हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या. ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.
“काय गं मुलींनो काय खेळताय?”
“बदाम सात”एकजण उत्तरली.
“मी खेळू तुमच्यासोबत?”
एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या. पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली
“हो. खेळा ना”
बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला, केतकीलाही तिने जवळ बसवलं. छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.
“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही. मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.
“ए असं नाही चालायचं हं. असा रडीचा डाव नाही खेळायचा”
तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.
“अगंबाई, हर्षू तू इथे बसलीयेस? मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस. आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”
आईच्या हाकेने ती भानावर आली.
” हो आई. येतेच. बस फक्त एक डाव”
“अगं तू भाजी करणार होतीस ना? की मी करु? बारा वाजून गेलेत. मुलांना भुका लागल्या असतील”
” हो आई मला भुक लागलीये”
केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली
” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का”
मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.
” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का? अगं दोन मुलांची आई ना तू?”
निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना. मग किचनमध्ये वळतावळता म्हणाली
“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले. आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”
निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या. “खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.
“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”
” म्हणू दे काय म्हणायचं ते”
हर्षा थोडी चिडूनच म्हणाली. मग तिने भाजी करायला घेतली. पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढून घेतलं.
” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या. हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं. तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या. “अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता. तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले. आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.
“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला? त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं
“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”
ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या.जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.
बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं, मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं, फुलपाखरं, रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो. जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं. आपण सहसा कुणावर रागवत नाही.
रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’
तिला आपले काँलेजचे दिवस आठवले. फुलपाखरासारखी ती बागडायची. सगळ्यांशी ती हसून बोलायची. सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ. ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”
पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस, बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे. तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे. पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे. बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे. काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँंड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.
“आई गं मी भातुकली खेळू?”
केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली
“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”
” हो. खेळू का?”
“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”
” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”
“मग ठिक आहे. जा खेळा”
“आई तू येतेस मांडून द्यायला?”
ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला. प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.
” हो. चल चल. आपण हाँलमध्येच बसू”
मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली. तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला. हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला.
चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला. तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या. हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.
“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”
एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.
“नाही गं, या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”
हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं
“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”
एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली
“उत्तरा आपण उद्या खेळू हं”
उत्तरालाही ते पटलं. तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली. हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.
“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली
” हो खरंच. अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”
“तिची फिगर तर बघ. अगदी चवळीची शेंग वाटतेय. नाहीतर आपण पहा. सगळ्याजणी भोपळे झालोत”
सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.
“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून? आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची. ती बेबी अजून बेबीच दिसतेय”
परत एकदा सर्वजणी हसल्या
हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.
गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत. सासू, सासरे, नणंदा, नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.
दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या. मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पुर्णवेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं. तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती. तिला संगीत आवडायचं. विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खुपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची. तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.
” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं
“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी. म्हणून तर मी इकडे आले. दादा, वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय. आई घरी एकटीच होती. म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती. म्हणून मग आले इकडे”
” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं. हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे ही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता. वास्तविक ही जितकी चंचल, अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता. तिच्या सासुबाईंनी तिच्या बालीशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता.
“काय माहीत! कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल” ती जरा खट्याळपणेच म्हणाली. मैत्रीण चुप बसली.
हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रीणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली. तिने झटपट शिरा भजी करुन प्लेट्स भरुन बाहेर आणल्या
“करुनच ठेवलं होतं की काय?” एकीने विचारलं
“नाही गं!आता केलंय. गरमच आहे बघ” हर्षा हसत म्हणाली.
“मग इतक्या झटपट?”
हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता.कधीकधी ती वेंधळेपणा करायची पण खुपदा फक्कड जमून जायचं
” खुप छान झालीहेत भजी आणि शिराही” एकजण म्हणाली
“चला याबाबतीत तरी आपली हर्षू मँच्युअर्ड आहे म्हणायची”दुसरीने टोमणा हाणला.तशा सगळ्या हसल्या.
“हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते. अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची. अजूनही तिचं नवीननवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही.
