रंग पांढरा पावित्र्याचा,लेऊन आली जगी शारदा!नवरात्रीच्या रंगांमध्ये,रंगून जाती साऱ्या प्रमदा! जास्वंदीसह लाल रंगी,दुसऱ्या दिवशी देवी सजली!रक्तवर्णी हा सडा शिंपीत, मांगल्याची उधळण झाली! आकाशासम निळे वस्त्र ते,लेऊन आली तिसऱ्या दिवशी!व्यापून टाकी अंबर सारे,रूप देवीचे विशालाक्षी ! शेवंतीचा रंगही पिवळा,मोहक अन् उत्साही !चौथ्या दिवशी देवी येई,करुनी शृंगार तो शाही! चैतन्याचा रंग हिरवा,सृष्टीचा शालूच असे !नवरात्रीचा दिवस पाचवा,,सस्य शामल मूर्ती दिसे! राखाडी, करड्या, रंगाचे,वस्त्र तिचे गांभीर्य दाखवी!रूप देवीचे शांतगंभीर,सहाव्या दिवशी मन रमवी! वैराग्याचा रंग केशरी,खुलून दिसे देवीला!नवरात्रीचे रूप देखणे,उजळे सातव्या माळेला! प्रेमळ सात्विक रंग गुलाबी,वस्त्र शोभे लक्ष्मीला!अष्टमीच्या देवीचा हा,मंदिरी रात्री खेळ रंगला! उत्साहाचे प्रतिक जणू असे,रंग गडद जांभळा !अंबेच्या नवरात्री रंगी ,आनंद मिळे आम्हा आगळा ! नऊ दिवसाचे नवरात्र संपले,दहन करू दुष्ट रावणाचे !सीम्मोलंघन करुनी लुटुया,सोने आपट्याच्या पानाचे! दसरा येई वाजत गाजत,आनंदाचे घेऊन वारे !दीपावलीच्या स्वागतासही,सज्ज होई घरदार हे सारे!
Category: Long Poems
आली गौराई अंगणी….
‘रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ गाणं गुणगुणतच आपण मोठं झालो हे आता आठवते.गौराई येते ती अशीच आनंदात, उत्साहात! त्या माहेरवाशिणीचं किती कौतुक करू असं वाटतं! लहानपणी निसर्गाच्या सान्निध्यात फुले, पत्री गोळा करताना खूप आनंद उत्साह असे.माझ्या माहेरी गौर बसवायची पद्धत नव्हती, तरी मी माझ्या मैत्रीण सह त्यांच्या आनंदात सहभागी होत असे. सासरच्या घरी आल्यावर मात्र गौरी गणपतीचा आनंद खूप मिळाला सांगली ला कृष्णा नदीच्या जवळच आमचे घर असल्याने गौर आणायला मी सासुबाईं बरोबर नदीवर गेले होते. त्यांनी मला गौरी ची सगळी तयारी करायला शिकवले. आम्ही वाड्यातील शेजारणीं बरोबर नटून थटून नदीवर जाऊन गौरी घेऊन आलो. छोटासा गडू, त्यावर ठेवायला ताटली, गौरीची पानं, (तेरड्याची पाने) हळद कुंकू, फुलं सर्व घेऊन पाणवठ्यावर गेलो. तिथे गडूत थोडसं पाणी, त्यावरच्या ताटलीत पाच खडे ठेवून त्याची पूजा केली. हळद कुंकू,वस्त्र, फुल वाहिले. तिथून येताना तोंडात जवळ घेऊन तसंच यायचं, मागं वळून पहायचं नाही, असे काही काही रितीभाती चे नियम मला शिकायला मिळाले. घरी आलं की दारातच ती पाण्याची चूळ बाहेर टाकायची. आणि त्या गौरीला ओवाळून पायावर दूध-पाणी घालून घरात घेतलं जाई. घरात आलं की प्रत्येक खोलीत गौरीसह जायचं. तिथे जाऊन ‘इथे काय आहे? या प्रश्नाला’ उदंड आहे!’ असं उत्तर द्यायचं! अशी ही सोन्याच्या पावली येणारी गौर गणपतीच्या जवळ आणून बसवायची!ते झाल्यानंतर गौरी आणणारीचीओटी भरायची हे सर्व छान साजरे केले जायचे. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवत मिरवत नवीन सुनेकडून गौर आणण्याचा आनंद काही वेगळाच असे.गौरी आणल्या की रात्री गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी गौरी जेवणाची तयारी आधीच केली जाई. गौरी जेवणाच्या दिवशी बायकांची धावपळ असे. एकमेकीकडे पाठशिवणी दिल्यासारख्या सवाष्ण म्हणून बायका जात असत. ते सर्व एकमेकीच्या सोईने केले जाई. एकदाचे गौरी जेवण झाले की संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची. संध्याकाळी आसपासच्या घरातून हळदी कुंकू घेऊन यायचे आणि आपल्या घरी बायका ना हळदीकुंकवासाठी बोलवायचे.