धावपळ करत मी मुंबई पँसेंजर पकडली. आतमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती तरीही मला बसायला जागा मिळाली. पँसेंजरचा प्रवास कंटाळवाणा असला तरी प्रत्येक छोट्या छोट्या स्टेशनवर थांबणारी गाडी, त्यातून उतरणारी आणि चढणारी वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मला मोठी इंटरेस्टिंग वाटतात. विशेष म्हणजे त्यांच्या आपापसातल्या गप्पा फारच इंटरेस्टिंग असतात. त्या गप्पातून नातेवाईकांचे आपसातले संबंध, हेवेदावे, मत्सर, समाजातल्या चालीरिती आपल्याला कळत असतात. माझ्याच बेंचवर बसलेल्या लहान मुलांची आपसातील भांडणं हसूही आणत होती आणि वीटही. म्हसावद आलं. माझ्यासमोरचे दोनजण उतरुन गेले आणि त्याजागी एक साठी उलटलेला माणूस येऊन बसला. माझ्या बेंचवरच्या मुलांची खिडकीत कोण बसेल यावरुन भांडणं झाली. नंतर मारामारीही. मग दोघांनीही मोठ्याने भोकाड पसरलं. त्यांचे आई आणि बाप त्यांना समजवायला लागले तेवढ्यात… “चाँकलेट खाता कारे पोरांनो” असा दमदार आवाज घुमला. सगळे त्या आवाजाकडे बघू लागले. पोरांनीही रडणं सोडलं आणि त्या आवाजाकडे बघू लागले.“कारे खाता का चाँकलेट?” माझं लक्ष गेलं. माझ्या समोर बसलेला तो साठी उलटलेला इसम त्यांना विचारत होता. चाँकलेटला नाही म्हणणारी लहान मुलं त्यातून पँसेंजरमध्ये प्रवास करणारी गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मुलं जवळजवळ अशक्यच. दोघांनीही होकारार्थी माना हलवल्या. मग त्या माणसाने बँग उघडून तिथल्या पोरांना चाँकलेट्स दिली. पोरं खुष आणि पोरांचं रडणं थांबलं म्हणून त्यांच्या आया खुष. एक चाँकलेट माझ्याकडेही सरकवत तो माणूस म्हणाला“घ्या साहेब”“अहो नको. चाँकलेट खायला मी लहान थोडाच आहे?” मी आढेवढे घेत म्हणालो खरा पण मलाही मिळालं तर हवंच होतं चाँकलेट. “अहो चाँकलेट खायला कुठं वय लागतं का?मी आता म्हातारा झालो तरी मला चाँकलेट खायला आवडतात. घ्या लाजू नका”मी ते चाँकलेट घेतलं आणि लहान मुलांसारखं पटकन खाऊन टाकलं. एवढ्यात माझ्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तसा माझ्यासमोरचा माणूस उठला. उठताउठता त्याने बँग उघडून त्यातली चाँकलेटस् काढली तेव्हा त्याची ती बँग पुर्ण चाँकलेट्सनी भरलेली दिसली. तो त्या कंपार्टमेंटमध्ये गेला आणि मुलांच्या रडण्याचे आवाज बंद झाले. थोड्या वेळाने पाचोरा आलं आणि मी उतरुन गेलो. पण तो चाँकलट वाटणारा म्हातारा माझ्या चांगलाच लक्षात राहिला. दोनतीन दिवसांनी मी चाळीसगांवला जायला निघालो. म्हसावद आलं तसे हे चाँकलेटस् वाटणारे ग्रुहस्थ योगायोगाने माझ्यासमोरच येऊन बसले. मी त्यांना लगेच ओळखलं पण त्यांनी मला ओळखल्याचं दिसलं नाही म्हणून मी त्यांना त्यादिवशीची ओळख करुन दिली. ते हसले“हो आठवलं. रोज नवीननवीन माणसं बघतो ना म्हणून विसर पडतो. आणि आता वयही झालं. पुर्वीसारखं लक्षात रहात नाही”“काका आजही चाँकलेट्स देणार का?” “हो तर! हे तर माझं रोजचंच आवडतं काम आहे. रोज याच गाडीने इगतपुरीला जातो. तिथं चाँकलेट्सनी बँग भरुन घेतो आणि तिकडून पँसेंजरनेच परत येतो”सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला.आता मात्र या माणसाबद्दल मला उत्सुकता वाटू लागली.मी आश्चर्यचकीत होऊन विचारलं“तुम्हांला त्यात आनंद मिळत असणार हे नक्की पण अजून काही विशेष कारण आहे का?”“साहेब मी निव्रुत्त शिक्षक.बायको दोन वर्षांपूर्वी वारली. एकुलता एक मुलगा खुप शिकला आणि नोकरीसाठी आँस्ट्रेलियात जाऊन बसला. म्हसावदसारख्या खेड्यात त्याला आणि त्याच्या बायकोला यायला आवडत नाही. मागच्या वर्षी त्याला मुलगा झाला.त्याला तरी तो घेऊन येईल असं वाटत होतं पण त्याने फक्त फेसबुकवर त्याचे फोटो पाठवले. कधीतरी व्हिडिओ काँलवर नातू दिसतो. त्याला घेण्याची, त्याचे लाड करण्याची खुप इच्छा होते पण काय करणार? इतक्या दुरुन ते कसं शक्य होणार?”“मग तुम्हीच का जात नाही आँस्ट्रेलियात?”“साहेब आपलं सगळं आयुष्य म्हसावदसारख्या खेड्यात गेलं. इथं शेती आहे. ती सोडून कुठे जावंस वाटत नाही. बहुतेक नातेवाईक इथंच आहेत. त्यांच्यामुळे तरी थोडा जीव रमतो. मुलाला म्हंटलंय,उन्हाळ्यात इथे येऊन मला आँस्ट्रेलियाला घेऊन जा आणि पावसाळा सुरु होण्याआधी इथे आणून सोड. हो हो म्हणतोय. बघू कधी नेतो ते? मुलगी औरंगाबादला आहे पण दुर्देवाने तिला मुलबाळ नाही. कधी होईल सांगू शकत नाही. त्यामुळे नातवांशी खेळण्याची, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची इच्छा अपुर्णच राहिली. ती या गोरगरीबांच्या मुलांना चाँकलेट वाटून मी पुर्ण करतोय. रडणारी पोरं जेव्हा चाँकलेट पाहून हसायला लागतात तेव्हा खुप बरं वाटतं” ” छान. पण तुम्हांला असं वाटत नाही की अशी चाँकलेट्स देऊन तुम्ही त्या मुलांचे दात खराब करताय?”” अहो रोजरोज चाँकलेट्स खायला ती काय श्रीमंताची पोरं आहेत? कधीतरी आईबापाने घेऊन दिलं तर खाणार बिचारी. आणि असंही मी त्यांना दोन चाँकलेट्सच्यावर देत नाही “” फक्त गाडीतच वाटता की अजून इतर कुठं…?”” कधी झोपडपट्टीत वाटतो तर कधी आदिवासी पाड्यांवर जाऊन वाटतो. आसपासच्या खेड्यातल्या शाळांमध्ये जाऊनही वाटतो” “अरे वा!” त्यांच्या या कार्याने मी चांगलाच प्रभावित झालो. मग मी पाकिट काढून पाचशेच्या दोन नोटा त्यांच्या हातात देऊन म्हंटलं ” हे तुमच्याकडे असू द्या. माझ्याकडूनही चाँकलेट्स देत चला” त्यांनी त्या नोटा मला परत केल्या “नाही साहेब. मी माझ्या समाधानाकरीता हे करतो. तुमच्या पैशांनी चाँकलेट्स दिल्याचं समाधान मला मिळणार नाही. तुम्ही असं करा ना तुम्ही एक्स्प्रेसनेही जात असता. एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातही बरीच गरीब मुलं तुम्हांला भेटतील. त्यांनाही चाँकलेट्स मिळाली तर आनंदच वाटेल” त्यांचं म्हणणंही योग्यच होतं. पण का कुणास ठाऊक असं चाँकलेट्स देणं मला माझ्या स्टेटसला न शोभणारं वाटलं.मग त्यांनी माझी चौकशी केली. मलाही दिड वर्षाची लहान मुलगी असल्याचं मी सांगितल्यावर त्यांना आनंद झालेला वाटला. म्हणाले “कधी या मुलीला घेऊन.मजा येईल तिच्याशी खेळायला”” हो जरुर आणेन” मी आश्वासन दिलं त्यानंतर आमच्या भेटीगाठी होत गेल्या. त्यांचं नांव काशिनाथ पाटील होतं तरी मी त्यांना चाँकलेट काकाच म्हणायचो. पँसेंजरमध्ये काका बरेच प्रसिद्ध होते. अपडाऊन करणारे आणि फेरीवाले त्यांना आता चांगलेच ओळखू लागले होते. एक दिवस चाळीसगांवला बायकोच्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी जायला निघालो. बाकीच्या गाड्या लेट झाल्यामुळे पँसेंजरशिवाय पर्याय नव्हता. सोबत मुलगी होतीच. मग मी चाँकलेट काकांना फोन करुन बोलावून घेतलं. म्हसावदला ते गाडीत आले.माझ्या मुलीला मांडीवर घेऊन बसले. तिच्याशी खेळतांना ते खुप आनंदी वाटत होते. तिच्या बोबड्या बोलांनी ते हरखून जात होते.चाळीसगांव येईपर्यंत मुलगी त्यांच्याकडेच होती. चाळीसगांव आलं तसं त्यांनी मुलीचा मुका घेत माझ्याकडे दिलं. “खुप गोड आहे तुमची मुलगी” तिच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले. मग खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून त्यांनी माझ्या हातात दिली.” हे कशासाठी?” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं“माझ्याकडून तिला फ्राँक घेऊन घ्या”“अहो कशाला काका?”“असं कसं नातीला पहिल्यांदा बघितलं. तिला काही द्यायला नको?”बोलताबोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी माझं पाचोऱ्याचं काम संपलं आणि बऱ्हाणपूरकडचं सुरु झालं. चाँकलेट काकांशी भेट होणं मुश्कील होऊन बसलं. अधूनमधून फोन करुन मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचो. आँस्ट्रेलियातला त्यांचा मुलगा येऊन गेला का याचीही मी चौकशी केली. त्याला अजून सुटी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोन महिन्यांनी बऱ्हाणपूरकडचं माझं काम संपल्यावर चाळीसगांवकडची साईट सुरु झाली. आता चाँकलेट काकांची रोजच भेट होणार याचा मला आनंद झाला. मी त्यांना फोन केला पण त्यांचा फोनच बंद होता. दुसऱ्या दिवशी मी पँसेंजरने जायला निघालो.काकांना फोन लावला. आताही फोन बंदच होता. म्हसावदला दोन माणसं माझ्यासमोरच येऊन बसली. मी त्यांना विचारलं “काहो त्या काशिनाथ पाटलांना ओळखता का?”“कोणते काशिनाथ पाटील? गावात चारपाच काशिनाथ पाटील आहेत. त्यातले नेमके कोणते?”“ते निव्रुत्त शिक्षक होते. आणि रेल्वेत नेहमी लहान मुलांना चाँकलेट्स वाटायचे”“ते…
Category: Long Story
अण्णा
