सुनेने सासूशी कसे वागावे यावर बरंच काही लिहिले वाचले गेलं !अगदी पूर्वीपासून लहानपणी मुलीला हेच सांगितले जायचे की, नीट वाग, पुढे सासरी नांदायला जायचंय! दुसऱ्या घरी कायमचं राहायला जावं लागतं ते मुलीलाच! माहेर आणि सासर दोन्हीचे नाव राखण्याचे काम मुलीचेच असे. तो काळ असा होता की मुलींची लग्न लवकर होत असत. साधारणपणे दहा-बारा वर्षाची मुलगी झाली की लग्न होत असे. मुलींचे शिक्षण हा दुय्यम विषय होता. लिहायला वाचायला आलं थोडाफार, हिशोब समजायला लागला की खूप झाले शिक्षण, असा घरातील मोठ्यांचा मुलीच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. लवकर लग्न झाल्यामुळे या मुली सासरी आपोआपच लवकर रुळून जात! माझी आजी सांगत असे की, तिचे लग्न दहाव्या वर्षी झाले. सासरी लहान नणंद होती. त्यांचे नाते मैत्रीचे होते. काळ बदलला, मुलीच्या लग्नाचे वय बदलले. शिक्षण झाल्यावर म्हणजे साधारणपणे ग्रॅज्युएशन झाल्यावर, कधी थोडीफार नोकरी करून मग लग्न होऊ लागली. शिक्षण हे आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे, वेळप्रसंगी अर्थार्जनासाठी उपयोगी म्हणून मुलींना मिळू लागले. दुसऱ्या घरात एकत्र कुटुंबातही मुली आनंदाने राहत असत.सुना नोकरी करू लागल्या आणि घरही सांभाळायला लागल्या.घरचे रीतीरिवाज , सणवार, अडीअडचणी सांभाळून करताना बाईवर दुप्पट ताण येऊ लागला. तरीही ही पिढी आनंदात जगत होती, कारण स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू लागले. स्वतःच्या हौशी मौजी करता येऊ लागल्या. स्वतः चे घर करण्याची स्वप्न पूर्ण होऊ लागली. नोकरी नसली तरी घरी काहीतरी करून बायका संसाराला हातभार लावू लागल्या. त्यांनी सूनपणाच्या मर्यादा सांभाळून स्वतःला एक गृहिणी म्हणून सुशिक्षित, कर्तृत्ववान हे बिरूद पटकावलं! यानंतरच्या काळात मात्र खूप बदल झाला. एक किंवा दोन मुले असल्यामुळे शिक्षण, पैसा सगळंच पाहिजे ते मुलांना मिळत गेले. छोट्या कुटुंबातून सासरी गेलेल्या मुलींना सासरची जबाबदारी सांभाळणे अवघड वाटू लागले. प्रत्येक घरी असंच होतं असे नाही, पण मनाचा लवचिकपणा कमी झाल्याने जुळवून घेता येणे जड जाते हे बऱ्याच कुटुंबातून दिसू लागले. मधल्या फळीने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायची तयारी दाखवली. तरुण वयात सासू-सासऱ्यांसकट संसार करण्याची आणि आता सुनांच्या नोकरीच्या काळात नातवंडांबरोबर आनंदाने राहायची! इथेच नातेसंबंधांचा कस लागतो. कालची सून आज सासू बनते. नवीन जीवनाला ती सामोरी जाते, तेव्हा सुने इतकीच सासूची जबाबदारी असते हे शिवधनुष्य पेलण्याची! याच काळात जागतिकीकरणामुळे मुले- मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशी जाऊ लागली. ती मुले तिथेच स्थिरावली. आणि आई-वडिलांच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढल्या. त्यांना सुना- मुलींचे बाळंतपणे करण्याच्या निमित्ताने परदेशवारी घडू लागली. ते आयुष्यही त्यांना छान सुटसुटीत वाटू लागले. या सगळ्या उस्तवारीत आत्ता असलेल्या 50 ते 70 वयोगटातील