आलास तु परतूनी बाळा…जाऊनिया दूर मानव देशी !वारूनी दुःखे, सुखवायां सकळा..लाडक्या,नित्य किती कष्टशी !! तुझ्या दर्शने गणेशा, होती..यातना जनांच्या बोलक्या !महिमा तव कृपेचा रे किती..वेदना साऱ्या होती हलक्या !! ते भक्त तिथे हर्षिती किती..जाणूनी..आम्ही, विरह तुझा साहतो !काळाची थबकली वाटे गती…आणूनी नेत्री प्राण,वाट तुझी पाहतो !
Category: Long Poems
अभंग रचना
गौरीच्या नंदना l तू गजवदना lसुखवी सर्वांना l दर्शनाने ll….१पोटाचे हे दोंद l तिथे रुळे सोंड lनाव वक्रतुंड l गजानना ll….२मोदक प्रीय तूl लाडू आवडतो lमोद तो मिळतो lआस्वादाने ll…३वाहन तुझे ते lसान मूषकाचे lशोभिवंत साचे l दिसे जनी ll…४सुंदर गुणांचा l बुद्धीचा तू दाता lप्रीयच जगता l तुझी मूर्ती ll….५येतोस या जगी l देतोस आनंद lआनंदाचा कंद l गणराय ll…६गजानना तुझे l रुप मनोहर lतू तारणहार l भक्तप्रिय ll…७आगमन तुझे l मोद देई सर्वा lआनंदाचा ठेवा l जनांसाठी ll..८
गणेश उत्सव
बाप्पा तुझे येणे, बाप्पा तुझे जाणे?आणि आमचे उगा मिरवणे…. आम्ही बाप्पा आणला….आम्ही बाप्पा बसवला….आम्ही नैवेद्य दाखवला….आम्ही बाप्पा विसर्जित केला…अनादी, अनंत तो एक!त्याला काय कोण बनवेल अन् बुडवेल? अनंत पिढ्या आल्या…अनंत पिढ्या गेल्या….बाप्पा तरीही उरला… काळ कधी का थांबेल?…बाप्पापण कधी न संपेल…आपल्या आधी तोच एक….आपल्या नंतरही तोच एक….त्यास काय कोणाची गरज?…. मग काय हा उत्सव दहाचं दिसांचा?…का न करावा तो रोजचा?…. आपुले येणे, आपुले जाणे,त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….जगण्याचाच या उत्सव करावा….अन् रोजचं बाप्पा मनी बसवावा…. सजावट करावी विचारांची…रोषणाई मनातल्या प्रेमाची…नैवेद्य दाखवावा सत्याचा….फुले दया, क्षमा, शांतीची….अन् आरती सुंदर शब्दांची…. रोजचं क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा…असा बाप्पा रोजचं का न पुजावा?…. रोज नव्याने मनी बाप्पा असा जागवावा….अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा…. सर्वांना गणेशोत्सवाच्या आरोग्यमय शुभेच्छा
कृष्ण – राधा… श्रावण फेर
फेर घालते मनात माझ्या,कृष्ण सख्याची रासलीला !क्रीडा त्याच्या अनंत रंगी,भुलवीत जाती मम मनाला! रासक्रीडा तुझी राधे संगे,राधाकृष्ण अगम्य मीलन!एक बासरी एकतानता,कृष्ण भक्तीचे राधा जीवन! मोरपिसांचे अनंत डोळे,जणू राधेचे अक्षय ध्यान!नजर खिळविते राधेची,मयुरा सम ती वळवी मान! धुंद सावळ्या सायंकाळी,कृष्ण मेघांची नभात दाटी !जणू वाटते कान्हा -राधा,खेळ रंगला यमुना काठी !
श्रावणा रे! तू हिरवा गार..
इंद्रधनुच्या रंगी झुलणारा..नवविवाहितांच्या स्वप्नांना फुलविणारा..नवयौवनांना स्वप्नात झुलविणारा…तुझी ओढच लागे जीवा फार..श्रावणा रे! तू हिरवा गार… श्रावणा रे! व्रतवैकल्य सणांचा तू झालास भ्रतार,सुगंधित फुलांनी सृष्टी बहरलीनवथर तारुण्याची काया मोहरली..रूप तुझे हे असे सदाबहार..श्रावणा रे! तू हिरवा गार… जीव रंगले, मन दंगले..तुझे रुप याच डोळी पाहिले,मन मयूर नृत्य करू लागले,लावण्य तव हे असेच राहो अपरंपार…श्रावणा रे! तू हिरवा गार… हिरव्या श्रावणाची हिरवाई,धरे ने पांघरली पाचु चीदुलई…उबदार दुलईतुनी कोवळे डीरडोलती.. नव स्वप्नांचा घेऊन झोका…आकाशा चुंबु पाहती…खेळ तव चाले होऊनी मेघा स्वार…श्रावणा रे! तू हिरवा गार….