लोकलने दादर स्टेशनवर मी उतरलो तेव्हा पाऊस सुरु होता.पावसाळ्याचेच दिवस ते.त्यामुळे माझ्यासोबत छत्री होतीच.एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हाताने छत्री उघडून मी जिना चढलो.सकाळची अकरा साडेअकराची वेळ असल्याने दादर स्टेशनवर तुफान गर्दी होती.दादर ईस्टच्या बाजुला बस स्टँड असल्याने मी ईस्ट साईडला आलो.जीना उतरतांना लक्षात आलं की पावसामुळे आणि लोकांच्या पायाचा चिखल पायऱ्यांना लागल्यामुळे जिना फार निसरडा झालाय.दोनदा मी सटकता सटकता वाचलो पण पाचसहा पायऱ्या शिल्लक असतांना माझा पाय अखेर सटकलाच आणि मी पायरीवर धाडकन आपटलो.पडतापडता मी जिन्याचा कठडा धरला त्यामुळे फार लागलं नाही पण माझा डावा पाय चांगलाच लचकला.पँटही मागच्या बाजूने खराब झाली असावी.कसाबसा उठून मी चालायला लागलो पण पाय चांगलाच दुखावला होता.लंगडतलंगडतच मी स्टेशनबाहेर आलो.एकाला बसस्टँडबद्दल विचारलं.त्याने दहा मिनिटाच्या अंतरावर ते असल्याचं सांगितलं.दहा मिनिटांच्या अंतरासाठी रिक्षाला पैसे घालवणं बरं वाटेना म्हणून मी पायीच निघालो.पाय दुखत होताच.त्याची पर्वा न करता हळूहळू स्टँडवर आलो.चौकशी कक्षात अलिबागला जाणाऱ्या गाडीची वेळ विचारली.“ती काय बाहेर उभी आहे.निघेलच पंधरावीस मिनिटात”त्यांनी सांगितलं.स्टँडवर पाण्याची डबकी साचली होती.ती चुकवत मी बसपर्यंत पोहोचलो.बस अर्धी भरली होती.एका सीटवर खिडकीजवळ बँग ठेवलेली मी पाहिली.त्याशेजारीच मी बसलो.थोड्या वेळाने कंडक्टरने जशी बेल मारली तसा एक चाळीस पंचेचाळीसच्या आसपासचा काळासावळा ग्रुहस्थ घाईघाईत माझ्याजवळ आला. मी त्याला आत जायला जागा करुन दिली.बस निघाली.पहिल्यांदाच अलिबागला जात असल्यामुळे मला तिथली माहिती घेणं आवश्यक होतं.१९८६चा तो काळ.मोबाईलचा त्यावेळी जन्मही नव्हता झाला.त्यामुळे गुगलवर सर्च करुन माहिती घेणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता.वाचलेल्या किंवा ऐकीव माहितीवरच अवलंबून रहावं लागायचं.मी शेजारच्या माणसाला विचारलं” अलिबाग किती दुर आहे इथून?” त्याने माझ्याकडे दचकून पाहिलं.कदाचित मी त्याच्याशी बोलेन अशी त्याने अपेक्षा केली नसावी.मग तो हसून म्हणाला” साँरी मै मराठी नही बोल सकता.आय कँन अंडरस्टँड बट कान्ट स्पीक.हिंदीमे बोलेगा तो चलेगा ?”त्याच्या उच्चारावरुनच तो साऊथ इंडियन अण्णा आहे हे माझ्या लक्षात आलं.“चलेगा ना.मै हिंदी बोलभी सकता हूँ और समझभी सकता हूँ”“थँक्स.अलिबाग इधरसे हंड्रेड कीलोमीटरसे उपर होयेगा.इट विल टेक टू अँड हाफ अँन अवर्स.आप अलिबागमे किधर जायेगा?”“मुझे आर.सी.एफ.जाना है.मेरा कल वहाँ इंटरव्ह्यू है”“व्हेरी गुड.मै भी आर.सी.एफ.जायेगा.आय अँम वर्किंग देअर”मला आनंद झाला.याच्याकडून हवी असलेली माहिती काढायला हरकत नव्हती.“अच्छा अलिबाग बस स्टँडपर कोई हाँटेल या लाँज मिल जायेगा आज रात सोने के लिये?”“येस.देअर आर सम हाँटेल्स बट मेरेको जादा जानकारी नही है”मी चुप बसलो.म्हणजे आता स्वतः अलिबागला उतरल्यावर शोध घेणं आलं.“आपके पैरमे कुछ प्राँब्लेम है क्या?मैने बस स्टँडवर देखा आप चल नही पा रहे थे” त्याने विचारलं” हाँ दादर स्टेशनकी सिढियोपरसे मै फिसल गया था.पैरमे मोच आ गयी है.बहुत दर्द हो रहा है” बोलताबोलता मी पँट वर करुन पायाकडे पाहिलं.पाय चांगलाच सुजला होता.त्यानेही पायाकडे पाहिलं.पण तो काही बोलला नाही. गाडीच्या खिडकीतून आता कोकणातला निसर्ग खुप सुरेख दिसत होता.जागोजागी भात पेरणी झालेली दिसत होती.पाण्याने भरलेले हिरवे चौकोन डोळ्यांना सुखावत होते.त्यासोबत खिडकीतून येणारी थंड हवा आल्हाददायक वाटत होती.पाय दुखत नसता तर मला या सुंदर निसर्गाचा जास्त आनंद घेता आला असता.शेजारच्या माणसाने मग माझी थोडी चौकशी केली.माझा कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे?आता सध्या काय करतोय?कुठे रहातो?घरी कोण कोण असतं?मी उत्तरं देत होतो पण मला मनातून रात्रीच्या निवासाची काळजी लागली होती.स्टँडजवळ चांगलं हाँटेल मिळेल का?फार महागडं तर नसेल?जेवायचं कसं करायचं?उद्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत हा पाय ठिक होईल का?फ्रँक्चर तर नसेल?नाना प्रश्न मला सतावत होते त्यामुळे त्याच्या प्रश्नांना मी थोडा तुटकपणेच उत्तरं देत होतो.थोड्यावेळानेखिडकीतून शहर आल्यासारखं दिसायला लागलं.मी त्याला विचारलं“अलिबाग आ गया क्या?”” अभी आयेगा.पहले आर.सी.एफ.आयेगा उसके बाद बस स्टँड आयेगा”” बस स्टँडसे आर.सी.एफ.के लिये रिक्षा मिल जायेगी ना?कितना किराया होता है?”तो हसला.“हाँ मिल तो जायेगी.लेकीन आप बस स्टँड क्यूँ जा रहे है?आर.सी.एफ.के स्टाँप पर उतर जाईये.”मी गोंधळलो.” क्या आर.सी.एफ.मे रहने के लिये गेस्ट हाऊस है?”मी शंका येऊन विचारलंतो अजूनच हसला“नही नही ऐसा गेस्ट हाऊस नही है.आप मेरे घर पर चलो.वहाँपर ही रुक जाना”आँफर चांगली होती.माझं सगळं टेंशन दूर करणारी होती पण अनोळखी माणसाकडे रहायला जाणं मला संकोचल्यासारखं वाटत होतं.त्याच्या कुटुंबातली माणसं कशी असतील?ती आपल्यासारख्या आगंतुक पाहुण्याशी व्यवस्थित वागतील की नाही ही शंका मनाला खाऊ लागली“नही नही.आपकी फँमिलीको डिस्टर्ब करना अच्छा नही.मै स्टँडपरही कोई हाँटेल ढुंढ लुंगा.एक रात की तो बात है.”” दँटस् व्हाँट आय अँम सेईंग.मेरा फँमिली केरलामे है.आय अँम स्टेईंग अलोन इन माय क्वार्टर. आपको रहनेमे कोई दिक्कत नही होगी.आपके पैरमे तकलीफ भी है.आप यही पर उतर जाओ.हाँटलमे रहनेकी जरुरत नही”मी अवघडलो.काय उत्तर द्यावं ते मला कळेना.बसमध्ये भेटलेल्या एका अनोळखी माणसाकडे रात्रभर रहाण्यात मग तो एकटाच का असेना मला नक्कीच संकोच वाटणार होता.शिवाय दोघांच्या भाषा वेगळ्या.तो तोडक्या मोडक्या हिंदीत बोलणार आणि मी तोडक्या मोडक्या इंग्रजीत. जमणं कठिणच.तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली“आर.सी.एफ.कुणी आहे का?उतरा लवकर”तो ओरडला.माझ्या शेजारच्या माणसाने त्याची बँग हातात घेतली आणि मला म्हणाला“चलो चलो.सामान लेकर आओ मेरे साथ”अवघडलेल्या अनिश्चित स्थितीत मी माझी बँग घेऊन त्याच्यासोबत खाली उतरलो.बस निघून गेली.स्टाँपवर दोनतीन रिक्षा उभ्या होत्या.त्याने एकाला पत्ता सांगितला आणि रिक्षात शिरला.माझ्याकडे नजर टाकून मला “आओ” म्हणाला.मी अनिच्छेने आणि अवघडलेल्या मनःस्थितीत त्याच्या शेजारी जाऊन बसलो.रिक्षा आर.सी.एफ.काँलनीत फिरत फिरत एका तीन मजली अपार्टमेंट समोर येऊन उभी राहिली.खालच्या मजल्यावरच त्याचं क्वार्टर होतं.कुलुप उघडून आम्ही आत शिरलो.पंधरावीस दिवस घर बंद असावं.एक कुबट वास आत येत होता.” मै बीस दिन छुट्टीपर था.मेरे ब्रदरके लडकीका शादी था.इसलिये घरमे थोडा कचरा हो गया है.आप बैठो मै रुम साफ कर देता.”मी बसलो.त्याने कुंचा घेतला आणि घर झाडून काढलं.मग कपड्याने पुसून काढलं.घरात सामान काही जास्त दिसत नव्हतं.बाहेरच्या खोलीत एक टेबल.दोन खुर्च्या.बेडरुममध्ये एक पलंग.भिंतीवर एका अनोळखी दाक्षिणात्य देवाचा फोटो होता.किचनमध्ये थोडीफार भांडी,गँस बस इतकंच.“आप फ्रेश हो जाओ.फिर मै काँफी बनाता.साँरी मै चाय नही पिता इसलिये चाय का सामान नही है”“कोई बात नही.मुझे काँफीभी पसंद है”मी फ्रेश होऊन आलो.त्याने काँफीचा कप माझ्या हातात दिला.दाक्षिणात्य चवीची ती थोडिशी कडवट काँफी होती.पण या पावसाळी वातावरणात मस्त वाटत होती.“खाना खाया था की नही आपने?”त्याने विचारलं आणि मला एकदम भुक लागल्याची जाणीव झाली“नही.सुबह नाश्ता किया था.बादमे पैरमे मोच आगयी तो फिर हाँटेलमे गया नही” मी म्हणालो“आय अँम साँरी मै मेसमे खाना खाता और अभी मेस बंद हुआ होगा.आपके खाने के लिये मेरे पास कुछ नही है.अभी रातकोही खाना मिलेगा”“कोई बात नही.मुझे भुख नही है”मी माझी भुक लपवत म्हणालोमग त्याने एकदम आठवल्यासारखी बँग उघडून बिस्किट पुडा काढला आणि मला दिला.काँफीसोबत बिस्कीटं खाऊन मला जरा तरतरी आली.“आप थोडा रेस्ट करो” तो म्हणाला” नही.दिनमे मै सोता नही हूँ”“ठिक है सोना नही थोडा रेस्ट करना.इव्हनिंगमे मै आपके लिये मेडिसीन लेके आऊंगा”मग तो बेडरुममध्ये गेला आणि लगेच बाहेर आला“आपका बेड तयार है.शामतक पैरको रेस्ट मिला तो फायदा हो जायेगा”मी उठलो.आतमध्ये गेलो.पलंगावर एक छान स्वच्छ चादर टाकली होती.उशीचं कव्हरही बदललेलं दिसत होतं“आप कहाँ सोयेंगे?आपभी तो केरलासे आये है”“नो नो आय केम यस्टर्डे फ्राँम केरला.कुर्लामे मेरा रिलेटिव्ह है उनके यहाँ रातको स्टे किया.सुबह उनके यहाँ खाना खाके…
सीमोल्लंघन
” हं सांगा मला काय काय आणायचं ते,मी घेऊन येतो” बापुसाहेब तयार होऊन सरलाताईंना म्हणाले“अहो तुम्ही राहू द्या.वसंताला पाठवते मी”“आम्हांला तरी कोणतं काम आहे?द्या ती लिस्ट आमच्याकडे”“वसंताला घेऊन तरी जा सोबत ““नको नको.तुमच्या मदतीला राहू द्या”सरलाताईंनी थोड्या नाखुषीनेच सामानाची यादी त्यांना दिली.बापुसाहेब घराबाहेर पडले.सरलाताई त्यांच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे पहात राहिल्या.एवढा मोठा माणूस,आज भाजी आणि किराणा आणण्यासारख्या क्षुल्लक कामांसाठी बाहेर पडावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं.आज दसऱ्यानिमित्त ड्रायव्हरला सुटी दिली असल्याने बापुसाहेबांनी स्वतःच गाडी काढली आणि ते बाजाराकडे निघाले.आज दसऱ्याचा बाजार तुडूंब भरला होता.एका गल्लीत गाडी पार्क करुन ते बाजारात शिरले.त्यांना आपल्या तरुणपणाची आठवण झाली. दसऱ्याच्या दिवशी ते असेच भाजीबाजारात येऊन खरेदी करायचे.सोबत मुलं असली की अजुनच मजा यायची.त्यांचे प्रश्न आणि मागण्या यांचा भडीमार असायचा.“एकट्याने खरेदी करण्यात मजा नाही” ते मनाशीच पुटपुटले.मग त्यांनी भरपूर भाज्या,झेंडूची फुलं खरेदी केली.एका किराणा दुकानात जाऊन सरलाताईंनी लिहून दिलेल्या वस्तू खरेदी केल्या.स्वीट मार्टमध्ये जाऊन त्यांचे आवडीचे मोतीचुरचे लाडू आणि संध्याकाळी भेटायला येणाऱ्यांसाठी पेढे घेतले.लहान मुलांसाठी चाँकलेट्स घेऊन ते घरी आले.पिशव्या भरभरुन त्यांनी आणलेला बाजार पाहून सरलाताईंना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं.“अहो इतक्या भाज्या?घरात आपण इनमीन दोन माणसं!कधी संपणार हे?”“असू द्या हो.आज इतक्या वर्षांनी बाजारात गेलो.इतक्या ताज्या हिरव्यागार भाज्या पाहून मोह आवरला नाही.”सरलाताईं मनाशीच हसल्या.आपल्या नवऱ्याने असं सामान्य माणसासारखं वागलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. विश्वासराव शिंदे उर्फ बापुसाहेब म्हणजे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ.एका सहकारी बँकेचे चेअरमन.बापुसाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो बँकेत मात्र विश्वासरावांचंच पँनल जिंकून यायचं.पँनलमध्ये इतर सदस्य कोण आहेत याचं बँकेच्या सभासदांना काहिही देणघेणं नसायचं.त्यात बापुसाहेब आहेत म्हणजे झालं इतकी लोकप्रियता बापुसाहेबांची होती.