लोकांना, विशेषतः स्त्रियांना विविध अनुभव घेता आले. कधीकाळी सून बनून आलेल्या या स्त्रिया पुन्हा नव्या जोमाने आईची, सासूची भूमिका वठवू लागल्या, आणि सासु सुनेचे नातं खरंच थोडं फार विरघळू लागले. काळाबरोबर स्त्री स्वतःला जुळवून घेते. मुलांच्या लग्नानंतर आम्ही दोघांनीही मुलांना पाठिंबा देऊन राहायचे ठरवले होते. सासू- सून या दोघीत पिढीचा फरक असतो. शिवाय दोघी दोन वेगवेगळ्या घरातून येतात. सासूचे ध्येय मुलाचा संसार हसता खेळता राहू दे म्हणून तर सुनेला नवरा आणि मुलांबरोबर तिचा संसार छान करायचा असतो म्हणून! या दोन्हींच्या आनंदाच्या सीमा रेषा जर एकत्र जोडल्या तर सासू काय आणि सून काय, दोघी एकमेकींच्यासाठी करत राहतील आणि एकत्र जगण्याचा आनंद घेतील!वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी सासूला कधी त्रास देतील तर आताच्या धकाधकीच्या जीवनात कधी सूनेची दमछाक होईल पण एकमेकींना समजून घेणे गरजेचे असते. तडजोड हाच या सर्वांचा पाया आहे. माझ्यासारख्या अनेक जणींना वृद्ध आई-वडील आहेत आणि त्याचबरोबर सून- नातवंडे ही आहेत. या सगळ्याचा समन्वय घालताना थोडी ओढाताण ही होणारच! पण आपणही कधीतरी या वृद्धत्वाला तोंड देणार आहोत याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे ना! म्हणजे आपोआपच मन तडजोडीकडे अधिक झुकेल आणि घरातील वातावरण आनंददायक राहण्यास मदत होईल! त्या दृष्टीने पाहिले तर खेड्यातील एकत्र कुटुंबातील वातावरण जास्त चांगले असते. मोठ्यांना मान देणे,कष्ट करणे,आणि कुटुंब जोडून रहाणे हे खेड्यातील कुटुंबात अधिक असते असे वाटते. अर्थात आर्थिक दृष्ट्या तिथे स्त्रियांना फारसे अधिकार नसतात, हे कारण ही असेल! एकमेकांना समजून घेऊन खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती अनुभवण्याचे दिवस आता बरेच जवळ आले आहेत असं मला वाटतं !अर्थात हा समाजातील एक स्तर आहे. अजून खूप बाकी आहे, पण क्षितिजावर स्त्रियांसाठी आनंदाचा सूर्य उगवू लागणार आहे हे निश्चित!
Category: Blogs
मास्क.(मुखवटे)
२०२० साला ची सुरूवातच कोरोनाने झाली आणि आपण मास्क वापरू लागलो. आज पर्यंत मुखवटा म्हणजे चेहऱ्यावरील एक काही काळापुरते घेतलेले रूप हाच अर्थ डोळ्यासमोर येत होता, पण ‘मास्क’ या शब्दाचा खराखुरा अर्थ आपल्याला आता कळला! उन्हापासून संरक्षण करायला पूर्वी मोठा रूमाल वापरला जात असे पण जीवाचे संरक्षण करण्यासाठी सतत मास्क वापरावा लागेल असे आपल्याला स्वप्नात सुध्दा कधी वाटले नव्हते! सध्यातरी ‘मास्क’ हा शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. या ‘मुखवटे’ किंवा ‘मास्क’ या शब्दावरून मला माणसांचे वेगवेगळे मुखवटे आठवायला लागले! चेहऱ्यावरील भावना लपवण्यासाठी काहीवेळा असे वेगवेगळे मुखवटे वापरले जातात. राग, लोभ, मत्सर किंवा भीती यासारखे भाव चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून माणसे समाजात वावरताना मुखवटे वापरत असतात. ‘चेहरा हा माणसाच्या भावनांचा आरसा असतो’ असं म्हटलं जातं, ते खरंच आहे पण बरेचदा