आयुष्याच्या गणितामध्ये,
एक भाग असे भूमिती !
प्रमेय त्यातील सोडवताना,
येई काठिण्याची प्रचीती!…..१
समानतेच्या संधी शोधी,
त्रिकोणाची संगती लावता!
दोन त्रिकोण जोडताना,
लक्षात घे एकरूपता !…..२
वर्तुळाच्या त्रिज्या न् जीवा,
एकीपेक्षा दुसरी दुप्पट !
लक्षात आपल्या येते तेव्हा,
संसाराची सारी खटपट !….३
त्रिकोण चौकोन काढून जाता,
मध्यबिंदू तो गाठावा लागे!
क्षेत्रफळाचे मापन करता,
जोडून घ्यावे लागती धागे !…..४
आयुष्याची भूमिती होती,
काहीशी किचकट अन् अफाट!
प्रमेय त्यातील सोडवत होते,
जिंकण्या संसाराचा सारीपाट!….५