बापुसाहेबांचं संघटन कौशल्य वादातीत होतं.कोणत्या माणसाला कसं ताब्यात ठेवायचं हे त्यांना माहित होतं.अगोदर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली त्यांची बँक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली होती.प्रत्येक शाखा आधुनिक होती आणि जवळजवळ प्रत्येक गावात बँकेचं एटीएम होतं.या सर्वामागे बापुसाहेबांचं अफाट कर्तृत्व होतं.जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार,खासदारापासून ते खेड्यापाड्यातल्या गरीब शेतकऱ्यापर्यत सगळ्यांशी बापुसाहेबांचे प्रेमाचे संबंध होते.कर्जवाटपात जशी बँक जिल्ह्यात अव्वल होती तशीच कर्जफेडीतही आघाडीवर होती.बँकेचा एनपीए अतिशय कमी होता.कारभार तर इतका पारदर्शी होता की रस्त्यावरच्या माणसाने जरी चौकशी केली तरी त्याला एकही चुक दिसू नये.बँकेतला भ्रष्टाचार म्हणजे फक्त चहापाणी करणं किंवा खुप झालं तर सगळ्या स्टाफला पेढे वाटणं.बापुसाहेबांची लोकप्रियता बघून त्यांना बऱ्याचदा राजकीय पक्षाकडून लोकसभा,विधानसभा निवडणूक लढायच्या आँफर्स यायच्या.पण बापुसाहेबांना बँकेला निवडणूकीचा आखाडा बनवायचं नव्हतं किंवा बँकेच्या कारभारात राजकीय पक्षांना शिरुही द्यायचं नव्हतं.ते स्वतः जन्मजात गर्भश्रीमंत होते.गावाकडे प्रचंड शेती होती.शहरात दोन थ्री स्टार हाँटेल्स होती.वडिलांच्या नावाचं एक इंजीनियरींग काँलेज होतं.मुलीचं लग्न होऊन ती जर्मनीत स्थायिक झाली होती.मुलगाही साँफ्टवेअर इंजीनियर होऊन हैदराबादला एका मल्टीनँशनल कंपनीत नोकरी करत होता.त्याची बायकोही डाँक्टर होती.बापुसाहेबांनी एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांची सर्व कर्तव्य पार पाडली होती. त्यात ते समाधानी होते.बँकेसोबतच बापुसाहेब किमान डझनभर संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कुशल नेत्रुत्वामुळे सर्वच संस्था भरभराटीला आल्या होत्या. “मला वाटतं बापुसाहेबांनी गेली पंधरा वर्ष या बँकेचं चेअरमनपद भुषवलं आहे आणि बँकेला फार मोठ्या उंचीवर पोहोचवलं आहे.त्यांच्याबद्दल आम्हांला नितांत आदर आहे.पण जशी मागणी होतेय यावेळी त्यांनी तरुण रक्ताला संधी द्यावी.सल्लागार म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्हांला यापुढेही मिळत राहील यात शंका नाही.मी यावेळी चेअरमनपदासाठी सुधाकर देशमुखांचं नाव सुचवू इच्छितो”बाकीच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून या सुचनेचं स्वागत केलं.बापुसाहेबांना धक्का बसला.चेअरमनपदातून त्यांना वगळण्यात येईल अशी त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती.निवडणूक अधिकारीही अचंबित झाले.बापुसाहेबांव्यतिरिक्त कुणाचं नाव पुढे येईल असं त्यांनाही वाटलं नव्हतं कारण तसं कधी घडलंच नव्हतं.ते उभे राहिले.“ठिक आहे.आपण बँकेच्या नियमानुसार हात उंचावून मतदान घेऊया.मी चेअरमनपदासाठी जे उत्सुक आहेत त्यांची नावं एक एक करुन घेतो”बापुसाहेबांनाच सर्वाधिक मतदान होईल अशी त्यांना आणि बापुसाहेबांनाही अपेक्षा होतीपण अगोदरच ठरल्याप्रमाणे सगळ्यात जास्त हात सुधाकर देशमुख या नावाला वर झाले आणि बापूसाहेब हरले.सभागृहात एकच जल्लोष झाला. देशमुखांना सगळ्यांनी वर उचलून घेतलं.बापुसाहेबांचा चेहरा काळाठिक्कर पडला.सुधाकर देशमुख पुढे झाले.आपल्या भाषणांत त्यांनी सर्वांचे आभार मानले.बापुसाहेबांना संचालक मंडळात राहण्याची विनंती केली.बापुसाहेबांनी ती अर्थातच नाकारली.सर्वात विश्वासू असलेल्या सुधाकर देशमुखाने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांना जाणीव झाली. विषण्ण मनाने ते घरी परतायला निघाले. बँकेसाठी त्यांनी केलेला त्याग,बँकेच्या प्रगतीसाठी झपाटल्यासारखी घेतलेली मेहनत,त्यामुळे कुटुंब, नातेवाईक,मित्र यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, शेतीची झालेली हेळसांड सगळं त्यांना आठवू लागलं.आजच्या या दगाफटक्याने हे सगळं मातीमोल करुन टाकलं होतं.विचारा-विचारात घर कधी आलं तेच त्यांना कळलं नाही.”साहेब घर आलं.उतरताय ना?”ड्रायव्हरच्या बोलण्याने ते भानावर आले.कारचा दरवाजा उघडून ते आत शिरणार तोच ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला.“साहेब एक मिनिट”वळून त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं.तो पुढे आला आणि त्याने एकदम त्यांचे पाय धरले.“अरे हे काय करतोहेस?”” उद्यापासून मला नवीन चेअरमनसाहेबांच्या गाडीवर जावं लागेल.माझ्याकडून काही चुकलंबिकलं असेल तर माफ करा साहेब”आणि एकदम तो रडू लागला.“काय झालं का रडतोहेस?”बापुसाहेबांनी त्या तरुण ड्रायव्हरला जवळ घेतलं“साहेब या हरामखोरांनी तुम्हांला कट करुन बाजुला केलं.तुम्ही बँकेसाठी काय काय केलं याची कदर नाही ठेवली या नालायकांनी.साहेब आम्ही सगळे ड्रायव्हर आणि स्टाफ हे कळल्यावर खवळून गेला आहे.तुम्हांला सांगतो साहेब ,यांच्या बापाकडून ही बँक सांभाळली जाणार नाही.पहा तुम्ही पाच वर्षात यांचे काय हाल होतात ते”बापुसाहेबांना त्याच्या भावना कळत होत्या.किंबहूना त्या सर्वच सभासदांच्या भावना होत्या.त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाले“बघुया.योग्य-अयोग्य काळ ठरवेलच “ते आत गेले.उत्सुकतेने सरलाताई बाहेर आल्या.आपल्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं.त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बापुसाहेबच म्हणाले.“आम्ही आता चेअरमन नाही राहिलो,सुधाकर देशमुख नवीन चेअरमन झाले”बापुसाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणून सरलाताई सुधाकर देशमुखांना ओळखत होत्या.त्यांना झालेल्या दगाफटक्याची कल्पना आली.अशावेळी बायका उत्तेजित होतात.नको ते प्रश्न विचारुन हैराण करतात.दगाबाजी करणाऱ्याला शिव्यांची लाखोली वाहतात.पण हे सगळं करुन काहीच साध्य होणार नाही याची सरलाताईंना जाणीव होती.त्या एवढंच म्हणाल्या” जे होणार होतं ते झालं.तुम्ही फारसं मनावर घेऊ नका.फ्रेश व्हा.आपण जेवायला बसू” त्या दिवसानंतर बँकेचा विषय मनातून काढून टाकायचा बापुसाहेब प्रयत्न करु लागले.वर्तमानपत्रात येणाऱ्या बँकेच्या बातम्याही वाचणं त्यांनी सोडून दिलं होतं.बँकेव्यतिरीक्तही जीवन आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली.ते अजुनही त्यांच्या काँलेजचे अध्यक्ष होते.दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दोन हाँटेल्स फारशी चालत नव्हती.त्यांचं नुतनीकरण आवश्यक होतं.शेतीही आजकाल बेभरवंशाची झाली होती.बेरोजगारी वाढलेली असतांना कामाला मजूर मिळत नव्हते.शेतीचं उत्पन्न घटलं होतं तिकडेही लक्ष देण्याची गरज होती.बापुसाहेबांचा दिवस शेती,काँलेज,हाँटेल्स यात संपू लागला. असं म्हणतात की नियती जेव्हा एक दार बंद करते तेव्हा दुसरी दोन दारं उघडत असते.ही उघडलेली दारं फक्त आपल्या लक्षात यायला हवीत.बापुसाहेबांच्या ती लक्षात आली होती. बापुसाहेबांचं चेअरमनपद गेलं आणि त्यांच्या जीवावर चालणाऱ्या सामाजिक संस्थाही हळूहळू बंद पडू लागल्या.त्यांच्या समाजाची संस्था बापुसाहेबांनी म्रुतावस्थेतून पुनर्जीवित केली होती.संस्थेचे अनेक कार्यक्रम बँकेच्या प्रायोजकत्वावर चालायचे.बापुसाहेबांचं चेअरमनपद गेल्यावर बँकेने त्यांना प्रायोजकत्व देणं बंद केलं.संस्थेच्या संचालकांमध्ये दुसरीकडून प्रायोजकत्व मिळवण्याची धमक नव्हती.संस्थेचे कार्यक्रम बंद पडले.याचा ठपका संचालकांनी बापुसाहेबांवर ठेवला आणि त्यांना अध्यक्षपदावरुन काढून टाकलं.एक एक संस्था हातातून जात असतांना बापुसाहेब हे सगळं निर्विकार मनाने पहात होते.वाघ जखमी झाला की त्याच्या शिकारीवर जगणारे कोल्हे वाघाची किंमत ठेवत नाहीत याचा अनुभव ते घेत होते.खोट्या मोठेपणासाठी आपण ही बांडगुळं पोसली याचा…
प्रेम
“साक्षी तू पार्टीला जाते आहेस तर रेवतीलाही घेऊन जा ना सोबत.बिचारी नेहमी घरातच बसलेली असते” वसुधाताई मेकअप करत बसलेल्या आपल्या लेकीला म्हणाल्या.“काही काय सांगतेस गं आई” साक्षी आईवर जोरात डाफरत म्हणाली.”एकतर तिला निमंत्रण नाहिये. दुसरं एवढ्या शानदार पार्टीत त्या लंगडीला घेऊन कशी जाऊ मी?किती लाजीरवाणं होतं मला जेव्हा सगळेजण तिच्याकडे बघून काहीबाही कमेंटस् पास करतात तेव्हा!”“हळू बोल,तिने ऐकलं तर रडत बसेल”“रडू दे.अगं आई माझ्या पार्टीत तिचा काय संबंध?”वसुधाताई काही बोलल्या नाहीत पण दुःखी जरुर झाल्या.रेवती त्यांची धाकटी मुलगी.तिच्या जन्माच्या वेळेस गरोदर असतांना त्यांना अपघात झाला.रेवती जन्माला आली ती वाकडा पाय घेऊनच.तिचा पाय व्यवस्थित व्हावा म्हणून अनेक उपचार झाले पण उपयोग झाला नाही.बिचारीचं अख्खं बालपण लोकांच्या कुत्सित नजरा झेलण्यात आणि ‘लंगडी लंगडी” हे शब्द ऐकण्यात गेलं.सातत्याने तिची चेष्टाच झाल्याने ती बहुतेक वेळा घरातच असायची.खरं तर आपली मोठी बहिण साक्षीपेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर होती,हुशार होती पण साक्षी नेहमी तिच्या या व्यंगाला लक्ष्य करुन बोलायची.रेवतीला खुप दुःख व्हायचं.या व्यंगामुळे निर्माण झालेल्या न्युनगंडामुळे तिला जवळच्या अशा मैत्रिणीही नव्हत्या.अभ्यासाची पुस्तकं आणि टिव्ही यापलीकडे तिचं विश्व नव्हतं. साक्षी निघाली आणि तिचा मोबाईल वाजला.ज्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती त्या अंजलीचाच फोन होता.“साक्षी अगं आईने तुझ्या बहिणीला,रेवतीलाही घेऊन यायला सांगितलंय”साक्षीच्या कपाळावर आठ्या उमटल्या.“काsss?अगं तिथे तिचं काय काम ?”“अगं मागे माझी आई तुझ्याकडे आली असतांना रेवतीने खुप छान गाणी म्हंटली होती.म्हणून आईने गाणी म्हणण्यासाठी तिला बोलावलंय”“ओहो.