तरंगांचे काय हो
उठतात आणि विझतात ते
अंतरीच्या कंपनांचे
धडधडणे चालू सदा…
सदा आठव राहतो
मंद वा तेजाळता
स्वप्न मग गोंजारते
भेटेल का ती एकदा ?
एकदा भेटली ती
दिले प्रासादिक गोड काही
आस हृदयी वाढली..अन्
दर्शनाची आस राही
राही अनंत इच्छा
असे तसे तिला सुखवावे
समर्पुनि देह तिजला
वितळूनी वाफ व्हावे
व्हावे असे…तसे व्हावे
कल्लोळ कायम चाललेला
दिवसांगणिक ओढ वाढे
कळे ना काही…माझे मला