चैत्र वैशाखात उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते! ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘नेमेची येतो मग पावसाळा’ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे, करवंदे, जांभळे, फणस हा उन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते. पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते! लगेच पाणी नियोजन सुरू होते! पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात. ‘ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस गाण्यापर्यंत! सकाळच्या अधून मधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं! ‘जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी’ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टी च्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो. वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची ऑर्डर येते. कांदे नवमी साजरी होते. आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो. गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात भिजत च साजरी होते. आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते! आठ पंधरा दिवसातच सृष्टीबालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे.. कविता आठवायला लागते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते! पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधून मधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे, तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो.’ रिमझिम पाऊस पडे सारखा’…’ असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘श्रावणात घन निळा बरस ना’ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सव प्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो!’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं! कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची, आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो. सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते. बघता बघता नारळी पौर्णिमा येते. पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो. कोळी लोक समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते. सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते.मग ओढ लागते ती भाद्रपदाची!श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पा ची चाहूल लागते. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो. पण तो मनात मुरलेला, भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो. त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो. .’अस्सा श्रावण सुरेख बाई’…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…
Category: Blogs
विठ्ठल -एक ऊर्जास्रोत
तसा मी देवदेव करणारा नाही, पण नास्तिक ही नाही. कसब्यात वेदपाठशाळा चालत असलेल्या वाड्यात रहात असल्याने संस्कार आणि धारणा बनली पण कर्मकांडापेक्षा भाव आणि विश्वासच कायम महत्त्वाचे वाटले. लहानपणी आषाढी एकादशी म्हणलं की सुट्टी आणि साबुदाणा खिचडी, साबू वडे, दाण्याची आमटी, बटाटयाचे पापड, शिंगाड्याचा शिरा असे उपासाच्या फराळाचे पदार्थ डोळ्यापुढे यायचे. शाळा पासोड्या विठोबाजवळ असल्यामुळे पुण्यात पालखी येण्याच्या दिवशी शाळेला सुट्टी असायची पण घरी पालखी बनवून ग्यानबा-तुकाराम करत मित्रांबरोबर वारकरी व्हायचो. माझे काका कुमठेकर रस्त्यावर रहायचे, त्यांच्या घरासमोरून पालखी जायची तिचे दर्शन घ्यायला जायचो. आठवी नववीनंतर आजोबांबरोबर दोन तीनदा आळंदी पुणे वारीही केली.. छान वाटायचं. पुढे विठ्ठलवाडीजवळ आनंदनगरला राहायला आल्यावर दरवर्षी आषाढीला विठ्ठलाचं दर्शन चुकवलं नाही… पण आजोबा गेल्यावर वारीला जाणं झालं नाही. गेली काही वर्ष कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींबरोबर आळंदी-पुणे, सासवड-जेजुरी असे वारीचे टप्पे केले आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात न्हाऊन निघालो. यावर्षी १८ जूनला वाल्हे ते लोणंद टप्पा करायचा ठरलं आणि हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥ संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥ तुकारामाच्या या अभंगाप्रमाणे जसे लाखो वारकरी आषाढी येण्याची आणि पंढरीच्या वारीची वाट पाहतात साधारण तसंच १८ जून आल्यावर आम्ही वाल्ह्याची वाट धरली पहाटेच्या वातावरणात दिवे घाटातल्या भव्य विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊन सासवड- जेजुरी मार्गे लोणंद कडे निघालो… रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोरगावच्या रस्त्याने मधल्या छोट्या रस्त्यातून पंढरपूर वारी मार्गावर पोचलो आणि तिथल्या वारकऱ्यांच्या वावराने, टाळ, मृदंग, वीणा यांच्या गजराने भक्तीमय झालो. तिथं गेल्यावर आपोआपच वारकरी माऊलींच्या सहवासाने, ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रसन्न अस्तित्वाने लीन