‘जाऊ देवाचिया गावा’ गुणगुणतच शेगावच्या प्रवासाला प्रारंभ केला. पुण्याहून शेगावला जाण्याचा प्रवास साधारणपणे १२ तास,अगदी ए.सी.मधून प्रवास केला तरी बाहेर उन्हाच्या जवळा जाणवत होत्या. खूप दिवसांपासून शेगाव चे वर्णन ऐकत होते. महाराज जरी अगदी साधेपणाने राहणारे संत होते तरी, आताचे शेगाव, महाराजांची कर्मभूमी खरंच एखाद्या सुंदर राजधानी सारखी नटलेली आहे.
भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने भरपूर देणग्या मिळत आहेत आणि त्याची व्यवस्था खूपच छान केली आहे. शेगाव स्टेशनवर उतरल्यावर संस्थाना पर्यंतचे अंतर २/३ कि.मी.आहे. संस्थांची मर्यादित बस सेवा ही आहे आणि रिक्षाही आहेत आम्ही आनंद विहार मध्ये जाऊन खोली बुक केली चार जणांसाठी एसी खोलीचे भाडे एका दिवसासाठी फक्त 950 रुपये! इतर सर्वच सोयी छान होत्या. सकाळी लवकर मंदिरात गेलो असता खूपच सुखद अनुभव आला. सर्व सेवेकरी अतिशय नम्रतेने मार्गदर्शन करत होते. रांगे मध्ये बसण्याची व्यवस्था, वाटेत पाण्याचे कूलर, पंखे होते.
दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा डिस्प्ले, सर्वत्र व्यवस्थित माहिती देणारे बोर्ड यामुळे कुठे तक्रारीला जागाच नव्हती. कित्येक देवस्थानच्या ठिकाणी अस्वच्छता गोंधळ दिसतो तो इथे अजिबात नाही. सर्व सेवेकरी सतत स्वच्छता करताना दिसत होते. परिसरात एकही झाडाचे पान किंवा कागदाचा कपटा पडलेला दिसत नव्हता! त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. आम्ही दर्शन घेऊन नंतर कारंजा येथे दत्तमंदिर पाहून आलो. येताना नागझरी जवळ गोमाजी बाबांची समाधी पाहिली. ते गजानन महाराजांचे गुरु होते. मठा पासून काही अंतरावर आनंद सागर नावाचे उद्यान छान प्रेक्षणीय केले आहे. पाण्याची कमतरता असूनही नदीचे पाणी लांबून उद्यानाजवळ वळवले आहे.
सगळीकडे झाडांची वाढ करून परिसरात गारवा आणला आहे. गुरुवारी दिवशी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी खूप रांग असते, पण कोठेही गैर शिस्त दिसत नाही. ध्यान मंदिरात पोथी वाचनासाठी सुंदर व्यवस्था आहे. एकंदरीत शेगावच्या या पुण्यमय वातावरणात दोन दिवस मन समाधानाने भरून गेले.
आधुनिक काळात संतांचा महिमा हा श्रद्धेचा विषय व्यक्तिगणिक बदलतो. पण सामाजिक स्वास्थ्याचा तो पूर्वी एक अविभाज्य भाग होता. गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा, शेगाव चे गजानन महाराज या सारख्या संतांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य केले ते खरोखरच अपूर्व होते. समाजात एकरसता आणण्यासाठी संतांनी गरीब-श्रीमंत, जातिभेद या सर्व गोष्टी बाजूला सारून, क्वचित समाजाचा विरोध पत्करून अध्यात्मिक पातळीवर काम केले.ते स्वतः कफनीवर राहिले असतील, पण आज त्यांच्या नावावर श्रध्देने हजारो लोक पोसू शकतील एवढे ऐश्वर्य त्यांनी या स्थानाला मिळवून दिले.
हेही अफाट कार्यच आहे. गोंदवले, शेगाव,शिर्डी ही खेडी होती.पाण्याची टंचाई होती, काही शी दुष्काळ ग्रस्त च होती, अशा ठिकाणी संतांच्या वास्तव्याने कार्य सुरू झाले. या संस्थानाने ही आरोग्य, शिक्षण कार्यही तिथे चालू केले. असे सर्व बघितल्यावर वाटते की अध्यात्मिक आणि भौतिकतेचा चांगला समन्वय साधला तर काय निर्माण होऊ शकत नाही? तिथे काम करणारा प्रत्येक जण ‘हे महाराजांचे काम आहे, आपण खोटं काम करता कामा नये’ या जाणिवेने थोडा जरी वागला तरी बरीचशी सुधारणा होऊ शकते. राजकारणाचे स्वार्थ कारण झाले की तिथे विवेक बुद्धी कशी कमी होत जाते ते आपण पहातोच आहोत, पण अशा तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि वातावरण पाहिले की वाटते, अजूनही कुठेतरी चांगुलपणा शिल्लक आहे.
श्रद्धा आहे जी आपले मनोबल वाढवते. बाह्य जगात, विशेष करून शहरीकरणात, जो दिखाऊपणा, एकमेकांशी सतत स्पर्धा व त्यामुळे आलेली अस्वस्थता दिसते इथे दिसत नाही. दोन दिवसाच्या शेगाव वास्तव्यात मन खरंच शांत झालं! प्रवास लांबचा असला तरी भौतिक सुखाचा (…) थोडा का होईना सात्विक आनंद मिळाला हेच या छोट्याशा ट्रीपचे फलित!