एखाद्याच्या आतील भावना वेगळ्याच असतात पण चेहऱ्यावर मात्र वेगळाच मुखवटा चढवलेला असतो! नाटकामध्ये कलाकार भावनाविष्कार करतात तेव्हा त्यांनी तो खोटाच मुखवटा चेहऱ्यावर चढवलेला असतो. काहीवेळा वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून नटाला नाटक वठवावे लागते. यासंदर्भात बालगंधर्वांची एक गोष्ट मला आठवते. त्यांचे मूल खूप आजारी अवस्थेत असताना त्यांना ठरल्याप्रमाणे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी जावे लागते आणि काही वेळातच ते मुल गेल्याची बातमी कळूनही आपल्या ‘मायबाप’ प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर नाटक करावे लागते. अशावेळी मुखवट्याआडचे दुःख दिसू न देता ते सादर करणे केवढे कठीण असेल! श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, स्मिता पाटील, सुलभा देशपांडे या सारख्या अनेक नाट्य-चित्र क्षेत्रातील कलाकारांनी भूमिका जगल्या. वैयक्तिक सुखदुःखाकडे लक्ष न देता कामात झोकून देऊन भूमिका सजीव केल्या. असे हे मुखवटे त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर साकार केले! साध्या जीवनातही आपल्याला कित्येकदां मुखवटे घेऊन जगावे लागते. अनपेक्षित आलेले, कधी नको असलेले किंवा अवेळी आलेले पाहुणे असले तरी घरच्या स्त्रीला हसतमुख चेहरा करून स्वागत करावे लागते. तोही एकप्रकारचा मुखवटा असतो. प्रत्येकाला आपली जीवनातली भूमिका बजावण्यासाठी मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो! आजच्या ‘करोना’ च्या काळातमुखवट्याने ‘मास्क’चे वेगळेच रूप धारण केले आहे. लोकांपासून विलग रहाताना, एकमेकांशी कमी संपर्क ठेवताना ‘मास्क’ वापरावा लागतोय! जीवनाच्या या रूपाला सामोरे जाताना आपला जीव सुरक्षित राहावा म्हणून हे मुखवटयाचे रूप आपण धारण केले आहे. पल्याला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातही ‘मुखवट्या चें जग’ प्रामुख्याने दिसते. स्वार्थ आणि सत्ता याचा ध्यास घेऊन या क्षेत्रातील कित्येक लोक सतत मुखवटे बदलत असतात. त्यामुळे त्यांची कृती आणि वृत्ती यात बरीच तफावत दिसत असते. या मुखवट्या मागे त्यांना त्यांचे भावही लपवता येतात. कोरोना च्या काळात हे ‘मास्क’बाजारात सुंदर आकारात, रंगात, मॅचिंगचे मिळू लागले आहेत. त्यातही मनुष्याची कलात्मकता दिसून येत आहे. आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे, आनंदाने सामोरे जाण्याची माणसाची वृत्ती दिसून येते. हे मुखवटे ‘कोरोना’ पासून संरक्षण करतील या विश्वासाने जगायचे बळही त्यामुळे वाढले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीने माणूस कोरोना चा सामना करत आहे. कोरोना रोगाचा प्रतिकार केला जाईल, काही काळातच तो रोग जाईलही पण या ‘मास्क’ मध्ये वावरायची माणसाची सवय जाईल का? एकूण समाजात जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी होईल का? चेहऱ्यावरचा ‘कापडी मास्क’ दूर करणे एक वेळ सोपे आहे पण मनावर जे अनेक प्रकारचे ‘मास्क’आपण चढवतो ते दूर करणे माणसाला शक्य होईल का?
