“आई आनंदाची बातमी आहे.मला ९८ टक्के मिळाले” आईला मिठी मारत मानस म्हणाला.सुनिताच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहीले. “खुप खुप अभिनंदन बेटा. तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर. त्यांनाही खुप आनंद होईल” मानसने सुभाषला फोन लावला.आपला रिझल्ट सांगितला. “अरे वा खुप मस्त. अभिनंदन बेटा. मी आलोच घरी” सुभाष म्हणाला .
मानस हा सुभाष-सुनिताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळावे यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला अँडमिशन करुन दिली होती. खरं तर दोघांच्या खाजगी नोकऱ्या.क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती तरीसुद्धा स्वतः वर्षभर काटकसर करुन त्यांनी मानसला कोणतीही अडचण येऊ दिली नव्हती. मानसनेही त्याची जाण ठेवत आईवडिलांना अपेक्षित असं दणदणीत यश दहावीत मिळवलं होतं.
सुभाष घरी आला. येतांना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला. “बाबा आमच्या क्लासच्या सरांनाही पेढे द्यायचे का?” “हो मग! अरे त्यांच्यामुळे तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत. चल जाऊया आपण त्यांच्याकडे” दोघंही बापलेक पेढे घेऊन मानसच्या क्लासमध्ये पोहोचले.क्लासमध्ये खुप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते.
“अरे ये ये मानस आणि मनःपूर्वक अभिनंदन.९८ टक्के मिळाले ना?” सरांनी हाक मारुन मानसला जवळ बोलावलं.
“हो सर. थँक्यू सर” मानस म्हणाला.
“सर हे घ्या पेढे. तुमच्यामुळे मानसला एवढं मोठं यश मिळालं”
सरांना पेढे देत सुभाष म्हणाला.
सरांनी पेढे घेतले आणि हसत म्हणाले.
“सुभाषभाऊ पुर्ण शहरात आपला क्लास टाँपवर आहे. अहो २५ मुलांना ९५%च्यावर, ५० मुलांना ९० च्यावर आणि ३० मुलांना ८०%वर मार्क्स आहेत.” मानसला आठवलं या क्लासमध्ये ९वीत ८०%असलेल्यांनाच प्रवेश मिळतो. याचा अर्थ सगळी स्काँलर मुलंच इथे घेतली जातात. ही मुळातच स्काँलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला ‘मग या मुलांच्या यशात खरंच क्लासचा काही रोल होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का?
हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं कुठे? “सर ९वीत ७०% मिळालेल्या माझ्या मित्राच्या भावाला आपल्या क्लासमध्ये अँडमिशन मिळेल?” मुद्दामच त्याने सरांना विचारलं “अजिबात नाही. आपण आपल्या क्लासचा दर्जा उच्च ठेवलाय मानस आणि आपण तो मेन्टेन करतो” सर आत्मप्रौढीने म्हणाले. तेवढ्यात इतर पालक आत शिरले तेव्हा मानस आणि सुभाषने सरांचा निरोप घेतला.
रिझल्ट लागला. आता अँडमिशनची प्रक्रीया सुरु झाली. ११वी-१२वी करुन मेडीकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डाँक्टर व्हावं असं सुनीता-सुभाषचंही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित काँलेजमध्ये वार्षिक १५ हजार रुपये भरुन मानसने प्रवेश घेतला. मानसचा काँलेजला जायचा पहिलाच दिवस म्हणून सुनिता मुद्दामच घरी राहिली. मानस काँलेजला गेला आणि दोन तासातच परत आला.
“अरे! काँलेजला गेला नाहीस?” सुनीताने विचारलं.
“अगं गेलो होतो. पण दोनचारच मुलं आली होती. त्यामुळे पिरीएडस् होऊ शकले नाहीत. माझा मित्रही आला होता. तो म्हणाला आजकाल काँलेज कुणीच अटेंड करत नाहीत. फक्त प्रँक्टिकलला येतात”
“अरे मग शिकणार कसं?”
“काँलेजमध्ये चांगलं शिकवत नाहीत म्हणून सगळे क्लासेस लावून घेतात “
“अरे मग काँलेजची आपण एवढी फी भरतो ती कशासाठी?”
“फक्त नावासाठी आणि परीक्षा देण्यासाठी.चांगल्या काँलेजमधून शिकलो हे सांगण्यासाठी”
” ते काही नाही. तू काँलेजची लेक्चर्स अटेंड करत जा” सुनीता रागाने म्हणाली.
“अगं आई आम्ही गेलो होतो प्राचार्यांना भेटायला. ते म्हंटले किमान दहा तरी मुलं येऊ द्या क्लासमध्ये, मग पाठवतो प्राध्यापकांना. त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थीच बसत नाहीत लेक्चर्सना. आम्ही तर तयार आहोत”
“बापरे म्हणजे काय आता क्लासेस लावायचे?”
“काही इलाज नाही आई. मेडीकलला जायचं म्हंटल्यावर क्लासेस तर लावावेच लागतील”
सुनीताने कपाळावर हात मारुन घेतला. आधीच दोघांची तुटपुंजी कमाई त्यात हा नवीन खर्च.
संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर मानसने सगळा किस्सा त्याला सांगितला.
“ठिक आहे. पण क्लासेस लावायचे तर कुठे? चांगले क्लासेस कोणते आहेत? “सुभाषने विचारलं.
“हो मी काढलीय माहिती. तुम्हाला वेळ असेल तर जाऊन यायचं का?”
“जावंच लागेल. शिकण्यासाठी हे सर्व करावं तर लागणारच आहे”
दोघं एका क्लासमध्ये पोहोचले. बाहेर बसलेल्या रिसेप्शननिस्टने मार्क्स विचारले. त्यांनी सागितल्यावर ती म्हणाली.
“ठिक आहे. आमची ११वी, १२वीची मिळून १,८०००० फी आहे एका टप्प्यात भरली तर! तुम्ही चार टप्प्यातही भरु शकता. पण मग ५० हजाराचे चार टप्पे. अशी फी होईल दोन लाख.”
“बापरे एवढी फी?कोणी देतं का?” सुभाषने विचारलं
ती हसली आणि जरा मग्रुरीनेच म्हणाली.
“कुणी देतं का? अहो सर आमची १२० विद्यार्थ्यांची कँपँसिटी आहे. ११५जागा भरल्यात. तुम्ही घाई केली नाहीत तर तुमच्या मुलाला अँडमिशन मिळणं मुश्किल आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी खर्च हा करावाच लागतो” तेवढ्यात एक मुलगी आईवडिलांसोबत चौकशी करण्यासाठी आली. रिसेप्शनिस्टने तिला मार्क्स विचारले. तिने ७५ टक्के सांगितल्यावर ती म्हणाली.
“साँरी ८५ टक्क्यांच्या खाली आम्ही अँडमिशन देत नाही. पण आम्ही तुला वेटींगवर ठेवू. आमच्या उरलेल्या पाच जागा भरल्या नाहीत तर आम्ही तुला काँल करु.”
मुलीचा चेहरा पडला. तिचे पालक रिसेप्शनिस्टला विनवण्या करु लागले. “अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला” रिसेप्शनिस्ट त्यांच्यावर खेकसत म्हणाली. “मी काही करु शकत नाही म्हणून”
“अहो पण इथे वाट बघत बसलो तर बाकीचे क्लासेस फुल्ल व्हायचे. मग तिथेही अँडमिशन मिळणार नाही” त्या मुलीचे वडिल अगतिकतेने म्हणाले.
“साँरी. तुम्ही सरांना भेटू शकता” तो संवाद ऐकून मानसला काय वाटलं कुणास ठाऊक तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला
“मँडम तुम्ही यांना अँडमिशन द्या. मला नाही घ्यायची अँडमिशन” तिथे बसलेले सगळे त्याच्याकडे अवाक होऊन बघू लागले.
“अरे मानस असा काय करतोस? अँडमिशनसाठीच तर आलो ना आपण?” सुभाष आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.
“नाही बाबा. आपण फक्त चौकशीसाठी आलोय. चला आपण बाहेर जाऊया”
आणि तो उठून बाहेरही पडला. सुभाषही हतबल होऊन त्याच्यामागे बाहेर पडला. “मानस काय वेडेपणा चालवलाय? अरे आपल्या शहरातला सर्वात नावाजलेला क्लास आहे हा आणि तू….”
“नावाजलेला आहे कारण ते हुशार मुलांनाच प्रवेश देतात. बघितलं ना तुम्ही, त्या मुलीला क्लासची खरी गरज होती. तिला ते प्रवेश देत नव्हते. आणि बाबा मला इतका महागडा क्लास लावायचाच नाहिये. आपण एखादा नवा क्लास बघू. ते फी कमी घेतात आणि नांव मिळवण्यासाठी चांगलंसुध्दा शिकवतात”
“तू पैशांची काळजी नको करुस मानस. तुला डाँक्टर करायचं आमचं स्वप्न आहे. प्रसंगी आम्ही स्वतःला गहाण ठेवू पण तुला कसलीच कमी पडू देणार नाही” मानस हसला “मला समजतंय ते बाबा पण त्याची काहीच गरज नाही. चला आपण दोनतीन क्लास बघू आणि फायनल करु” तीन क्लासमध्ये चौकशी केल्यानंतर चौथ्या क्लासमध्ये त्यांनी प्रवेश नक्की केला. मानससारखा हुशार मुलगा आपला क्लास जाँईन करतोय हे पाहून क्लासवाल्यांनाही आनंद झाला.
मानस काँलेजमध्येही तीनचार वेळा जाऊन आला पण पिरीएडस् कुणीच अटेंड करत नव्हतं याचं त्याला दुःख होत होतं
एकदा केमिस्ट्रीच्या प्रँक्टिकलला सगळे विद्यार्थी जमले. आज सगळ्यांशी बोलायचंच असं मानस ठरवून आला होता. प्रँक्टिकल संपल्यावर व्हरांड्यात जमलेल्या मुलांकडे तो गेला. “मित्रांनो तुमच्यापैकी क्लास कुणी नाही लावलेला?”
सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एक मुलगा म्हणाला “अरे वेड्या सायन्सचा स्टुडंट क्लास लावणार नाही असं कधी होईल का?”
“आम्ही नाही लावला क्लास.का काय झालं?” सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या.चारपाच गरीब घरची मुलं समोर उभी होती. “का? तुम्ही का नाही लावला क्लास?” मानसने विचारलं.
“आम्ही १५किमी. वरच्या एका खेड्यात रहातो. घरची परीस्थिती एवढी चांगली नाहिये. आमच्यापैकी कुणाचे वडील शेती करतात तर कुणाचे छोटेमोठे उद्योग किंवा मजूरी. क्लासची महागडी फी आम्ही नाही भरु शकत.”
“मग तुम्ही पिरीएडस् का नाही अटेंड करत?”
“आम्हांला खेड्यावरुन बसने किंवा सायकलने यावं लागतं. त्याला आमची तयारी आहे. एकदोनदा आम्ही येऊन पाहीलं. पण इथे कुणी येतच नाही हे पाहून आम्हीही येणं सोडलं”
“अरे आपण एवढी फी भरतो काँलेजची ती कशासाठी? वरुन आपण महागडे क्लासेस लावतो. आपल्या आईवडिलांवर आपण किती ओझं टाकायचं?”
“आम्ही नाही अटेंड करणार पिरीएडस्. काही चांगलं शिकवत नाही” मध्येच एक मुलगी ठसक्यात म्हणाली. मानस तिच्याकडे किंचित रागाने बघत म्हणाला.
“मला सांगा क्लासमध्येही शंभर शंभर विद्यार्थी असतात. तिथेही कोणं आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देतं? आणि मी, ज्यांना काँलेज फीमध्ये सवलत मिळते किंवा ज्यांचे आईवडिलच श्रीमंत आहेत, त्यांच्याबद्दल बोलतच नाहिये. मी मध्यमवर्गीय किंवा गरीबांबद्दल बोलतोय” ती मुलगी तावातावाने तिथून निघून गेली “अजून कुणाला पिरीएडस् अटेंड करायची इच्छा आहे?”मानसने विचारलं.
“आमची” चारपाच मुली एकदमच म्हणाल्या मानसने सगळी मुलं मोजली. १५-१६भरली. “चला तर मग, आपण प्राचार्यांकडे जाऊ.उद्यापासून पिरियडस् सुरु करायची त्यांना विनंती करु”
दुसऱ्या दिवसापासून काँलेजमध्ये पिरीएडस् सुरु झाले. मानस सकाळी काँलेजला तर संध्याकाळी क्लासेसला जाऊ लागला. त्याचा क्लास अत्याधुनिक होता. क्लासमध्ये १२५ विद्यार्थी असल्यामुळे मागच्या मुलांना सरांचा आवाज ऐकू जायचा नाही. त्यांच्यासाठी टिव्ही आणि स्पिकर्सची व्यवस्था होती. मानस प्रश्नं विचारायचा. पण बरीच मुलं शंका असूनही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं हसू होऊ नये म्हणून प्रश्नंच विचारत नव्हती. याउलट काँलेजमध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळे सरांचं प्रत्येक मुलामुलीकडे लक्ष असायचं. हळूहळू मानसच्या लक्षात आलं की काँलेजमध्येही चांगलं शिकवल्या जातंय. क्लासमध्ये त्याच विषयाची पुनरावृत्ती होत असल्याने सगळ्या विषयांवर चांगली पकड बसत चालली होती.
मानसच्या क्लासमध्ये सगळे विषय शिकवल्या जात होते. पण बहुतांशी मुलांनी वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस लावले होते. ही मुलं काँलेजमध्ये न जाता या क्लासमधून त्या क्लासमध्ये जाण्यात दिवसभर अडकून पडायची. या अशा फिरण्याने त्यांना थकवा तर यायचाच शिवाय अभ्यासही व्हायचा नाही.
मानस तसा काही फार हुशार मुलगा नव्हता. आपण एकपाठी नाही आणि मेहनतीशिवाय आपल्याला पर्याय नाही ही गोष्ट तोही जाणून होता. संध्याकाळी क्लासहून परतल्यावर रात्री उशीरापर्यंत दिवसभरात झालेल्या अभ्यासाची उजळणी करणं आणि नोट्स काढण्याचं काम तो करायचा. घरकामं करुनही मेरीटमध्ये येणाऱ्या मुलींच्या बातम्या त्याने वाचलेल्या होत्या त्यामुळे आईला तो नेहमी घरकामात मदत करायचा. त्याचे वडील रात्री नऊ वाजता घरी यायचे. अर्थातच त्यांच्या वाट्याची बाहेरची कामंही त्यालाच करावी लागायची. मानसची त्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती आणि आईवडिलांच्या आशा आपल्यावरच केंद्रित झाल्या आहेत हेही तो जाणून होता. सुनीताला त्याच्या समंजसपणाचं खुप कौतुक होतं.मानसच माझी मुलगी आणि मुलगा आहे असं ती अभिमानाने लोकांना सांगायची.
