मोबाईलची रिंग वाजली तसा मी फोन उचलला
“सर मी आदेश बोलतोय “पलीकडून आवाज आला ” सर तुम्ही चारठाण्याला जाणार होतात ना या महिन्यात?”
“हो आदेश. या रविवारी म्हणजे एक एप्रिलला आपण जातोय. तू येतोयेस का?”
मी चारठाण्याला जाणाऱ्यांची लिस्ट डोळ्या समोर ठेवत त्याला विचारलं.
“हो सर माझी खुप दिवसांची इच्छा आहे जंगलात फिरायची. पण सर हे एप्रिल फुल तर नाही ना?”
मी जोरात हसलो “नाही नाही. अरे आपण फाँरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतलीय. गाड्या बुक केल्याहेत. चारठाण्यात जेवणाची आँर्डर देऊन ठेवलीये. एवढं सगळं एप्रिल फुल कसं असेल?”
“साँरी सर सहजच विचारलं”
“इट्स ओके आदेश. काही चेंजेस झाले तर तुला कळवतो”
“ओके सर ”
मी फोन ठेवला. लिस्टमध्ये आदेशचं नांव लिहीलं.
बारावीच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्या होत्या. काँलेजच्या मुलांची मागणी होती कुठंतरी घेऊन चला म्हणून. एक दिवसात जंगल सफारी होणारं चारठाणा मी ठरवलं. जंगल सफारीसोबत वनभोजन होणार म्हणून मुलंही खुप खुष होती.
एका पर्यावरणावरील कार्यक्रमात माझी आणि आदेशची भेट झाली होती. मी निसर्गसहली आयोजित करतो हे ऐकून तो मला सहलीबाबत सारखी विचारणा करत होता. आज त्याचं समाधान झाल्यासारखं वाटलं.
३१ मार्चला मी सगळ्या पुर्वतयारीचा अंदाज घेत असतांना मला तीन जणांचे फोन आले. त्यांनाही सहलीला यायचं होतं. पण गाडीत जागा नव्हती. मी आदेशला फोन लावला. “आदेश तू येतो आहेस ना नक्की? कारण बरेच जण इच्छुक आहेत आणि गाडीत जागा नाहीये”
“हो सर मी नक्की येतोय. वाटल्यास सहलीचे पुर्ण पैसे मी घेऊन येतो तुमच्याकडे”
“नको नको. उद्या दिलेस तरी चालतील. ठिक आहे मी त्यांना नाही सांगतो. सकाळी शार्प सहाला ये स्टाँपवर”
“हो सर येतो” असं म्हणून त्याने फोन कट केला.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी ठरलेल्या ठिकाणी साडेपाचलाच बस घेऊन उभा राहिलो.बहुतेक सगळी मुलं आली होती.ती सगळी पटापट गाडीत बसली.मी आदेशची वाट पाहू लागलो.
सहा वाजले, सव्वा सहा झाले. साडेसहा झाले तरी आदेशचा पत्ता नव्हता. मी अस्वस्थ झालो. शेवटी मी मोबाईल काढला आणि त्याला फोन केला. फोन स्विच आँफ होता. माझ्या अस्वस्थेतेची जागा आता संतापाने घेतली. पण हा अनुभव मला नेहमीचा होता.कितीही कडक ताकीद द्या, स्वतःच्या फुरसतीने डुलतडालत येणारे मी अनेक लोक बघितले होते. अशा लोकांना दुसऱ्याच्या गैरसोयीशी काही देणंघेणं नसतं. मी अजून १५ मिनिटं वाट बघायचं ठरवलं. पंधराची तीस मिनिटं होऊन गेली ना आदेश आला ना त्याचा फोन आला.
बसमधली मुलं कंटाळून बाहेर आली आणि “काय झालं?”असं विचारु लागली. त्यांना काय उत्तर द्यावं मला कळेना. मी मोबाईल काढून आदेशला फोन लावला. परत मोबाईल स्वीच आँफ! आता मात्र माझी नस तडकली. आता थांबणं शक्यच नव्हतं. मी निर्णय घेतला.
“बसा रे मुलांनो. खुप झालं वाट बघणं. चला निघुया”
मुलं पटापट जाऊन बसली. मीही बसमध्ये चढणार तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर दिसत होता.