आता राहू दे.मी आता निघालेय.तिला आणायचं म्हंटलं तर उशीर होईल”” नो प्राँब्लेम.असाही पार्टीला एक तास उशीरच होणार आहे.ये तिला घेऊन”फोन कट झाला तशी साक्षी चरफडली.तिने रेवतीला हाक मारुन तयार व्हायला सांगितलं. रेवतीने आढेवेढे घेतले तशी ती तिच्यावर खवळली.“ए बाई मुकाट्याने तयार हो बरं.तू आली नाहीस तर ती अंजली माझा जीव घेईल” दोघी हाँटेलवर पोहोचल्या.रेवतीच्या किंचीतशा लंगड्या चालीकडे लोकांच्या नजरा वळलेल्या पाहून साक्षीला मेल्याहून मेल्यासारखं झालं.तेवढ्यात अंजली आणि तिची आई समोर आल्या.“वा खुप छान आणि गोड दिसतेय गं रेवती”अंजलीच्या आईने म्हंटलं तसं साक्षीने नाक मुरडलं.केक वगैरे कापून झाल्यावर सुत्रसंचालकाने रेवतीला स्टेजवर गाणं म्हणायला बोलावलं.रेवतीने साऊंड ट्रँकवर गाणं म्हणायला सुरुवात केली तसा सगळा गलका एकदम शांत झाला.तिचं गाणं जसं संपलं संपूर्ण हाँल टाळ्यांच्या कडकडाटाने भरुन गेला.’वन्स मोअर,वन्स मोअर’च्या घोषणा होऊ लागल्या.रेवतीने तेच गाणं रिपीट न करता दुसरं गाणं म्हटलं.या गाण्याला तर अजूनच जास्त प्रतिसाद मिळाला.परत वन्स मोअर झालं पण सुत्रसंचालकाने दुसऱ्याही कार्यक्रमांना चान्स हवा म्हणून रेवतीला बसायला सांगितलं.प्रसन्न चेहऱ्याने रेवती खाली जाऊन बसली.“हँलो”रेवतीने मान वरुन पाहिलं.एक देखणा तरुण तिच्यासमोर उभा होता.“मी अक्षय.साक्षीचा मित्र.खुप छान गाणी म्हंटलीत तुम्ही.शिकलाहात का कुठे?”“नाही तर.जस्ट आवड आहे”“वा खुप छान.तुमचा आवाजही खुप गोड आहे”तेवढ्यात त्याचा मित्र आला.“अरे चल अक्षय.अंजलीबरोबर फोटो काढायचेत”“बरं भेटू या”रेवतीकडे पहात अक्षयने हात हलवला.रेवतीने स्मित केलं. दोन दिवसांनी अक्षयचा फोन आला“फेसबुकवर मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीय.बघितली नाही का?”“अहो बऱ्याच दिवसात मी फेसबुकच बघितलेलं नाहीये”“ओके ओके.मग आता तोंडीच विचारतो.माझ्याशी फ्रेंडशिप कराल ना?”रेवती अडखळली.आजपर्यंत कोणत्याही मुलाने तिला फ्रेंडशिपबद्दल विचारलं नव्हतं“ठिक आहे चालेल.मात्र एक अट आहे.असं अहोजाहो करायचं नाही”तिच्या तोंडातून निघून गेलंअक्षय जोरात हसला.“ओके रेवती.बाय. भेटू नंतर” आणि फोन कट झाला.रेवतीला खुप आनंद झाला. एक दोन मैत्रिणी सोडल्या तर तिची कुणाशी फारशी मैत्री नव्हती.मुलांशी तर नाहीच नाही.तिचं व्यंग पाहून मुलंच तिच्याशी मैत्री करायला उत्सुक नसायची.“काय अक्षयचा फोन होता?”साक्षी जवळच उभी होती हे रेवतीच्या लक्षातच आलं नव्हतं“आश्चर्य आहे.तुझ्यासारख्या अपंग मुलीशी त्याने मैत्री करावी.तू त्याच्या नादी लागू नकोस.तुला माहितेय किती श्रीमंत आहे तो. त्याच्या वडिलांच्या दोन फँक्टरीज आहेत.आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मेडीसीनची डिस्ट्रीब्युटरशीप त्याच्या मोठया भावाकडे आहे.मोठा बंगला आहे.घरात चार गाड्या आहेत.अशी श्रीमंतांची मुलं मुलींना नुसतं फिरवतात आणि वापरुन सोडून देतात.तू तर अगदी इझी टार्गेट आहे त्याच्यासाठी”रेवतीला एकदम धक्का बसला.अक्षय असं करु शकतो यावर तिचा विश्वास बसेना.यापुढे त्याच्यापासून सावध रहावं लागणार होतं.अक्षय त्यानंतर दोनतीनदा घरी आला.पण तो संध्याकाळी सगळी घरी असतांना यायचा आणि सगळ्यांशीच गप्पा मारायचा.रेवती त्याच्याशी मोजकंच बोलायची.साक्षीने दिलेल्या वाँर्निंगचा तो परीणाम होता.एक दिवस तो आला तेव्हा वसुधाताई हाँलमध्ये बसल्या होत्या .रेवती किचनमध्ये काहीतरी काम करत होती.थोडंसं जुजबी बोलल्यानंतर तो वसुधाताईंना म्हणाला“काकू तुम्हांला नाही वाटत रेवतीमध्ये न्युनगंड आलाय तिच्या अपंगत्वामुळे?”“वाटतं ना!त्याच्यामुळे ती कुठेच घराबाहेर निघत नाही रे.मलाही तिची तिच काळजी वाटते बघ.”“तुम्ही काही काळजी करु नका.मी करतो सगळं व्यवस्थित.फक्त तुम्ही मला साथ द्या”तेवढ्यात रेवती बाहेर आली.“रेवती आम्ही चाललोय भंडारदऱ्याला.तिथून आम्ही कळसूबाईला जाणार आहोत.चलतेस माझ्यासोबत?”” मी आणि कळसूबाईला?नाही रे बाबा.खुप चढावं लागतं असं ऐकलंय मी”“अगं काही खास नाही.मी जाऊन आलोय दोनदा.आणि मी आहे ना तुझ्यासोबत.बऱ्याच मुलीसुद्धा आहेत बरोबर”“हो गं रेवती.ये जाऊन.खुप छान आहे भंडारदरा.मीसुद्धा जाऊन आलेय”वसुधाताई बोलल्या.“नको ना.आई प्लीज समजून घे ना”रेवती काकुळतीने म्हणाली.अक्षयला तिच्या भावना कळल्या.तो म्हणाला.“मला समजलं, तू का नाही म्हणतेस ते!तुला सांगतो मागच्या वर्षी मी हिमालयात ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत दोन अंध मुलं होती.त्यांना मी व्यवस्थित सुखरुप घरी आणलं.तू तर चांगली डोळस आहे.ते काही नाही तुला यावंच लागेल.पैशाची काही काळजी करु नको”“अरे पण अक्षय मी…. ““हो कळलं मला.तू मनाने तर अपंग नाहीयेस ना?मग झालं तर”हो नाही करता करता रेवती तयार झाली. अक्षयचा ग्रुप भंडारदऱ्याला पोहोचला.तिथलं निसर्गसौंदर्य पाहून रेवती वेडावून गेली.दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळे कळसूबाईकडे निघाले.अक्षयने अगोदरच सगळ्यांना रेवतीच्या व्यंगावर कोणीही काँमेंट करायची नाही उलट तिला चिअर अप करत रहायचं असं बजावून सांगितलं होतं.त्यामुळे सगळेच तिला प्रोत्साहित करत होते.कळसुबाई शिखराकडे पाहिलं की रेवतीच्या मनात धडकी भरायची,आपण तिथे पोहोचू शकू का अशी शंका वाटायची.पण हळूहळू ते चढ चढतांना तिला त्रास वाटेनासा झाला.अर्धा डोंगर चढल्यावर तिला उत्साह वाटू लागला.’येस आपण करु शकतो’ हा आत्मविश्वास तिच्या नसानसात खेळू लागला.अक्षय सतत तिच्यासोबत होता.ती थकली,मागे राहिली की तो तिच्यासाठी थांबायचा.तिला हिंमत द्यायचा.दोन्ही पाय नसतांनाही एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या न्युझिलंडच्या मार्क इंग्लिस या गिर्यारोहकाची गोष्ट त्याने तिला सांगितली. ती ऐकल्यावर रेवतीला दुप्पट उत्साह आलादुपारी सगळा ग्रुप शिखरावर पोहोचला.रेवतीला आपण इतक्या उंचीवर पोहोचलो यावर विश्वासच बसेना. आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू आले.“काँग्रँट्स रेवती.यु डिड इट”अक्षयने तिच्या हातात हात मिळवून तिचं अभिनंदन केलं.बाकी सगळ्यांनीही तिचं अभिनंदन केलं.आयुष्यात पहिल्यांदाच तिला आपल्या अधू पायाचा राग आला नाही.भंडारदऱ्याला परतल्यावर रात्री जेवणानंतर कँप फायरचा कार्यक्रम झाला.रेवतीने आपल्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं.कार्यक्रम संपल्यावर ग्रुप लिडर सगळ्यांना उद्देशून म्हणाले”कळसूबाई ट्रेक यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो.पण आज मी रेवतीचं विशेष अभिनंदन करेन.काल तिला पाहिल्यावर ती ट्रेक पुर्ण करेल का अशी शंका वाटत होती.पण तिने जिद्देने ट्रेक पुर्ण केला.देव जेव्हा काही आपल्यापासून हिरावून घेतो तेव्हा वेगळी काही गोष्ट आपल्याला देत असतो.देवाने रेवतीला गोड गळा देऊन ते सिध्द केलंय.रेवती पुढे ये”रेवती पुढे जायला उठली.’या सगळ्याचं क्रेडीट अक्षयला आहे.त्याच्यामुळेच मी हे करु शकले’असं सांगायचं तिने ठरवलं” ट्रेक पुर्ण केल्याबद्दल आणि सुरेख गाण्यांसाठी मी रेवतीला एक हजार रुपयाचं बक्षीस देतोय”रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं.तिने अक्षयकडे पाहिलं आणि तिला साक्षीचे शब्द आठवले.”अशी श्रीमंत मुलं मुलींना वापरुन सोडून देतात”तिने डोळे पुसले.ग्रुप लिडरकडून बक्षीसांचं पाकीट घेतलं आणि सर्वांना धन्यवाद देऊन ती आपल्या…
बंध राखीचे….
रक्षाबंधन निमित्ताने विवेक ची…माझ्या भावाची आठवण येते.सण साजरा होतो. भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो.भाऊही भेटवस्तू देऊन बहिणी ला खूश करतो.राखीपौर्णिमा साजरी होते! पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेक ने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते! जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वी ची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते. आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरी ला लागला होता. मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूर ला होता. आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते. वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरी हून नांदेड ला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीला च होते.दिवाळीच्या सुट्टी त घरी जायला मिळत असे. त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टी साठी नांदेड ला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर – नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९-३०/१० पर्यंत नांदेड ला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीद चा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. बरोबर मिरजेच्या स्टॅण्ड वर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवांधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं! एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस् टीत बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते..अधूनमधून माझी उंची कमी असल्याने पाण्यात पूर्ण डोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई.पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅग मधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो.भावाचं नातं आणखीनच ध्रुढ करतो…इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो! आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो..आता विवेक पंचाहत्तरी कडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणी चे नाते तितकेच घट्ट आहे! ….