नोकरी करत असतांनाही ती सुटीच्या दिवशी काहीतरी नवीन करुन सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची”
निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली.
“कसं जमतं कुणास ठाऊक? आम्हांला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचासुध्दा कंटाळा येतो” एक मैत्रीण म्हणाली
हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये. सदोदित उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं. नोकरी करतांनाही ती आँफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची. दिवसभराचं काम चारपाच तासात पुर्ण करुन ती बाँसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची. तिच्या या व्रुत्तीमुळे ती बाँससकट सर्वांचीच लाडकी होती. म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती. अर्थातच तिने नकार दिला होता.
मैत्रिणी गेल्या तसं प्रियाला हायसं वाटलं.त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती.ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती.तिला त्याबद्दल खुप काही सांगायचं होतं पण मैत्रीणींना त्यात काडीचाही रस नव्हता.सध्या ती खुप पुस्तकं वाचत होती.त्याबद्दलही तिला बोलायचं होतं.पण मुलं,नवरा,सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रीणींना आवडत नव्हतं.
संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली.मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं.झोक्यावरुन उतरतांना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली.
तीन दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली.दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रांसहून परतला.
उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या.शाळेतली मुलं काँलन्या काँलन्यात क्रिकेट खेळायची.हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरु होतं.भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले.तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असतांना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची.ती बँटिंग आणि बाँलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टिममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची.हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.
“ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”
तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली
“काकू हा लेडीज गेम नाहिये. तुम्हांला बँट तरी हातात धरता येते का?” एक मुलगा चेष्टेने म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली
” तुम्ही सगळे बँटिंग करा. तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बँटिंग करेन. चालेल?”
पोरं आनंदाने तयार झाली.
बऱ्याच वर्षांनी बाँल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते. पोरं ती मस्त चोपत होती. पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला. सातही पोरांना आऊट करुन तिने बँटिंग करायला सुरुवात केली. चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग जोरदार फटके लगवायला सुरुवात केली. एक चेंडू तर तिने पार एका दोनमजली इमारतीवरुन भिरकावून दिला. पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.
“काकू त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बाँल बसला. त्या बाँल देतच नाहीयेत.त्या तुम्हांला बोलवताहेत. तुम्ही जाऊन घेऊन या ना!”
हर्षा विचारात पडली. रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती. तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरुन तिला नाही नाही ते बोलणार हे नक्की होतं.
” जाऊ द्या मुलांनो. मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बाँल घेऊन या “मुलं खुष झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले.मुलं नवीन बाँल आणायला गेली. हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली. तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं. तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली.
“अगं तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला? आता तरी सुधर. तू काही लहान नाही. दोन मुलांची आई आहे तू”अशी ताकीद देऊन गेली. ती गेल्यावर हर्षाला रडू आलं. एक प्रकारची विचित्र उदासिनता तिला वाटू लागली. संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसुम होती. केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते. हर्षा बेडरुममध्ये पुस्तक वाचत पडली होती.पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं. दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.
“काय गं केतकी आज घरात इतकी शांतता का बरं?” प्रणवने विचारलं
” त्या मागच्या काँलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खुप बोलून गेल्या. म्हणून आई रडतेय”
” आईला बोलून गेल्या? पण का?”
केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला. प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो बेडरुममध्ये गेला. त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास,रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.
“काय गं असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”
“नाही. काही नाही असंच!”
” सांगितलं मला केतकीने सगळं. मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”
हर्षा रडायला लागली. रडतारडता म्हणाली
“सगळेच मला म्हणतात की तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला? आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या. माझी आई, वहिनी, माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात. आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु? मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं”
प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले
“वेडाबाई कुठली! असं रडतात का? या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहितच नसतं. म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो त्याला ती नावं ठेवत असतात”
हर्षाला गोंधळली. तिला काही कळलं नाही.
“म्हणजे?” तिनं विचारलं
“तू लहान मुलांकडे बघितलंस? ती बघ कशी नेहमी आनंदी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो. एखादं खेळणं, पान, फुलं, पक्षी, चित्रं, चाँकलेट बघून ती हूरळून जातात. आपलं रडणं विसरुन ती लगेच हसायला लागतात. त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना?”