मूड…..!
ढगाळलेली हवा,हातात कप हवा !वाफाळलेल्या चहाचा,प्रत्येक घोट नवा ! कविता लिहिता लिहिता,हातात चहाचा कप होता,बाहेरच्या खिडकीतून ,भारद्वाज बोलवत होता! खिडकीतून बाहेर बघताना,प्रतीक्षा नव विचारांची,झटकून जळमटे ही,कोत्या खुळ्या मनाची ! शुभ दर्शनी तयाच्या,होतेच मी ही मग्न !घडेल अवचित काही,जे पाहिले मीही स्वप्न !
स्वातंत्र्य दिनी -स्मरण…
स्वातंत्र्याच्या वेदीवरती,किती आहुती पडल्या होत्या !नाही त्यांची गणती काहीच,आज घडीला स्मरूया त्या! आद्य जनक ते स्वातंत्र्याचे,लक्ष्मीबाई अन तात्या टोपे!त्यांचीच धुरा हाती घेती,शूरवीर वासुदेव फडके! टिळक, आगरकर जगी या आले,स्वातंत्र्य सूर्याची आस घेऊनी!गांधीजींचे आगमन झाले ,सत्त्याची ती कास धरूनी ! स्वातंत्र्यनभी सावरकर तळपले,क्रांतीची ती मशाल घेऊनी !भगत, राजगुरू, सुखदेव गेले,फासा वरती दान टाकुनी ! पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची,कशी उलटली वेगाने !घोडदौड देशाच्या प्रगतीची,चाले लोकशाही मार्गाने ! देशाची सर्वांगीण प्रगती,ध्येय हेच धरू या उरी !शतकाकडे जाई वाटचाल ही,जगास दाऊ स्वप्ने खरी!
मैत्री
जन्मा सवे येते मैत्री,नात्यांच्या विणीतुनी,सम विचारधारेतुनी,कधी शत्रू मैत्री,कधी विशुद्ध मैत्री. मैत्री कधी ठरवून का होते?मैत्री ला वयाचे बंधन नसते.मैत्री दिनी काव्य करायचे,मैत्री वरच बोलायचे.मैत्री तर अखंड वाहणारा निर्मळ झरा…..जिथे मिळतो आनंदाचा निखळ सहारा…… मैत्री असावी जन्मजन्मांतरी ची,मैत्री खरी संकट घडीला टिकणारी,मैत्री असावी आश्वस्त शब्दांची, बालवयी जरी पांगलो,यौवनात जरी दूर गेलो,वृद्धत्वी जरी निजधामी गेलो,मागे राहिलेल्या मैत्रेयाला आठव असणारी…..
मित्र
खुप सारे मित्र असावेत …..थोडं खेचणारे, खूप हसवणारेअडचणीत हाक मारल्यावर हजर राहणारे…. खुप सारे मित्र असावेत…थोडं समजावणारे, बरंचसं समजून घेणारेकान पकडून चुका दाखवणारे…. खुप सारे मित्र असावेत…खूप भांडणारे, प्रसंगी धीर देणारेसुख- दुःखाच्या प्रसंगी मन जपणारे ….
मिळतील उत्तरे…
तणावाचं आयुष्य जगताना हलकेफुलके क्षण यावेत… त्या क्षणांची प्राजक्त फुले होऊन… मन उमेदीने भरून जावे… नित्य नव्या समस्यांना सामोरे जाताना, कोणाचे तरी आश्वासक शब्द, कलकलत्या जीवास शांतवून जावे… धाव धाव धावणाऱ्या थकल्या गात्रांना, क्षणभर निवांत बस जरा या शब्दांचे अत्तर शिंपडावे…. काळ कोणासाठी थांबत नाही, माणसानेच माणसासाठी थोडे थांबावे… समाधानाचे कुंपण मनास घालून हव्यासाचे क्षण रिते करावे…अगदी काहीच नाही जमले तर, मौन साध्य करून घ्यावे… निश्चय निग्रह मग जुळून येतील, पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुटून जातील….