*अजनी, एपी आणि ती उडी…*
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दाराजवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली…! आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं…! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर…! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच. लहानपणी साइकलीवर फिरलेलं असल्यामुळे नागपूरचा भूगोल मला ठावूक आहे. ही माहितीच त्या दिवशी माझ्या कामी आली. 1996 साली एक महिना हैदराबादला राहून मी परत येत होतो. एपी एक्सप्रेसचं तिकिट घेतल्यानंतर खिशांत तीसच रुपए उरले. आता बिलासपुरपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता. मधे नागपूरला उतरुन मामे भावाकडून मदत घेणे. इथे साहजिकच प्रश्न येतो की खिशांत पैसे नसतांना एक्सप्रेस कां निवडली…? एखाद्या पैसेंजर ट्रेननी जायचं. एक्सप्रेस निवडण्याचं कारण सांगताना आज हसूं येतंय, पण तेव्हां मनांत ‘एयर ब्रेक’ असलेल्या पैसेंजर ट्रेन मधे बसायची इच्छा होती. आणि या एपीला एयर ब्रेक होते. त्यांचं काय आहे की मी स्टीम इंजिन मधे 5 वर्ष फायरमैन होतो, म्हणून मला वैक्यूम ब्रेकची माहिती होती. जबलपूर किंवा नागपूरला जाता-येता पैसेंजर/ एक्सप्रेस मधे वैक्यूम ब्रेकची कंट्रोलिंग मी बघून चुकलाे होतो. आमच्या फैक्ट्रीत एयर ब्रेक असलेल्या बीसीएन वैगन सोबतच एन बॉक्स मधे कोळसा, आयरन ओर, जिप्सम येत असे. तेव्हां तिथे छोटे डीजल इंजिन (फैक्ट्रीत 350 एचपी आणि 650 एचपी चे डीजल इंजिन होते) शंटिंग करायचे. त्या इंजिनमधे बसून एयर ब्रेकची कंट्रोलिंग पावर बघितली होती. मालगाडी मधे कंट्रोलिंग पॉवर बघितल्या नंतर मला पैसेंजर ट्रेनमधे एयर ब्रेकची कंट्रोलिंग बघायची होती. तो पर्यंत आमच्या दक्षिण-पूर्व (आता दक्षिण-पूर्व-मध्य रेलवे) रेलवेच्या पैसेंजर ट्रेन मधे एयर ब्रेकची सुविधा नव्हती आणि ‘एपी’ ला एयर ब्रेक होते. म्हणून ‘एपी’ ची निवड केली. मी हैदराबादहून गाडीत चढलो. तिकिट घेऊन फलाटावर आलो. नागपूर पर्यंत दिवसाचा प्रवास, म्हणून मी शेवटची जनरल बोगी निवडली. गार्डचा डबा आमच्या पुढे होता. इंजिनकडे तोंड करुन सिंगल सीट वर बसलो, माझ्या मागे चार सीटनंतर डब्याचं दार होतं. ट्रेन सिकंदराबादहून सकाळी सहा वाजता सुटली आणि मी प्रकृतिचं निरीक्षण करुं लागलो. ‘एपी’ ला 26 डबे हाेते, मी शेवटच्या डब्यांत होतो. आता माझं सगळं लक्ष ड्राइवरच्या ड्राइविंग वर होतं. तो भरधाव जात असलेल्या गाडीचा वेग कमी करायचा, तेव्हां गाडीच्या बदललेल्या आवाजावरुन मी समजून जात असे की ड्राइवरनी ब्रेक लावलाय. तिसरं स्टेशन भुवनगिर येई पर्यंत मी ‘एयर ब्रेक’ ची कंट्रोलिंग समजून चुकलो होतो. भुवनगिर स्टेशनानंतर डब्याच्या दाराजवळ उभा असलेला एक मुलगा माझ्या समाेर लांब सीटवर बसलेल्या लोकांच्या पाया खाली जागा बनवत सीट खाली झोपून गेला. बसलेल्या लोकांच्या पायामागे झाकला गेल्यामुळे तो दिसत नव्हतां. 9 वाजता गाडी काजीपेटला थांबली, तेव्हां टीटीई आला आणि सगळ्यांचे तिकिट चेक करुन निघून गेला, त्या मुलावर त्याची नजर गेलीच नाही. म्हणजेच तो मुलगा डब्ल्यूटी होता आणि टीटीईला चुकवण्यासाठी सीट खाली लपून बसला होता. दहा वाजताच्या जवळपास बल्लारशाॅला ट्रेन थांबली. सडकून भूक लागली होती म्हणून इडली विकत घेऊन खाल्ली, फक्त दहा रुपए…(भूख के सामने किसका बस चलता है?). इथून गाडी सुटल्यावर मी हाच विचार करत होतो की नागपूर मेन स्टेशनला उतरल्या नंतर स्वावलंबी नगर पर्यंत कसं जायचं…? रिक्शातून उतरताच मावशीकडे पैसे मागण्याचा धीर होत नव्हतां. ‘एपी’ वर्ध्यावरुन येते खरी, पण ती वर्ध्याला न जातां सेवाग्राम हून निघून जाते. त्या दिवशी सेवाग्रामला गाडी फलाटावरुन निघाली. (सहसा असं होत नाही, एक्सप्रेस ट्रेनचा स्टाॅप नसला, ती थ्रू असली म्हणजे तिला फलाटावर न घेतां मधल्या लाइनीवरुन जाऊ देतांत.) म्हणून सेवाग्राम स्टेशनावर गाडीची स्पीड बघून कुणांस ठाऊक एक विचार मनांत चमकून गेला की जरी ‘एपी’ अजनीला थांबत नसली तरी मी तिथे गाडीतून उतरु शकेन. तिथून स्वावलंबी नगर नक्कीच जवळ होतं. समोर लांब पल्याच्या सीट खाली लपलेला तो मुलगा आतां बाहेर येऊन माझ्याच शेजारी बसला होता. तो पुटपुटत होता-‘नागपूर में तो साले पकड़ ही लेंगे…जेब में एक पैसा भी नहीं…।’ हे ऐकतांच मी त्याला म्हटलं- ‘अजनी में ड्राइवर ट्रेन की स्पीड कंट्रोल करेगा, वहां उतर जाना…!’ हे ऐकून तो तर चमकलांच, शेजारी बसलेले लोक देखील दचकून माझ्याकडे बघूं लागले. मी पुढे म्हटलं- ‘नागपूर में उतरकर रिस्क लेने से अच्छा है अजनी में रिस्क लेना. और फिर कोशिश करने में क्या हर्ज है…?’ त्याने अविश्वासानं माझ्याकडे बघितलं आणि गप्प राहिला. मला ती हिंदी म्हण आठवली-चोर का दिल कमजोर होता है… खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडली आणि सामान घेऊन दारावर आलो. तो तिथेच उभा हाेता. मी त्याला म्हटलं- ‘अजनी में गाडी धीमी होती है तो उतर जाना. मैं भी उतरुंगा.’ त्याचा विश्वासच बसत नव्हतां. तो माझ्याकडे बघतच राहिला. इतक्यांत गाडीचा वेग कमी झाला होता, म्हणजेच इंजिन अजनी स्टेशनाच्या फलाटापर्यंत पोचलं होतं. अजनी फलाटावरचा पहिला साइन बोर्ड मागे पडताच मी पिशवी खांद्यावर घेतली, सूटकेस डाव्या हातात घेऊन त्याला विचारलंं- ‘उतरतो कां…!’ तो चुप होता. तेव्हां मी त्याला म्हटलं- ‘मग दार सोड…’ उजव्या हाताने दाराचं हैंडल धरुन डाव्या हातांत सूटकेस सावरत मी शेवटच्या पायदानावर आलो…आता गाडीचा वेग वाढू लागला होता…आणि सूटकेस सांभाळत मी उडी घेतली. पाय जमीनीला लागतांच गाडीच्या दिशेने गाडी सोबत पाच-सहा पाउल धावलो आणि थांबता-थांबता गाडी कडे बघून जोराने ओरडलो- ‘ऐसे उतरते हैं चलती गाडी से…!’ मला माहीत होतं की मी जिथे बसलो होतो तिथे बसलेले लोक माझ्याकडेच बघत होते. आता मी चहुकडे बघितलं. दुपारचे पावणे चार वाजले होते. चहुंकडे सगळं व्यवस्थित होतं. मी प्लेटफॉर्मच्या पुढे असलेल्या सिग्नल जवळ उतरलो होतो. सूटकेस घेऊन मी फलाटावर आलो आणि गेटजवळ पोचलो. तिथे स्टेशन मास्तर उभा होता. त्याने इतक्यांतच ‘एपी’ एक्सप्रेस ला लाइन क्लीयर दिला होता, ‘एपी’ तिथे न थांबता पुढे निघून गेली. मग हा वाटसरु कुठून टपकलां असेच काहीसे भाव त्याच्या चेहेरयावर होते. तिकडे दुर्लक्ष करीत मी स्टेशना बाहेर आलो, रिक्षा केला-8 रुपए. रिक्षा मधे मी रिलैक्स होईस्तोवर अजनी चौक आला. रिक्षा तो चौक पार करत असतांना मला जणूं जाग आली…! आणि माझ्या एकदम लक्षांत आलं की मी काय दिव्य केलंय ते. रिक्क्षेवाल्या साठी मावशीला पैसे मागावे लागतील म्हणून मी चक्क चालत्या सुपरफास्ट ‘एपी’ मधून उडी घेतली होती. स्वावलंबी नगर ला मावशीच्या घरी पोचल्यावर मी कुणालाच काही सांगितलं नाही. रात्री मामे भाऊ भेटला तेव्हां त्याला सांगितलं. ते ऐकतांच तो सुन्नपणे मला बघतच राहिलां…मग खूप रागावलां. (माझ्याहून मोठा आहे) पण बिलासपुर पर्यंतचे तिकिटचे पैसे त्यानेच दिले. ड्यूटीवर असतांना यार्डमधे शंटिंग करणारया इंजिन मधून दहादा उतरणं, चढ़णं रुटीनचं काम असूं शकतं. पण ‘एपी’ मधून घेतलेली ती उडी…! त्यानंतर मी असं धाडस कधीच केलं नाही…!