“हँलो, कोण बोलतंय?”मी विचारलं.
“चौधरी सर बोलताहेत ना?”
“हो चौधरीच बोलतोय”
“सर मी आदेशचा भाऊ जितू बोलतोय. सर आदेश सहलीला नाही येऊ शकणार”
“अरे कमाल आहे त्याची! आता सांगतोय हे? मी साडेपाच पासून त्याची वाट पहातोय. आणि माहितेय? तो येणार म्हणून तीन जणांना मी नाही सागितलंय. आता हे नुकसान कोण भरुन देणार?”
मी संतापाने अक्षरशः ओरडलो. “साँरी सर पण ऐका ना सर.. सर..तो येऊ शकणार नाही कारण. कारण त्याचा अँक्सीडंट झालाय आणि तो आँन दि स्पाँट गेला सर ”
” काय्य्य……”मी इतक्या जोरात ओरडलो की बसमधली मुलं बाहेर आली.
“कसं, कसं झालं हे?”
मी आता थरथर कापत होतो. माझ्या डोळ्यात आता पाणी जमा होऊ लागलं होतं.
” सर तो सकाळीच सहलीला जायचं म्हणून घरातून बाईकने बाहेर पडला. हायवेवर आला तर एका भरधाव डंपरने त्याला उडवलं. त्याच्या डोक्यावरुन डंपरचं चाक गेलं. तो तिथंच गेला. योगायोगाने एक अँम्ब्युलन्स तिथून जात होती त्यांनी त्याला उचलून सिव्हिल हाँस्पिटलला नेलं. पण डाँक्टरांनी त्याला म्रुत घोषित केलं. आम्हाला त्यानंतरच कळलं.
आम्ही आता सिव्हिललाच आहोत” फोनवर आता जोरजोराने रडणं ऐकू येत होतं. माझ्या तर हातापायातले त्राणच गेले. मी मटकन खाली बसलो. एका मुलाने पाण्याची बाटली आणून दिली. मी पाणी प्यायलो. थोडी हुशारी वाटू लागली.
“सर काय झालं?”त्याने विचारलं मी थोडक्यात सर्व सागितलं. पोरं हळहळली.
“सर मग ट्रिप कँन्सल करायची का?”
मी भानावर आलो. ट्रिप कँन्सल केली तर माझं नुकसान तर होणार होतंच पण मुलांचे मुड गेले असते. ते आदेशला ओळखतही नव्हते. खरं तर माझीही आदेशशी नुकतीच ओळख झाली होती. मी स्वतःला सावरलं. मुलांना बसमध्ये बसायला सांगितलं. मीही जाऊन बसलो. बस चारठाण्याकडे निघाली.
जंगलात फिरतांना माझा मुड वाईटच होता.कशातच मन लागत नव्हतं.फाँरेस्ट गार्डला माहीती सांगायला सांगून मी रेस्ट हाऊसला येऊन बसलो. संध्याकाळी आम्ही लवकरच परतीच्या प्रवासाला लागलो.तरीही येतायेता नऊ वाजलेच.जेवण करुन मी विचार करत बसलो.उद्या आदेशच्या आईवडिलांना भेटून यावं असं ठरवलं.मग टिव्ही लावून आदेशची बातमी दिसतेय का ते बघू लागलो.पण तशी बातमी काही टिव्हीवर झळकली नाही.
दहा वाजता मोबाईल वाजला. स्क्रीनवर आदेशचं नांव वाचून मी हादरलो. भीतभीतच मी फोन कानाला लावला.
“सर मी आदेश बोलतोय .कशी झाली सर ट्रिप?”
मी इतका जोरात दचकलो की माझ्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला. थरथरत्या हाताने उचलून मी तो कानाला लावला.
“कोण…को..ण
बो..ल..तं..य?”
“सर मी आदेश बोलतोय. सर आवाज नाही ओळखला का? आणि माझा नंबर तर सेव्ह असेलच ना?”
“कोण आदेश? आदेश..अरे..अरे तू जिवंत आहेस? काहीतरी गडबड आहे. अरे आज सकाळी फोन आला होता की.. की तुझा अँक्सीडंट होऊन तू आँन दी स्पाँट गेलास” बोलताबोलता माझ्या घशाला कोरड पडली.
