गिफ्ट्स आणली आहेत त्यांनी.आपले नातेवाईकही इतकं आणत नाहीत”
मी वरमलो.
“आणि काहो!तुम्ही तर त्यांना काही विचारलंच नाही. कलेक्टर आँफिसला ते कोणत्या पोस्टवर आहेत? इथं पुण्यात कुठे रहाणार आहेत? फँमिली येईपर्यंत जेवणाचं कसं करणार आहेत? थोडी चौकशी तर करायची! तुम्ही तर स्वतःबद्दलच सांगत सुटलात”
” तुला खरं सांगू का अर्पिता, मला त्याच्यात जराही इंटरेस्ट नाही. काँलेजमध्ये असतांनाही तो मला कधीच आवडला नाही आणि आताही मला तो आवडत नाही. तो काँमर्स ग्रँज्युएट आहे म्हणजे तो कारकूनच असणार आणि आपल्याला काय करायचंय, तो कुठे रहातो, कुठे जेवतो याबद्दल? पुण्यात भरपूर भाड्याने घरं मिळतात आणि तितक्याच मेस आहेत. इथं आल्यावर करतोच माणूस काहितरी व्यवस्था. मी त्याला विचारलं असतं तर तो मलाच म्हंटला असता काहितरी व्यवस्था करण्यासाठी. इथं कुणाला वेळ आहे अशा फालतू गोष्टींसाठी”
अर्पिता काही बोलली नाही पण तिला माझं वागणं पसंत पडलं नव्हतं हे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.
२०-२१ दिवसांनी पीकेचा फोन आला.
“अजिंक्य. मी फँमिलीला घेऊन आलोय इथे. या रविवारी तुला जमेल का माझ्याकडे यायला?”
” मी बघतो. माझ्या सगळ्या असाईनमेंटस् चेक करुन तुला कळवतो “मी मुद्दामच आढेवेढे घेत म्हणालो. खरं तर या रविवारी मला काहीच काम नव्हतं. मी त्याला दिवसभर काहीच कळवलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याचाच फोन आला.
” मग काय ठरवलंस अजिंक्य? येतोय ना रविवारी?” त्यानं विचारलं
” मला तशी कामं आहेत. पण करतो अँडजस्ट” मी अर्पिताकडे बघत म्हणालो.
” व्हेरी गुड. मग जेवायलाच ये. म्हणजे निवांत गप्पा मारता येतील “
” नको. जेवायला नको. आम्ही फक्त चहा घेऊ”
मी असं म्हणताच अर्पिता मोबाईलवर वाकून जोरात म्हणाली
” येऊ हो भाऊजी जेवायला. पण वहिनींना साधंच काही करायला सांगा “
फोनवरुन हसण्याचा आवाज आला.
“बरं मग या नक्की. आम्ही वाट बघतोय. बरं अजिंक्य, तुला कलेक्टर बंगला माहितच असेल. तिथं आल्यावर मला फोन कर .मी येतो तुम्हांला घ्यायला “तो म्हणाला आणि फोन कट झाला. मी रागाने अर्पिताकडे पाहिलं. तिचा हा आगावूपणा मला अजिबात आवडला नाही.
“अहो असं काय रागावताय? चांगला प्रेमाने जेवायला बोलावतोय तुमचा मित्र. काय हरकत आहे जायला? पुण्यासारख्या शहरात इतकी आपुलकी कोण दाखवतंय? आणि एक दिवस मलाही स्वयंपाकापासून आराम मिळू द्या ना”
तिचं हे म्हणणं बरोबर होतं. मी वरमलो.
रविवारी मी मोठ्या अनिच्छेनेच माझ्या बाईकवर बायको आणि मुलीला घेऊन निघालो. संबंध आणि मैत्री वाढवावी ती तोलामोलाच्या व्यक्तींसोबतच.” हा माझा मित्र आहे “असं कुणालाही सांगतांना अभिमान वाटला पाहिजे असं माझं ठाम मत होतं. पीकेसारख्या फालतू माणसाची ओळख करुन देतांना मला लाजच वाटणार होती आणि ते मला नको होतं.
रविवारी संध्याकाळी कलेक्टर बंगल्याजवळ आल्यावर मी पीकेला फोन केला.
“पीके आम्ही आलोय कलेक्टर बंगल्याजवळ. इथून कुठं यायचं?”
” अरे मग आत ये ना! मी सिक्युरिटीला सांगून ठेवलंय “तो म्हणाला तसा मी गोंधळलो.
“पीके तू कलेक्टर बंगल्यात काय भाड्याने रहातोस?”
तो हसला
“अरे शासनानेच मला बंगला दिलाय. मी भाड्याने कसा राहीन? थांब. मी कुणाला तरी पाठवतो तुम्हांला घेऊन यायला “
तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या पाटीकडे गेलं.”प्रथमेश काळे, जिल्हाधिकारी “आणि बसलेल्या जबरदस्त धक्क्याने माझ्या हातातून मोबाईल पडतापडता वाचला.
“अहो तुमचे मित्र कलेक्टर आहेत?”अर्पिताही त्या पाटीकडे पहात मला विचारत होती पण माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत. मी अजुनही त्या पाटीकडे डोळे फाडून बघत होतो.
“देसले साहेब ना?” आतून आलेल्या माणसानं विचारलं.
“हो “
” या साहेब. साहेब तुमची वाट बघताहेत “
मी त्याच्यामागे यंत्रवत निघालो. बंगल्याच्या दाराशी पीके हसऱ्या चेहऱ्याने उभा होता. त्याने मला मिठी मारली.
“ये अजिंक्य, या वहिनी “तो माझा हात धरुन आत घेऊन गेला.
सोफ्यावर बसत नाही तोच एक माणूस पाण्याचे आणि सरबताचे ग्लास घेऊन आला. मी घटाघटा पाणी प्यायलो.
” पीके…तू…साँरी …प्रथमेश …तुम्ही कलेक्टर असाल असं वाटलं नव्हतं “मी कापऱ्या आवाजात बोललो. अजूनही मी धक्क्यातून सावरलो नव्हतो.
