एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………“तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुनजातोस रे ???” देव हसला आणि म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात नं त्यांना या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…” मी म्हणाले….“याचा अर्थ, मी तुला आवडत नाही कां ???” देव म्हणाला, “तसं नाही गं ! तु पण तुझ्या साधेपणामुळे प्रेमळपणामुळे मला खुपआवडतेस !” नक्की …? मी म्हणाले. हो गं … नक्की. देव म्हणाला. “मग मी या पृथ्वीवर अजुन कशी आहे???” मी विचारलं . देव प्रसन्न हसला आणि म्हणाला, “तु पृथ्वीवर आहेस कारण………माझ्या पेक्षाही कुणालातरी तू जास्त आवडतेस म्हणुन …..
Category: Terribly Tiny Story
निर्माल्य …
देवपूजेला आणलेली फुलं अचानकपणे तिच्या देहावर मालकी हक्क गाजवणाऱ्या त्या नराधमाच्या कलेवरावर टाकायला लागली. इतकी वर्ष तिच्या मनाचीच काय पण देहाचीही फुलबाग कधीच उमलून फुललीच नव्हती. कायम कुस्करलेली आणि सुकलेली. कदाचित त्या मुळेच की काय… ती नेहमीच स्वतःची तुलना त्या निर्माल्यागत अवस्थेतल्या फुलांशी करायची… संधी मिळताच त्या नराधमाला आयुष्यातूनच मोकळं करून समाजाच्या विखारी नजरेतून कायमची मुक्त होण्यासाठी ती … आज स्वतःच नदीच्या विशाल आणि रौद्र पात्रात निर्माल्यागत वाहत होती…
कोने की सफाई l
घर के कोनो की सफाई करते वक़्त समझ में आया की, घर के कोने साफसुथरे हो तो किसीको नज़र नहीं आते l लेकिन अगर कोई भी कोना साफ़ न हुआ हो तो सफाई पूरी नहीं हुई ऐसा लगता है l तभी खयाल आया की मन के कोनो की सफाई भी उतनी ही जरुरी है ना l मेरे मन के कोने में भी कुछ ऐसे जज्बात हैं जो बेवजह तकलीफ देते हैं l उनकी सफाई करके l मुझे भी साफसुथरे मनसे जिंदगी का आनंद लेना चाहिए l
अलक (अति लघु कथा)
सुतकातल्या दिवसात त्या बंगल्यात तिघा भावंडांची इस्टेटीच्या वाटणी बद्दल वकीलांशी बोलणी सुरु होती. एकंदरीत प्रकरण हातघाईवर येऊ पहाताच त्यांनी मालकाचे मृत्युपत्र वाचून दाखवले आणि त्या भावंडांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. शांतपणे वकिलाने त्या घरच्या प्रामाणिक, विश्वासू आणि एकनिष्ठ नोकराला हाक मारली. मातेसमान मानलेल्या मालकीण बाईंना स्वतःच्या घरी नेऊन त्या नोकराने त्याच्या मालकाला दिलेले वचन पूर्ण केले आणि … आज तो सगळ्यात श्रीमंत सनाथ म्हणून अभिमानाने मिरवू लागला होता …
अलक (अति लघु कथा)
धुवांधार पडत असलेल्या पावसातून मी घरी पोचलो. बाहेर दरवाज्यात छत्री ठेवली. आत येताच आईचं लक्ष माझ्याकडे गेलं. मला बघून म्हणते कशी…, अरे उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस तू. उद्या तिला घरी घेऊन ये. मला भेटायचंय तिला…
पायरी …
टाळ्यांच्या कडकडाटात त्या सत्कारमूर्तींचे कार्यक्रम स्थळी आगमन झालं. आयुष्यात इथवर पोचण्यासाठी त्याने जे काही केले होते ते झर्रकन त्याच्या डोळ्यांसमोरून सरकले. स्टेजकडे जात असताना अचानक त्याची नजर श्रोत्यांत बसलेल्या त्याच्यावर पडली आणि तो चपापला. आपल्याच नजरेतली अपराधीपणाची भावना त्याला तीव्रतेने जाणवली. ओशाळलेली नजर घेऊन एके काळच्या आपल्याच सहकाऱ्याला ‘पायरी’ बनवून आपले ध्येय गाठलेला तो आज स्टेजच्या पायऱ्या चढत होता…
अलक (अति लघु कथा)
माहेराहून घेऊन आलेली संस्कृती, कुलाचार मोठ्या श्रद्धेने ती सासरी जोपासत होती. देवीच्या सहवासातले नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे तिच्या श्रद्धेची परिसीमा. आज सवाष्णी पूजनाच्या दिवशीच तिच्या कुंकुवाचं अस्तित्व अचानकपणे धोक्यात आलं. त्याला बघायला जाण्यासाठी ती निघाली मात्र, दरवाज्यात ठसठशीत कुंकू लावलेली आणि गळ्यात फक्त डोरलं घातलेली एक स्त्री उभी राहिलेली दिसली. आजही सवाष्णीच्या कुलाचाराचे कर्तव्य पार पाडून ती हॉस्पिटलमध्ये पोचली आणि त्याला बघताच आपलं कपाळावरचं कुंकू अजूनच ठसठशीत दिसतंय हे तिला सहज पणे जाणवलं.
अलक (अति लघु कथा)
तिचं पोरगं शाळेतून आल्या आल्याच लडिवाळपणे तिच्या कुशीत शिरून विसावलं. आईचा हात केसांतून फिरत असतानाच तिच्या डोळ्यांत पाणी आणि हृदयात कालवाकालव सुरु झाली. पोराला भुकेसाठी रोजचं काय खाऊ घालावं ह्या चिंतेच्या खोल डोहात ती आई बुडायला लागली. शेवटी मनावर दगड ठेऊन खोपटातल्या त्या फडताळातला पोचे आलेला जस्ताचा डबा काढला. आणि … त्या खोपटात अश्वत्थामा पुनश्च अवतरला …
अलक
मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचे बाळकडू घेऊन आलेले पस्तिशी – अडतिशीतले उच्च विद्याविभूषित जोडपे. समाजातल्या हाय स्टेटस असलेल्या आर्थिक पुजाऱ्यांबरोबर रोज उठबस असलेले ते दोघे. आपले सोसायटीतले स्थान टिकवण्यासाठी अजून चालू असलेली त्यांची धडपड आणि त्या बरोबरच काहीतरी चुकत आणि दुरावत असल्याची खंत. कारण…अर्थार्जनाचा पेटवलेला यज्ञ शेवटच्या श्वासापर्यंत न शांतणारा आहे ह्याची जाणीव उराशी बाळगूनच आता जगायचंय हे सत्य त्यांच्याकडून स्वीकारले गेले होते.
अलक
आपल्या बापाचं बोट धरूनच त्याने आयुष्यतलं पहिलं पाऊल टाकलं होतं. अजूनपर्यंत आईविना लेकराला वाढवताना बापाची होणारी दमछाक त्याने जवळून बघितली होती. कुठल्याही परिस्थितीत बापाला अंतर द्यायचं नाही ह्या निश्चयाने त्याने त्याच्या अर्धांगिनीला माप ओलांडून घरात आणलं. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपताच त्या बापासाठी अचानकपणे वृद्धाश्रमाचा दरवाजा उघडला गेला आणि … डोंगरच अवेळी म्हातारा झाला.