होऊन मिसळून गेलो. मनातल्या शंका कुशंका दूर होऊन शुद्ध भावाने वारीचा निर्मळ आनंद घेऊ लागलो. एकमेकांना माऊली म्हणून हाक मारून विठूमाऊलीलाच जणू हाक देतोय असं वाटू लागलं. चालत होतो, पाय दुखत नव्हते, रस्त्यातल्या खाचखळग्यांकडे लक्ष नव्हतं … भजनं ऐकत…म्हणत पालखीपुढे वाटचाल करण्यात खूप समाधान आणि मनःशांती मिळत होती. सुंदर नाम ओढणारे, तुळशीच्या माळा विकणारे, मोबाईल चार्जिंग करून देणारे, वेवेगळ्या वस्तू- खेळणी विकणारे, झुंमका (झुणका) भाकर -सागर (साखरेचा) चहा, ऊसाचा रस विकणारे आणि चक्क रस्त्यावर केशकर्तन, श्मश्रू काम करणारे नाभिक असे अनेक “उद्योजक” ही दिसले. वाटेत वारकऱ्यांना नाश्ता -जेवण-पाणी देऊन एका प्रकारे माऊलींची सेवाच करणारे, रेनकोट, औषधांसारख्या आवश्यक वस्तू देणारे दानशूरही बघायला मिळाले. वारी बरोबर जाताना जितक्या वेळा माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेता आलं तेवढं घेतलं आणि धन्य झालो. “तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू,आम्हा लेकरांची विठू माऊली” असं का म्हणत असावेत याची प्रचितीही आली. खरंच, विठ्ठल या शब्दामुळे, विठ्ठल शब्द उच्चारण्यामुळे, विठ्ठल नामाच्या टाहूमुळे, तनमनात एक विलक्षण आत्मविश्वास जागृत होतो. चैतन्याची निर्मिती होते. हजारो लाखो वारकरी तहान भूक विसरून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीची वारी करतात. गावागावातले आबालवृद्ध विठ्ठलनाम जपत पालखीत सामील होतात व वारकऱ्यांची सेवा करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा तीन वेळा उच्चार केला तरी निर्माण होणारी उर्जा आणि तिची अनुभूतीचे वर्णन अनेकांनी विविध प्रकारे केले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्याने विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर प्रथमोपचार म्हणून करावा असे आपण. वाचले असेल…त्याविषयी सोशल मीडियावरही ऑडियो .. व्हिज्युअल स्वरूपात पाहिले असेल अनेक संत -कवी प्रभूतींनी लिहिलेले आणि भीमसेनजी–लता-आशा- बाबूजी- वसंतराव –किशोरीताई इत्यादि दिग्गजांनी गायलेले विठ्ठलाचे अभंग – भक्तिगीते आपण भावभक्तीने ऐकतो -गुणगुणतो. या विठ्ठल भक्तीगीतांचे, अभंगांचे आणि संत साहित्याचे अध्ययन वर्षानुवर्षे होत आहे होत राहिल. विठ्ठल – या शब्दाचा शब्दशः अर्थ विटेवर स्थल – वीटेवर स्थित. विठ्ठलनामाचा उध्द्घोष ही किती वेगवेगळ्या पध्दतीने होतो – कुणी त्याला विठोबा म्हणतात तर कुणी विठू माऊली, ज्ञानेश्वर त्याला माझी विठाई तर तुकारामांची आवडी त्याला विठ्या आणी काही बाही म्हणते. कुणासाठी तो पांडुरंग आहे तर कुणासाठी पंढरीनाथ आहे. एका रचनेत त्याला पंढरीचा चोर तर एकात चक्क त्याला पंढरीचे भूत म्हटले आहे. विष्णूसहस्रनामाप्रमाणे १६८ श्लोकांचे विठ्ठलसहस्रनाम हस्तलिखितात आहे असे मी कुठेतरी वाचले होते. विठ्ठलाची नावे द्वारकेश्वर, मुरलीधर, गिरीधर, कमलाबंधूसुखदा, पद्मावतीप्रिय:, गोपीजनलवल्लभ अशी कृष्णाशी मिळती जुळती आहेत. कुणी त्याला काही म्हणो , महाराष्ट्रात शेकडो वर्षे विठ्ठलाची आणि विठ्ठलनामाची ऊर्जा जनतेला जागृत करत आहे आणि देश परदेशातील विद्वान विठ्ठलभक्तिने भारावून जाऊन वारीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या लोकयात्रेत राजकारणी जरी आता बाधा आणत असले तरीही वारकऱ्यांत- भक्तांमध्ये जात पात नाही, उच्च- नीच नाही, गरीब- श्रीमंत कुठलाच भेदभाव नाही. विठ्ठल म्हणजे प्रेम,दया, माया,शांती यांचा मिलाफ. विठ्ठल म्हणजे वासनेचा नाश आणि विकारांवर विजय. विठ्ठल म्हणजेच बंधुभाव विठ्ठल म्हणजेच सुखसमाधान, समता व समृद्धी. विठ्ठल विठ्ठल गजरात आज पंढरीच काय आख्खा महाराष्ट्र- प्रत्येक मराठी आणि अमराठी विठ्ठलभक्त बुडून गेला आहे. आणि प्रत्येक वारकरी पुढची शेकडो वर्षे भजत रहाणार आहे…. आतां कोठें धांवे मन ।तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला ।अवघा जाला आनंद ॥२॥ प्रेमरसें बैसली मिठी ।आवडी लाठी मुखाशी ॥३॥ तुका म्हणे आम्हांजोगें ।विठ्ठला घोगें खरें माप॥४॥
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने….
गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करता क्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या. त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला. घरी येताना मन सहज विचार करू लागले की 50 एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला! पर्यावरण म्हणजे काय? ही सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, मातीआणि जमीन या सर्वांचे संतुलन! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार! आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे! हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली! माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले, ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे.. 5 जून 1973 साली अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची आपण काळजी करतो हे दिसून येईल!
सांजवेळ….