“हो”
” तू तशीच आहेस हर्षू. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी. आपल्या लग्नाला दहा वर्ष झालीत पण मी एवढ्या वर्षात मी तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती. माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो. तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला. पण नाही जमलं. कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खुप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही.
चाँकलेट खातांना किंवा कुल्फी, आईस्क्रीम खातांना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो. तिथलं निसर्गसौंदर्य पाहून तू हरखून गेलीस पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे हर्षू आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मुल तसंच जिवंत राहू दे. अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू. तू मला तशीच आवडतेस. अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्याकुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो”
प्रणव क्षणभर थांबला.
“आणि मला सांग. तू कामं तर मोठ्या माणसांसारखीच करतेस ना? तू स्वयंपाक उत्कृष्ट करतेस. घर छान सांभाळतेस. मुलांवर चांगले संस्कार करतेस. कंपनीत नोकरी करत असतांना तू कंपनीची बेस्ट एंप्लाँयी होतीस. तू कशातच कमी नाहीस. मात्र तुझ्यात आणि इतरांत हा फरक आहे की तू हे सगळं आनंदाने करतेस कारण तुझ्यातलं ते लहान उत्साही मुल तुला सतत सक्रीय, आनंदी ठेवतंय. खरं सांगू हर्षू, प्रत्येक माणसाने तुझ्यासारखंच असायला हवं पण मोठेपणाचा आव आणून माणसं जगतात आणि जीवनातल्या आनंदाला पारखी होतात”
त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली. मग ती अवघडली. आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरुन टोमणेच मारले होते पण तिचा धीरगंभीर, अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता. तिला कसं रिअँक्ट व्हावं ते कळेना.
तेवढ्यात बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळला. त्या वासाने हर्षा वेडावून गेली. या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं.
“आई पाऊस पडतोय. आम्ही पावसात खेळायला जाऊ?” बाहेरुन केतकीने विचारलं.
“हो.जा”तिला उत्तर देतादेता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं
“मी जाऊ?”
प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
“कुठे?”
“पावसात भिजायला?”
प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणतेय ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला
“काय झालं हसायला?” तिने निरागसपणे त्याला विचारलं.
तो न बोलता हसतच राहिला.
“अं? सांगा ना का हसताय?”
” काही नाही. तू जा”
हर्षा पटकन बाहेर आली.
“चला रे मुलांनो. आपण पावसात खेळू या”
प्रणव बाहेर आला. आपली बायको आणि मुलांना पावसात नाचतांना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला. का आपल्याला इतकं प्रौढत्वं यावं की या छोट्या छोट्या क्षणांचा आपल्याला आनंद घेता येवू नये याचं त्याला वैषम्य वाटू लागलं.
“बाबा या ना पावसात खेळायला”
केतकी ओरडली. पण प्रणवचं संकोची, प्रौढ झालेलं मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं. तेवढ्यात हर्षा पुढे आली. प्रणवचा हात धरुन तिने त्याला अंगणात खेचलं. त्याचे दोन्ही हात धरुन ती त्याला नाचवायचा प्रयत्न करु लागली. तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करु लागला. मग कसा कुणास ठाऊक त्याला तसं भिजण्यात आणि नाचण्यात खुप आनंद वाटू लागला.
पावसाची सर आली तशी निघून गेली. पण त्या पंधरावीस मिनिटात सगळ्या स्रुष्टीवर चैतन्य पसरवून गेली. हर्षा मुलांना घेऊन आत गेली. तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला.
“मुलांनो बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या”
मुलं बाथरुममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टाँवेल घेऊन आली. ओलेत्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खुप गोड दिसत होती.
“हे घ्या. डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या “त्याच्या हातात टाँवेल देत ती म्हणाली. त्याने टाँवेल घेतांना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं.
“खुप मजा आली आज हर्षू पावसात भिजून. असंच मला शिकवत रहा आयुष्याचा आनंद घ्यायला. शिकवशील ना?”
प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला.
“माझी गोड गोड बायको. मला तू खुप आवडतेस”