*आणि आषाढी पावली…*
12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती… उपासाचा दिवस… मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो… गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी… स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या. सात-आठ तासांचा प्रवास… लोअर बर्थ मिळाली म्हणून आम्ही खुशीत होतो… 11 वाजता घरून निघालो… पिल्लू (मुलगी) घरीच झोपून गेलं होतं. स्टेशनावर गाडी पार्क करून उतरलो तर पिल्लू कडेवरून खाली उतरायला तयार नव्हती. प्लेटफार्म वर एंट्री घेताच समाेर पहिले एसी कोच, नंतर थ्री टायरचे कोच होते. तिला घेऊन वैन पासून एस-9 पर्यंत पोचता पोचता चांगलीच दमछाक झाली… (ती 9 वर्षांची झाली यावर्षी) बर्थवर मंडळी स्थानापन्न झाली. आम्हाला सोडायला माझ्या बहिणीचा मुलगा हेरंब वसंत धुमाळ आला होता… सोबत माझी मामी होती-सुनंदा पात्रीकर… वय वर्षे 77. मी हेरंबला म्हटलं देखील इतक्या रात्री मामीला का बरं घेऊन आलास… या वयात इतकं पायी चालणं… जड जाइल तिला… तर हेरंब म्हणाला काय सांगू मामा… मी जाेपर्यंत घरी पोचणार नाही, ही जागीच राहणार एकटी… बाकी सगळे झोपलेले… त्यापेक्षा मी म्हटलं सोबत चल, स्टेशनावरून दोघं सोबतच परत येऊ… तेवढंच तिचं फिरणं होईल… म्हणून सोबत आणलंय… तर… गाडी सुटायला थोडा उशीर होता. घड्याळात पावणे बारा होत होते… हेरंब म्हणाला मामा, आम्ही निघतो… मी त्यांना सोडायला सोबत निघालो… दोन कोचपर्यंत गेलो… त्यांना सोडून परत आलो… तर आमच्या बर्थवर एक बंगाली कुटुंब येऊन बसलं होतं. ते म्हणत होते की आमच्या बर्थचा नंबर देखील एस-9 मधे 65, 68 आहे… *झाली ना गडबड…* मी आनलाइन रिजर्वेशन करवून घेतलं होतं. तो मैसेज मी पुन्हां बघितला… त्यांना देखील मैसेज दाखवला… आणि टीटीईच्या शोधात निघालो… तो मला एस-4 च्या जवळ दिसला. तिकडे निघालो आणि फोन वाजला… बायकोचा होता. ती म्हणत होती बर्थ नंबर सेम आहे… पण आपलं तिकिट एक दिवसापूर्वीचं म्हणजे 11 जुलैचं आहे… अरेच्चा… असं कसं झालं… इतकी मोठी चूक… काहीच सुचेना… आता काय करायचं…? तिला मी म्हणालो- त्यांना सांग बर्थ तुमचीच आहे… तुम्ही बसा… टीटीई जसं सांगेल आम्ही तसं करू… मग मी विचारलं पर्स मधे काही पैसे आहेत की नाही… ती म्हणाली एक-दीड असतील… इतकं बोलता बोलता मी टीटीई जवळ पोचलो देखील. मी घाबरत घाबरत त्याला विचारलं… बिलासपुर के लिए दो बर्थ मिलेगी क्या…? तो हिंदी साइडर होता… म्हणाला बिलकुल मिलेगी साहब… मग मी त्याला माझा प्राब्लम सांगितला… मेरे पास टिकट नहीं है… मेरा टिकट एक दिन पहले का था। मैंने देखा नहीं और रिजर्वेशन आज का ही है, समझकर आ गया… अभी गलती समझ में आई। अब 11.50 हो गए हैं। जनरल टिकट लाने का भी समय नहीं है। (मी विसरूनच गेलो होतो की भाचा आणि मामी अजून पार्किंगपर्यंत पोहचले देखील नसतील. तो तिकिट आणून देऊ शकतो…) टीटीई म्हणाला अरे… यानी आप बेटिकट हो… मी म्हटलं – होय… काय म्हणाला असेल तो… तो म्हणाला – मी असं करतो… तुमचं जनरल टिकट बनवून देतो…। … इतके पैसे लागतील… मी म्हटलं तो प्रश्न नाहीये… चूक झाली आहे तर परिणाम भोगायला मी तयार आहे… जनरल तिकिट… ठीक आहे… मग रिजर्वेशन चार्ज किती लागेल… एकूण किती लागतील… तो म्हणाला दोघांचं जनरल तिकीट 740 रुपए… मी विचारलं रिजर्वेशन चार्ज… तो म्हणाला – छोड़िए ना… इतना ही लगेगा… मी पर्समधून हजार रुपए दिले… तर तो म्हणाला चिल्लर नहीं है… अच्छा रहने दीजिए… त्याने उरलेले पैसे परत केले… मी त्याला म्हणालो साइड लोअर बर्थ मिल सकेगी क्या… हां… हां… क्यों नहीं… मी म्हणालो दो लोअर बर्थ चाहिए… मिसेस कैंसर पेशेंट आहे… त्याचं पुढचं वाक्य ऐकून मी सर्दच झालो… आणि टचकन डोळयात पाणीच आलं… तो म्हणाला… अरे साहब… तो ये बात पहले बतानी चाहिए थी न… हम आपसे कोई चार्ज ही नहीं लेते… आप भी गजब करते हैं… अगल बगल की साइड लोअर चलेगी… मी म्हणालो – चलेगी… चार्ट बघून तो म्हणाला आप ऐसा कीजिए एस-5 में जाकर …/… पर बैठ जाइए… ठीक है… मी त्याला थैंक्यू म्हटलं… मला गहिवरून आलं होतं… तो दुसरयाचं तिकिट करू लागला… मी हिला फोन केला एस-5 मधे यायचंय… एस-9 पर्यंत आलो… त्या बंगाली कुटुंबाला म्हटलं सॉरी… आपकी ही बर्थ है… मुझसे चूक हुई… हिला आणि पिल्लूला कंपार्टमेंटच्या आतून एस-5 मधे यायला सांगितलं आणि मी सामान घेऊन प्लेटफार्म वरून एस-5 पर्यंत आलो… पुन्हां घोळ झालाच… मी त्याने दिलेले बर्थ नंबर विसरलो. कारण त्या बर्थवर कुणीतरी बसलेलं होतं… सामान एका बर्थवर ठेवून मी पुन्हा त्याला गाठलं आणि बर्थचा नंबर विचारला… त्याने सांगितला आणि मी परत येऊन त्या बर्थवर सामान ठेवलं. ही दोघं आली नव्हती म्हणून बघायला गेलो… हिने सांगितलं पिल्लू इतकी झोपेत आहे की वाटेत दोन जागी खाली बर्थ दिसताच त्यावर झोपून गेली… बर्थवर स्थानापन्न होईस्तोवर गाडी सुटायची वेळ झाली होती… वेळेवर गाडी सुटली… खिडकीतून येणारया थंड वारयामुळे ही आणि पिल्लू झोपून गेले होते. सोबतीचे प्रवासी देखील झोपले. सामसूम झाल्यावर मी कानाला इयरफोन लावून वसंतरावांची ‘अब ना सहूंगी…’ ‘रंग भरन दे मोहे श्याम…’ चीज ऐकत होतो… रूटीन चेक वर ताे आला… तेव्हां साडे बारा होऊन गेले होते. तो म्हणाला अरे, सोये नहीं अब तक… मी म्हणालो रात्री अडीच नंतर झोपायची सवय आहे… मी हात जोडले आणि त्याचं नाव विचारलं… त्याने हसून माझ्याकडे बघितलं… म्हणाला बंदे को लालसिंह कहते हैं… बिलासपुर डिवीजन या नागपुर डिवीजन… तो म्हणाला नागपुर डिवीजन… आणि हसत हसत निघून गेला…आषाढी एकादशी सरता-सरता मला देव पावला होता…
सुख
कसल्याशा आवाजाने मला जाग आली.खिडकीच्या काचेतून मी बाहेर पाहिलं तर चाळीसगांवची पाटी दिसली.ती पहाताच मी ताडकन उठून बाहेर आलो.स्टेशन मध्ये बरेच बदल झालेले दिसले.इकडे तिकडे पहात असतांना माझी नजर एका ग्रुहस्थांकडे गेली.ते माझ्याकडेच बघत होते.मी त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या बाईशी ते काहीतरी बोलले.ती बाईही आता माझ्याकडे बघू लागली.मलाही ते ग्रुहस्थ थोडेसे ओळखीचे वाटले.पण क्लिक होईना.मी त्यांच्यावरची माझी नजर काढली आणि प्लँटफाँर्मवरच्या गर्दीकडे बघू लागलो.एवढ्यात माझ्या खांद्याला हाताचा स्पर्श झाला.मी चमकून वळून पाहिलं तर तेच ग्रुहस्थ जवळ उभे होते.” तू अवि ना रे?मधूचा मुलगा?”त्यांनी विचारलं.मी चमकलो.“हो.तुम्ही?”मी आश्चर्याने विचारलं” अरे मला ओळखलं नाही?मी प्रभू. तुझ्या वडिलांचा मित्र.तुझा प्रभुकाका” ते आनंदाने म्हणाले. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.त्यांचा चेहरा ओळखीचा का वाटत होता हे आता लक्षात आलं.“हो बरोबर”मीही आनंदाने ओरडलो आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलो तसं त्यांनी मला वरचेवर उचलून मला मिठी मारली.त्यांचा हात बराच वेळ माझ्या पाठीवर फिरत राहिला.त्या स्पर्शाने मला माझ्या वडिलांची आठवण झाली.“कुठं निघालास?”त्यांनी विचारलं” दिल्लीला चाललोय कंपनीच्या कामानिमित्त.तुम्ही?”” आम्ही मुंबईहून येतोय.सुजाताकडे गेलो होतो.तिच्या घराच्या वास्तूशांतीसाठी.बरं चल आता घरी.खुप वर्षांनी भेटतोय.निवांत गप्पा मारु”“नाही आता शक्य नाही.नंतर येईन केव्हातरी”” अरे मग परततांना उतर इथे” काकू म्हणाल्या.हां हे जमण्यासारखं होतं पण माझं थेट पुण्याचं रिझर्वेशन होतं.मी विचार करु लागलो.” अरे ये रे.काढ सवड थोडीशी. आजचं काम उद्या केलं तर कंपनी काही बुडणार नाही तुझी” काका आग्रह करत म्हणाले. तेवढ्यात गाडीने शिटी मारली.” बरं बघतो.तुमचा मोबाईल नंबर द्या.मी कळवतो तुम्हांला” त्यांनी घाईघाईने नंबर दिला.“नक्की ये अवि.तुझ्याशी खुप बोलायचंय.अरे खुप घडामोडी झाल्यात आयुष्यात”” बापरे! काही वाईट तर नाही ना झालं?”तेवढ्यात गाडी सुरु झाली.मी गाडीत चढून दरवाजात उभा राहिलो“नाही रे! तू ये मग बोलू आपण”” बरं चालेल” मी निरोपाचा हात हलवला त्याबरोबर त्यांचेही हात हलले.मी माझ्या सीटवर येऊन बसलो तेव्हा का कुणास ठाऊक माझे डोळे भरुन आले होते.खुप दिवसांनी असा कुणी प्रेमाने पाठीवर हात फिरवला म्हणून असं असेल कदाचित. प्रभुकाका आणि माझे वडील नगरपालिकेत एकाच विभागात कारकून होते.जुन्या चाळीसगांवातल्या एका चाळीत आमची घरंही एकमेकांना लागून असलेली.प्रभुकाका माझ्या वडीलांपेक्षा दहा वर्षांनी लहान असले तरी दोघांचं एकमेकांवर सख्ख्या भावांपेक्षा जास्त प्रेम होतं.आमची घरं वेगळी असली तरी परीवार एकच होता.मोबाईल, कंप्यूटर, इंटरनेट अस्तित्वात नसलेले ते दिवस खुप आनंदाचे होते.तुटपुंज्या पगारात दोन्ही घरं व्यवस्थित चालायची.असा एकही दिवस जात नसेल ज्यादिवशी एकमेकांकडच्या भाज्यांचं आदानप्रदान झालं नसेल.आम्ही मुलं तर कधीही शेजारी जाऊन जेवत असू.ब्लँक अँड व्हाईट टिव्ही आणि फक्त दुरदर्शनचा तो जमाना. त्यामुळे आम्ही मुलं गल्लीतच दंगामस्ती करत असू.गरीबी होती पण खुप आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते ते.मी दहावीत असतांना कसलातरी आजार होऊन माझे वडील वारले.आई अशिक्षित.नगरपालिका तिला सफाई कामगार म्हणून वडिलांच्या जागेवर घ्यायला तयार होती.पण पुण्यातल्या माझ्या मामाला ते काही आवडलं नाही.तो आम्हांला घेऊन पुण्याला गेला.आईला थोडं शिवणकाम येत होतं.त्याच्या जोरावर तिने आम्हांला वाढवलं,शिकवलं,मोठं केलं.चाळीसगांवशी तेव्हापासून जो संबंध तुटला तो जवळजवळ कायमचाच.आज प्रभुकाका भेटले आणि मनातला तो हळवा कोपरा परत एकदा जिवंत झाला.परत येतांना उतरावं का चाळीसगांवला याचा मी विचार करु लागलो.खरं तर नेहमी विमानाने जाणारा मी पण यावेळी दिल्लीहून परततांना तीन चार ठिकाणी काम असल्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं.परतीचं माझं थेट पुण्याचं रिझर्वेशन होतं.पण प्रभुकाका भेटले आणि माझ्या मनाची दोलायमान स्थिती झाली.अखेरीस मी ठरवलं परततांना चाळीसगांवला उतरायचं.माझं बालपण जिथे गेलं तो भाग बघण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात दाटून आली.प्रभुकाकांच्या जीवनात काय घडामोडी घडल्या तेही मला जाणून घ्यायचं होतं. परततांना मी चाळीसगांवला उतरलो.फोन केल्यामुळे मधुकाकांचा मुलगा केतन मला घ्यायला आला होता.त्याच्या बाईकवर बसून आम्ही निघालो.जुन्या घराकडे न वळता त्याने बाईक हिरापूर रोडला वळवली तसं मी विचारलं” अरे इकडे कुठे?