“सांज ये गोकुळी, सावळी सावळी…” गाण्याच्या ओळी कानावर पडल्या की संध्याकाळ झालेली आपोआपच डोळ्यासमोर येते. सूर्याची उतरतीची उन्हं अंगावर घेत अलगदपणे ही सांजवेळ पश्चिम क्षितिजावर येऊ लागली की मग आपोआपच अस्वस्थ होतं,कातर होतं! सकाळची उभारी माध्यांन्ही पर्यंत राहते आणि मग तिला कधी कलाटणी मिळते ते कळत नाही. मन उतरणीला लागते! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही वेळ जणू काळजाचा तुकडा असते. रात्रीच्या विश्रांतीनंतर उगवणारी सकाळ नवीन आशा आकांक्षा घेऊन येते. दिवसभर आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की सांजवेळ इतकी लवकर डोकावते याचे भानच राहत नाही!पहाटे पूर्वेला आभाळभर पसरलेल्या लाल केसरी रंगाच्या गालीच्या वरून कोवळ्या सूर्यकिरणांना घेऊन बाल रवी अवतरतो. तेव्हा त्याच्या तप्त किरणांचे अस्त्र गुप्तच असते जणू! जसजसं आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते, तस तसे त्या बाल रवीचे रूप सर्वांगाने तेजस्वी होत जाते. कालक्रमानुसार ते कधी सौम्य तर कधी दाहक रूप दाखवते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होत जाते तेव्हा तो पुन्हा क्षितिजाशी दोस्ती करायला वेगाने जाऊ लागतो. आपली सौम्य झालेली किरणे घेऊन निशेला भेटायला! तेव्हा ती संध्या लाजेने लालबुंद दिसते तर चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात निशेचा प्रवास सुरू होतो! या अदलाबदलीच्या काळात ही सांजवेळ येते. निसर्गाचे हे रूप घराच्या गच्चीवरूनच मी अनुभवत असते. अशावेळी मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात. कधी सागरात बुडत जाणारे लाल केसरी सूर्यबिंब तर कधी डोंगरांच्या रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे ते सूर्याचे लाल केशरी रूप! अशावेळी आभाळातील रंगांची उधळण मनाला मंत्रमुग्ध करते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात आपले मुक्त फिरणे संपले असले तरी सूर्याचे फिरणे थांबले आहे का? तो तर आपल्या गतीने जात असतोच पण तरीही ही सांजवेळ रोज मनाला हुरहुर लावून जाते! आयुष्याच्या उतरणीचा काळ हा असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बाळरूप बदलत बदलत तारुण्य येते. ज्या काळात मनुष्य कर्तव्य तत्पर असतो. आयुष्याच्या माध्यांन्ही ला तळपत्या सूर्याप्रमाणे मनुष्य कार्यरत असतो. जमेल तितक्या कर्तुत्वाने तळपत, पण त्यानंतर येणारी आयुष्याची उतरण तीव्र स्वरूपाची असते. ही सांजवेळ कधी येते कळतच नाही! खूप काही करायचे बाकी राहिले आहे असे वाटते! पण गेलेला काळ परत येत नाही. कोरोनाच्या काळात तर मन अंतर्मुख झाले. जीवनाची नश्वरता अधिकच जाणवू लागली! जणू काही जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवरील ही सांजवेळ आहे, ती संयमानेच संपवायला हवी असंच काळ आपल्याला सांगत आहे का? रोज ही सांजवेळ दिवे लागण्याची असते. सांजेला दिवा लावून आपण पुन्हा एकदा उद्याच्या आशेचे स्वप्न डोळ्यासमोर आणत असतो. अंधाराकडे नेणाऱ्या सांज वेळेला दिव्याचा प्रकाश दाखवून उद्याच्या आशादायी दिवसाकडे वाटचाल करायची असते. या सांजवेळी नंतर येणारी ही रात्र आपल्याला “रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल” अशी आशा दाखवते. तसेच हेही दिवस जाऊन पुन्हा एकदा आपण निसर्गाची प्रसन्न पहाट अनुभवणार आहोत., त्यासाठी या सांजवेळीच्या काळाला सामोरे जायला पाहिजे आणि विश्वासाने प्रत्येक दिवस संयमाने घालवायला हवा तरच निराशेची काजळी त्यावर धरणार नाही. रात्र आणि दिवस यांना जोडणारी ही ‘सांजवेळ’ देवासमोर दिवा लावून आपण मांगल्यमय केली की ही हुरहुर नाहीशी होऊन मन प्रसन्न होते! आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध मानवी जीवनाशी जोडून हे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत!
आला सण वटपौर्णिमेचा ..!
