पानगळ जरी झालीतरीही झाड परत बहरते… फुलंफळं लुटली जाऊनहीखोडाला पुन्हा पालवी फुटते… आपणही का नाही मग झाड व्हावं ? आप्तजनांची पानं गळताहुंदके गिळून नवा बहर ल्यावा…. आशेची पालवी नेसावीआठवणीतून नवस्वप्ने पहावी छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावीसारी दुनिया खुलवून टाकावी….
Category: Long Poems
गोपी -कृष्ण…
नदीच्या काठावर,झऱ्याच्या पाण्यात ,निळाई अंगावर,पांघरून संगत ….१ मनाला भुरळ,घाली तो सतत!देतोस तू जणू,कृष्णसख्या साथ!….२ झाडांची सावली,पाण्यात हिरवाई,जळाच्या आरशात,मोरपिसे कृष्णाई!…३ गोपी येती साथीला,दंग झाल्या लीलेत,कृष्णाच्या संगतीत,धुंद होऊन नाचत!….४ रास रंगे गोकुळी ,गोकुळ होई सुखी!नवनीत देती गोपी,कृष्णाच्या गोड मुखी.!…५ येई सांज सकाळ,घेऊन रंग सोनेरी,आनंद देई मला,कृष्णाची बासरी!….६
कुठे गेलीस तूss
अक्षय तृतीयेचा अक्षय ठेवा..आईची आठवण.. नाही नजरेसमोर, नाही कधी भेटणार..अक्षय तिचे माझ्यात असलेलेतिचे गुण ही साठवण.. नाही कधी तिची बरोबरी होणार..अवगुणांची खाण मी, ती माझी हिऱ्याचे कोंदण… किती आठव तुझे करावे,तुझ्याविना सारे सहावे…तुटले बंध संपून गेले माहेरपण.. माहेर या शब्दास मुकले..अंतरी पायीचे घुंगुरवाळे,माहेरच्या आठवणीत लडिवाळे नादावत राहिले… वेणीत माळलेला मोगऱ्याचा गजरा सुकोनी गेला..भिजल्या नयनी अश्रू ओघळले.. सणासुदीला पावडर कुंकू काजळ नटवून रुपडे अपुले..आई मी कशी दिसते?😥तिच्या डोळ्यातले अपार प्रेम अप्सरेस ही लाजवून गेले… आई तुझे नसणे पदोपदी मनास समजावून गेले…तेवढ्याच उत्कटतेने तुझ्या आठवणीत मन रमून गेले.. गढूळलेले थकले मन फिरून प्रफुल्लित होऊन गेले…हे आई चैतन्याच्या खाणीतुझ्या सवे जगायचे अजून राहून गेले….
सत्य….
दुःखालाही कंटाळा आला,वास्तव्याला राहण्याचा !सतत प्रश्न अन् कटु सत्याला,संगत घेऊन जगण्याचा !…..१ कोण तू अन् कोण मी,आपण सारे भाग सृष्टीचेउत्पत्ती अन् लय यांचे,साक्षी निसर्ग किमयेचे !….२ कुठे, कसे, कधी जन्मा यावे,हे तर आपल्या हाती नाहीलक्ष योनीतून फिरता फिरता,जगी काळ घालवतो काही !…३ धागे सारे मोह मायेचे ,उगीच बांधतो स्वतःभोवतीमोहवणाऱ्या जगी जिवाला,गुंफून घेतो अवतीभवती !….४ सत्य चिरंतन मना उमगते,जेव्हा येते कधी आपदानिमित्त मात्र ही असतो आपण,भू वरी या सदा सर्वदा !…५
विश्वास…
चालले होते विश्वासावर,साथ आहे कायमची !कधी मनात आले नाही,वेळ येईल ताटातुटीची ! सप्तपदी ची गाठ आपली,शेल्याची अन् शालूची!रेशीम धागे मुलायम त्यांचे,भीती नव्हती तुटण्याची! आज अचानक सोडून गेलात,राहिले एकटी मी या जगी !राहील का हो तुमचा आधार,अद्रुष्य पणे माझ्या पाठी ! विश्वास आहे पुनर्जन्मावर,गाठ पडेल पुढील जन्मी!त्या क्षणाची वाट मी पाहीन,सात जन्माची साथी मी !
*आई **
आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावीखरच आई बाळाची माउली असतेभर उन्हात शांत सावली असते दुधातली मलई असतेभांड्यांना तेजावणारी कल्हई असते आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी
जागतिक कविता दिन….
कविता माझी येई अचानक,काळजाच्या त्या गाभ्यातुन …अलगद कोमल शब्दछटातुन …भावनेच्या शब्द झऱ्यातुन…. कधी असते ती कल्पना भरारी..कधी ती देते दुःख वेदना उरी..कधी ती असते हसरी साजरी..तर कधी उमटे व्यथेतून खरी! मनीच्या गर्भी रुजून रहाते…चैतन्यावर ते बीज पोसते…अंकुरे जेव्हा मनात तेव्हा…इवल्याशा रोपात बहरते ! जशी उमलते , तशीच फुलते..कविता जगी अशीच जन्मते..मी न कधी ती सांगू शकते..कविता मज ती कशी स्फुरते !
