कविता म्हणजे काय
नुसता शब्दांचा खेळ?
की मग कागदासवे
होई भावनांचा मेळ..
सगळेच अनुभव
प्रत्यक्षात नसतात
तरीही मग माणसे
त्यात कशी फसतात?
कधी स्पष्ट शब्दांतून
अबोल नजरेतून
अस्फुटशा स्पर्शातून
अन् कुंद श्वासातून
व्यक्त होतच असती
आपल्याजोग्या परीने
असाच मार्ग शोधला
कुठल्याशा त्या कवीने
मग मळवली वाट
अन् झाली शब्द-मैत्री
नवनव्या काव्यांतून
मांडली भावना जंत्री
कधी झरझर फुटे
कवितेचा गोड पान्हा
कधी मात्र शब्दझरा
कुंठे अवचित तान्हा
आराधना नित-नवी
अर्थवाही भावनांची
मग जोड त्यास द्यावी
यथोचितशा भाषेची
समर्पक खास शब्द
योजणे मांडण्यासाठी
भाव मुके मनातले
नेमके सांधण्यासाठी
किती नि कसे सांगावे
काव्यवेणा कशी दाटे
काव्यरूपी खूण माझी
उरावीशी आता वाटे