सहामाही परीक्षा झाली.मानसला त्यात ८५ टक्के मिळाले. मराठी माध्यमात शिकलेल्या मानसला इंग्रजी माध्यमातले विषय थोडेफार जड जाणारच होते. सुभाषला मात्र थोडीफार चिंता वाटू लागली होती. एक दिवस तो मानसला म्हणाला.
“अजूनही चान्स आहे मानस, हा क्लास सोडून दुसरा चांगला क्लास लावून घे”
“बाबा क्लास कितीही चांगला असला तरी सगळेच विद्यार्थी काही मेरीटमध्ये येत नाहीत. शेवटी क्लासचा फायदा आपण कसा करुन घेतो ते आपल्यावर अवलंबून असतं. तुम्ही काही काळजी करु नका. वार्षिक परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळतील. नाहीच मिळाले तर बघु”
सुभाष काही बोलला नाही पण त्याचं मन मात्र अस्वस्थच होतं. एक गोष्ट मानसच्या लक्षात येत होती ती म्हणजे क्लासमध्ये १२५ विद्यार्थी असल्याने कुणाही विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिल्या जात नव्हतं. त्यातच परीक्षेच्या गुणांना केंद्रीत करुनच शिकवल्या जात होतं. विषयाचं सखोल ज्ञान मिळावं असं ना तर क्लासवाल्यांना वाटत होतं ना विद्यार्थ्यांना! शिक्षणपद्धतीच अशी होती की जास्तीत जास्त मार्क्स पदरात पाडून घेण्यावर भर दिल्या जात होता. अशा प्रकारच्या शिक्षणामुळेच काँपी करण्यासारखे शाँर्टकट्स विद्यार्थी अवलंबत होते.
वार्षिक परीक्षा सुरु झाली तसं मानसवर आईवडिलांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण आलं.खरं तर अकरावीच्या मार्क्सचा काहीही फरक पडणार नव्हता पण बारावीत आपण काय दिवे लावणार आहोत हे त्या मार्क्समुळेच कळणार होतं.मानसने रात्रीचा दिवस केला आणि परीक्षा दिली.रिझल्ट लागला.मानसला ८८टक्के मिळाले.ते मार्क्स पाहून सुभाष-सुनीताचे होश उडाले.
“बघ मानस तुला आम्ही म्हणत होतो चांगला क्लास लाव.पण तू ऐकलं नाहीस.बघितलं ना काय झालंय ते!”
सुनिता रडवेली होत म्हणाली. “अगं आई क्लासवर काहीही नसतं. जो क्लास बाबा लावायचं म्हणत होते त्या क्लासचा रिझल्ट आमच्या क्लासपेक्षाही कमी आहे. आमच्या क्लासमध्ये मी दुसरा आलोय. पहिल्या नंबरच्या मुलालाही ९०टक्के आहेत. एवढं काही वाईट घडलेलं नाहीये. अजून एक वर्ष बाकी आहे. होईल प्रगती”
मानस वैतागून म्हणाला. “अरे पण बेटा मेडिकलच्या द्रुष्टीने इतके मार्क्स पुरेसे नाहियेत. शिवाय आता “नीट”चीही परीक्षा असेल. त्यादृष्टीने चांगला क्लास लावणं आवश्यक नाहीये का? “सुभाषने विचारलं.
“बाबा तुमचीच काय सगळ्यांचीच ही मानसिकता झालीये की क्लास लावल्याशिवाय चांगले मार्क्स मिळत नाहीत म्हणून. आपला आत्मविश्वास कमी पडतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. तुमच्या काळातही डाँक्टर, इंजीनियर, शास्त्रज्ञ झालेत. कधी त्यांनी क्लासेस लावलेत?”
“अरे बेटा, तो काळ वेगळा होता. त्यावेळी इतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आजकाल पाँईंट फाईव्ह मार्कांनी अँडमिशन हुकतात” सुभाष त्याला समजावत म्हणाला. “मान्य आहे बाबा मला.पण मेडिकलला अँडमिशन नाही मिळाली तर आभाळ थोडीच कोसळणार आहे? दुसऱ्याही शाखा आहेत. आर्ट्स ग्रँज्युएट आय.ए.एस.होऊन कलेक्टर बनतात. काँमर्सवाले चार्टर्ड अकाउंटंट बनून डाँक्टर इतकाच पैसा कमवतात. इंजीनियरींगच्या अनेक अशा शाखा आहेत जिथे खोऱ्याने पैसा मिळू शकतो. अहो अंगठाछाप लोक आमदार, खासदार बनतात” बोलताबोलता मानस हसला पण सुभाष-सुनीता गंभीर होते.
“मानस हा गमतीचा मुद्दा नाहिये. डाँक्टरांचं स्टेटस काही वेगळंच असतं. तू डाँक्टर व्हावंस असं आमचं स्वप्न आहे. त्याकरीता आम्ही काहीही करायला तयार आहोत. बरं तू आता कुठे क्लास लावणार आहेस?” सुनिताने विचारलं.
“मी कुठेच क्लास लावणार नाहीये आई. मी घरीच अभ्यास करणार आहे”
“काय?” दोघंही जवळजवळ ओरडलेच. “काय वेडबीड लागलंय का तुला?”