गेल्या दहा वर्षात वटपौर्णिमेला वडाला जाऊन पूजा करणे बंद झाले माझे! लग्नाची चाळीशी उलटून गेली आणि या पूजे बाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदलही होत गेला. लग्न झाल्यावर नवीन सून म्हणून सासूबाई बरोबर नटून-थटून पूजेला गेले होते ते आठवलं! जरीची साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर सगळा नव्या नवती चा साज घेऊन नदीकाठी असलेल्या वडावर पूजेला गेले होते. थोडा पाऊस पडल्यावरचे रम्य, प्रसन्न वातावरण, समोर कृष्णेचा घाट आणि वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळत फिरणाऱ्या उत्साही, नटलेल्या बायका असं ते वातावरण होतं! धार्मिकतेची गोष्ट सोडली तरी त्या निसर्गातील अल्हाददायक वातावरणात चैतन्य भरून राहिलेले होते, त्यामुळे मन खरोखरच प्रसन्न झाले! अशी काही वर्षे गेली आणि लहान मुलांच्या व्यापात वडावर जाणे जमेना. घराची जागा बदलली, त्यामुळे नदीकाठ आता दूर गेला होता. वडाची फांदी आणून त्याची पूजा करणे आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणे एवढाच वटपौर्णिमेचा कार्यक्रम होऊ लागला! हळूहळू या सर्वातून मन बाहेर येऊ लागले. पतीचे आयुष्य वाढावे आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करणे ही गोष्ट अंधश्रद्धेचा भाग वाटू लागली. हिंदू धर्मात त्या त्या काळाचा विचार करून सणावाराच्या रूढी समाजात रुजलेल्या! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला लहानपणी पिता, मोठेपणी पती आणि वृद्धापकाळी पुत्र अशा व्यक्तीचाच आधार आहे ही गोष्ट मनावर ठसलेली! स्त्रीचा बराचसा काळ संसारात पतीबरोबर व्यतीत होत असल्याने पति वरील निष्ठा सतत मनात राहणे हेही अशा पूजेला पूरक होते. पूर्वीच्या काळी स्त्रीला घराबाहेर पडणे फारसे मिळत नव्हते. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाच्या सहवासात मैत्रिणी, नातलगांसह अशा सणाचा आनंद घेता येत असे. यानंतरच्या काळात पावसाला जोरात सुरुवात होते. आषाढ, श्रावण महिन्यापर्यंत पावसाचा जोर असतो. हवामान प्रकृतीसाठी पोषक असतेच असे नाही, त्यामुळे उपवासाची सुरुवातही ज्येष्ठी पौर्णिमेपासूनच केली जाते आणि चातुर्मासात विविध नेम, उपास केले जातात. ‘वड’हे चिरंजीवीत्त्वाचे प्रतीक आहे. या झाडाचे आयुष्य खूप! तसेच वडाचे झाड छाया देणारे, जमिनीत मुळे घट्ट धरणारे आणि पर्यावरण पूरक असल्याने ते जंगलाची शोभा असते. वडाच्या पारंब्या त्याचे वंश सातत्यही दाखवतात. पारंबी रुजून वृक्ष तयार होतो. वडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. या सर्वांमुळे आपल्याकडे वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा यासारख्या मोठ्या झाडांचे संवर्धन केले गेले. या सर्वाला धार्मिकतेचे पाठबळ दिले की या प्रथा समाजात जास्त चांगल्या रुजतात.जसे हिंदू धर्मात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, तुलसी विवाह यासारखे सण निसर्गातील प्राणी, वनस्पती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. तशीच ही वडपौर्णिमा आपण पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाबरोबर साजरी करतो. वटपौर्णिमेच्या पूजेमागे सत्यवान- सावित्रीची पौराणिक कथा सांगितली जाते. सत्यवान अल्पायुषी आहे हे सत्य सावित्रीला समजल्यावर सत्यवानाचे आयुष्य मिळवण्यासाठी सावित्रीने तप केले.हे तप तिने वडाच्या झाडाखाली बसून केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने एका वराने सासू-सासऱ्यांचे आयुष्य मागितले, तर दुसऱ्या वराने त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिसऱ्या वराने मी अखंड सौभाग्यवती राहावे हा वर मागितला. या वरामुळे सत्यवानाचे आयुष्य तिने परत मागून घेतले. सावित्रीचे हे बुद्धीचातुर्य आपल्यात यावे ही इच्छा प्रत्येक स्त्रीने या दिवशी व्यक्त केली पाहिजे! अरविंद घोष यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य एम्. ए. ला असताना अभ्यासले. तेव्हा या सावित्रीची अधिक ओढ लागली. ‘सावित्री’ ही आपल्या जीवनाचे प्रतीकात्मक रूप आहे. एका शाश्वत ध्येयाकडे जात असताना कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा ढळता कामा नये हेच ‘सावित्री’ सांगते. प्रत्येकाचे एक आत्मिक आणि वैश्विक वलय असते. जीवन जगताना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत साधत हे जगच परमात्मा स्वरूप असून आपण त्याचा एक अंशात्मक भाग आहोत हे चिरंतन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या ‘सावित्री’ त आहे. कधीकधी मनात येतं की, स्त्रियांनीच का अशी व्रते करावी? उपास का करावे? पण अधिक विचार केला की वाटते, निसर्गाने स्त्रीला अधिक संयमी, सोशिक आणि बुद्धी रूप मानले आहे. स्त्री जननी आहे, त्यामुळे वंशसातत्याची जबाबदारी तिच्यावर आहे. सात जन्म हाच पती मिळावा ही भावना मनात ठेवली तरी स्त्री-पुरुष किंवा नवरा बायकोचे साहचर्य ह्या जन्मी तरी चांगल्या तऱ्हेने राहण्यास मदतच होते. पुनर्जन्म आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी आत्ताच्या जन्मात संसार सुखाचा होवो यासाठी तरी हे व्रत पाळायला किंवा एक सुसंस्कार मनात ठेवायला हरकत नाही ना?