फोनमधून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर काटा आला. बापरे! मी एखाद्या भुताशी तर बोलत नव्हतो ना?
“सर तुम्ही प्यायला तर नाहीत ना? अहो सर मी एकदम धडधाकट आहे. मला काही झालेलं नाही. आणि तुम्ही प्यायला नसाल तर नक्कीच कोणीतरी तुम्हांला एप्रिल फुल केलं असावं”
बापरे! हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसत होतं
“अरे पण मग तू आला का नाहीस? बरं. येणार नसल्याचा साधा फोनसुध्दा केला नाहीस तू! किती वाट बघितली तुझी”
“सर गडबड अशी झाली की रात्री दहा वाजता मोबाईल खाली पडून फुटला. आईबाबांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सिम त्यांच्या मोबाईलमध्ये बसेना. सकाळी मी साडेपाचला निघालो. हायवेला लागलो आणि माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. सकाळ आणि त्यात रविवार एकही दुकान उघडं नव्हतं. शेवटी एकाला विनंती करुन पंक्चर जोडलं. पण या सगळ्या भानगडीत पावणेसात वाजले.मी स्पाँटवर पोहोचलो तेव्हा बस निघून गेली होती. घरी येऊन मोबाईल दुरुस्त करुन तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. कदाचित जंगलात रेंज नसावी”
मला एकदम आठवलं. त्याच्या भावानेच तर फोन करुन ती बातमी दिली होती. माय गाँड चक्क भावानेच हा खोटारडेपणा करावा?
“आदेश चक्क तुझ्या भावानेच फोन करुन मला ती वाईट बातमी दिली. काय नांव बरं त्याचं…हं
जितू! हो जितूच. तो तुझाच भाऊ ना?”
“काय जितूने तुम्हांला फोन करुन सांगितलं? सर कसं शक्य आहे?”
“का? का शक्य नाही?”
“सर..”तो चाचरत बोलत होता “सर मी तुम्हाला आता लगेच भेटायला येतो”
“अरे पण….”
पण फोन कट झाला होता.
१५-२० मिनिटातच दाराची बेल वाजली. आदेश आला असावा. मी भीतभीतच दरवाजा उघडला. बाहेर आदेशच उभा होता. अगदी धडधाकट. भुताचे पाय उलटे असतात असं मी कुठंतरी वाचलं होतं. मी त्याच्या पायांवर नजर टाकली. ते सरळ होते. मला हायसं वाटलं.मी त्याला आत घेतलं.तो बसला पण घाबरलेला दिसत होता.
“हं काय झालं आदेश?तू असा घाबरलेला का दिसतोय?”
“सर तुम्ही म्हणता तुम्हाला जितूचा फोन आला होता?”
“हो नक्की. जितूच नाव सागितलं त्याने! का रे?”
“सर शक्यच नाही. जितू….जितू एक वर्षापुर्वीच वारलाय सर”
“काय्य….”मी जोरात ओरडलो.
“हो सर. मागच्या मार्चमध्येच रोड अँक्सीडंटमध्ये त्याचा म्रुत्यु झाला”
“ओ माय गाँड!”
आदेशने आपले डोळे पुसले.
“सर कोणीतरी तुम्हांला एप्रिल फुल करण्यासाठी हा फोन केला असावा.”
“शक्य आहे. पण कोण असेल ही व्यक्ती जी तुला आणि मलाही ओळखते?”
“सर आपल्या दोघांना ओळखणारा फक्त समीर आहे. बघा ज्याने माझी तुमच्याशी ओळख करुन दिली होती.”
“हो आलं लक्षात. पण तो असं करेल असं वाटत नाही. शिवाय अनोळखी नंबर होता. समीरचा नंबर तर सेव्ह आहे माझ्या मोबाईलमध्ये”
“सर ओळख पटू नये म्हणून त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाईलवरुन फोन केला असेल. मला तरी वाटतं हे त्याचेच उद्योग असावेत. तसा तो जरा खोडकरच आहे”
मला ते पटलं. समीरच्या खोड्या मीही पाहील्या होत्या. अनेकदा तो खोटंनाटं सांगून मित्रांची टर उडवायचा हे मी प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
“ठीक आहे. मी त्याला उद्या फोन करुन चांगला खडसावतोच बघ”
मी आदेशला म्हणालो.