“नाही आईबाबा. काँलेजमधले लेक्चर्स रेग्युलर अटेंड केले आणि घरी नियमित अभ्यास केला तर क्लासची गरजच नाहिये. क्लास अटेंड करण्यात दिवसातले बहुमुल्य चारपाच तास वाया जातात असं माझ्या लक्षात आलंय. आपण ओपन कँटगरीत येतो बाबा. आपल्याला मेडिकलला प्रचंड पैसा लागणार आहे. क्लासच्या अवाढव्य फीमध्ये तो घालवणं योग्य नाही. मी सगळा सारासार विचार केलाय. तुम्ही काही काळजी करु नका. मला मेडिकलला नक्की अँडमिशन मिळेल”
आणि तो उठून त्याच्या रुममध्ये निघून गेला.सुभाष-सुनीता त्याच्याकडे बघतच राहिले. काँलेज सुरु झालं आणि एक नवाच प्राँब्लेम उभा राहिला. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीत क्लासेस लावले नव्हते त्यांनी बारावीत क्लासेस लावून घेतले आणि हे विद्यार्थी काँलेजमधल्या लेक्चर्सला गैरहजर राहू लागले.ज्या मुलांना काहीच महत्वाकांक्षा नव्हती, फक्त ग्रँज्यूएशन करायचं होतं तीच मुलं फक्त काँलेजमध्ये हजर रहायची.पण त्यात नियमितपणा नव्हता.अर्थातच लेक्चर्स अनियमित होऊ लागली.मानस मग काँलेजच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करु लागला.पण अनेक मुद्दे त्याला समजायचे नाहीत.बरीच गणितं सुटता सुटत नसायची.अडचणी वाढत चालल्या होत्या.त्याच्या मनाची घालमेल वाढायला लागली.आपण क्लास सोडून चुक केली असं त्याला वाटू लागलं.एक दिवस तिरीमिरीत त्यांने प्राचार्यांचं आँफिस गाठलं.आपल्या आर्थिक परीस्थितीची,आईवडिलांच्या अपेक्षांची आणि क्लास सोडल्याची माहिती प्राचार्यांना दिली.त्यांनी मानसला खुर्चीत बसायला सांगितलं.
“तुझ्या धाडसाचंं मला कौतूक वाटतं मानस.मागील वर्षी तुझ्याच पुढाकारामुळे आपण लेक्चर्स सुरु केल्याचं मला आठवतंय.विषय समजण्यात अडचणी येतातच.पण तू काळजी करु नकोस” त्यांनी बेल वाजवून शिपायाला बोलावलं.सगळ्या विषयाच्या प्राध्यापकांना बोलावून घेतलं.
“या मुलाने काँलेजमध्ये चांगलं शिकवतात म्हणून क्लास सोडला. आणि आता विद्यार्थीच येत नाहीत म्हणून आपलीही लेक्चर्स होत नाही. माझी तुम्हांला विनंती आहे की त्याला केव्हाही अडचण आली तर त्याला मार्गदर्शन करावं”
“सर आम्ही केव्हाही तयार आहोत. लेक्चरला विद्यार्थी नसले की आम्ही रिकामेच असतो. “बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणाले.” आणि मानस तू अगदी माझ्या घरीही आलास तरी चालेल” सगळे प्राध्यापक त्याला मदत करायला तयार आहेत हे पाहून मानसचा जीव भांड्यात पडला. एक प्रश्न मार्गी लागला होता.
फिजिक्सच्या प्रँक्टिकलला मानसची परीस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांना कळली. बऱ्याच जणांनी त्याला मुर्खात काढलं. पण ज्या मुलीकरीता त्याने तो नावाजलेला क्लास सोडला होता ती मानसकडे आली आणि म्हणाली. “मानस आमच्या क्लासच्या नोट्स खुप चांगल्या असतात. मी त्या तुला आणून देईन. पण तू म्हणतो ते खरंय. या क्लासेसचा नुसता बाजार झालाय. आणि इतकं दमायला होतं बघ. हा क्लास झाला की तो क्लास. तो झाला की हा क्लास. अभ्यास करायचीही इच्छा उरत नाही घरी गेल्यावर.
पण काय करणार? आईवडिलांच्या आग्रहाखातर यावं लागतं. आपल्या स्कोअरची चिंता आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त असते.”