” हो ना भाऊजी, तुम्ही घरी आलात तेव्हा तुम्ही कलेक्टर असल्याबद्दल काही बोलला नाहीत. आम्हांला वाटलं तुम्ही कलेक्टर आँफिसला क्लर्क वगैरे असाल “
पीके जोरात हसला.
“त्यात काय सांगायचं वहिनी!कलेक्टर असो नाहीतर क्लर्क, शेवटी आम्ही सरकारचे नोकरच ना”
तेवढ्यात एक अतिशय गोड मुलगी धावत आली आणि पीकेच्या मांडीवर जाऊन बसली. आतापर्यंत माझीच मुलगी सर्वात गोड आहे असं मला वाटायचं पण ही मुलगी अगदी एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. विशेषतः तिच्या उजव्या गालावरच्या खळीने ती फारच मोहक दिसत होती. मला एकदम स्वप्ना आठवली. तिच्याही गालावरच्या खळीत काँलेजचे किती तरुण बुडाले याची गणती नव्हती. मीही त्यातलाच एक होतो.
” ही माझी मुलगी मुग्धा. बेटा मुग्धा काकाकाकूंच्या पाया पड”
मुग्धा खाली उतरली. जवळ येऊन तिने माझ्या पायावर डोकं ठेवलं. नंतर अर्पिताकडे जाऊन तिलाही नमस्कार केला.
“किती गोड आहेस गं तू !अगदी बाहुलीच दिसतेस”अर्पिताने तिला जवळ घेऊन तिचे मुके घेतले. मुग्धा नंतर माझ्यामुलीकडे गेली. तिचा हात धरुन म्हणाली
“चल आपण खेलू “आणि तिचा हात धरुन माझ्या मुलीला ती आतमध्ये घेऊन गेली. मला मोठी गंमत वाटली. पाच वर्ष एका काँलेजमध्ये राहून देखील मी पीकेला आपला मित्र मानत नव्हतो आणि या मुली एका सेकंदात मैत्रिणी होऊन गेल्या होत्या.
“आणि ही माझी बायको, स्वप्ना” पीके म्हणाला. तसं मी गर्रकन मागे वळून पाहिलं आणि मी जागीच थिजलो. माझ्या हातापायातले त्राण गेले. माझ्या घशाला कोरड पडली. माझ्या हातातला सरबताचा ग्लास पडतापडता वाचला. जबरदस्त शाँक लागल्यासारखा मी त्या बाईकडे पहातच राहिलो. हो. ती तीच स्वप्ना होती जिच्यासाठी मी काँलेजमध्ये पागल झालो होतो. काँलेजमध्ये होती त्यापेक्षाही ती आता अप्रतिम सुंदर दिसत होती आणि या सुंदरीने माझ्यासारख्या देखण्या पुरुषाला डावलून पीके सारख्या साधारण, बावळट पुरुषाशी लग्न करावं हा धक्का मला सहन करण्याच्या पलिकडचा होता.
कुणीतरी मला हलवत होतं म्हणून मी दचकून पाहिलं तर अर्पिता माझ्या दंडाला हलवत होती.
“अहो त्या नमस्कार करताहेत”
मी कसेबसे स्वप्नाला हात जोडले पण माझ्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. स्वप्ना पीके जवळ जाऊन बसली तसा पीके तिला म्हणाला
“अजिंक्यला ओळखत असशीलच.आपल्या काँलेजचा हिरो होता तो “
” हो तर. ते नेहमी नाटकात हिरोच्या भुमिका करायचे.आणि त्यात ते शोभूनही दिसायचे “
स्वप्ना माझ्याकडे बघून हसत म्हणाली. मी शरमेने मान खाली घातली. कदाचित स्वप्नाला पटवण्यासाठी मी जे लाजीरवाणे उद्योग केले होते ते तिला नक्कीच आठवत असावेत.
“खुप छान वाटलं तुम्ही आलात.जुने मित्र भेटले की सगळ्या आठवणी जाग्या होतात. काँलेजचे दिवस आठवायला लागतात. खरंच ते गोल्डन डेज होते नाही आपल्या आयुष्यातले?”
स्वप्ना माझ्याकडे बघत म्हणाली तशी ती माझ्या बायकोसमोरच मी केलेले कारनामे सांगते की काय याची मला भिती वाटू लागली. तेवढ्यात पीकेचा मोबाईल वाजला.
“साँरी, एक महत्वाचा काँल आहे. तुम्ही गप्पा मारणं चालू ठेवा. मी येतोच पाच मिनिटांत”
तो मोबाईल घेऊन बाहेर गेला तसं मी धीर एकवटून स्वप्नाला विचारलं.
“तुमचं हे लव्ह मँरेज का?”
” नाही. अँरेंज कम लव्ह असं म्हणता येईल”
हा अजून एक धक्का होता.
” म्हणजे ?मी नाही समजलो”
“अहो ती एक फार मोठी गंमत झाली ” स्वप्ना हसत सांगू लागली ” चार वर्षांपूर्वी माझे आईवडील चारधाम यात्रेला गेले होते.योगायोगाने प्रथमेशही त्यांच्या आईवडिलांसोबत त्याच ग्रुपमध्ये होते. प्रथमेशचा स्वभाव तर तुम्ही जाणताच, सगळ्यांना ते मदत करायचे. माझ्या वडिलांना बीपी.चा त्रास होता. त्यात त्यांना एक दिवस हार्ट अटँक आला. सगळ्या ग्रुपची चारधाम यात्रा कँन्सल करण्याची वेळ आली होती. पण प्रथमेशनी माझ्या वडिलांची जबाबदारी स्विकारली. त्यांना उत्तरकाशीच्या हाँस्पिटलमध्ये अँडमीट केलं. आपल्या आईवडिलांना ग्रुपसोबत सोडून ते माझ्या आईवडिलांसोबत राहिले. अटँक माईल्ड होता म्हणून चारपाच दिवसातच वडिलांना बरं वाटू लागलं. आईवडील धुळ्याला परतायचं म्हणत होते पण प्रथमेशनी त्यांना धीर दिला. त्यांची राहिलेली चारधाम यात्रा त्यांच्यासोबत राहून पुर्ण करुन दिली. माझे आईवडील प्रथमेशच्या वागणुकीने खुप इंप्रेस झाले”
” पण मग तुमची आणि प्रथमेशची काँलेजमधली ओळख तुमच्या आईवडिलांना समजली असेल ना?”मी अधीरतेने विचारलं.