क्रांती ज्योतीसावित्रीबाई फुले…
ज्योत लाविलीस तू,मनामनात सर्वांच्या!शिक्षणाची कास तू,धरलीस स्त्रियांच्या ! ज्योतिराव, सावित्री,गाठ बांधली स्वर्गात!एकरुप होऊनी,मग्न झाले कार्यात! दीनदुबळया दलितांना,आधार त्यांचा मिळाला!अनाथ,सान बाळांना,मायेचा झरा लाभला! अस्पृश्यतेस दूर सारूनी,दीप समानतेचा लावला!मुलामुलींना शिक्षणाचा,ध्यास तुम्ही लावला! शेणगोळे आणि शिव्याशापझेलले तिने धैर्याने !तिच्या त्यागाची फळे,आज चाखतात मानाने! ममता, समता यांचे नाते,जोडले समाजात त्यांनी!ऋण त्यांचे विसरू नये,हीच इच्छा मन्मनी !
नववर्ष
भले बुरे जे…घडुन गेले…विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…जरा विसावु…या वळणावर…या वळणावर….! लहान पणी केंव्हा तरी… रेडिओवर…भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर… हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…! हळूहळू ते गाणं कानात झिरपत होतं नी पडुन रहावसं वाटलं… ऐकत… अर्थपूर्ण कडवे सगळे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातुन.. वेदनेतून…कधी आनंदात… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, कर्त्या-निवृत्त वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…! खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! आज एक वळण संपतय, नवीन चालू होतंय… येणाऱ्या नववर्ष २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा !!
31:12:2023
आयुष्य सरते.. वर्ष संपते…तीच सकाळ. तोच सूर्य…काय बदलते..कालचे असते ते आजचे होते… कालचक्राची गती अधिक गतिमान होते….आयुष्य जगलेले दिवस आठवणीत जाऊन बसतात…आणि येणारा नवीन दिवसतोही भूतकाळ होणार आहे हे विसरून प्रारब्धा प्रमाणे जगत राहतात… काय दिले.. काय घेतले..किती हिशोब केले तरी…गेले ते गेलेच.. परत फिरून येणे नाही… मग ते माणसाच्या बाबतीत आणि अचेतन वस्तूच्या बाबतीतही होते… वर्ष संपले… आपल्या आयुष्यातील या जन्माचा राहण्याचा कालावधी कमी झाला..किती उन्हाळे किती पावसाळे पहाणे बाकी? याचा हिशोब मनात सुरू झाला…सारे कसे अघटीतच.. विज्ञान किती पुढे गेले तरी मानवी मनाचा शोध अपूर्णच राहिला…पृथ्वीची उंची खोली मोजून झाली…साऱ्या चल अचल पंचतत्त्वांची बेरीज करून झाली…पण अजूनही मानवाच्या आयुष्याची मोजमाप अपूर्ण राहिली… ग्रह तारे, ज्योतिषीय भाकिते हस्तरेखा.. सारे सारे ढुंडाळून झाले…पण जगण्याचे अंदाज चुकत गेले…. कोणाला कुठे हवे असते… दुःखाचे, वेदनेचे, अश्रूंचे, गरीबीचे आयुष्य…श्रीमंती, वैभव, सुखासीन ऐश्वर्य संपन्न.. अशीच कामना असते…पण प्रारब्धाप्रमाणे प्राप्तन प्राप्त होते….जीवा सवे आयुष्य येते.. वर्ष सरते तसे आयुष्य सरते… सरासरी आयुष्याचा कालमान पाहताना…जगात अनेक अद्भुत घटना घडून गेल्या…सामान्य जीवाला त्या कोठे स्पर्शून गेल्या…त्याचे आपले जगणे आणि जगण्यासाठी संघर्ष करणे इतकेच काय ते उरले…. सध्या राममय झालेले जग…अयोध्या.. अक्षता कलश..विरोधी पक्षाचा थयथयाट…येत्या वर्षाच्या निवडणुका…आणि संजय राऊत च्या ऐवजी सतत टीव्हीवर दिसणारा जरांगे पाटील …काय काय म्हणून लक्षात ठेवायचे…काही झाले तरी शेतकऱ्यांच्या समस्या…आम्हा नोकरदारांचे काय?कुठे बसतो आम्ही…आरक्षण नाही… रक्षण नाही..आयुष्य जगण्याच्या कल्पना आम्ही करू शकतो….पण त्यासाठी पोषक वातावरण नाही…सरते वर्ष… आशा पल्लवीत ठेवूनच पुढे सरकायचे….आपले आयुष्य आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्याच हिमतीवर आपणच पूर्ण करायच्या…कोणी देईल , कोणी करेल ह्या अपेक्षा नाही ठेवायच्या …. नरदेह सर्वात समृद्ध जन्म..पाप पुण्य.. बरे वाईट याचे आकलन असते…आत्म्याचा परमात्म्याकडे सुरू झालेला प्रवास असतो….म्हणूनच सरत्या वर्षाला बाय बाय करताना… येणाऱ्या वर्षाचे ज्याने त्याने आपल्या परीने आनंदाने स्वागत करावे… प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना, सुखाचा उपभोग घेण्याच्या कल्पना वेगळ्या असतात…म्हणून आपल्या इच्छांचे ओझे दुसऱ्यावर लादू नये…होता होईल तो मनास जपावे…मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची….तू चाल पुढ…. तुला भीती पर्वा कशाची…अगदी अशीच वाटचाल करावी…चला इथेच थांबते….अस्तमानी सूर्य चालला आहे…त्या तेजाला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच माझ्या नेत्र ज्योतींच्या पायघड्या घालण्यास सुरुवात करते….