सुनेने सासूशी कसे वागावे यावर बरंच काही लिहिले वाचले गेलं !अगदी पूर्वीपासून लहानपणी मुलीला हेच सांगितले जायचे की, नीट वाग, पुढे सासरी नांदायला जायचंय! दुसऱ्या घरी कायमचं राहायला जावं लागतं ते मुलीलाच! माहेर आणि सासर दोन्हीचे नाव राखण्याचे काम मुलीचेच असे. तो काळ असा होता की मुलींची लग्न लवकर होत असत. साधारणपणे दहा-बारा वर्षाची मुलगी झाली की लग्न होत असे. मुलींचे शिक्षण हा दुय्यम विषय होता. लिहायला वाचायला आलं थोडाफार, हिशोब समजायला लागला की खूप झाले शिक्षण, असा घरातील मोठ्यांचा मुलीच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. लवकर लग्न झाल्यामुळे या मुली सासरी आपोआपच लवकर रुळून जात!
माझी आजी सांगत असे की, तिचे लग्न दहाव्या वर्षी झाले. सासरी लहान नणंद होती. त्यांचे नाते मैत्रीचे होते. काळ बदलला, मुलीच्या लग्नाचे वय बदलले. शिक्षण झाल्यावर म्हणजे साधारणपणे ग्रॅज्युएशन झाल्यावर, कधी थोडीफार नोकरी करून मग लग्न होऊ लागली. शिक्षण हे आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे, वेळप्रसंगी अर्थार्जनासाठी उपयोगी म्हणून मुलींना मिळू लागले. दुसऱ्या घरात एकत्र कुटुंबातही मुली आनंदाने राहत असत.सुना नोकरी करू लागल्या आणि घरही सांभाळायला लागल्या.
घरचे रीतीरिवाज , सणवार, अडीअडचणी सांभाळून करताना बाईवर दुप्पट ताण येऊ लागला. तरीही ही पिढी आनंदात जगत होती, कारण स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू लागले. स्वतःच्या हौशी मौजी करता येऊ लागल्या. स्वतः चे घर करण्याची स्वप्न पूर्ण होऊ लागली. नोकरी नसली तरी घरी काहीतरी करून बायका संसाराला हातभार लावू लागल्या. त्यांनी सूनपणाच्या मर्यादा सांभाळून स्वतःला एक गृहिणी म्हणून सुशिक्षित, कर्तृत्ववान हे बिरूद पटकावलं!
यानंतरच्या काळात मात्र खूप बदल झाला. एक किंवा दोन मुले असल्यामुळे शिक्षण, पैसा सगळंच पाहिजे ते मुलांना मिळत गेले. छोट्या कुटुंबातून सासरी गेलेल्या मुलींना सासरची जबाबदारी सांभाळणे अवघड वाटू लागले. प्रत्येक घरी असंच होतं असे नाही, पण मनाचा लवचिकपणा कमी झाल्याने जुळवून घेता येणे जड जाते हे बऱ्याच कुटुंबातून दिसू लागले. मधल्या फळीने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायची तयारी दाखवली. तरुण वयात सासू-सासऱ्यांसकट संसार करण्याची आणि आता सुनांच्या नोकरीच्या काळात नातवंडांबरोबर आनंदाने राहायची! इथेच नातेसंबंधांचा कस लागतो. कालची सून आज सासू बनते. नवीन जीवनाला ती सामोरी जाते, तेव्हा सुने इतकीच सासूची जबाबदारी असते हे शिवधनुष्य पेलण्याची!
याच काळात जागतिकीकरणामुळे मुले- मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशी जाऊ लागली. ती मुले तिथेच स्थिरावली. आणि आई-वडिलांच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढल्या. त्यांना सुना- मुलींचे बाळंतपणे करण्याच्या निमित्ताने परदेशवारी घडू लागली. ते आयुष्यही त्यांना छान सुटसुटीत वाटू लागले. या सगळ्या उस्तवारीत आत्ता असलेल्या 50 ते 70 वयोगटातील लोकांना, विशेषतः स्त्रियांना विविध अनुभव घेता आले. कधीकाळी सून बनून आलेल्या या स्त्रिया पुन्हा नव्या जोमाने आईची, सासूची भूमिका वठवू लागल्या, आणि सासु सुनेचे नातं खरंच थोडं फार विरघळू लागले.
काळाबरोबर स्त्री स्वतःला जुळवून घेते. मुलांच्या लग्नानंतर आम्ही दोघांनीही मुलांना पाठिंबा देऊन राहायचे ठरवले होते. सासू- सून या दोघीत पिढीचा फरक असतो. शिवाय दोघी दोन वेगवेगळ्या घरातून येतात. सासूचे ध्येय मुलाचा संसार हसता खेळता राहू दे म्हणून तर सुनेला नवरा आणि मुलांबरोबर तिचा संसार छान करायचा असतो म्हणून! या दोन्हींच्या आनंदाच्या सीमा रेषा जर एकत्र जोडल्या तर सासू काय आणि सून काय, दोघी एकमेकींच्यासाठी करत राहतील आणि एकत्र जगण्याचा आनंद घेतील!
वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी सासूला कधी त्रास देतील तर आताच्या धकाधकीच्या जीवनात कधी सूनेची दमछाक होईल पण एकमेकींना समजून घेणे गरजेचे असते. तडजोड हाच या सर्वांचा पाया आहे. माझ्यासारख्या अनेक जणींना वृद्ध आई-वडील आहेत आणि त्याचबरोबर सून- नातवंडे ही आहेत. या सगळ्याचा समन्वय घालताना थोडी ओढाताण ही होणारच!
पण आपणही कधीतरी या वृद्धत्वाला तोंड देणार आहोत याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे ना! म्हणजे आपोआपच मन तडजोडीकडे अधिक झुकेल आणि घरातील वातावरण आनंददायक राहण्यास मदत होईल! त्या दृष्टीने पाहिले तर खेड्यातील एकत्र कुटुंबातील वातावरण जास्त चांगले असते. मोठ्यांना मान देणे,कष्ट करणे,आणि कुटुंब जोडून रहाणे हे खेड्यातील कुटुंबात अधिक असते असे वाटते. अर्थात आर्थिक दृष्ट्या तिथे स्त्रियांना फारसे अधिकार नसतात, हे कारण ही असेल!
एकमेकांना समजून घेऊन खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती अनुभवण्याचे दिवस आता बरेच जवळ आले आहेत असं मला वाटतं !अर्थात हा समाजातील एक स्तर आहे. अजून खूप बाकी आहे, पण क्षितिजावर स्त्रियांसाठी आनंदाचा सूर्य उगवू लागणार आहे हे निश्चित!