अशी धावपळ असायची, पण त्यातही खूप मोठा आनंद मिळत असे. कदाचित संस्काराचा परिणाम असेल पण हे सर्व आवडत होते. काळाबरोबर आता थोडे बदल करायलाच हवेत. आपल्या पुढच्या पिढीला नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून सर्व करणे अवघड जाते तरीही त्या हौसेने जमेल तितके करतात याचे कौतुक वाटते.एकदा का गौरी जेवणाचा दिवस झाला की, गौरी-गणपती जाणार म्हणून मनाला हुरहुर लागत असे. गौरी गणपतीचे पाच-सहा दिवस इतके धामधुमीत उत्साहात जात की खरोखरच घरी पाहुणे आल्यासारखे वाटे. त्या पाहुण्यांना निरोप देताना मनापासून वाईट वाटे. नेहमीप्रमाणे गौरी, गणपती घेऊन विसर्जनाला गेले की मन भरून येते! निरोप देताना दही भात, तळलेले मोदक, करंजी यांची शिदोरी गणपती, गौरीसाठी दिली जाई. तिथून येताना पाण्या जवळची थोडीशी माती, खडे बरोबर घेऊन यायचे आणि ते गौरी गणपतीच्या रिकाम्या जागी ठेवायचे! एकदम रिकामी जागा नको म्हणून तिथे एखादे देवाचे पुस्तक ठेवायची आमच्याकडे प्रथा होती. गणपतीचा हा सगळा सोहळा आनंददायी केला जाई. कितीही संकटे आली तरी आपण ती बाजूला सारून या उत्सवाला आनंदाने सामोरे जातो. शेवटी ते संकट दूर करणारा विघ्नहर्ता गजाननच आहे याची आपल्याला खात्री असते. आता ही आलेली वादळे, कोरोना आणि इतर संकटे दूर करून गणपतीने आपल्याला चांगले दिवस दाखवले.दोन वर्षाची कसरआपण भरून काढत आहोत.सगळीकडे गौरी आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. असाच आनंद कायम राहू दे एवढीच गौरी गणपती कडे मनापासून मागणी आहे!
आली गं गौराई..
आली ग गौराई,नटून सजून !पायात पैंजण,सोन्याचे घालून! गौरीचे पाऊल,येई उंबऱ्यात !औक्षण केले हो,घंटेच्या गजरात ! गौरीची पाऊले,सोन्याची सोन्याची!अक्षय समृद्धी,धनाची, धान्याची ! इथे काय आहे?उदंड उदंड !वावर तिचा हो,अखंड अखंड ! समृद्धी घेऊनी,सौभाग्य लेऊनी!नांदाया घरात !आली सुवासिनी! गणेश गौरीची,सजावट केली !बहिण न् भाऊ,सौख्यांत भेटली !
गणेश उत्सव
बाप्पा तुझे येणे, बाप्पा तुझे जाणे? आणि आमचे उगा मिरवणे…. आम्ही बाप्पा आणला….आम्ही बाप्पा बसवला….आम्ही नैवेद्य दाखवला….आम्ही बाप्पा विसर्जित केला… अनादी, अनंत तो एक!त्याला काय कोण बनवेल अन् बुडवेल? अनंत पिढ्या आल्या…अनंत पिढ्या गेल्या….बाप्पा तरीही उरला… काळ कधी का थांबेल?…बाप्पा पण कधी न संपेल… आपल्या आधी तोच एक….आपल्या नंतरही तोच एक….त्यास काय कोणाची गरज?…. मग काय हा उत्सव दहाचं दिसांचा?…का न करावा तो रोजचा?…. आपुले येणे, आपुले जाणे,त्यामधले क्षणभंगुर हे जगणे…. जगण्याचाच या उत्सव करावा….अन् रोजचं बाप्पा मनी बसवावा…. सजावट करावी विचारांची…रोषणाई मनातल्या प्रेमाची…नैवेद्य दाखवावा सत्याचा…. फुले दया, क्षमा, शांतीची….अन् आरती सुंदर शब्दांची…. रोजचं क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा…असा बाप्पा रोजचं का न पुजावा?…. रोज नव्याने मनी बाप्पा असा जागवावा….अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा…. सर्वांना गणेशोत्सवाच्या आरोग्यमय शुभेच्छा
गणेश आगमन
झिरझिरणारा पाऊस पडदा,घेऊनी आला आकाशाखाली !सोबत होती मेघगर्जना ,ढोल ताशांचे संगित भारी ! मधून दिसे ती दिव्य शलाका,दामिनी चमके अभ्रातुनही !साज रंगला सभोवताली,गणमूर्तीच्या स्वागतासही! धरती भिजली, आनंदी झाली,सडा शिंपला मेघांनी !संतोष तिचा पाहून सृष्टी ,घाली रांगोळी नवरंगांनी ! लाल, पिवळी, निळी, पांढरी,फुले ही सामिल रंगीत !बाप्पाच्या स्वागता जमले सारे,पाहून होई मीच अचंबित ! डौलातच हा येई भुवरी,बसूनी छोट्या मूषकावरी!सर्वांना आवडतो हा बाप्पा,बघून त्याची ऐट खरी !
