वार – रविवार,
तारीख – ०८-०५-२०२२,
वेळ – संध्याकाळचे सव्वाचार,
ठिकाण – मराठा मंडळ सभागृह, मुलुंड (पुर्व), मुंबई
सभागृहात पाऊल ठेवले तेव्हा दहा पंधरा टक्के रसिक अगोदरच स्थानापन्न झालेले होते. पुढच्या अर्ध्या तासात सभागृह तुडूंब भरले. ठीक पावणेपाच वाजता म्हणजे अगदी वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला व दीपप्रज्वलन पार पडले. आता रंगमंचावरील पडदा उघडेल आणि कार्यक्रम सुरू होईल अशी अपेक्षा असताना एका अनामिक उद्घोषकाने माईकवरून बोलणं सुरू केलं आणि काही दिवसांपूर्वीच्या एका ब्रेकिंग न्युजचा उल्लेख करून मनाचा हळवा कोपरा दुखावला. गानसरस्वतीच्या उल्लेखाने आणि आठवणीने मन व्याकुळ झाले, डोळे पाणावले. मराठीतील सर्वोत्कृष्ट कवी (कवी व कवयित्री धरून) शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम असला तरी लतादिदींनी गायलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा आरंभ झाला आणि रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रथम लक्ष वेधून घेतलं ते 70 एमएम स्क्रिनच्या आकाराच्या बॅनरने. बॅनरवर डावीकडे शांताबाईंची सर्वज्ञात डोक्यावरून पदर घेतलेली, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा व कपाळावर मोठं कुंकु असणारी मुद्रा; ‘असेन मी, नसेन मी’ या व इतर शब्दांचं सुलेखन तसेच शाईची दौत व लेखणी यांचं चित्र. बॅनर बनवणा-याची कल्पकता वाखाणण्याजोगीच.
वाद्यवृंद, गायक गायिका, निवेदिका स्थानापन्न होऊन मैफलीसाठी सज्ज होतेच. विविधरंगी प्रकाशयोजनेचे नेपथ्य हा वेगळा घटक ठळकपणे जाणवून गेला. एकूण परिपूर्ण माहोल तयार झाला होता. तेवढ्यात निवेदिकेचे सुर कानावर पडू लागले आणि काही सेकंदांतच जाणवलं की आज शांताबाईंच्या जीवनाचा अख्खा पटच आपल्यासमोर उलगडत जाणार आहे.
शांताबाईंनी “गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया” असं म्हणत म्हणत पुण्याच्या हुजुरपागा विद्यालयातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि “जय शारदे वागेश्वरी” असा जयजयकार करीत स. पा. महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. तारुण्यात पदार्पण करत असताना त्यांना “तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी” असतानाच “स्वप्नामधील गावा दूर जाणारी वाट” दिसू लागली. पण अचानक हृदय विध्द झालं आणि “काटा रुते कुणाला, मज फुलही रुतावे हा दैवयोग” त्यांच्या नशिबी आला. पण “काय बाई सांगू, कसं गं सांगू” असं स्वतःचं दुःख कुरवाळत न बसता “नाव सांग, नाव सांग” म्हणत त्यांनी एकीला ‘त्याच्या’साठी हेरलं.
एकांतात मात्र त्यांचे मनोगत होते “जीवलगा, राहिले रे दुर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे” आणि तिची ‘त्याच्याशी’ गाठ घालून देताना
त्यांचा “कंठ दाटून आला” होता.
काळ पुढे सरकत होता आणि “रेषमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा काढण्याचं” काम करत होता.
शांताबाई कोष्टी समाजाच्या. त्यामुळे कोळी समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. अशा वेळेस बाईंनी काय करावे ! त्यांनी कोळी समाज, कोळी ज्ञातीबाबतचं सगळं साहित्य धुंडाळलं आणि त्यांना हवे असलेले खास शब्द गवसले. मग काय ! “राजा सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं”, “वादलवारं सुटलं गं”, “वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा”, “पुनवेचा चंद्रम आला घरी” या गीतांचा जन्म झाला.
शांताबाई थोरांमध्ये थोर आणि पोरांमध्ये पोर होऊन जायच्या. त्यामुळे त्यांनी बालगीतांतही लिलया मुशाफिरी केली. “पाऊस आला, वारा आला”, “किलबिल किलबिल पक्षी बोलती”.
त्यांना “ऋतू हिरवा” दिसू लागला आणि “आज चांदणे उन्हात हसले” असंही वाटलं.
भाषेचे बंधन नसल्याने त्यांनी चक्क “माझे राणी माझे मोगा” या गोवी भाषेतील गाण्याची निर्मिती देखील केली.
‘बांबू’ बघून कुणाला काही सुचेल का हो ? पण शांताबाईंनी ते देखील करून ठेवलंय “नंबर 54, House of बांबू”.
शांताबाईंनी साहित्याच्या प्रत्येक प्रकारात पाऊल ठेवले. अपवाद फक्त विनोद आणि नाटक यांचा. त्यांना याबाबत छेडलं असता त्यांनी मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत असं उत्तर दिलं होतं. तरीही त्यांनी ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकासाठी पदं लिहिलीच. उदाहरणार्थ “का धरीला परदेस, सजणा का धरीला परदेस”.
अखेरच्या काळात कालातीत रचना देखील त्या करून गेल्या. “असेन मी, नसेन मी तरी गीत असेल हे”. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असूनही त्यांची गीतं अजूनही आहेतच आणि ती रहातीलच.
अशाच एका कालातीत गीताने मैफलीची सांगता झाली – “मराठी पाऊल पडते पुढे”.
एवढी सुंदर मैफल जमवून आणणा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप तर द्यायलाच हवी. वाद्यवृंदाचा मेळा खुपच सुंदर जमला होता. कितीही अवघड सुरावट असली तरी प्रत्येक वादकाने ती अप्रतिम व बिनचुक सादर केली. काही वादकांनी ते जाणकार नसलेल्या वाद्यवादनाचा अंश देखील सादर केला. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करून घेतल्याबद्दल श्री. अंकुश हाडवळे अभिनंदनास पात्र आहेत.
दोन्ही गायक व दोन्ही गायिका कमालीच्या गायल्या. “जीवलगा”, “काटा”, “परदेस”, “कंठ”, “नंबर 54”, “मराठी पाऊल” ही गाणी अजुनही कानात रूंजी घालत आहेत.
केतकी व मंदार यांना शतप्रतिशत गुण. या दोघांशी तुलना करता प्रीति व सौमितकुमार हे काकणभरच कमी पडले. थोडंसं डावं, उजवं तर असणारच. हाताची बोटं कुठे सारखी असतात. वय, अनुभव या बाबींमुळे देखील फरक पडतोच.
नेपथ्य व्यवस्था, प्रकाश योजना, ध्वनी संयोजन, इत्यादी घटकांची कामगिरी चोख. मराठा मंडळ सभागृहातील संपूर्ण व्यवस्था लौकिकाला साजेशी होती.
सरतेशेवटी कार्यक्रमाचे निर्माते श्री. राजेंद्र शिंगरे यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. नोकरी, घर, संसार सांभाळून अशी यशस्वी मैफल जमवण्याचे शिवधनुष्य त्यांनी अगदी व्यवस्थित पेलले. एका कार्यक्रमासाठी दोन महिने मेहनत घ्यायची व तो कार्यक्रम सादर करायचा. तो कार्यक्रम पार पडला की पुन्हा दोन महिने मेहनत हे न संपणारं चक्र त्यांना सांभाळावं लागत असणार. काही शब्दांत त्यांचं कौतुक करणं खरं तर योग्य ठरणार नाही.
आता तुम्ही म्हणाल की मी निवेदिकला विसरलोच. नाही. अजिबात नाही. निवेदिका तर या मैफलीची आत्मा आहे. तिच्याबद्दल काय बोलू ? माझ्याकडे शब्दच नाहीत. कार्यक्रम सुरू झाल्यावर काही मिनिटांतच मी अवाक झालो होतो. कार्यक्रम संपला तरी माझा ‘आ’ वासलेलाच होता. मी अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. हसरा आणि बरा दिसेल असा चेहरा व वाणी या भांडवलावर समोर कागद ठेवून निवेदन करणारेच इतकी वर्षे बघत आलो आहे. त्या दिवशी मात्र निवेदिकेच्या हातात माईकशिवाय काहीच दिसत नव्हते. हातात काय, समोर, खाली कागद, मोबाईल काहीच दिसत नव्हते. तरीही न थांबता, न अडखळता, न चुकता शांताबाईंचा अख्खा जीवनपट तीन साडेतीन तास खुमासदार, ओघवत्या वाणीने कानावर पडत होता.
निवेदिका, अनघा मोडक हिने सर्व गायक गायिका व वाद्यवृंद चमूचा परिचय करुन देताना स्वतःबद्दल मात्र खुपच त्रोटक माहिती दिल्याने श्री. शिंगरे यांनी रसिक प्रेक्षकांतून एका रसिकाला अनघाचा परिचय करून देण्यास सांगितले असता तिच्याबद्दल समजले. “अनघाचे डोळे गेले पण दृष्टी गेली नाही” असे त्यांनी सांगितले. मी तर म्हणेन की अनघाने ‘दृष्टीआड सृष्टी’ ही म्हण वेगळ्याच अर्थाने सार्थ ठरवली आहे. तिने खरोखरच ‘दृष्टीआड सृष्टी’ निर्माण केली आहे. तिच्या त्या ‘सृष्टी’चा अनुभव निरंतर घेण्यासाठी सर्वच रसिक सदैव तयार असतील याबाबत माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.