भाऊबीज
लहानपणी भाऊबीजेचे खूप अप्रूप असे! भावाकडून काय भाऊबीज मिळवायची याचे प्लॅनिंग आधीपासूनच चालू असे.पैसे खूप नव्हते, पण उत्साह खूप होता. दिवाळीला एकच ड्रेस घेतलेला असे. तोच भाऊबिजेला पुढे केला जाई. एक वर्षी माझ्या भावाने गंमत म्हणून नाणी गोळा करून त्याचे छान पॅकिंग करून दिले होते. तेव्हा १९६२ सालच्याएक पैशाच्या नाण्यात सोनं आहे अशी बातमी होती! त्यामुळे ती नाणी पॅक करून मला भाऊबिजेला दिली! त्यात काय आहे ह्या उत्सुकतेने ते गडबडीने उघडले, तो आनंद आगळाच होता. पुढे मोठे झाल्यावर दोन्ही भाऊ नोकरी ला लागले.. दोन दोन साड्या मिळू लागल्या! लग्न होऊन सासरी गेल्यावर भाऊबिजेला भावाचे येणे अपुर्वाईचे असे. कधीतरी त्या निमित्ताने माझेही माहेरी जाणे होई! मग मुले बाळे झाल्यावर आपल्या पेक्षा मुलांची भाऊबीज महत्वाची होऊ लागली! एक मुलगा, एक मुलगी असा भाऊबिजेचा कोटा पूर्ण झाला! दरवर्षी त्यांत काही ना काही नाविन्य असे. पाहुणे मंडळी येत, मग हसत खेळत दिवाळी साजरी होई. आमच्याकडे माझ्या पुतण्या उत्साहाने मोठा कार्यक्रम आखत असत. जवळपास ३५/४० जण एकत्र येऊन भाऊबीज साजरी करत!वरची पिढी, मधली पिढी आणि छोटी मुले…सर्वांची ओवाळण्याची गडबड, मिळालेल्या भाऊबिजेच्या वस्तू गोळा करणे, आणि शेवटी खाण्यापिण्याचा कार्यक्रम! गेली दोन वर्षे हे सगळं बंद होतं!पण यंदा भाऊबीज साजरी झाली! भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक! आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सणाच्या निमित्ताने गुंफली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. अशा सणांमुळे नाती दृढ होण्यास मदत होते. बहिण-भावातील बंध रेशमाचे भाऊबीजेसारख्या सणामुळे अधिक मुलायम बनतात हे नक्कीच! कधी चुकून झालेले समज गैरसमज अशा सणांच्या निमित्ताने दूर केले जातात.आपले सण ही आपली समाज मन एकत्र जोडतात!दिवाळी चा हा शेवटचा दिवस असा गोड आनंदात साजरा होतो!
बदलती दिवाळी …..
चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिराती टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते. आणि तर्हेतर्हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणी यांचे वास नाकाला येऊ लागतात! दिवाळीची चाहूल तर लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या तेल, वात घालून प्रज्वलित होऊ लागल्या! या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले! त्याचा प्रकाश मनभर पसरला! पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या! आमच्या लहानपणी आता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पावित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी विठोबाच्या, दत्ताच्या देवळात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळायचं.. कोजागिरी पौर्णिमा आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे. बोचरी थंडी पहाटे अंगात शिरशिरी आणायची पण तो गारवा सुखद वाटायचा! घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की, बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या! डबे घासणे, अनारसा पीठ करणे, चकली, कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे लवकर सुरू होत असत. दिवाळीची खरेदी फार मोठी नसे, तरीही खिशाचा परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडेसे फटाके आणले जात! कधीतरी घरासाठी म्हणून काही खरेदी असे. दिवाळीची वाट पाहिली जायची ती फराळासाठी! लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी या सगळ्याची सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे! आता फराळाचे पदार्थ बारा महिने मिळत असल्याने त्याचीं अपूर्वाई कमी झाली. दिवाळी अगदी उद्यावर आली की, दिवाळीचा पहिला फटाका कोण आणि किती वाजता लावणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत, कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा मी घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे. त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे याची जोरदार चर्चा सुरू असे. मुली अंगणात रांगोळ्या काढून वेगवेगळ्या रंगाने सुशोभित करत असत. सगळे वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेली सुगंधी तेलं, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली! आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली! दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठणे, तेल लावणे, गरम गरम पाण्याच्या आंघोळी करणे आणि सर्वांना ओवाळणे हा कार्यक्रम असे.त्यानंतर नवीन कपडे घालून देवदर्शन व नंतर फराळ असे. एकदा का दिवाळी सुरू झाली की दिवाळीचे चार दिवस फारच भरभर जात असत! लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या काळात पाहुणे मंडळींची जा- ये असे. एकमेकांना फराळाची ताटे दिली जात. भेटवस्तूंची देवाण घेवाण होई. त्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण असे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षात दिवाळीने थोडे वेगळे स्वरूप घेतले असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले, त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. दिवाळीमध्ये काही बदलही झाले. यानिमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ, मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करीत असतात. दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकाची मेजवानी तर सुट्टीत मिळत आहेच. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले असले तरी दिवाळी आनंदमय आहे. रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग मुळे पणत्यांची शोभा कमी झाली.पण अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे,ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते. खरेदी बारा महिने होत असल्यामुळे दिवाळी खरेदी चे महत्व कमी झाले असले तरी सतत खरेदी करण्याचा उत्साह असलेला वर्ग आणि जे खरोखरच सणासाठी खरेदी करतात असा वर्ग बाजारात गर्दी करत आहे. बाजारातली गर्दी लोकांचा उत्साह वाढल्याचे दाखवून देत आहे. रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. आनंदाचा कोणताही क्षण मनाची दिवाळी साजरी करत असतो! दिवाळी आता उंबरठ्यावर आली असताना माझ्या मनात ती उजळू लागली आहे. अशीच आपल्या सर्वांची दिवाळी आनंदमय जावो हीच सदिच्छा!
