संध्याकाळ उलटून रात्र झाली..शेवटची बस निघून गेली तरी बाबा अजून घरी का आले नाहीत या विचाराने तो त्रस्त होता. आपली आई लहानपणीच देवाघरी गेली नि बाबांनी आपला कसा सांभाळ केला ..काळजी घेतली..शिकवलं..मोठ्ठं केलं..चांगले संस्कार दिले हे सारं त्याच्या नजरेसमोर उभं राहिलं. “आई गं” म्हटलं तरी बाबांचाच चेहरा डोळ्यासमोर असायचा. आता आपण एकटेच…पोरके ! या विचाराने तर तो गारच झाला. हात पाय थरथरु लागले. तेवढ्यात दूरवरुन येणारी एक सावली दिसली…बाबांची सावलीसुद्धा त्याने दूरवरुनच ओळखली. पोरका या शब्दाचे तीव्र व्रण खोलवर होण्याइधीच त्यांने आनंदाने धावत बाबांकडे झेप घेतली.