“नाही. माझं काँलेजमधलं आडनांव लाहोटी असलं तरी माझे वडील मात्र”माहेश्वरी “हे आडनांव लावतात. त्यामुळे प्रथमेशला ते माझे आईवडील होते हे समजलं नाही. माझे आईवडील घरी आल्यावर त्यांनी झालेल्या प्रसंगाबद्दल आणि प्रथमेशबद्दल मला सांगितलं. प्रथमेशना मी ओळखत होते ते सगळ्यांना आपलं काम सोडून मदत करणारा एक उत्साही,आनंदी मुलगा म्हणून.ते आय.ए.एस.आँफिसर आहेत हे ऐकून तर मी आश्चर्यचकितच झाले. एका साधारण व्यक्तिमत्वाच्या माणसाने इतकी उंच भरारी घ्यावी तेही घरची साधारण परिस्थिती असतांना याचं मला कौतुक वाटलं. माझ्या वडिलांना तर प्रथमेश इतके आवडले की त्यांनी एक दिवस मला विचारलं की प्रथमेशशी लग्न करशील का म्हणून.मला एक लहान बहिण आहे, भाऊ नाही. मुलासारखा काळजी घेणारा जावई माझ्या वडिलांना हवा होता. आणि प्रथमेश त्यात एकदम फिट आहेत असं त्यांना वाटत होतं.
“बेटा मला माहित आहे की तो मुलगा तुला शोभणार नाही. पण तू त्याच्या चेहऱ्याकडे पाहू नकोस. चेहऱ्याने तो मुलगा देखणा नसला तरी मनाने हिरा आहे हिरा.तो तुला तर सुखात ठेवेलच पण आमचीही मरेस्तोवर काळजी घेईल” असं ते मला वारंवार सांगू लागले.मी अगोदर तयार नव्हते पण काँलेजमधले एकेक प्रसंग आठवू लागले आणि मला आईवडील खरं बोलताहेत याची जाणीव झाली. शेवटी मी महिन्याभरानंतर त्यांना मी तयार असल्याचं सांगितलं.खरं तर आम्ही मारवाडी आणि प्रथमेश महाराष्ट्रीयन. कितपत जमेल ही शंकाच होती.पण आईवडील जे करतील त्याला मी संमती देणार होते.मी अनुकुलता दाखवल्यावर माझे आईवडील तसं विचारण्यासाठी प्रथमेशच्या घरी गेले.प्रथमेशचे आईवडील आनंदाने तयार झाले पण प्रथमेशनी मात्र नकार दिला”
“काय सांगता काय?” मी आणि अर्पिता एकदमच ओरडलो. स्वप्ना पुढे हसत म्हणाली
“तो नकार ऐकून माझ्या ईगोला जबरदस्त धक्का बसला.माझ्यासारख्या सुंदर मुलीला कुणी नकार देऊ शकतं हा धक्काच मी सहन करु शकले नाही. हा माझ्या सौंदर्याचा धडधडीत अपमान होता. मी खुप रडले. संतापले. त्या संतापातच मी प्रथमेशना फोन केला. त्यांना वाटेल तसं बोलले.” तुम्ही स्वतःला समजताय कोण? तुमच्यापेक्षा कितीतरी हँडसम मुलं माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेत आणि तुम्ही मला नाही म्हणताय?” मी असं संतापून म्हंटल्यावर प्रथमेश शांततेने म्हणाले.
“स्वप्ना तुझ्या आईवडीलांना मला जावई बनवावंस वाटलं आणि तुही त्याला होकार दिला यासाठी मी तुझा आणि तुझ्या आईवडिलांचा खुप आभारी आहे. अग वेडे सुंदर बायको कुणाला आवडणार नाही? आपलं अख्खं काँलेज तुझ्या प्रेमात होतं. मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो. पण मी तुझ्या लायक नाही हे तेव्हापासूनच मला माहित होतं आणि आताही मला तेच वाटतंय. लग्नासाठी तू एखादा तुला शोभेल असा हँडसमच मुलगा निवडायला हवा असं मला वाटतं. एक विचार कर आता तू आईवडील म्हणताहेत म्हणून तयार होशील पण पुढे तुला पश्चाताप झाला तर आपलं वैवाहिक जीवनच धोक्यात येईल. मला ते नकोय म्हणून मी नकार दिला. तू अजून महिनाभर शांततेत विचार कर. माझ्याबद्दल तुला खरंच प्रेम वाटत असेल, मी तुला नवरा म्हणून योग्य वाटत असेन तरच तू हो म्हण. तू नाही म्हंटलंस तर मला वाईट जरुर वाटेल पण मी माझी लायकी ओळखून आहे. मी फारसं मनाला लावून घेणार नाही “प्रथमेशचं हे म्हणणं मी आईवडिलांना सांगितल्यावर ते खुप खुश झाले. वडिल म्हणाले
” बेटा इसकी जगह कोई होता तो इस रिश्तेसे खुशी के मारे पागल हो जाता लेकीन देख कितना सोचसमझकर, दिल पर पत्थर रखकर उसने निर्णय लिया है. मैने बोला ना लडका हिरा है हिरा. मेरी बात मान तुझे कभी पछतावा नही होगा”
महिनाभर मी विचार केला. मला जाणवायला लागलं की मला प्रथमेश आवडू लागले होते. शेवटी मी प्रथमेशना माझा होकार कळवला. अशा रितीने आमचं लग्न झालं. पण खरं सांगते वडील जे म्हणत होते ते खरंच निघालं. या पाच वर्षात मला एकदाही वाटलं नाही की माझी निवड चुकलीये. उलट मी स्वतःला भाग्यवान समजते की प्रथमेशसारखा नवरा मला मिळाला आणि माझ्या वडिलांना एक मुलगा मिळाला. दोन वर्षांपूर्वी माझ्या लहान बहिणीचं लग्न झालं. प्रथमेशनी माझ्या आईवडिलांना कोणत्याही कामाला हात लावू दिला नाही. लग्नाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली आणि यशस्वीरीत्या पार पाडली”
ते ऐकल्यावर अर्पिताने माझ्याकडे रागाने पाहिलं. तिच्या भावाच्या लग्नात मी काडीचाही हातभार लावला नव्हता. उलट मानपानासाठी मी रुसून बसलो होतो. त्याची तिला आठवण झाली असावी.