रेखा
आँखो में महके हुए ख्वाब जिचे पाहून आपलेही अंदाज खुमारतात… ती रेखाआजकल पांव जमीं पर नहीं पडते मेरे म्हणताना आपलंच पाऊल घसरवायला लावते … ती रेखापिया बावरी पिया बावरी म्हणते जी आणि उगाचंच कावरंबावरं आपल्यालाच करते… ती रेखा*जिंदगी जब भी तेरे बज्म में लाती है- ये जमीं चाँद से बेहतर * वाटायला मजबूर करते… ती रेखासून सून दीदी तेरे लिये इक रिश्ता आया है असं म्हणताना हिच्याशीच रिश्ता बनवावा असं वाटू लागतं … ती रेखामन क्यूँ बहका आधी रात को म्हणताना आपल्यालाही *रातभर ख्वाबमे देखा करेंगे तुम्हे ” अशी बहकवायला लावते … ती रेखाकतरा कतरा जीना है म्हणत जगायची आस लावते… ती रेखा सलाम-ए -इश्क म्हणते ती, पण उसके आगे की दास्तां आपल्यालाच गायला लावते…. ती रेखाइन आँखोंकी मस्ती में गुणगुणताना तिच्याशी जुस्तजू * करत * दिल चीज क्या है आपलीच जान घेणारी .. ती रेखाये क्या जगह हैं दोस्तो पासून ये कहाँ आ गये हम पर्यंत मजबूर हालात * इधरभी और उधरभी करून टाकते.. ती रेखा परदेसीया ये तूने क्या किया ? असं मैत्रिणींसमोर विचारून तुमने कभी किसीसे प्यार है? असले प्रश्न टाकून भुलवते … ती रेखा नीला आसमान सो गया म्हणून खयालात बुडवून टाकतांनाच “रंग बरसे म्हणत अनेक रंग उधळवायला भाग पाडणारी .. ती रेखागुम है किसीके प्यार में असं सुबह- शाम गायला लावून अगर तुम ना होते तो हमें और जीने की चाहत नहीं रहती वो …. ती रेखाअरे रफ्ता रफ्ता देखो आंख जिसे लडी है पासून कैसी पहेली जिंदगानी पर्यंतच्या प्रवासात अनेक सीमारेखा ओलांडून टाकते .. ती रेखा सदाबहार रेखाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ओंजळ….
रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती….’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते करदर्शनम्’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो! ओंजळ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रीती राहत नव्हती. गंगा स्नानानंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे! त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाच वेळी मिळवली. ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी वाटते !दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने दान देण्यासाठीच असते! फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते. ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते.ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते! भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहत नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते! ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा होमात घालत असतात, तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात, तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते! ‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळींच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. त्यांना फार तर पैसे देऊ नये पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे. आपण लक्ष्मीचे जे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ,असे ते चित्र असते. अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असं मनात येतं! लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो. आत्ता आठवली ती व्ही शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री ,जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे! आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही “ओंजळ “शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असं मला वाटतं, पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी मला वाटतं!