मानसला आपल्या आईवडिलांची आठवण झाली. म्हणजे सगळीकडे पालकांचा प्रश्न समान होता तर! मानसची सहामाही परीक्षा आठवड्यावर राहिली आणि सुनीता काविळीने आजारी पडली.उपचार सुरु होते पण सुनिताला काम करवेना.स्वयंपाकघरात तर उभं सुध्दा रहावत नव्हतंं इतकी मळमळ सुटायची.सुभाष तर सकाळी नऊला गेला की रात्री नऊलाच परतायचा.घरात कामाला कधीच बाई नव्हती.शेवटी सगळ्या कामांची जबाबदारी मानसवरच पडली.कपडे धुणं,भांडी स्वच्छ करणं,आईसाठी बिनातेलाच्या भाज्या करणं,स्वतःसाठी आणि वडिलांसाठी वेगळ्या भाज्या करणं.घराची साफसफाई हे सगळं त्यालाच करावं लागत होतं.या सगळ्या गडबडीत त्याचा अभ्यास मात्र जेमतेमच होत होता.सुनिताला ते कळत होतं.तिने या कामासाठी बाई मिळवण्याचाही प्रयत्न करुन पाहिला.पण सणवाराचे दिवस असल्याने बाईही मिळेना.परीक्षा सुरु झाली. रात्रीची जागरणं,सकाळी पहाटे उठून सर्व कामं करुन मानस परीक्षेला जायचा.तो पेपर देऊन आला की सुनिता त्याला कसा गेला पेपर असं विचारायची.तो चांगला गेला म्हणायचा पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला सगळं काही सांगून जायचे.
“माझ्यामुळे तुझा अभ्यास होत नाही ना मानस?”एक दिवस तिने त्याला विचारलंच. तो हसून तिच्या शेजारी बसला.तिचा हात हातात घेऊन म्हणाला. “असं काही नाहिये आई.आणि ही परीक्षा काही महत्वाची नाहिये. चालतंच थोडंफार. आम्ही आजारी पडलो की तू घेतेच ना आमची काळजी.मग एखादेवेळी आम्ही तुझी घेतली तर बिघडलं कुठं?”
त्याचा समजुतदारपणा पाहून तिला भडभडून आलं. “दुसरी वेळ असती तर काही वाटलं नसतं रे.ऐन परीक्षेच्या वेळी असं व्हावं.वाईट वाटतं रे”आणि ती रडू लागली. “नको रडू आई” तो तिला जवळ घेऊन म्हणाला.
“वार्षिक परीक्षेला मी चांगली तयारी करेन. त्यावेळेस मात्र तू एकदम फिट रहायचं हं! आणि सुटीही घ्यायची दहाबारा दिवस”
“हो रे घेईन मी. पण तू आम्हांला निराश तर करणार नाही ना मानस?” “नाही गं आई.तू बरी झालीस की मी जोमाने अभ्यासाला लागणार आहे. बरं तू आता कर आराम. मी थोडा वेळ अभ्यास करुन स्वयंपाकाला लागतो” दैवयोग पहा मानसची परीक्षा संपली आणि सुनिताला बरं वाटायला लागलं.कमीतकमी दिवाळी तरी आनंदात जाईल एवढंच समाधान सुनीताला वाटत होतं.
सहामाहीचा रिझल्ट लागला. मानसच्या अपेक्षेप्रमाणे त्याला ७५ टक्के मिळाले. पण सुभाष-सुनीताला जबरदस्त धक्का बसला. सुनीताच्या आजारपणामुळे त्याला कमी मार्क्स मिळतील याची त्यांना कल्पना होतीच पण मानस इतका खाली येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्याला वाईट वाटेल म्हणून ते त्याला चकार शब्द बोलले नाहीत. एक दिवस मानस घरी नसतांना सुभाष सुनीताला उद्वेगाने म्हणाला.
“मला वाटतं आपण आता मानसकडून अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे”
“करतोय हो तो प्रयत्न, मध्येमध्ये अडचणीच अशा आल्या की त्याचाही नाईलाज होता”
“त्याने तो क्लास सोडायचा मुर्खपणा करायला नको होता. घरी अभ्यास झाला नाही तर तिथे तरी होऊ शकला असता” सुभाष नाराजीने म्हणाला.
“हो ते तर खरंच आहे.मलाही त्याचा तो निर्णय पटलेला नाही. पण जाऊ द्या आपण त्याला काही बोलायचं नाही. बघताय ना आजकाल मुलं थोडंसं कुणी वाईट बोललं की लगेच जीवाचं बरंवाईट करुन घेतात. जाऊ द्या नाही डाँक्टर झाला तर इंजीनियर तर नक्कीच होईल”
“आजकाल इंजीनियर तर कुणीही होतंय गं. बघितलं ना कसा बाजार मांडून ठेवलाय राजकारण्यांनी इंजीनियरींगचा. दरवर्षी लाखो इंजीनियर्सचं प्राँडक्शन होतंय. नोकऱ्या कुठे आहेत या इंजीनियर्सना?”
“पण मेडिकलमध्येही तर सगळी अनिश्चितता आहे. अगोदर एम.बी.बी.एस.करायचं. मग एम.डी. त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करुन दवाखाना टाकायचा. तो चालला तर ठीक आहे नाही तर एखाद्या मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलला नोकरी करायची. मँनेजमेंटच्या हुकमानुसार पेशंटच्या जीवाशी खेळायचं. सगळा जीवघेणा प्रचंड पैशाचा खेळ.आपल्याला जमेल असं वाटतंय तुम्हांला? आपण अशी मध्यमवर्गीय माणसं. ना कुठलं रिझर्व्हेशन ना कुठल्या सवलती”
सुभाषने एक निश्वास सोडला.
“खरंय तुझं म्हणणं. मानसची परीक्षा झाली की आपली परीक्षा सुरु होणार आहे. कधीकधी विचारांनी झोप लागत नाही.”