आपलं घर तर त्या चाळीत आहे ना?”” नाही दादा.ती चाळ तर कधीच पडली.तिथे आता शाँपिंग काँप्लेक्स उभं राहिलंय.इकडे आपण स्वतःचं घर बांधलंय” त्याच्या आवाजातला अभिमान मला जाणवला.त्याने बाईक थांबवली.समोर एक रो हाऊसिंगमधलं बैठं घर होतं.प्रभुकाका दारातच उभे होते.” ये ये.तू आलास.खुप बरं वाटलं बघ” आनंदाने त्यांनी मला मिठी मारली.”अगदी मधूसारखा दिसतोस रे .त्या दिवशी स्टेशनवर तुला पाहिल्यावर अगदी मधूच असल्याचा भास झाला बघ”” हो ना.मलाही तसंच वाटलं “काकू बाहेर येत म्हणाल्या.आत शिरल्यावर काका म्हणाले” तू फ्रेश हो.चहा घे.मग तुला घर दाखवतो”केतनच्या आवाजात जाणवलेला अभिमान काकांच्याही स्वरात मला जाणवला.फ्रेश होऊन चहा घेतल्यावर काका मला घर दाखवायला निघाले.साधंच घर.एका पाठोपाठ तीन छोट्या खोल्या.मागच्या बेडरुमच्या बाहेर लोखंडी जिना.वरच्या रुमकडे जाणारा.” केतनचं लग्न करायचंय बाबा या वर्षी.त्याच्यासाठी मुद्दाम बांधून घेतली ही रुम.सुनेने म्हणायला नको,आम्हांला प्रायव्हसी नाही म्हणून ” काका जोरात हसले.खाली आल्यावर काकांनी मला विचारलं” काय कसं वाटलं घर?” त्यांच्या या विचारण्यात आयुष्यात आपण काहीतर करुन दाखवलं ही भावना होती.” छान आहे “मी म्हणालो.पण हे म्हणतांना मला माझा चार कोटीचा आलिशान बंगला आठवला.” माझा रिटायरमेंटचा पैसा आला.काही केतनने कर्ज घेतलं.त्यात बांधून टाकलं हे घर.पोराने म्हणायला नको माझ्यासाठी काही केलं नाही म्हणून” काका बोलत होते.मुलाबद्दल, मुलगी सुजाताबद्दल,जावयाबद्दल,नातीबद्दल,जावयाने घेतलेल्या नवीन फ्लँटबद्दल भरभरून सांगत होते.त्यात प्रेम होतं,अभिमान होता,आपलेपणा होता.’ माझ्यासारखा सुखी मीच ‘ ही भावनाही होती.ते ऐकतांना माझ्या डोळ्यासमोर माझी पाचशे कोटीचा टर्नओव्हर असलेली कंपनी उभी राहिली.माझ्या त्या आलिशान गाड्या,ते परदेश दौरे,उच्चभ्रू लोकांमधलं बसणं उठणं आठवलं.एवढं सगळं असूनही मी सुखी होतो?काकांसारखा समाधानी होतो?” घे. पोहे घे” काकूंच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली.मी पोह्याची डिश हातात घेतली.पोह्यांकडे पाहूनच माझी भुक चाळवली.चमच्याने मी घास घेतला.व्वा काय अप्रतिम चव होती !अगदी माझ्या आईच्या हातच्या पोह्यांची.” व्वा खुप छान झालेत पोहे ” मी म्हणालो तशा काकू हसल्या.” ही तुझ्या आईची क्रुपा.मी लग्न होऊन आले तेव्हा मला साधे पोहेसुध्दा करता येत नव्हते.त्यांनीच मला शिकवले.नंतर स्वयंपाकही त्यांनीच शिकवला”मला माझ्या आईचा अभिमान वाटला.खरंच ती अन्नपूर्णा होती.दुर्दैवाने माझ्या लग्नाअगोदरच ती गेली.नाहीतर माझ्या बायकोला- अश्वीनीलाही तिने असाच स्वयंपाक करायला शिकवलं असतं.स्वयंपाकावरुन मला आठवलं.गेल्या कित्येक वर्षात अश्विनीने स्वयंपाक केला नव्हता.यात तीचा दोष नव्हता.कंपनीची जबाबदारी तिने माझ्याइतकीच उचलली होती.किंबहुना ती नसती तर आमच्या कंपनीने थोड्या कालावधीत इतकी प्रगती केलीच नसती.पण एखाद्या निवांत सकाळी बायकोच्या हातचे पोहे खाण्याच्या सुखाला मी नक्कीच पारखा झालो होतो.काका काहितरी बोलणार होते असं मला वाटलं.प्रश्नांचा ओघ आता माझ्याकडे वळणार होता.त्याआधीच मी त्यांना विचारलं.“काका त्यादिवशी तुम्ही म्हणत होतात की तुमच्या आयुष्यात खुप काही घडामोडी घडल्या म्हणून.म्हणजे नेमकं काय घडलं?”” घडामोडी म्हणजे हेच रे!सुजाताचं लग्न झालं.मग केतनला एम.एस.ई.बी.त नोकरी लागली.त्यानंतर मी रिटायर झालो.इथे प्लाँट घेऊन ठेवला होता.घर बांधायचं होतं.योगायोगाने केतनला सरकारी नोकरी लागल्यामुळे कर्ज पटकन मिळालं.घर बांधून झालं.मग केतनने मला स्कुटी घेऊन दिली.आख्खं आयुष्य आपलं सायकल चालवण्यात गेलं.आता उतार वयात का होईना पोराने सुख दिलं.मग केतनने स्वतःसाठीही बाईक घेतली.सुजाताला मुलगी झाली.तिच्या नवऱ्याने आता कल्याणला फ्लँट घेतलाय.खुप समाधान वाटतंय रे.आयुष्य सार्थकी लागलं बघ”खरं होतं.एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात अजून कोणत्या वेगळ्या घडामोडी घडणार होत्या?काका आनंदी,समाधानी होते हे काय कमी होतं?” अरे अवि केव्हापासून मीच बोलतोय.तुही काहीतरी सांग.सध्या काय करतोस पुण्यात?”क्षणभर मी विचारात पडलो.मी जर काकांना सांगितलं असतं की मी…
माणसं
मिटिंग संपली तसा विकास आँफिसच्या बाहेर आला.पण आल्याआल्या बाहेरच्या दमट उकाड्याने तो घामाघूम झाला. थोड्याच वेळात आपण घामाने ओलेचिंब होणार हे त्याच्या लक्षात आलं. आणि झालंही तसंच.मुलूंडला जाणाऱ्या लोकलचं तिकीट काढायला तो सिएसएमटी स्टेशनवर जाईपर्यंत त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मे महिन्यात मुंबईला यायला त्याला याच कारणाने अजिबात आवडायचं नाही. त्या घामाने त्याचा जीव घाबराघुबरा व्हायचा. कधी एकदा अंघोळ करतो असं होऊन जायचं. पण एकदा अंघोळ केल्यावरही अर्ध्याएक तासात तो परत घामाने ओला होऊन जायचा. तिकिट काढून तो प्लँटफाँर्मवर आला आणि तिथली अफाट गर्दी पाहून हबकलाच. अर्थात ही गोष्ट त्याला नवीन नव्हती. वीस वर्षांपूर्वी तो मुंबईलाच नोकरी करत होता तेव्हाही गर्दी अशीच जीवघेणी असायची आणि लोकलला लोंबकळून त्यानेही अनेकदा प्रवासही केला होता. पण त्यावेळी तो तरुण होता.गैरसोयी सहन करण्याची त्याच्यात क्षमता होती. आता त्याने चाळीशी पार केली होती आणि त्याचं आयुष्य सुखासीन झालं होतं. माणसांची ही अफाट गर्दी त्याला नकोशी वाटू लागली होती. “माणसं कसली, हे तर वळवळणारे किडे. कसलीही स्वतंत्र ओळख नसणारे. या अफाट गर्दीत चेंगरुन, घुसमटून, कधीकधी खाली पडून मरणारे” स्वतःच दिलेल्या या उपमेने त्याचं मन अस्वस्थ झालं. त्या गर्दीत शिरायला त्याचं मन धजवेना.पण जाणं तर भाग होतं. आजुबाजूच्या लोकांच्या अंगाला घासत तो प्लँटफाँर्मवर गेला. लोकल आली आणि ती थांबण्या अगोदरच प्लँटफाँर्मवर असणारे जीवाच्या आकांताने उभ्याने का होईना जागा मिळवण्यासाठी दणादण आतमध्ये उड्या मारु लागले. काही सेकंदातच लोकल गच्च भरली. विकास हतबुद्ध होऊन तो प्रकार पहात राहिला. आतमध्ये शिरायची त्याची हिंमत झाली नाही. ती लोकल गेली दुसरी आली. ती गेली तिसरी आली पण तो प्लँटफाँर्मवरच होता. आता मात्र आपण आत घुसायलाच पाहिजे या इराद्याने विकास धावपळ करत लोकलच्याआत शिरला खरा पण मागून आलेल्या रेट्याने तो आतमध्ये ढकलल्या गेला. आतमध्ये त्याचा जीव गुदमरु लागला. किंचीतही हलायला आणि मोकळा श्वास घ्यायला जागा नव्हती. असह्य झालं तसा तो आजुबाजूच्या लोकांना ढकलत, त्यांच्या शिव्या खात प्लँटफाँर्मवर उतरला. त्याचक्षणी लोकल हलली. “बस, पूरे झाली ही नाटकं. आता आपण टँक्सीने जाऊ. जातील चारपाचशे रुपये पण आरामात जाता येईल” त्याने निर्णय घेतला आणि स्टेशनच्या बाहेर येऊन टँक्सीला हात दिला. मागच्या सीटवर बसून त्याने खिडकीच्या काचा खाली केल्या. हवेचा एक झोत अंगावर घेतांना त्याला खुप बरं वाटलं. मुलुंडला तो त्याचा चुलतभाऊ श्रीकांतच्या अपार्टमेंटला पोहचला तेव्हा सहा वाजून गेले होते. १२ व्या मजल्यावर जाऊन त्याने श्रीकांतच्या फ्लँटची बेल वाजवली. श्रीकांतच्या मुलाने दार उघडलं. विकासला पाहून त्याला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं.” काय रे आहेत का पप्पा मम्मी घरात?”” हो आहेत “विकासला ” या, बसा” न म्हणता तो आतमध्ये निघून गेला. विकास स्वतःच आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. दोनच सेकंदात श्रीकांतदादा बाहेर आला.“अरे विकास, आज अचानक कसा काय?”” अचानक?अरे दोन दिवसांपूर्वीच तर मी तुला येण्याबद्दल फोन केला होता “” अरे कामाच्या गडबडीत कुणाच्या लक्षात रहातंय ते! तू आज सकाळी तरी फोन करायचा होतास “विकासला आपली चुक लक्षात आली. आपण श्रीकांतदादाला ग्रुहीत धरायला नको होतं हे त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात मेघावहिनी बाहेर आली. तिच्या साडीवरुन कळत होतं की ती बाहेर जायला निघालीये.” विकासभाऊजी असं अगोदर न कळवता अचानक कसं येणं केलंत? “नाराजीच्या सुरात तिनं विचारलं.विकासने श्रीकांतकडे पाहिलं.त्याच्या नजरेतले भाव ओळखून श्रीकांत घाईघाईने म्हणाला.“अगं त्याने परवा सांगितलं होतं पण मी ते तुला सांगायला विसरलो “मेघावहिनी त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकून आतमध्ये निघून गेली. काहितरी गडबड आहे. आपण आलेलं कुणालाच आवडलेलं दिसत नाहिये हे विकासच्या लक्षात आलं आणि तो अस्वस्थ झाला. मग त्याने बँगेतून फरसाणचं पाकीट आणि कैऱ्यांची पिशवी काढली. श्रीकांतच्या हातात देत तो म्हणाला“आपल्या शेतातल्या आहेत. आईने आठवणीने दिल्या आहेत लोणच्यासाठी “” सध्या इकडेही चांगल्या कैऱ्या मिळतात. पण आम्ही त्या आणत नाही. लोणचं टाकायला वेळच कुठे असतो आम्हांला! सरळ विकतचं लोणचं आणून खातो आम्ही “विकासचा चेहरा पडला. तरी तो आईला कैऱ्या आणायचं नाही म्हणत होता. एकतर बँगेचं वजन खुप वाढलं होतं. दुसरं,या लोकांना त्याची किंमत नव्हती. बाजारात तर सगळंच विकत मिळतं पण प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूमागे काहीतरी आपुलकीच्या भावना असतात हे या लोकांना कळत कसं नाही? “काय घेतोस? चहा, काँफी, सरबत? “श्रीकांतदादाने विचारलंखरं तर विकासला अंघोळ करायची होती. घामाने त्याच्या सर्वांगाला खाज सुटली होती. अंघोळ करुन जेवण झाल्यावर मस्त एसी रुममध्ये ढाराढूर झोपायचं असा त्याचा बेत होता. पण ते आता काही शक्य दिसत नाही हे त्याच्या लक्षात आलं.“पाणी दे अगोदर, खुप तहान लागलीये. आणि सरबत चालेल”“ओके.अरे जय एक ग्लास पाणी आणि सरबत घेऊन ये रे”पाणी आणि सरबत पिऊन झालं. श्रीकांतदादा चुप बसला होता. बराच वेळ झाला तो बोलला नाही तेव्हा तो अस्वस्थ आहे हे विकासच्या लक्षात आलं. “श्रीकांतदादा काही प्राँब्लेम आहे का? नाही म्हणजे वहिनी नाराज दिसतात म्हणून विचारलं”” काही नाही रे!बऱ्याच वर्षांनी आमचं आज मुव्हीला जायचं ठरलं होतं. आमचं म्हणजे मेघाच्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या फँमिलीज असे १४-१५ जण मुव्हीला जाणार होतो. मुव्ही संपल्यावर तिकडच्या तिकडे हाँटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं होतं.