स्वप्ना पीकेचं एकेक कौतुक सांगत होती तसतसे माझ्या काळजावर चरे पडत होते. मत्सराने मी जळू लागलो होतो.” बस! बंद कर त्या येडपट माणसाचं कौतुक “असं ओरडून स्वप्नाला सांगावंसं मला प्रकर्षाने वाटू लागलं
तेवढ्यात पीके आत आला. स्वप्ना बोलायची थांबली.
“साँरी अजिंक्य. एकामागून एक फोन येत गेले त्यामुळे लवकर आत येता नाही आलं “
” मँडम जेवणाची तयारी झालीये ” एक माणूस आत येऊन म्हणाला.
” चला जेवायला ” स्वप्ना म्हणाली तसे आम्ही सगळे उठलो. आम्ही डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. टेबल व्यवस्थित सजवलेलं होतं. स्वप्ना किचनमध्ये पोळ्या करायला गेली. कलेक्टरची बायको असूनही स्वयंपाकाला बाई न लावता सगळा स्वयंपाक ती स्वतः करते हे पीकेकडून ऐकून मला आश्चर्य वाटलं.
जेवण उत्कृष्ट होतं पण माझ्या घशाखाली उतरत नव्हतं. पीके आणि स्वप्ना दोघंही मला आग्रह करत होते. पण मी अँसिडिटी होते वगैरेसारखी फालतू कारणं सांगून कमी जेवलो.
जेवणानंतर मी आणि पीके बैठकीत येऊन बसलो पण माझ्यात आता न्युनगंड तयार झाला होता. मी माझ्या मित्रासमोर नाही तर एका कलेक्टरसमोर बसलोय याचं दडपण मला मोकळेपणाने वागू देत नव्हतं.
थोड्यावेळाने स्वप्ना आणि अर्पिता दोघीही आमच्यासोबत येऊन बसल्या. स्वप्ना इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडे सारखं बघण्याचा मला मोह होत होता पण समोरच बसलेल्या पीकेमुळे मी तिच्याकडे बघायचं टाळत होतो. सुंदर बायकोला लोकांच्या घाणेरड्या नजरांपासून वाचवणं किती अवघड असतं याची जाणीव मला झाली.
“चला आम्ही निघतो”
मी असं थोड्या वेळाने म्हणत नाही तोच एक माणूस एक बँग घेऊन आला. स्वप्नाने त्यातली एक वस्तू काढून अर्पिताच्या हातात ठेवली. बहुतेक ती साडी असावी.
“अहो वहिनी हे कशाकरिता?”अर्पिता आढेवेढे घेत म्हणाली.
“अहो असं कसं तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे येताय. काहितरी गिफ्ट तर द्यालाच हवं ना?”
“पण आम्ही तर काहिच आणलं नाही”
” तुम्ही आणलं नाही म्हणून आम्ही काही द्यायचं नाही असं थोडीच असतं वहिनी !”पीके हसत म्हणाला. मग त्याने स्वप्नाच्या हातातून बँग घेत त्यातून एक मोठं पाकीट काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाला “अजिंक्य हे तुझ्यासाठी”
” हे काय?” मी हात मागे खेचत म्हणालो.
“काही नाही टी शर्ट आहे. तुला टी शर्ट आवडतात म्हणून घेतलाय”
मी अर्पिताकडे पाहिलं. ती रागाने माझ्याकडे बघत होती.घरातून निघण्याअगोदर पीकेच्या परिवारासाठी काहितरी गिफ्ट घेऊया असं ती मला म्हणत होती पण मी तिचं म्हणणं उडवून लावलं होतं. फक्त पीकेच्या मुलीसाठी आम्ही चाँकलेट आणलं होतं तेही स्वस्ताचं.
“आणि हा फ्राँक या छकुलीसाठी “स्वप्नाने माझ्या मुलीच्या हातात फ्राँकचा बाँक्स ठेवत म्हंटलं.
“आता तुम्ही आमच्याकडे यायचं बरं का साहेब आणि स्वप्ना वहिनी”अर्पिता दोघांकडे पहात म्हणाली.
“अहो वहिनी मला ते साहेब बिहेब म्हंटलेलं आवडत नाही बरं!
तुम्ही मला भाऊजी किंवा पीके म्हंटलं तरी चालेल. काय रे अजिंक्य?”पीके हसत म्हणाला. मी कसानुसा हसलो.
“आणि हो अजिंक्य. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाची अँनिव्हर्सरी आहे. तसा मी फोन करेनच पण पंधरा तारीख लक्षात ठेव.तुम्हांला दोघांनाही नक्की यायचं आहे आणि आपल्या धुळ्याचे जे जे मित्र पुण्यात आहेत त्यांचेही नंबर्स मला पाठव. सगळ्यांनाच निमंत्रणं द्यायची आहेत”
“बरं पाठवतो”
त्यांचा निरोप घेऊन आम्ही बंगल्याच्या बाहेर निघालो आणि मला एकदम हायसं वाटलं. मनावरचं दडपण एकदम नाहिसं झालं.
“किती छान आहेत ना ही माणसं!” बाईकवर बसून आम्ही निघालो तशी अर्पिता म्हणाली “कलेक्टर असूनही तुमचा पीके किती साधा आहे. आणि ती स्वप्ना! माय गाँड काय सुंदर आहे ती! पण थोडासाही गर्व नाही. दोन अडिच तासातच आम्ही मैत्रिणी होऊन गेलो. जेवणही किती छान होतं. पण का हो तुम्ही तर अजिबातच बोलत नव्हतात. काय झालं होतं तुम्हांला?”
” नाही तसं काही नाही. पण कलेक्टर म्हंटलं की थोडं दडपण तर येणारच ना!” मी अडखळत म्हणालो खरा पण पीकेबद्दल वाटणाऱ्या मत्सराने मी जळून खाक झालो होतो.