मळकी नोट
आज सकाळचीच गोष्ट. शिवाजी चौकात ताजी पालेभाजी आणि सलाड साठी लागणारे साहित्य मी घेतले… भाजीवाली ला पैसे देऊन, तिने दिलेल्या टोपलीतील भाजी मी माझ्या पिशवीत भरून घेत असता.. ‘ए बाई ही नोट नको! दुसरी दे स्वच्छ नोट ‘ म्हणून बाजूला भाजी घेणाऱ्या बाईने भाजीवाली ला ठणकावले… ती बिचारी भाजी खाली अंथरलेल्या गोणी घालून सर्व नोटा आणि चिल्लर समोर करून म्हणाली ‘ताई बघा! संमद्या अशाच मळक्या हायती … घ्या यातील तुम्हास कोणती साफ सुदरी दिसत असंल ती….” क्षणात माझ्या मनात विचार चमकला! कशा असतील तिच्याजवळ? दहा.. वीस च्या स्वच्छ नोटा ! कष्टकरी हात त्यांचे, दिवसभर उन्हातान्हात राबणारे! तेव्हा कुठे हातात रोकडा येतो त्यातून त्यांचा दिवसाचा चरितार्थ चालतो. या नोटा मळक्या जुनाट असतात पण त्याला कुठेही भ्रष्टाचाराचा डाग नसतो…. खरोखर फक्त स्वाभिमानाचा, कष्टाचा आणि जीवन जगण्यासाठी व कुटुंबाचा जीव जगवण्यासाठी केलेल्या अविश्रांत मेहनतीचा त्या नोटेला वास असेल, उद्याच्या उज्वल भविष्याची चिंता मनात आणून आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी राबणाऱ्या हातांचा स्पर्श या सर्व नोटांना झालेला असेल त्याचे मोल ..अनमोल आहे… एसीमध्ये गुबगुबीत सोफ्यावर बसून साधा चहाचा कप उचलून ठेवण्याचे कष्ट न करणाऱ्या हातातील नोटा! तशाच स्वच्छ परीटघडीच्या रहातील… आणि तशाच तिजोरीत कुलपात बंद राहतील, त्यांची एकावर एक रचलेली चळत स्वतःच्याच ओझ्यांनी दबत असेल! त्या नोटांना कसला आलाय स्वप्नांचा कष्टाचा गंध? कायमच्या आपल्या कोऱ्या करकरीत…… मग तुम्ही नाही ना खळखळ करणार त्या जुन्या मळक्या नोटा घ्यायला?.. हो पण त्यासाठी तर आपल्याला थोडे फार कष्ट होतील, बँकेत जाऊन बदलून आणाव्या लागतील.. पण त्यांना निदान समाधान तरी मिळेल!! आपण उगीचच शिकलेल्यांनी दहा-वीस रुपयासाठी तुझ्याकडे पेटीएम आहे का? तुला गुगल करू का? म्हणून बिचार्यांना पेचात पाडू नये, असं मला वाटलं हं.. पन्नास-शंभर रुपयांसाठी स्वतःचं काम संपल्यावर कधी बँकेत खेटे घालतील…. आणि तिथे तरी त्यांना कोण लवकर दाद देते?… जिकडे तिकडे त्यांची अवहेलनाच!.. म्हणून तिच्या जवळच्या मळक्या नोटेचे महत्त्व मला अधिक वाटले!!
हसणाऱ्या सिंहाचे चित्र
अमीर फोर्ट (राजस्थान) येथील शीश महल मध्ये पाहण्यात आलेले जरा हटके चित्र … हसणाऱ्या सिंहाचे हे चित्र माझे लक्ष वेधून घेऊन गेले… आणि ते कॅमेरात कटीबद्ध करावेसे वाटले… हे पाहताना मला जाणवले फार पूर्वापार अशी व्यंगचित्रकला असावीच आणि ती साकारणारे कलाकारही… अख्खा खांब अगदी बारीक बारीक नक्षीकाम करून त्यावर त्याच पद्धतीने सुंदर काचेचे तुकडे जोडून मंत्रमुग्ध करणारी लयकारातील नक्षी साकारल्यावर खांबाच्या अगदी पायथ्याला हा असा हसणारा वनराज! का बरे असे केले असेल त्याने! मनात दिवसभराचे काम संपल्याचा आनंद तर कलाकाराने व्यक्त केला नसेल चित्राच्या माध्यमातून…. हो नाहीतर सिंह हसतोय ही कल्पनाच गंमतशीर आणि ते चित्रातून प्रकट करणे तेही एवढ्या भव्य दिव्य वास्तू मधील खांबावर… मनात येत आहे कसा असेल बरं तो कलाकार! काय असेल त्याच्या मनात! अख्खा दिवस मनमोहक चित्रे रंगवून मनामध्ये वनराज ही आपली ही कलाकृती पाहण्यासाठी आला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ही आपण साकारलेली सुंदर कलाकृती पाहून हास्य उमटले आहे अशी कल्पना करून त्याने शेवटच्या क्षणी कुंचला ठेवताना रेखाटले असावे.. होते विसंगत पण मला आवडून गेले…
कोकणातील- रत्नागिरीची होळी
होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींची निगडित आहेत! लहानपणी मार्च महिना आला की घरात अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमाने या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात खेळे यायचे! ‘खेळे’ म्हणजे वेगवेगळे नाच करणारे ठराविक लोक असायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे पण पारंपारिक गीतांबरोबरच नवीन नवीन सिनेमातले तसेच कोळी गीते, शेतकरी गीते यावर आधारित नाचायचे. त्यात उत्साह व जोश इतका असे की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने उत्साहाने गोळा व्हायचे. तेव्हा टीव्ही नव्हता त्यामुळे ही जिवंत उत्साहाची करमणूक सर्वांनाच फार आवडायची. या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच! होळीच्या खुंटावर होळी उभी करण्यात येत असे आणि भैरीचे पालखी पाच दिवस असे दरवर्षी एखाद्याच्या बागेतील माडाचे झाड होळीसाठी निवडले जाईल ते तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणले जाईल मुख्य म्हणजे ते माणसे वाहून आणत असेल त्यामुळे त्यासाठी चार-पाच तास लागत असत आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासूनच ते बघण्यात दंग असायचो. एकदा का होळी उभी राहिली की चार-पाच दिवस तिथे जत्रा असे. रोज देवीची पालखी मंदिरापासून मिरवणुकीने येई तेव्हा खूपच गर्दी उसळत असे. होळीच्या खुंटावर उभे राहणाऱ्या होळीसाठी सुरमाडा चा उपयोग केला जातो. हा सुरमाड जिथे असेल तिथे देवीची पालखी जाते आणि मिरवणुकीने होळीच्या सुरमाडाबरोबरच खुंटावर येते. रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्या बहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते, पण उत्साह तेवढा जास्तच असतो! पाच दिवस देवीच्या पालखीचे असतात. देवीची पालखी उठली तरी होळी मात्र पंधरा दिवस उभी असते. पाडव्याला ती होळी उतरवतात. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात, तिचा कौल मिळाला की ते काम होते असे मनापासून वाटत असते. मग ते काम झाले की पुढच्या वर्षी नारळाची तोरणे बांधली जातात!होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ, लोणचं यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते, पण कोकणात मात्र रंगपंचमीची मजा जास्त येते! परीक्षा तोंडावर आलेली असते. पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची आणि कोकणातील होळी अशीच माझ्या डोळ्यासमोर येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत! काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे! पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळी सणाला अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहूया!
परीक्षा
सध्या परीक्षेचे दिवस आहेत, मुलांची सतत लगबग सुरू आहे, अभ्यास, वह्या पूर्ण करणे, प्रोजेक्ट सादरीकर, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ची तयारी, हे न ते, काही तरी गडबड सुरू च आहे. १०वी, १२वी च्या परीक्षा एकतर संपल्या आहेत किंवा संपत आल्या आहेत. या वर्षी पूर्ण सत्र ऑफ लाइन झाल्यामुळे मुलं खुश आहेत, कारण मागचे २ वर्ष तर करोनामुळे विध्यार्थीवर्ग खूपच नाराज झाले होते. शाळा नाही, कॉलेज नाही, ट्यूशन नाही, नीट अभ्यास होत नव्हता, मित्र- मैत्रिणींना भेटता येत नव्हतं. त्यांना बिचाऱ्यांना समजतच नव्हतं काय करायला हवं. किती अभ्यास करायचा, कसा करायचा, तांत्रिक बाजू सांभाळायची, की शिक्षक काय म्हणतंय त्याच्या कडे लक्ष द्याच. सगळीकडे नुसता गोंधळ होता. पण आत तसं नाही, ही मात्र विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. निदान ज्यांना अभ्यास करायला आवडतो, शाळेत जायला आवडतं, त्यांच्यासाठी तरी. आणि ज्यांना आवडतं नाही ते शाळेत मस्ती करायला मोकळे. असो…… विद्यार्थ्यांसाठी पण या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ३ प्रकारचे लोक आहेत बरं का!! एक जे खूप अभ्यास करतात, ज्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय माहीत असतं आणि ते त्या दृष्टीने पुढे जातात. आणि त्यांना पुरेपूर यशही मिळत. दुसरे ज्यांना अभ्यासात मुळीच आवड नसते, त्यांना भविष्याची किंवा त्यांच्या आयुष्याची काळजीही नसते. आणि ते तसे प्रयत्नही करत नाहीत, स्वतःला सुधारण्याकरीता. त्यांचे विचार असे का असतात, हे मात्र कोणी समजू शकलं नाही. आणि तिसऱ्या पद्धतीचे जे खुप हुशार नसले तरी अभ्यास करतात, पूर्ण प्रयत्न करतात, पण नशीब काही त्यांना साथ देत नाही, परीक्षा देतांना कधी वेळेवर आठवत नाही, तर कधी वेळ पुरत नाही, काही न काही गडबड नक्कीच होते. कितीही अभ्यास केला तरी यश काही हाती लागत नाही. त्यांची इच्छा खुप असते काहीतरी करायची, पण जमतंच नाही आणि मुख्य म्हणजे याच मुलांना सगळ्यात जास्तं बोलणी ऐकावी लागतात. कारण जे खूप हुशार असतात त्यांना काही बोलायची गरज नाही, आणि ज्यांना अभ्यास करायचा नसतो त्यांना बोलून काही उपयोग नाही. मग उरले तिसऱ्या पध्दतीचे, त्यांच्या मागे पालक मंडळी सतत मागे लागलेली असते. अच्छा, आणि पालकांच्या भरपूर अपेक्षा ही असतात त्यांच्याकडून, पण जर नशिबाची साथ मिळत नसेल तर ते तरी काय करणार. कधी कधी तर त्यांना पुढच्या आयुष्यत सुद्धा त्रास होतो. हवी तशी नोकरी मिळत नाही, कुठलं ही काम केलं की, त्यात हवं तसं यश मिळत नाही. कितीही पुढे जायचा प्रयत्न केला तरी अपयशच हाती येतं. प्रत्येक कामात अडचणी येतात. सगळ्या गोष्टींना उशीर लागतो. आणि आज मी जे गाणं निवडलं आहे ते अश्याच परिस्थितीला मिळत जुळत आहे. चित्रपट – कभी हा कभी ना, १९९४ मध्ये रिलीस झालेला. चित्रपटात मुख्य भूमिकेत – शाहरुख खान, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि दीपक तिजोरी. निर्देशक कुंदन शाह, निर्माता – विक्रम मेहरोत्रा. संगीतकार जतीन- ललित. आणि हे गाण्याचे गायक कलाकार – देवकी पंडित आणि कुमार सानू. अप्रतिम गाणं. वो तो है अलबेला, हजारों में अकेला, वो तो है अलबेला, हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा, हूनर को न देखा…….. खरंच काही काही लोकांच नशीब असंच असतं. सतत प्रयत्न करूनही, निराशाच हाती येते. आणि अशा परिस्थितीत जर घरच्या मंडळीची साथ मिळाली नाही तर तो किती हताश होतो. सतत घरच्यांचे टोमणे ऐकावे लागतात. बाहेरच्या जगाने साथ दिली नाही तरी एक वेळेस चालत. पण घरातल्यांचा विश्वास हवा. घरच्यांची साथ हवी. कधी आई सक्त असते, तर कधी वडील. खरंतर आई-वडिलांचं चिडण, रागावणं हे मुलांच्या भविष्यासाठीच असतं. त्यांच्या चांगल्यासाठीच असतं. पण या सगळ्यांमुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मतभेद वाढतच जातात. त्या मुलांचा तरी काय दोष, जर परिस्थिती, वेळ, नशीब साथ देत नसेलं. खरंतर सगळी मुलं सारखी कशी असू शकतात? प्रत्येकचं स्वतःच एक वेगळंच अस्तित्व किंवा आयुष्य घेऊन जन्माला येतं. या सगळ्या परिस्थितीत त्याला कसं वाटत असेल, तो किती हताश होत असेल. हे समजून घ्यायला हवं. घरच्यांना सतत त्यांच्यातले दोषच दिसतं असतील आणि त्यांच्यातले चांगले गुण कोणी बघतच नसेल तर, त्याला किती त्रास होत असेल. त्यांचे शेजारी, ओळखीची माणसं जरी त्याची साथ देत असतील, पण जर त्यांच्या घरचेच सोबत नसतील तर, त्यांना किती एकट वाटतं असेल. हा विचार करायला हवा. फुरसत मिली ना तुम्हें, अपने जहाँ से, उसके भी दिल की कभी, समझते कहाँ से….. जाना है जिसे पत्थर, हीरा है वो तो हीरा….. सदा तुमने ऐब देखा हुनर को ना देखा….. आई – वडील मुलांना नेहमीच दोष देतात, पण काही काही पालकांनी हा विचार करायला हवा की ते स्वतः किती प्रयत्न करतात, मुलांची बाजू समजून घ्याचा. काही काही पालक मंडळी नेहमी स्वतःच्याच आयुष्यात busy असतात, स्वतःच्या कामात, मुलांच भविष्य, स्वतःच आयुष्य आणि बाकी इतर कामात इतके गुंतले असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्याल वेळच नसतो. कितीही मेहनत करून किंवा कितीही प्रयत्न करून, एखादं काम मुलांना जमत नसेल, तर यात मुलांचा दोष आहे का की परिस्थितीचा, हे जर पालकांनी समजूनच घेतलं नाही. आपलं मुलं प्रयत्न तर करतंय! या गोष्टी कडे ही त्यांचं लक्ष जात नाही. प्रत्येकदा मुलांना काहीतरी बरं वाईट बोलतात, पण त्यांच्याले सुप्त गुण पालकांना दिसत नाही. तसं बघितलं तर प्रत्येकच मुलं हे वेळग असतं, प्रत्येकात काहीतरी वेळगी प्रतिभा असते आणि म्हणूनच ते स्वतःच एक Star आहे. ह्या गोष्टीचा पालकांनी विचार करायला हवा. बंसी को लकड़ी सदा, समझा किये तुम, पर उसके नग्मों की धून, कहाँ सुन सके तुम…. दिए की माटी देखी, देखि न उसकी ज्योति…. सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा…. या कडव्यात खूप छान उपमा दिली आहे. जसं बासुरी/ बासरी एक लाकडाचा तुकडा आहे. पण त्या एका लाकडाच्या तुकड्यातून जर एखादं छान वाद्य तयार करता येऊ शकत. तसंच मुलांना जर चांगल मार्गदर्शन मिळालं, त्यांच्याकडे पालकांनी जाती ने लक्ष देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं तर एखाद्याचं आयुष्य नक्कीच मार्गी लागू शकत. जर एका लाकडाच्या तुकड्यातून बसुरी बनून, सुंदर, मोहक आवाज येऊ शकतो, तर मग ही मुले सुद्धा खूप काही करून दाखवू शकतात. दिवा हा मातीचा बनला आहे, पण तो प्रकाश ही देऊ शकतो या दृष्टीने मुलांकडे ही बघायला हवं. एखाद्याला एक गोष्ट जमतं नाही म्हणून काहीच जमणार नाही, हा दृष्टिकोन