“मी निघतो सर. आणि साँरी माझ्यामुळे तुम्हाला मनःस्ताप सहन करावा लागला”
“असू दे आदेश. त्यात तुझाही नाईलाजच होता”
आदेश गेला आणि मी आदेश जिवंत आहे या समाधानात झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी मी सकाळीच समीरला फोन केला. “समीर काल तुच फोन केला होता ना मला आदेशच्या अँक्सीडंटची बातमी द्यायला? अरे मी काय तुझ्या बरोबरीचा वाटलो काय अशी माझी चेष्टा करायला?”
“नाही सर. मी नव्हता केला फोन. जितूने, आदेशच्या भावाने केला होता फोन! आणि ती चेष्टा नव्हती. ते सगळं खरंच होतं सर”
“काय्य…?”मी ताडकन उडालोच.”समीर अरे जितू जिवंत आहे?”
“सर काय पण तुम्ही! हे घ्या जितूशीच बोला”
“सर मी जितू बोलतोय. काय झालं सर?” होय हा तोच आवाज होता. जो माझ्याशी काल सकाळी बोलला होता. माझ्या अंगावर शहारे आले. भितीने मी लटपटू लागलो.
“जितू अरे काल रात्री आदेश आला होता घरी. मला म्हणत होता जितूचा एक वर्षापूर्वी अँक्सिडंटमध्ये म्रुत्यू झालाय”
“काय्य….?”जितू जोरात ओरडला. “सर तुम्हाला काय वेड लागलं की काय? अहो काल रात्री नऊ वाजता मी माझ्या हाताने आदेशला अग्नीडाग दिला. आणि तुम्ही म्हणता आदेश तुमच्या घरी आला होता!”
माझी थरथर अजूनच वाढली. थरथरत्या आवाजात मी त्याला म्हंटलं
“मी खोटं बोलत नाहीये जितू! आदेश खरंच आला होता. चक्क अर्धा तास त्याने गप्पा मारल्या माझ्यासोबत”
“बस करा सर. अशा दुःखाच्या प्रसंगी चेष्टा नका करु”
जितू आता हमसून हमसून रडत होता “माझ्याकडून आता हे सहन होत नाहीये” आणि फोन कट झाला.
फोन ठेवता ठेवता माझं लक्ष बायकोकडे गेलं. ती माझ्याकडे रोखून पहात होती. तिच्या नजरेची मला भितीच वाटली.
“काय म्हणालात तुम्ही? आदेश इथे आला होता? किती वाजता आला होता तो?” तिने विचारल़ं.
“झाले असतील साडेदहा.का?”
“अहो महाशय साडेदहाला तुम्ही शुध्दीत तरी होता का? साडेनऊला जेवण करुन तुम्ही टिव्ही बघायला बसलात आणि बसल्याबसल्या झोपून गेलात. तुम्ही झोपलात म्हणून मी टिव्हीवर एक गाण्याचा कार्यक्रम लावला आणि साडेअकरापर्यंत तो बघत बसले होते. तोपर्यंत आणि पुर्ण रात्रभरात कोणीही आलं नाही आपल्याकडे. झोपेत तुम्ही सारखं आदेश, जितू, समीर असं बडबडत होतात. साडेअकराला मी तुम्हाला उठवून बेडरुममध्ये नेलं.”
माझ्या अंगात आता चांगलंच कापरं भरलं. मी डोळे फाडून तिच्याकडे बघू लागलो.
“अहो असं काय बघताय? ही बातमी बघा आदेशच्या अपघाताची. वाचा खरं काय घडलं ते!”
तिने मला दिलेल्या पेपरवर मी नजर टाकली.
” डंपर-बाईक अपघातात तरुण जागीच ठार”
खाली आदेशचा फोटो होता. त्यातला आदेश माझ्याकडे बघून हसतोय आणि जणू म्हणतोय “कसं एप्रिल फुल केलं!!”असं मला वाटू लागलं.
हे सगळे मिळून मला एप्रिल फुल करताहेत की मीच स्वतःला एप्रिल फुल करतोय हेच मला समजेनासं झालं. आणि सततच्या मानसिक धक्क्यांनी माझी शुद्ध हरपली.