आम्ही घरी आलो.कपडे बदलून झाल्यावर अर्पिता मला म्हणाली
“आपण कधी बोलवायचं त्यांना जेवायला आपल्या घरी?”
आतापर्यंत दाबलेला माझा राग एकदम उफाळून आला.मी एकदम जोरात ओरडलो
“अजिबात बोलवायचं नाही त्यांना.आणि त्यांच्या अँनिव्हर्सरीलाही आपण जाणार नाही आहोत. कळलं तुला. मुद्दाम.. मुद्दाम करतोय तो पीके हे सगळं मला जळवण्यासाठी. काँलेजमध्ये मी त्याच्याशी वाईट वागलो ना त्याचा बदला घेतोय तो.”तू मला तुच्छ समजत होतास ना! आता बघ मी किती मोठ्या पोस्टवर आहे. माझी बायकोही बघ तुझ्या बायकोपेक्षाही सुंदर आहे. माझी मुलगीही तुझ्या मुलीपेक्षा छान आहे. माझ्याकडे मोठा बंगला आहे. अधिकार आहेत. नोकरचाकर आहेत” हे सांगण्यासाठीच फक्त त्या हलकटाने आपल्याला त्याच्याकडे बोलावलं होतं. मला समजतोय त्याचा कावा. वरुन साळसूदपणाचा आव आणतो तो, पण महाबनेल आहे तो. मला तो कधीच आवडला नाही, आताही आवडत नाही आणि पुढेही आवडणार नाही. समजलं तुला?
आणि आता त्याचं कौतुक करुन माझं डोकं खराब करु नकोस “
अर्पिता धक्का बसल्यासारखी माझ्याकडे बघत होती.
“अहो काय झालंय काय तुम्हाला?का एवढे चिडताय. इतके चांगले वागले ते आपल्याशी. एवढे गिफ्ट….”
“मुद्दाम…मुद्दाम दिले त्याने ते. आपण काही नेलं नाही ना! म्हणून मुद्दाम आपल्याला लाजवण्यासाठी दिले त्याने ते गिफ्टस. महा नीच आहे तो पीके आणि आता पुरे झाली त्याची स्तुती. तुला फुकटची साडी मिळाली म्हणून फार पुळका आलाय ना तुला त्या पीकेचा?”
अर्पिता डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिली. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करुन तणतणत झोपायला निघून गेलो. मी पलंगावर पडलो खरा पण मला रात्रभर व्यवस्थित झोप आली नाही. सारखी पीकेचीच स्वप्नं पडत होती. स्वप्नात ती “प्रथमेश काळे,जिल्हाधिकारी “ची पाटी वारंवार डोळ्यासमोर येत होती आणि त्यापाठोपाठ हसणारी स्वप्ना मला म्हणत होती “अजिंक्य मला तू कधीच आवडला नाहीस, मला प्रथमेशच आवडतात”
तीन दिवस झाले माझं आँफिसमध्येही कामात मन लागत नव्हतं. घरातही मी जास्त बोलत नव्हतो. अर्पिता विचारायची त्या प्रश्नांना फक्त हो-नाही एवढीच उत्तरं देत होतो. नेहमी घरी आलो की माझ्या मुलीसोबत खेळायचो. पण पीकेची मुलगी पाहिल्यापासून माझी मुलगी मला आँर्डिनरी वाटायला लागली होती. मी तिच्यासोबत खेळणं तर सोडाच साधा बोलतही नव्हतो. पीके आणि स्वप्नाने माझा अहंकार चक्काचूर केला होता. मी स्वतःच्या नजरेत एकदम क्षुद्र होऊन गेलो होतो.
आता माझ्या मनात पीके आणि स्वप्नाबद्दल वाईट विचार येऊ लागले होते. त्या दोघांचा संसार कसा मोडता येईल याचा मी विचार करु लागलो. सुंदर बायकांचे नवरे कायम संशयी असतात हे मला माहीत होतं. मैत्रीच्या नावाखाली स्वप्नाला वारंवार भेटून अशा काही हरकती करायच्या की पीके आणि स्वप्नात भांडणं लागली पाहिजे. मी अजुनही देखणा होतोच. किंबहूना पीकेपेक्षा स्वप्नासाठी मीच योग्य होतो. अजूनही स्वप्नाला पटवणं मला शक्य झालं असतं. या विचाराने मी उत्साहीत झालो खरा पण दुसऱ्याच क्षणी माझा उत्साह मावळला. पीकेकडे आज अमर्याद अधिकार होते. त्याला माझ्या या प्लँन्सचा जरा जरी संशय आला तरी तो एका आदेशाने माझी रवानगी तुरुंगात करु शकत होता. तसं झालं तर माझी नोकरी, माझं कुटुंब यांना मी मुकणार होतो. शिवाय नातेवाईकात, समाजात जी बदनामी झाली असती ती वेगळीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्वप्नाने काँलेजात असतांना माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं ती स्वप्ना आज एका मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी आणि एका मुलीची आई असतांना मला कितपत प्रतिसाद देईल याची शंकाच होती. शिवाय तिच्या नजरेतून, वागण्यातून पीकेबद्दल व्यक्त होणारं प्रेम सहजासहजी कमी होणं अशक्यच होतं.
पाचव्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर मी मोबाईलवर व्हाँटस्अप बघत असतांना अर्पिता माझ्यासमोर बसून म्हणाली.
“काय झालंय तुम्हांला? चारपाच दिवसापासून एकदम शांतशांत असता. माझ्याशी बोलत नाही. आपली छकुली तुम्हाला काहीकाही विचारते तिलाही उत्तर देत नाही. असं आम्ही दोघींनी काय केलंय की तुम्ही आमच्याशी वाईट वागताय?”
“काही नाही. माझी मनःस्थिती ठिक नाहिये” मी तिची नजर टाळत म्हणालो.
“पीके भाऊजींच्या घरुन आल्यापासूनच तुमची मनःस्थिती खराब झालीये. खरं ना?”
मी उत्तर दिलं नाही.
“मी सांगते तुमची मनःस्थिती का खराब झालीये. ज्या पीकेला तुम्ही एकदम फालतू आणि तुच्छ समजत होतात तो पीके एवढा मोठा अधिकारी झालाय याचा तुम्हाला मोठा धक्का बसलाय. बरोबर? आणि का हो आपल्या लग्नानंतर तुम्ही मला तुमचं काँलेजच्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं हे सांगितलं होतं. ती मुलगी स्वप्नाच आहे ना?”
मी पकडल्या गेलो होतो. लग्नाअगोदरची लफडी बायकोला सांगायची नसतात हे तत्व मी पाळलं नव्हतं. मला होकारार्थी मान हलवण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नव्हता.
“आता सगळं मँटर क्लियर झालं. ज्या स्वप्नाने तुमच्यासारख्या देखण्या, उंच, रुबाबदार मुलाला दाद दिली नाही, तुमचं प्रेम नाकारलं. त्या स्वप्नाने तुम्ही ज्या मुलाला तुच्छ, फालतू समजत होतात त्या बुटक्या, साधारण चेहऱ्याच्या मुलाशी लग्न करावं ही गोष्ट तुम्हांला सहन होत नाहिये. बरोबर ना?”
मी न बोलता मोबाईलशी खेळत राहिलो.
” तुम्हांला राग येईल अजिंक्य, पण खरं सांगते स्वप्नाची निवड अजिबात चुकलेली नाही”
मी रागाने आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.
“अजिंक्य, पीके चेहऱ्याने देखणा नसेल पण तो मनाने अतिशय देखणा आहे. त्याची शारीरिक उंची कमी असेल पण मनाची उंची आभाळाएवढी आहे. आणि असतात काही मुली स्वप्नासारख्या, ज्या चेहऱ्याच्या देखणेपणापेक्षा मनाच्या देखणेपणाला जास्त महत्व देतात. कारण चेहऱ्याचा देखणेपणा काही काळापुरता असतो पण मनाचा देखणेपणा शाश्वत असतो हे त्यांना माहित असतं. स्वतःमध्ये काहिही व्यंग नसतांना अंध, अपंग मुलांशी लग्न करणाऱ्या बऱ्याच मुली असतात. त्यामागेही हेच कारण असतं. पीके पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास झालाय तेही देशभरातून तिसऱ्या रँकने. याचा अर्थ तो बुध्दिमान आहे. कर्तुत्ववान आहे. मुख्य म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जाणारा एक संवेदनशील माणूस आहे. म्हणूनच स्वप्नाला तो आवडला. पीके पहिल्यांदाच आपल्याकडे आला तेव्हा आपल्या सर्वांसाठी गिफ्ट घेऊन आला तेव्हाच मी ओळखलं की हा माणूस मनाने अतिशय देखणा आहे. एक कलेक्टर असुनही तो कोणताही मानपान न घेता स्वतःहून तुमच्याकडे आला. तुम्हाला सन्मानाने त्याच्या घरी जेवायला बोलावलं. काय गरज होती त्याला तुम्हांला इतका मानपान देण्याची? तुम्ही म्हणता त्याने तुम्हांला जळवण्यासाठी हे सगळं केलं. अजिबात नाही अजिंक्य. आम्ही बायका माणसांना बरोबर जोखत असतो.
त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा,वागण्याचा आम्ही बरोबर अर्थ लावत असतो. आणि मला पीकेच्या बोलण्यावागण्यात कुठेही तसा उद्देश आढळून आला नाही. स्वप्ना मला सांगत होती की पीकेना माणसं जोडण्याची फार आवड आहे. ते जिथे जातात तिथे स्वतः पुढे होऊन माणसं जोडतात.आज त्यांचे संपूर्ण भारतात मित्र आहेत. फोन करायचा अवकाश, माणसं हातचं काम टाकून भेटायला येतात. प्रेमाने घरी घेऊन जातात.स्वप्ना सांगत होती, त्यांच्या लग्नाला विरोध करणाऱ्या तिच्या नातेवाईकांना पीकेंनी असं जिंकून घेतलंय की कोणताही कार्यक्रम असो पीकेंशिवाय त्यांचं पान हलत नाही. लक्षात घ्या स्वप्नाचे वडिल म्हणजे पक्का व्यावसायिक मारवाडी माणूस. त्यांनी पीकेंची अचूक पारख केली होती. माणूस हिरा आहे हिरा! आणि ते अगदी खरं आहे.ही झाली पीकेंची गोष्ट. स्वप्नाचं काय? दिसायला इतकी सुंदर. फिल्म इंडस्ट्रीत गेली असती तर खात्रीने गाजली असती इतकी सुंदर. त्यातून कलेक्टरची बायको. किती गर्व असायला पाहिजे? पण बाई जमीनीवर आहे. त्या दोघांच्या तुलनेत आपण एकदम क्षुल्लक.
पण आपल्याला बोलावलं, जेवू घेतलं, एखादा नातेवाईक असल्यासारख्या आपल्याला गिफ्ट दिल्या आणि आपण काय दिलं तर एक चाँकलेट! का तर म्हणे “पीके फालतू माणूस आहे मला तो आवडत नाही”.त्यांनी आपल्याला लाजवण्यासाठी काही केलं नाही पण आपल्याला नक्कीच लाज वाटली पाहिजे की समोरचा माणूस आपल्याला दोनदोनदा महागड्या गिफ्ट देतोय आणि आपण फक्त घेतोय,देत काहीच नाही. अजिंक्य, स्पष्टच बोलते, तुम्ही चेहऱ्याने खुप देखणे आहात पण त्या चेहऱ्यावर अहंकाराचा, मीपणाचा चिखल लागलाय. म्हणूनच कदाचित स्वप्नाने तुम्हांला नाकारलं असावं. तो चिखल धुवून टाका, तुम्ही जास्तच देखणे दिसाल. खरं सांगते पीकेसारखी माणसं आजकाल फार दुर्मिळ झाली आहेत. तुम्ही ज्यांना जीवलग मित्र म्हणता त्यांचंच उदाहरण घ्या ना. पुण्यात राहूनही कधी बोलावतात ते आपल्याला प्रेमाने? मागे एकदा काय ते गेटटुगेदर केलं होतं फक्त दारु पिण्यासाठी आणि खाण्यासाठी. त्याचाही खर्च त्यांनी वसुल केला होता. त्यात ना प्रेम होतं ना आपुलकी. सगळेजण स्वतःला ग्रेट समजणारे. एकजात गर्विष्ठ.
त्या पार्श्वभूमीवर पीकेला बघा. खरा मित्र कोण आहे ते तुमच्या लक्षात येईल अजिंक्य. त्याला सोडू नका. त्याला तुमची गरज नाहिये. त्याच्याकडे पैसा, अधिकार, मानसन्मान सगळं आहे तरीही तो तुम्हांला जोडू पहातोय. विचार करा. तुम्ही त्या स्वप्नाला पटवण्यासाठी अनेक उद्योग केले हे तुम्हीच मला सांगितलं होतं. ते उद्योग स्वप्नाला आजही आठवत असतील. पीकेंनाही ते माहित असतील पण तरीही मागचा सगळा भुतकाळ विसरुन ते तुम्हांला जोडू पहाताहेत यात त्यांचा काही स्वार्थ आहे असं मला वाटत नाही. तुमच्या मैत्रीचा फायदा पीकेला कमी तुम्हांलाच जास्त होणार आहे. शांततेने विचार करा मगच मैत्री तोडायची की टिकवायची याचा निर्णय घ्या”
अर्पिताचा एकेक शब्द माझं काळीच चिरुन जात होता. तो एकूण एक शब्द खरा आहे हे बुध्दीला पटत होतं पण मन मानत नव्हतं. पीकेने मला पराभूत केलं होतं आणि तो पराभव माझ्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातून सावरण्यासाठी काळ हेच उत्तर होतं. पीकेच्या बातम्या आणि अनेक कार्यक्रमातले फोटो आता वर्तमानपत्रात झळकू लागले होते. एक धडाकेबाज, कार्यक्षम पण तितकाच संवेदनशील, सह्रदयी जिल्हाधिकारी असा त्याचा नावलौकिक होऊ लागला होता. तो पाहून माझ्या काळजात आग लागायची.
एक दिवस कंपनीच्या कँटीनमध्ये चहा घेत असतांना एक जण म्हणाला “अरे हा जो नवीन कलेक्टर आलाय त्याला कुणी भेटलंय का?”
“का रे काय झालं?” पीकेबद्दल काहितरी वाईट ऐकायला मिळेल या उत्साहाने मी विचारलं
“अरे काय ग्रेट माणूस आहे यार! एकदम डँशिंग! परवा आमच्या पर्यावरण संस्थेतर्फे आम्ही त्याला भेटायला आणि जिल्ह्यातल्या व्रुक्षतोडीबद्दल निवेदन द्यायला गेलो होतो. निवेदन वाचल्याबरोबर त्याने धडाधड सगळ्या फाँरेस्ट आँफिसर्सना आणि तहसीलदारांना फोन केले. व्रुक्षतोडीबद्दल खात्री झाल्यावर सगळ्यांना सज्जड दम भरला. दुसऱ्या दिवशी ताबडतोब मिटींगला यायला सांगितलं. समाधानाने आम्ही निघायला लागलो तर आम्हांला आग्रहाने बसवून आमच्यासाठी चहाबिस्कीटं बोलावली. प्रत्येकाशी ओळख करुन घेतली. काहीही प्राँब्लेम असेल तर मला निःसंकोचपणे येऊन भेटा असं सांगितलं. यार जिंकून घेतलं त्या माणसाने आम्हांला. कलेक्टर न वाटता तो आपला मित्र आहे असंच वाटत होतं”
“अरे मी असं ऐकलंय की कलेक्टर आँफिसबाहेर जे तंबू टाकून धरणे द्यायला किंवा उपोषणाला बसतात त्यांना म्हणे या कलेक्टरने सांगितलंय की’ तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका, मला येऊन भेटा. मी तुमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करेन ‘आणि तो तसं करतोय बरं. त्यामुळे आता तिथं फक्त राजकीय पक्षाचेच तंबू दिसतात” दुसरा म्हणाला.
“तुम्हांला माहित नसेल पण हा कलेक्टर आणि मी जीवलग मित्र आहोत. धुळ्याला एकाच काँलेजमध्ये आम्ही शिकलो “माझ्या तोंडून हे वाक्य कसं निघून गेलं मलाच कळलं नाही. मी स्वतःच आश्चर्यचकित झालो.
“काय सांगतोस काय? अरे मग आधी सागायचंस ना?”
“तो कलेक्टर जसा साधा माणूस आहे ना! तसाच मीसुद्धा साधाच आहे. कलेक्टर माझा जीवलग मित्र आहे ही काही दवंडी देण्यासारखी बातमी नाही”
“तू आणि साधा?काय जोक करतोस का? अरे तुझ्यासारखा अँटिट्यूड दाखवणारा माणूस कंपनीत दुसरा नसेल. बरं ते जाऊ दे.घेऊन चल आम्हांला कधी तुझ्या या मित्राकडे “
“नक्की घेऊन जाईन “मी उत्साहाने म्हणालो.
मी कलेक्टरचा जीवलग मित्र आहे अशी बातमी सगळ्या कंपनीत पसरली. एक दिवस एम.डीं.नी मला बोलावून घेतलं.
” देसले हे नवीन कलेक्टर तुमचे जीवलग मित्र आहेत म्हणे”
” हो सर “
” व्हेरी गुड”एम.डी.खुश होऊन म्हणाले “मग पुढच्या महिन्यात आपल्या कंपनीच्या अँनिव्हर्सरीच्या प्रोग्रामला चीफ गेस्ट म्हणून त्यांना घेऊन यायची जबाबदारी तुमची”
” येस सर. मी आग्रह केला तर ते नक्की येतील “
मी अभिमानाने बोललो. एम.डी.खुश झालेले दिसले. अर्पिता बरोबरच म्हणत होती. पीकेसोबतच्या मैत्रीचा मलाच जास्त फायदा होणार होता. रात्री झोपतांना सहजच काँलेजमधला एक प्रसंग आठवला. पेट्रोल संपलं म्हणून माझी बाईक रस्त्यात बंद पडली होती.सगळ्या मित्रांना फोन केले पण कुणालाच मदतीला यायची इच्छा दिसत नव्हती. शेवटी कंटाळून मी ती जड बाईक ढकलत निघालो तोच मागून पीके सायकलवर तिथे आला. मला बाईक ढकलण्याचं कारण विचारलं. मी सांगितल्यावर मला म्हणाला
“काही काळजी करु नकोस. तू इथेच थांब मी कुठूनतरी बाटली मिळवून पेट्रोल घेऊन येतो “दोन किमी. वरच्या पेट्रोल पंपावर जाऊन तो पेट्रोल घेऊन आला.