“म्हणूनच तर म्हणतेय, नको आपण मानसवर प्रेशर आणायला. आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादायला. नाही मेडिकल तर इंजीनियरींग करेल”
“आपल्यावेळी किती छान होतं ना सुनीता! अभ्यासाचं, अपेक्षांचं कोणतंच ओझं नसायचं. साधं ग्रँज्युएट झालं तरी नोकऱ्या लागायच्या. पगार कमी असला तरी आपण समाधानी होतो.” “तसे आताही आपण समाधानी आहोत. फक्त मानसच्या भवितव्यासाठी आपण बैचेन झालोय. त्या बिचाऱ्याची एकच चुक आहे की तो एकुलता एक आहे. त्यामुळे आपल्या आशाअपेक्षांचा केंद्रबिंदू तोच आहे. ही त्यालाही जाणीव आहे. म्हणून त्याच्यात अकाली प्रौढत्व आलंय.भाऊबहिण कुणी असतं तर त्याला मन तरी मोकळं करता आलं असतं. आपल्याजवळ तो खुलत नाही. त्याचा ताण त्याच्या चेहऱ्यावर आजकाल दिसू लागलाय.”
“ठिक आहे यापुढे आपण त्याला अभ्यासाबद्दल काही विचारायचं नाही. जसं होईल तसं”
“तो तसाही सिन्सीयर आहे” सुनीता म्हणाली “मग आपण उगीचंच त्रास का द्यायचा”
तेवढ्यात मानस आला आणि त्यांचं बोलणं खुंटलं.
परीक्षा जवळ आली तसा मानस अभ्यासात गुरफटून गेला.त्याच्या मित्रांचे आता क्रँश कोर्सेस सुरु झाले होते.या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं याबद्दल मानसला उत्सुकता होती.पण प्रचंड फी देऊन हे क्लास लावणाऱ्या मित्रांना विचारणंही त्याला योग्य वाटत नव्हतं.इंटरनेटवरुन तो जमेल तितकी माहिती घेत होता पण त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं.आजकाल त्याचा आत्मविश्वासही डळमळीत होत चालला होता.
एके रात्री १२ वाजता सुनीता पाणी प्यायला उठली.मानसच्या खोलीत उजेड पाहून तिने खोलीचं दार सहज ढकलून पाहिलं.मानस टेबलवर डोकं ठेवून रडत होता.सुनीता लगेच त्याच्याजवळ गेली.
“मानस.काय झालं?का रडतो आहेस” तिने चिंतातूर होऊन विचारलं.त्याने आईकडे पाहून डोळे पुसले.सुनीताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला.तसा रडवेल्या स्वरात तो म्हणाला.
“खुप टेंशन आलंय आई.खुप भीती वाटतेय परीक्षेची.”
“बेटा असं घाबरुन कसं चालेल परीक्षेला?ही तर फक्त बारावीची परीक्षा आहे.अजून पुढे कितीतरी परीक्षा द्यायच्या आहेत तुला.तुला सांगू माणसाचं आयुष्य हीच एक परीक्षा आहे.शैक्षणिक परीक्षा आटोपल्या की माणसाची जीवनाची परीक्षा सुरु होते.नोकरीसाठी लेखी परीक्षा,इंटरव्ह्यू सुरु होतात.नोकरी लागेपर्यंत बेरोजगारीचा काळ सहन करणे हीसुद्धा एक परीक्षाच असते.नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवणं,त्यात बढती मिळवणं ही परीक्षाच असते.नोकरीत बस्तान बसल्यावर चांगली बायको किंवा नवरा मिळवणं,लग्नानंतर एकमेकांशी जमवून घेणं हीही एक परीक्षाच.मग मुलं होतात.त्याचा सांभाळ करणं,त्यांच्यावर चांगले संस्कार करणं,ती सगळ्या क्षेत्रात पुढे जातील,त्यांची प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणं,शिक्षण झालं की त्यांच्या नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करणं या सगळ्या परीक्षाच तर आहेत बेटा”
मानस काही बोलला नाही.पण कुठेतरी त्याच्या काही काळजात ते भिडत होतं.
“इतकं आयुष्य कठीण असतं आई?”त्याने विचारलं.सुनीता हसली.
“नाही रे बाळा.एकदा या परीक्षांची सवय झाली की त्यांचं काही वाटेनासं होतं.म्हणूनच म्हणते टेंशन घेऊ नकोस.मी आणि तुझ्या बाबांनी मेडिकलचा हट्ट सोडलाय.नाही जमलं मेडिकलचं तर इंजीनियरींगला अँडमिशन घ्यायची.आता रिलँक्स हो.झेपेल तेवढाच अभ्यास कर.अभ्यास करुनकरुन आजारी पडलास तर ते जास्त महागात पडेल.चल झोप आता”
मानसला एकदम हलकंहलकं वाटू लागलं.मनावर आलेलं मळभ नाहिसं झालंं.एक नवीन उत्साह,उमेद जागृत झाली.