मैं शायर बदनाम मैं चला, मैं चला महफ़िल से नाकाम मैं चला, मैं चला मृत्यू…. एक भयंकर पण अटळ सत्य. खरतरं आपण सगळे या गोष्टीला खूप घाबरतो. कोणी कितीही या गोष्टीला घाबरला, पळायचा प्रयत्न केला किंवा ही गोष्ट पचत नसली तरी, हे एक असं सत्य आहे जे सगळ्यांच्याच पदरी पडणार आहे. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा पण या भयंकर अश्या सत्य गोष्टीला तोंड द्यावंच लागतं. कधी कळत तरी कधी नकळत. खरंतर नकळत वाल प्रमाण जास्त. कारण १00 पैकी ९९ टक्के लोकांना हे समजतंच नाही की आता आपला शेवट आला आहे. १ टक्के लोक असे आहेत की ज्यांना ही अनुभूती किंवा प्रचिती येते. अनुभूती च म्हणावं लागेल. कारण ९९ टक्के लोकांबरोबर ही गोष्ट नकळतच घडते. त्यांना कळत सुद्धा नाही ती वेळ, तो काळ, तो क्षण त्यांचा शेवटचा क्षण आहे. आणि म्हणूनच बहुदा लोक घाबरतात मृत्यूला. कोणी स्वतः च्या मृत्यूला घाबरतात “ की माझ्या नंतर माझ्या लोकांचं काय होईल”, तर कोणाला दुसऱ्याच्या मृत्यूची भीती असते “ की जर आपली आवडती व्यक्ती गेली तर आपलं काय होईल किंवा त्याच्या शिवाय आपण कसे जगू हे सगळे प्रश्न पडतात”. कारण कोणाचाही मृत्यू नंतर उरत ते फक्त वैराग्य, दुरावा, असंख्य प्रमाणात येणारं नैराश्य आणि दुःख. कुणासाठी कायमच तर कुणा साठी काही काळाकरीता. आणि म्हणूनच बहुदा सगळे मृत्यूला घाबरतात. चित्रपट “नमक हराम”. (1973) मुख्य भूमिकेत “ राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि रेखा”. या गाण्याचे बोल – आनंद बक्षी, संगीतकार – आर. डी. बर्मन आणि गायक – किशोर कुमार. हे एक सुंदर पण एक उदास गीत. माझ्या मते या गाण्यात जीवनातलं एक कटू सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मेरे घर से तुमको, कुछ सामान मिलेगा दीवाने शायर का, इक दीवान मिलेगा और एक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम मैं चला… आयुष्य भर आपण किती संघर्ष करतो किती तरी गोष्टीं साठी. काही भौतिकवादी तर काही भावनिक असतात. आपल्या स्वप्नांच्या पुरती करता आयुष्याशी झगडत असतो. श्रीमंती, राग, लोभ, अहंकार, अपेक्षा, प्रेम अश्या सगळ्या गोष्टीच्या अवती भवती भटकत असतो. आयुष्यभर सगळ्यात स्वतःला गुंतवून ठेवतो. पण शेवटी काय सगळ्या गोष्टी जागच्या जागीच राहतात आणि आपण आयुष्यच्या पलीकडे निघून जातो, एकटेच, यातली कुठलीही गोष्ट आपल्या बरोबर न घेता. शेवटच्या क्षणी या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा येत नाही. काही लोकांचे स्वप्न तर दूर आयुष्य सुद्धा अर्धवट राहतं. शोलों पे चलना था, काँटों पे सोना था और अभी जी भर के, किस्मत पे रोना था जाने ऐसे कितने, बाकी छोड़ के काम मैं चला…. काही लोकांच्या आयुष्यात फक्त दुःख च असत का? आयुष्यभर त्यांना संघर्षच करावा लागतो का? कुठे ही आराम नाही, एका नंतर एक संघर्ष, आयुष्यभर तडजोडी. सतत निराशा. कितीही positive विचार केला तरीही निराशाच हाती येते. अश्यात मनुष्य आशावादी न होता निराशावादीच होत जातो. म्हणून बहुकेत काही लोक आपलं आयुष्य स्वतः च संपवतात किंवा तसा प्रयत्न तरी करतात. किती विचित्र मनःस्थिती असेल या लोकांची. रास्ता रोक रही है, थोडी जान है बाकी जाने टूटे दिल में, क्या अरमान है