मी पैसे देऊ लागलो तर घेतले नाहीत. म्हणाला “राहू दे मी कधी गरज लागली तर घेईन तुझ्याकडून” ही घटना मी दुसऱ्या दिवशी माझ्या ग्रुपमध्ये सांगितली. सगळे खुप हसले. एक जण म्हणाला ” आता आपलं पेट्रोल संपलं की पीकेलाच बोलवत जाऊ.पेट्रोल फुकट आणि सर्व्हिसही फुकट.चांगला बकरा सापडलाय “मीही त्यावेळी हसलो होतो पण आज त्या निर्लज्जपणाबद्दल मला चांगलीच लाज वाटत होती. पीकेने मला नंतर कधीही ते पैसे मागितले नव्हते. पीकेबद्दल जसजसा विचार करु लागलो तसतशी त्याच्या मनाच्या मोठेपणाची जाणीव मला होऊ लागली.
पीकेच्या अँनिव्हर्सरीला आता पंधरा दिवस राहिले होते. त्याला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं होतं पण माझा तो निर्णय मलाच आता चुकीचा वाटू लागला होता. गेलो तरी चांगलं मोठं गिफ्ट घेऊन जायचं असा विचार करत असतांनाच मला एक कल्पना सुचली. मी माझा मित्र सुमीतला फोन लावला.
” सुमीत तुला आपल्या काँलेजचा पीके आठवतो का?”
” हो. तोच ना तो बावळट मुलगा ज्याची आपण नेहमी टर उडवायचो? त्याचं काय?”
“अरे तोच बावळट पीके आता पुण्याचा कलेक्टर म्हणून आलाय”
“कायsss?काही काय सांगतोस?अरे हो यार मी पेपरमध्ये त्याचे फोटो पाहिले होते. प्रथमेश काळे. पण मला वाटलं हा प्रथमेश काळे दुसरा कुणीतरी असेल.कारण फोटोतला कलेक्टर तर चांगलाच स्मार्ट दिसत होता. चांगलीच झेप घेतलीये रे पीकेने. वाटलं नव्हतं एवढा पुढे जाईल “
” त्याच्या भरारीबद्दल तर काही विचारुच नकोस.त्याची बायको कोण आहे हे तुला कळलं तर तू बेशुद्ध पडशील “
” कोण..कोण आहे त्याची बायको?”
” ज्या मुलीवर आपण सगळेच लाईन मारायचो ती आपल्या काँलेजची स्वप्नसुंदरी,स्वप्ना “
” कायssssss?”सुमीत जोरात किंचाळला
“आय कान्ट बिलीव्ह यार.पण हे कसं शक्य आहे? ती इतकी सुंदर आणि तो असा…”
” आता तो पुर्वीचा पीके नाही राहिला. तो आता चांगला स्मार्ट दिसतो. आणि त्यांच्या लग्नाची कहाणी मी तुला नंतर सांगेन. तीही खुप इंटरेस्टिंग आहे. मी आता तुला याकरीता फोन केला की पीकेची या पंधरा तारखेला अँनिव्हर्सरी आहे आणि त्याने आपल्या धुळ्याच्या सगळ्या मित्रांना निमंत्रण दिलंय. आपण त्या कार्यक्रमाला जाऊच पण त्या अगोदर पुण्यात आपल्या काँलेजचे जेजे मित्र आहेत त्यांच्यातर्फे पीकेचा आपण सत्कार करावा असं मला वाटतं. आपल्या काँलेजचा एक मुलगा आज एवढा मोठा अधिकारी होतो ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्याला कधी मित्र मानलं नाही पण तो आपल्याला अजून मित्रच मानतो. मी आठदहा दिवसांपुर्वी त्याच्या बंगल्यावर जेवायला गेलो होतो. तो आणि स्वप्ना दोघंही आमच्याशी खुप चांगले वागले.त्याला अजुनही आपल्या मित्रांना भेटायची इच्छा आहे. त्याच्या अँनिव्हर्सरीतही आपल्याला त्याचा सत्कार करता येईल पण तो औपचारिक वाटेल. आपण तो कार्यक्रम वेगळाच ठेवू या. काय विचार आहे?”
” आयडिया चांगली आहे. पण खरंच या सत्काराची गरज आहे का?”
” सुमीत पीकेने काँलेजमध्ये असतांना नेहमीच सगळ्यांना मदत केलीये. तू आठव तुलाही कधीतरी केलीच असेल “
” हो यार ही गोष्ट खरी आहे.स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही तो सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा. मलाही त्याने एकदोनदा पैशाची नाही पण इतर मदत केलीच आहे. ठिक आहे करु आपण. चल लागू तयारीला. चांगली जंगी पार्टी करु. पीके खुश झाला पाहिजे. पण कारे येईल का तो त्या सत्काराच्या कार्यक्रमाला? तो एवढा मोठा आणि बिझी माणूस. म्हणायचा मला वेळ नाही. मग?”
” तसं होणार नाही. फार साधा आहे रे आपला पीके.आणि खुप चांगलाही. आपण फार वाईट वागलो रे त्याच्याशी. आता वेळ आलीये त्याला आपली खरी मैत्री दाखवून देण्याची….” हे म्हणताम्हणता मला का गहिवरून आलं आणि माझे डोळे का भरुन आले ते मला कळलं नाही. आणि….त्याचक्षणी मला एका सत्याची जाणीव झाली. पीकेने इतरांसारखं मलाही जिंकून घेतलं होतं!