“आई मलाही इंजीनियरींगपेक्षा मेडिकल आवडतं.मी प्रयत्न करणार आहेच.पण नाही जमलं तर प्लीज नाराज होऊ नका”
” नाही होणार.चल पुरे कर अभ्यास”
मानस प्रसन्न मनाने झोपायला गेला.
परीक्षा सुरु झाली. मानसच्या मनावरचं अपेक्षांचं ओझं उतरल्यामुळे मानसचं डोकं उत्तमरित्या काम करत होतं. परिक्षेची भिती नाहिशी झाली होती त्यामुळे प्रत्येक पेपर त्याला सोपा वाटत होता. परीक्षा संपल्यावर सुभाषने त्याला विचारलं.
“किती मिळतील असं वाटतंय तुला?”
“इंजीनियरींगला अँडमिशन मिळेल एवढे नक्की मिळतील “
सुभाष काही बोलला नाही पण मनातून तो नाराज झाला. मानसने मेडिकलसाठीच प्रयत्न करावे असं त्याला अजूनही वाटत होतं पण सुनीता आणि त्याचं ठरल्याप्रमाणे त्याने शांत रहाणंच पसंत केलं.
रिझल्टचा दिवस उजाडला. सुनीताच्या उरात धडधड होऊ लागली. आपला अपेक्षाभंगच होणार आणि तसा झाला तर आपण मानसला काहीतरी बोलून बसू या भितीने सुभाष कामावर निघून गेला. अकरा वाजता घरातलं नेट व्यवस्थित चालत नाही म्हणून मानस सायबर कँफेवर निघून गेला. सुनीता घरातच थांबली.विपरीत रिझल्ट लागला तरी तिने मनाची तयारी करुन ठेवली होती. पण मानस आणि सुभाषच्या प्रतिक्रिया कशा रहातील या कल्पनेने तिचा थरकाप उडत होता.
बारा वाजले. अजून काही कळत नव्हतं. सुनीता बैचेन झाली. मानसला फोन करण्यासाठी तिने मोबाईल उचलला. तेवढ्यात तिचाच मोबाईल वाजला.अपरिचित नंबर होता. तिने धडधडत्या काळजाने तो उचलला.
“काकू मी मानसचा मित्र बोलतोय. मानस कुठेय?”
“अरे तो सायबर कँफेवर गेलाय रिझल्ट बघायला. का काय झालं?”
“अहो काकू तुम्हांला कळलं नाही?”
“का…काय कळलं नाही?”सुनीताने अधीरतेने विचारलं.
“अहो काकू मानस पुर्ण जिल्ह्यातून पहिला आलाय आणि महाराष्ट्रातून दुसरा.पार्टी पाहिजे हं काकू”
“काय म्हणाला तू? परत एकदा सांग”सुनिताच्या डोळ्यात आता अश्रु जमा होऊ लागले.
“काकू मानस महाराष्ट्रातून दुसरा आणि जिल्ह्यातून पहिला…..”
सुनिताने पुढचं ऐकलंच नाही मोबाईल तसाच ठेवून ती मोठमोठ्याने रडू लागली. तेवढ्यात फाटक वाजलं. तसंच रडत रडत तिने दार उघडलं. मानस बाहेर उभा होता. त्याचे डोळे रडवेले दिसत होते. आईलाही रडतांना पाहून त्याने तिला “आई”म्हणून मिठी मारली आणि तोही रडू लागला.
“तुला कळलं ना आई?” त्याने रडतारडता विचारलं.
“हो बाळा कळलं मला! खुप खुप अभिनंदन बेटा”
फोन वाजला. सुनीताने तो घेतला. सुभाष बोलत होता. “सुनीता मला आताच कळलं मानसबद्दल. पोराने स्वप्न पुर्ण केलं आपलं”पुढे त्याला बोलता येईना.
“बोलताय त्याच्याशी?”
“नाही मी घरी यायला निघालोय. कधी एकदा त्याला भेटतोय असं झालंय. आल्यावरच बोलतो त्याच्याशी”
सुनीताने फोन ठेवला. पण नंतर फोन सातत्याने वाजू लागला. मानसचे मित्र, नातेवाईक, परिचित आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर सर्वांना मानसशी बोलायचं होतं. कोणताही क्लास न लावता त्याने इतकी उत्तुंग भरारी घेतलीच कशी हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं.
थोड्या वेळाने सुभाष आला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानसला जवळ घेतलं. “बारावी तर झाली.आता “नीट”ची परीक्षा राहिलीये.एक टेन्शन अजून बाकीच आहे” सुभाष म्हणाला. “काही काळजी करु नका बाबा. माझी “नीट”ची तयारी झालीय. उद्यासुध्दा मी परीक्षा देऊ शकतो आणि नक्कीच चांगला स्कोअर करु शकतो” मानस आत्मविश्वासाने म्हणाला.
प्रेस फोटोग्राफर आले. मानसला पेढा भरवतांना सुनिता -सुभाषचे फोटो निघू लागले..मागच्या वर्षभरातील घटना मानसच्या डोळ्यासमोरुन सरकू लागल्या. आणि आयुष्यातली एक अवघड परीक्षा उत्तीर्ण केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं.