आज सकाळचीच गोष्ट. शिवाजी चौकात ताजी पालेभाजी आणि सलाड साठी लागणारे साहित्य मी घेतले… भाजीवाली ला पैसे देऊन, तिने दिलेल्या टोपलीतील भाजी मी माझ्या पिशवीत भरून घेत असता.. ‘ए बाई ही नोट नको! दुसरी दे स्वच्छ नोट ‘ म्हणून बाजूला भाजी घेणाऱ्या बाईने भाजीवाली ला ठणकावले…
ती बिचारी भाजी खाली अंथरलेल्या गोणी घालून सर्व नोटा आणि चिल्लर समोर करून म्हणाली ‘ताई बघा! संमद्या अशाच मळक्या हायती … घ्या यातील तुम्हास कोणती साफ सुदरी दिसत असंल ती….”
क्षणात माझ्या मनात विचार चमकला! कशा असतील तिच्याजवळ? दहा.. वीस च्या स्वच्छ नोटा ! कष्टकरी हात त्यांचे, दिवसभर उन्हातान्हात राबणारे! तेव्हा कुठे हातात रोकडा येतो त्यातून त्यांचा दिवसाचा चरितार्थ चालतो. या नोटा मळक्या जुनाट असतात पण त्याला कुठेही भ्रष्टाचाराचा डाग नसतो….
खरोखर फक्त स्वाभिमानाचा, कष्टाचा आणि जीवन जगण्यासाठी व कुटुंबाचा जीव जगवण्यासाठी केलेल्या अविश्रांत मेहनतीचा त्या नोटेला वास असेल, उद्याच्या उज्वल भविष्याची चिंता मनात आणून आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी राबणाऱ्या हातांचा स्पर्श या सर्व नोटांना झालेला असेल त्याचे मोल ..अनमोल आहे…
एसीमध्ये गुबगुबीत सोफ्यावर बसून साधा चहाचा कप उचलून ठेवण्याचे कष्ट न करणाऱ्या हातातील नोटा! तशाच स्वच्छ परीटघडीच्या रहातील… आणि तशाच तिजोरीत कुलपात बंद राहतील, त्यांची एकावर एक रचलेली चळत स्वतःच्याच ओझ्यांनी दबत असेल! त्या नोटांना कसला आलाय स्वप्नांचा कष्टाचा गंध? कायमच्या आपल्या कोऱ्या करकरीत……
मग तुम्ही नाही ना खळखळ करणार त्या जुन्या मळक्या नोटा घ्यायला?.. हो पण त्यासाठी तर आपल्याला थोडे फार कष्ट होतील, बँकेत जाऊन बदलून आणाव्या लागतील.. पण त्यांना निदान समाधान तरी मिळेल!! आपण उगीचच शिकलेल्यांनी दहा-वीस रुपयासाठी तुझ्याकडे पेटीएम आहे का? तुला गुगल करू का? म्हणून बिचार्यांना पेचात पाडू नये, असं मला वाटलं हं..
पन्नास-शंभर रुपयांसाठी स्वतःचं काम संपल्यावर कधी बँकेत खेटे घालतील…. आणि तिथे तरी त्यांना कोण लवकर दाद देते?… जिकडे तिकडे त्यांची अवहेलनाच!..
म्हणून तिच्या जवळच्या मळक्या नोटेचे महत्त्व मला अधिक वाटले!!