गेले कित्येक महिने घरून बाबांचे फोन येत असूनही कामाच्या व्यस्ततेचं कारण देऊन मी येण्याचं टाळायचो.
माझ्या लहानपणापासूनच आई-बाबांनी अनाथ म्हणून घरी आणलेल्या त्याच्या जीवावर मी सगळ्याच बाबतीत निर्धास्त होतो.
आज बाबांचा निर्वाणीचा फोन आला पण मी घरी पोहोचेपर्यंत सगळंच संपलं होतं.
कधीकाळी आईबाबांनी काशीयात्रेहून आणलेला गंगाजलाचा सीलबंद गडू आईच्या मुखी रिता झालेला पहाताच मी पुरता कोलमडून गेलो.
मात्र कालपर्यंत अनाथ असलेला तो, आज पुण्यवान सनाथ ठरला होता आणि मी….?