गेले कित्येक महिने घरून बाबांचे फोन येत असूनही कामाच्या व्यस्ततेचं कारण देऊन मी येण्याचं टाळायचो. माझ्या लहानपणापासूनच आई-बाबांनी अनाथ म्हणून घरी आणलेल्या त्याच्या जीवावर मी सगळ्याच बाबतीत निर्धास्त होतो. आज बाबांचा निर्वाणीचा फोन आला पण मी घरी पोहोचेपर्यंत सगळंच संपलं होतं. कधीकाळी आईबाबांनी काशीयात्रेहून आणलेला गंगाजलाचा सीलबंद गडू आईच्या मुखी रिता झालेला पहाताच मी पुरता कोलमडून गेलो. मात्र कालपर्यंत अनाथ असलेला तो, आज पुण्यवान सनाथ ठरला होता आणि मी….?
Category: Terribly Tiny Story
अलक (अति लघु कथा)
लक्ष्मीचा वास असलेल्या त्या घरात ते दोघे बंधू जरी गुण्यागोविंदाने रहात असले तरी डाव्या- उजव्याचा फरक एकाला उघडपणे जाणवायचा. आपल्या माउलीला नेहमी तो थाळीभेदा बद्दल पुसायचा. ती माउली कावरी बावरी होऊन त्याची नजर चुकवून निघून जायची. खिन्नतेने आला दिवस ढकलून तक्रार न करता तो परिस्थितीने अजूनच पक्व होत गेला. आपल्याच कुंकवाच्या बाहेर- ख्याली पणामुळे ह्या जगात डोळे उघडणाऱ्या त्याला, त्या माउलीने जीवनाच्या थाळीतून सकस आचार-विचारांचे घास भरवून पोसले होते.
विघ्नहर्ता …
परतीच्या प्रवासात गावाबाहेरच्या घनदाट अश्या रान- सदृश रस्त्यावर येताच गाडी अचानक बंद पडली आणि काळजात धस्स झालं. वेळ आणि रात्र दोन्ही पुढे सरकत असतानाच त्या थंड वातावरणात धडधड, भीती आणि सर्वांगी घर्म-ओघळ अश्या सगळ्यांनीच परिसीमा गाठली. अचानक पोटाला अन्न मिळेल ह्या आशेने एक अत्यंत भुकेला जीव नजरेत अगतिकता आणि लाचारी घेऊन समोर आला. नकळत आमच्याकडे असलेले खाद्यपदार्थ याचकाच्या झोळीत पडताच त्याच भुकेल्या अवस्थेत त्याच्या ओठांवर आशीर्वाद उमटला … दुसऱ्याच मिनिटाला गाडी सुरु झाली होती…
विसर्जन …
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले. जड मनाने निरोप देताना मनाबरोबर पायही जडावलेले. बाप्पाला निरोप देऊन सगळे परतले; अन थोड्याच वेळात दहा दिवसांत श्रमलेल्या… दमलेल्या गलितगात्र शरीरास बिछान्यात झोकून दिलं सगळ्यांनी. आणि मी ?… मी मात्र जीवनाच्या पाटावर अजून बसलोय. विषण्ण गलितगात्रांसह. . . विसर्जनाची वाट बघत….
अलक
पेरलेली बीजं गडप करणार्या धरेला पृथूने नष्ट करण्याची धमकी दिली. आधी माज करणार्या त्याच धरेने पुन्हा पेरलेली बीजं सर्व शक्तिने फुलवली. अन् प्रजेला अमाप धान्य दिलं. धरेला आपल्या मापात रहायला सांगून पृथूने तिला पृथ्वीपण बहाल केल…
अलक
खूप हळवी होती ती. आयुष्यभर सोसावंही लागलं अमाप. पण सोसता सोसता आलेला कठोरपणा मात्र तिने प्रसंगापरता मापातच ठेवला..
अलक
लग्न ठरलं. सगळी धामधूम सुरू झाली. एक मोठं वादळ घोंघावत आलं अवचित. सगळं मनोरथ कोसळलं आणि उंबरठ्यावरचं माप प्रतीक्षेतच गोठून गेलं..
समांतर
झोपडीत राहणा-या आई वडिलांना आनंदाचा धक्का देत ती इंजिनिअर झाली. मोठ्या कंपनीत रुजू झाली. प्रमोशन मिळवत मोठ्या पदावर पोचली. वडिलांनी जीव सोडताना सांगितलं…”तू आमची मुलगी नाहीस..तूला मी दवाखान्यातून पळवलेलं !”हे आत्त्ता सांगून वडिलांनी पापमुक्ती साधली की बंध तोडले ?दोन रेल्वे रुळातील समांतर अवस्था ती अनुभवत होती.
वाडा
बालपणी वाड्यातलं कुठलंच घर परकं नव्हतं. पण पौगंडावस्थेत मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे कंपू होण्याचे दिवस होते ते. त्यातून त्याचं आणि तिचं तर खेळातही कधी पटलं नाही. संध्याकाळी नाक्यावर नेहमीप्रमाणे टवाळांचा कंपू बसलेला बघून ती बिचकतच चालत होती. तेवढ्यात तो येऊन तिच्याशेजारी उभा राहिला. तिला धीर देत म्हणाला, “पटत नसलं, बोलत नसलो, तरी वाड्यातल्या सगळ्या मुलींसारखीच तू ही माझी जबाबदारी आहेस.”
अस्तित्व
माहेरच्या देवीची ओटी भरायला ती गेली होती. जोरदार पावसामूळे रात्री परत यायला उशीर होणार होता. पाऊस वाढल्यानं ती माहेरीच थांबली. अन् रात्री शेजारी ती नसल्यानं तो त्या रिकाम्या जागेकडं पहातच बसला. आपण आतून पोकळ आहोत अन् आपला भरीवपणा.. आपली शक्ती आपल्या जवळ नसण्याच्या जाणीवेनं तो शहारुन गेला.