आज सकाळीच तो प्रोग्राम ठरला. म्हणून तुला म्हंटलं की सकाळी तू मला तुझ्या येण्याबद्दल रिमाईंड केलं असतं तर हा प्रोग्राम ठरवला नसता “ अच्छा ! असं आहे का? तरीच मेघावहिनी का चीडचीड करतेय आणि श्रीकांतदादा का अस्वस्थ झालाय ते विकासच्या लक्षात आलं. तो घाईघाईने म्हणाला “अरे मग जा ना!मी वैशालीकडे जातो ठाण्याला.तिलाही मी येण्याचं सांगून ठेवलंय “श्रीकांतदादाचा चेहरा खुलला. मेघावहिनी आणि तिची मुलगी लगेच बाहेर आल्या.दोघींच्याही चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता.” अरे पण तू आता तीन वर्षांनी घरी येतोय आणि आम्ही बाहेर जायचं ते बरं वाटेल का आम्हांला? “श्रीकांतदादा औपचारिकता दाखवत म्हणाला.” काही प्राँब्लेम नाही दादा.मी पुढच्या महिन्यात येणारच आहे तेव्हा येईन तुमच्याकडे ““बरं मग नक्की या हं भाऊजी.आणि फोन करुन या म्हणजे मग अशी गडबड होणार नाही” मेघावहिनी म्हणाली. विकास उठला तसे सगळेच उठून त्याच्यामागे बाहेर आले. “अरे पण वैशालीला तू येतोय असं आज कळवलंय की नाही? नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती व्हायची”विकास चमकला. त्याने पटकन मोबाईल काढून वैशालीला फोन लावला. पण तिने तो उचलला नाही. त्याने परत लावला पण परत तेच घडलं.“ती फोन उचलत नाहिये. जसं तुला सांगितलं तसंच तिलाही मी कळवलंय पण मी उद्याचं कळवलंय “” काही हरकत नाही. तिचे सासूसासरे आजारी असतात त्यामुळे ती कुठेच बाहेर जात नाही. आणि ती माझेही फोन उचलत नाही.आणि दोनतीन दिवसांनी विचारते फोन का केला होता म्हणून. तू बिनधास्त जा तिच्याकडे. ती घरीच असेल “श्रीकांतदादा हसत म्हणाला.” बरं बरं मी निघतो “” हो चल.आम्हीही निघतोय “ बेसमेंटमधली कार आणायला श्रीकांत गेला. विकास रिक्षा पकडण्यासाठी निघाला. त्याच्यामागून श्रीकांतची कार येऊन पुढे निघून गेली. साधं रिक्षापर्यंत सोडण्याचं सौजन्यही श्रीकांतदादाने दाखवलं नाही याचा विकासला खुप संताप आला. खरं तर “तुही आमच्यासोबत मुव्हीला आणि पार्टीला चल” असं श्रीकांतदादा म्हणू शकला असता. किंवा ” तू घरीच थांब. मी बाहेरुन तुझ्यासाठी खायला मागवून देतो. जेवण करुन मस्त झोपून रहा “अशी…
कुंडलीयोग
“श्रीगणेश ज्योतिष कार्यालय ” ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये १०-१२ जण बसले होते.त्यातल्या एकाला मी “गुरुजी आहेत का?” असं विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवली. आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता. एकदिड वर्षांपूर्वी मी जर एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे असं मानणारा.आकाशातील कोट्यावधी मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा. पण गेल्या दिड वर्षांपूर्वी बी.ई.पास झाल्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. काँल येत नव्हते असं नाही पण इंटरव्ह्यू चांगला होऊनही माझी निवड होत नव्हती.”तुझं नशीब मार खातंय”असं आईवडील म्हणत होते. मला ते पटत नव्हतं. “आपलं भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं” असं माझं मत होतं. पण इतर माझ्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेले मित्र भराभर नोकरीला लागत असतांना मी मात्र बेरोजगारीचे चटके सहन करत होतो. गेल्या सहा महिन्यापासून तर मी चक्क डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. ते पाहून आईवडिलांनी मला आज जबरदस्ती इथे पाठवलं होतं. मी समोरच्या लोकांकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्याची काळजी दिसत होती. प्रयत्न करुनही यशस्वी न झालेली, दुःखात, संकटात पोळलेली माणसं शेवटी ज्योतिषाचा आणि देवाचा आधार घेतात असं मी ऐकलं होतं. ते आज मी स्वतःच अनुभवत होतो. एक तासाने माझा नंबर लागला. मी गुरुजींसमोर जाऊन बसलो. गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने हसले.” बोला काय म्हणताय?” त्यांनी विचारलं. मी माझी पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली.“गुरुजी बी.ई.चांगल्या मार्कांनी पास होऊन दिड वर्ष उलटलंय. साधी पाचदहा हजाराचीही नोकरी लागली नाही. सध्या खुप निराशा वाटतेय. कशात मन लागत नाही. आत्महत्येचे विचार मनात येतात”” साहजिकच आहे. बेरोजगारांची मानसिक अवस्था अतिशय वाईट असते. मी त्या अवस्थेतून गेलोय “” गुरुजी बघा बरं माझ्या नोकरीचा योग कधी आहे ते! आणि नोकरी कुठं मिळेल तेही सांगा”गुरुजींनी पत्रिकेवर नजर टाकली. खालची मान वर न करता म्हणाले“तुम्ही हुशार आहात. मेहनती आहात. पण पत्रिकेतल्या नोकरी, व्यवसायाच्या स्थानात अशुभ ग्रहांची युती आहे त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येताहेत” मग त्यांनी पंचांग उघडलं. मनाशी काही आकडेमोड केली. मग माझ्याकडे पहात म्हंणाले” पण वर्षापूर्वी नोकरीचा बऱ्यापैकी योग होता तेव्हा काही झालं नव्हतं का?”ते म्हणत होते ते खरंच होतं.” हो. एका काँलेजमध्ये नोकरीची आँफर होती पण पगार कमी होता आणि तोही चारचार महिने मिळत नाही असं ऐकण्यात होतं. शिवाय ते परमनंट करत नाहीत असं माहित झाल्यामुळे मी गेलो नाही” ” अच्छा.सगळ्या शिक्षणक्षेत्रात आजकाल अशीच पिळवणूक सुरु आहे. ठिक आहे आता एकवीस आँगस्ट नंतर चांगले योग आहेत. आँगस्ट महिन्यात राहूची महादशा संपून गुरुची महादशा सुरु होतेय. शिवाय गोचरीचे ग्रहही शुभस्थानात येताहेत. नोकरी शंभर टक्के मिळणार. मात्र ती दक्षिण दिशेला मिळेल. पण तुम्ही फार काळ नोकरी नाही करणार. स्वतःचा व्यवसाय सुरु कराल.त्यातही तुम्ही चांगली प्रगती कराल “ “बापरे! म्हणजे अजून सहा महिने वाट पहायची?”मी थोडं नाराजीने आणि अविश्वासाने म्हंटलं. एकतर सहा महिने असे घरी बसून काढायचे माझ्या जीवावर आलं होतं आणि माझ्या हातात मुंबईच्या तीन चार कंपन्यांचे काँल्स होते. त्यातल्या एकात तरी माझी निवड होईल असं मला वाटत होतं. अर्थात आजपर्यंतच्या अनुभवावरुन त्याचीही खात्री वाटत नव्हती. शिवाय आईवडिलांना सोडून दक्षिण भारतात जायची माझी अजिबात इच्छा नव्हती. गुरुजींनी खांदे उडवले. म्हंणाले “ग्रह तरी तेच सांगताहेत”“नोकरी लवकर लागावी यासाठी काही उपाय नाही का?”“करुनही फायदा नाही. उपायाच्या नावावर लोकांकडून पैसे उकळण्यातला मी नाही. तसंही विधीलिखित टळत नाही. दिड वर्ष वाट पाहिलीत. सहा महिने अजून पहा” मी निरुत्तर झालो.“गुरुजी तुमची दक्षिणा किती द्यायची?” गुरुजी हसले “मी बेरोजगारांकडून दक्षिणा घेत नाही. हे माझं एक समाजकार्य आहे असं समजा. नोकरी लागली, भविष्य खरं ठरलं की तुमची जेवढी इच्छा होईल तितकी दक्षिणा द्या. ओके?” मला आनंद झाला. मी त्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो. उत्सुकतेपोटी मी गुरुजींची माहिती काढली. गुरुजींचं खरं नाव होतं चंद्रकांत पण त्यांना सगळे चंदू गुरुजीच म्हणायचे. गोरा रंग, देखणा चेहरा, सहा फुट उंची, कपाळावर गंध, मजबूत शरीरयष्टी. गुरुजी मेकँनिकल इंजीनियर आहेत असं चुकूनही वाटायचं नाही. वय असावं पस्तीस छत्तीस. ‘माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाही’ असं ते सर्वांना सांगायचे. पण त्यांच्या आईने त्यांना जळगांवबाहेर नोकरीला जाऊ दिलं नाही हे खरं सत्य आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं. एकुलता एक मुलगा, लग्नानंतर सात वर्षांनी नवसाने झालेला. त्यामुळे त्याला दूर पाठवायला ती माऊली तयार नव्हती. गुरुजींचे वडील ते दहावीत असतांनाच गेलेले. त्यामुळे जे काही करायचं ते जळगांवातच कर असं तिचं म्हणणं होतं. जळगांवात इंडस्ट्रीज नव्हत्या. गुरुजींना सुरुवातीला मुंबई पुण्याला बऱ्याच नोकऱ्या मिळण्याची संधी चालून आली होती पण आईमुळे ते जाऊ शकले नाही. स्वतःच्या भविष्याचा अभ्यास करता करता भविष्य सांगणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. मनमानी दक्षिणा त्यांनी कधीही मागितली नाही तरीही त्यांना चांगली कमाई व्हायची. चांगला अनुभव आलेले लोक त्यांना बराच दानधर्म करायचे. गुरुजींचं लग्न झालं नव्हतं. ‘माझ्या कुंडलीत विवाहयोग नाही’ असंही ते म्हणायचे. त्याच्या लग्नाचे अनेक प्रयत्न झाले. पण केवळ लोकांचं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणाऱ्याला आपली मुलगी द्यायला कोणीही तयार झालं नाही ही खरी वस्तुस्थिती होती. किंवा मला तशी ती वाटत होती. त्या सहा महिन्यात मी बऱ्याच ठिकाणी मुलाखतींना गेलो. गुरुजींचं भविष्य खोटं ठरवण्याच्या हेतूने मी इंटरव्ह्यूला जातांना चांगली तयारी करुन जायचो. पण मुलाखती चांगल्या होऊन देखील माझी कुठेच निवड झाली नाही. १६ आँगस्टला मला बंगलोरच्या एका कंपनीचा मेसेज आला. २२ आँगस्टला मुलाखतीला बोलावलं होतं. इच्छा नसतांनाही मी गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिलेक्टही झालो. सुरुवातीलाच सहा लाखांचं पँकेज मिळालं. मला खुप आनंद झाला. चंदू गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. दोन महिन्यांनी मी जळगांवला आलो. गुरुजींना मी हजार रुपये दक्षिणा आणि पेढे तर दिलेच पण एका हाँटेलमध्ये पार्टीही दिली. त्यानंतर मी अनेक गोष्टीत गुरुजींचा सल्ला घ्यायला लागलो. ज्योतिषाला थोतांड समजणारा मी गुरुजींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करेनासा झालो. त्याचे फायदेही होऊ लागले. त्यांच्या सल्ल्यावरुन मी माझ्या बहिणीचं लग्नं एका हाँटेल व्यावसायिकाशी लावून दिलं. वर्षभरातच त्यांची भरभराट झाली. दुसरं शानदार हाँटेल सुरु झालं. आता घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली. एका मुलीचं स्थळ सांगून आलं. मुलगी सुंदर होती. उच्चशिक्षित होती. माझ्यासह सर्वांनाच आवडली. मी तिची कुंडली चंदू गुरुजींना जाऊन दाखवली. ‘मुलीचं बाहेर अफेअर आहे. शक्यतो लग्न करु नका’ गुरुजींनी सल्ला दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मुलीला नकार दिला. आश्चर्य म्हणजे एक महिन्यातच ती मुलगी एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी आली. मी गुरुजींना लक्ष लक्ष धन्यवाद दिले. नंतर मी गुरुजींच्या सल्ल्यानेच लग्न केलं. माझा संसार सुखात सुरु झाला. लग्नानंतर तीन वर्षांनी मला पुण्यात स्वतःची फँक्टरी सुरु करायची संधी मिळाली. बंगलोरची नोकरी सोडून मी पुण्यात स्थायीक झालो. गुरुजींचं हेही भविष्य खरं ठरलं. दोनच वर्षात माझी खुप भरभराट झाली. बंगला झाला. दोनतीन चारचाकीही झाल्या. परदेशी…