अभंग रचना
गौरीच्या नंदना l तू गजवदना lसुखवी सर्वांना l दर्शनाने ll….१पोटाचे हे दोंद l तिथे रुळे सोंड lनाव वक्रतुंड l गजानना ll….२मोदक प्रीय तूl लाडू आवडतो lमोद तो मिळतो lआस्वादाने ll…३वाहन तुझे ते lसान मूषकाचे lशोभिवंत साचे l दिसे जनी ll…४सुंदर गुणांचा l बुद्धीचा तू दाता lप्रीयच जगता l तुझी मूर्ती ll….५येतोस या जगी l देतोस आनंद lआनंदाचा कंद l गणराय ll…६गजानना तुझे l रुप मनोहर lतू तारणहार l भक्तप्रिय ll…७आगमन तुझे l मोद देई सर्वा lआनंदाचा ठेवा l जनांसाठी ll..८
तो येतोय
या वर्षी ही तो येतोयसर्व संकटातूनबाहेर काढायलाविघ्नहर्ता येतोय शिवपार्वतीचा हा पुत्रदुर्मुखलेल्यांना उल्हसवायला येतोयभोळाभाबडा रिध्दीसिध्दीचा दाताहिरमुसल्यांना खुलवायला येतोयदोन वर्षांची मरगळ घालवूनउत्साह भरायला येतोय ओसाड रस्त्यांवर परतथोडी जाग आणायला,उदास मनालाआश्वासायला तो येतोय.. मोदक, निवगिऱ्या , आणिनाना खाद्यपदार्थ घेऊनभूक भागवायला तो येतोयगर्वाचं हरण करायलासेवेचं व्रत शिकवायलादुःखहर्ता तो येतोय भक्तीची सवय जोडायलाशक्तीची आठवण करून द्यायलातो आज पुन्हा येतोय अजूनही त्याला नकोय कसलीच गडबडनकोय त्याला अजूनही,अजिबात गोंधळपावित्र्य राखून पूजा करा असं तो बजावतोयगर्दी जास्त करु नका , प्रेमानं दटावतोयस्वतःवर विश्वास ठेवा. संदेश तो देतोयकाळजी करु नका…घ्या असंही सांगतोय दिवस सुगीचे येत रहातीलनवीन काहीतरी चांगलंच होईलही आशा मनात ठेवायचीसुखकर्त्याची त्या रोज आरती करायची त्याला नको सजावटनको देखावा त्यालासर्वांगी सुंदर देव माझाफक्त भक्तीभावाचा भुकेला दहा दिवसांनी त्याची मूर्ती विसर्जित होईलपण मनात मात्र तो कायमच राहीलमनात मात्र तो कायमच राहील
कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन..
आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती. कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते. कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत. कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको, असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला. या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते! त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते. तरी ती गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो,’ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात,’ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते. तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते. नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते.लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो. जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते,तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते.ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो.पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणिवातावरणात प्रसन्नता आणतात. गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो. कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार! आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार! संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या, *गणपती बाप्पा मोरया!
काव्यवेणा
कविता म्हणजे कायनुसता शब्दांचा खेळ?की मग कागदासवेहोई भावनांचा मेळ.. सगळेच अनुभवप्रत्यक्षात नसताततरीही मग माणसेत्यात कशी फसतात? कधी स्पष्ट शब्दांतूनअबोल नजरेतूनअस्फुटशा स्पर्शातूनअन् कुंद श्वासातून व्यक्त होतच असतीआपल्याजोग्या परीनेअसाच मार्ग शोधलाकुठल्याशा त्या कवीने मग मळवली वाटअन् झाली शब्द-मैत्रीनवनव्या काव्यांतूनमांडली भावना जंत्री कधी झरझर फुटेकवितेचा गोड पान्हाकधी मात्र शब्दझराकुंठे अवचित तान्हा आराधना नित-नवीअर्थवाही भावनांचीमग जोड त्यास द्यावीयथोचितशा भाषेची समर्पक खास शब्दयोजणे मांडण्यासाठीभाव मुके मनातलेनेमके सांधण्यासाठी किती नि कसे सांगावेकाव्यवेणा कशी दाटेकाव्यरूपी खूण माझीउरावीशी आता वाटे
राधा कृष्ण
कृष्ण सावळी,राधा बावरी !खेळत होती,यमुना तीरी ! मुग्ध होऊनी,मनी तोषूनी!राधा गुंगुनी ,गेली मन्मनी! राधा कृष्णाची,रास रंगली!गोकुळात ती,टिपरी घुमली ! सारे गोकुळ,गाऊ लागले!नाचू लागले,तद्रुप झाले! कृष्ण किमया,वृंदावनी त्या ,कालिंदी काठी,अवतरली !