बदलायला हवा. खरंतर एखाद्या मुलात/व्यक्तीत, असलेले गुण आणि त्या व्यक्तीकडून केल्या गेलेल्या अपेक्षा, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण एखाद्या मुलाचा कलं चित्रकलेत, नृत्य, खेळ, पाककला, लेखन किंवा कुठल्याही क्षेत्रात असू शकतो आणि त्याचे आई-वडील त्याच्या कडून डॉक्टर किंवा इंजिनिअर च हो, अशा अपेक्षा करणं, चुकीचं नाही का? मुलांसाठी आजकाल खूप वेळवेगळ नवीन क्षेत्र आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचा विषय निवडता येऊ शकतो. त्या मुलाची किंवा त्या व्यक्तीची बुध्दीमत्ता, त्याची क्षमता, त्याची एखाद्या विषया बद्दलची आवड या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शिक्षण किंवा कॅरियर निवडलं तर नक्कीच यश मिळेल. या व्यतिरिक्त पालक मंडळी कितपत वेळ देऊ…
जरा विसावू या वळणावर….!
लहानपणापासून…… रेडिओवर…”भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर”… हे गाणं अनेकदा कानावर पडत आलंय…! जेव्हांही हे गाणं ऐकतो ..हळूहळू ते गाणं कानात झिरपतं आणि ऐकत रहावसं वाटतं…… अर्थपूर्ण कडवे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश दाखवणारं असतं…! भलं बुरं.. घडामोडी घडून गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो …क्षणिक या वळणावर…! खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापूर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात असतं तसंच जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ, पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! या वर्षाआधीच्या दोन वर्षांत आपण करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो होतो. याच कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरेही गेलो होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणीं ना सामोरे गेलो होतो – आर्थिक दृष्टया फटका बसला होता. पण या सरत्या वर्षानं आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात आलेल्या बिकट वाटेतही आशेचा किरण दाखवला. – आपल्या सर्वांची काळाने जरा जास्तंच परीक्षा घेतली. पण त्यातही आपण तावून सुलाखून बाहेर आलो आहोत. करोनाचं सावट आता परत येईल अशा बातम्या येत आहेत, पण न्यू नॉर्मल का काय म्हणतात त्याची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे – थोडीफार ती गेली असेल तर परत ती लावायला लागेल . अनेक बंधनं कंटाळा न करता आपल्यावर घालून घेऊन संयमाने वागायला लागेल. अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं गाणं मला आठवतं – “कई बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंसके पीछे … मन दौडने लगता है “ सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी – रोज हेच व्हायला पाहिजे – असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो – आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले. लवकरच एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपून नवीन सुरु होईल…. आणि असंख्य अडचणी – खडतर मार्ग येऊन गेले असले तरी सर्वच काही निराशजनक नाहीये.. सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – ऑफिसची -व्यवसायाची दैनंदिन व्यावहारिक -कौटुंबिक अगदी सामाजिक- सांस्कृतिकही कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? – यावर्षी अगदी संक्रांती- पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी पर्यंत सगळे सण जोशात साजरे झाले स्लो डाऊन कायमचं राहणारं नाही आणि ” As long as life is there, there is a hope ” याचीखात्री पटली. मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता –उनकी यादे जरूर रहती है –जीवन का सफर चालू रहता है ! शेवटी जीवन है चलने का नाम !चलते रहो सुबह-ओ-शाम !! दोन पावलं मागं सरकलो होतो …आता चार पावलं परत पुढे आलोय – रोज पुढंच जायचंय- मोठा पल्ला गाठायचाय – नक्कीच गाठू. बरंच काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात – परिस्थिती नक्कीच बदलतीय – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी… रिता जरी दिन वाटेमन भरलेले ठेवू धीर धरून सदाआशा जागती ठेवू भले बुरे ते विसरुनी जाऊधैर्य -आनंदाने पुढे जाऊ येणाऱ्या नववर्ष २०२3च्या हार्दिक शुभेच्छा !!