बाकी जाने भी दे ऐ दिल, सबको मेरा सलाम, मैं चला हे कडवं खरंतर फक्त आणि फक्त त्या १ टक्के लोकांसाठी आहे ज्यांना हे समजल असत की आता आपला शेवटचा क्षण आला आहे. आणि आता सगळं संपणार. पण काय करू शकतो तो त्यावेळेस? जास्तजास्त त्याच्या काही अपुऱ्या इच्छा- अपेक्षा सांगेल, काही राहून गेलेलं गुपित share करेल, थोडं आपल्या माणसांना जवळ घेईल, थोडं त्यांच्या समोर रडून घेईल. थोडं त्यांना सांगेल सांभाळा स्वतःला आता मी राहणार नाही तुम्हाला सांभाळायला. बस अजून काय करू शकणार तो……. आणि त्या शेवटच्या क्षणाची वाट बघेल. खूप कठीण असत हे सगळं अनुभवण. सतत त्रास होत असतो पण करू काहीच शकत नाही. (हे सगळे विचार झाले माझ्या सारख्या एका सामान्य व्यक्तीचे. कारण काही लोकं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करू शकतात किंबहुना विचार करतात. त्यांना मृत्यूची अजिबात भीती नसते. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात काही ध्येय प्राप्त करायचे असतात ज्यात त्यांना मृत्यूच्या भीती पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. अश्या व्यक्तींचे सुध्दा दोन प्रकार असतात एक वाईट प्रवृत्तीचे लोक तर दुसरे चागल्या प्रवृत्तीचे. दुसऱ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आपल्या देशातल्या शूर आणि वीर सेनानी येतात, जे आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणाची आहुती देतात आणि स्वःताला अमर करून जातात. आणि या उलट जे वाईट वृते चे. या लोकांना स्वतः च्याच काय पण दुसऱ्यानंच्या जिवाची सुद्धा पर्वा नसते, स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणाला ही मारू शकतात किंवा कोणाचाही जीव घेऊ शकतात. खरंतर प्रत्येकाची मृत्यूची वेळ आधीच ठरली असते. कारण ज्याची वेळ आली नसेल तो किती ही मोठ्या आजारातून किंवा अपघातातून बाहेर पडतो, तेव्हा आपण हे म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती आली. या उलट एक छोटीशी गोष्ट सुद्धा कोणाच्या मृत्यू च कारण बनू शकतं. तेव्हा बहुतेक काळही आला असतो आणि वेळही. covid ची परिस्तिथी तर खूपच वाईट होती, हजारो – लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. मग काय इतक्या सगळ्या लोकांचा एकत्र च काळ ही आणि वेळ ही आली असेल का? हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.)
सांगता गणेशोत्सवाची….
अनंत चतुर्दशी झाली! आज सकाळ उगवली, तीच मुळी मरगळलेली! सकाळी उठून बाल्कनीत गेले तर मागच्या कॉर्पोरेशनच्या मैदानावर वेगळेच दृश्य दिसत होते. कॉर्पोरेशनचे कामगार कामावर येऊन स्वच्छता मोहीम सुरू झाली होती. कालपर्यंत मंगलमय वातावरणात असणारे ते ठिकाण, आज अगदी मांडव परतणे झाल्यावर दिसणाऱ्या लग्न कार्यालयासारखेच दिसत होते! जिकडे तिकडे कागद, फुलांचे निर्माल्य, डेकोरेशनचे मोडके तोडके साहित्य, आणखी काय काय! तिथे दोन मोठे पाण्याचे टॅंक गेले दहा दिवस पाण्याने भरून ठेवले होते. प्रत्येकाच्या गणेश विसर्जनाच्या पद्धतीप्रमाणे- दिवसाप्रमाणे रोज गणपती विसर्जनासाठी लोक येत होते. बाजूलाच कचरा टाकण्यासाठी निर्माल्य कुंड होते. कोणी त्यात व्यवस्थितपणे कचरा टाकत, तर कोणी दुरूनच फेकत! ज्यामुळे कुंडा बाहेरही कचरा! आरती साठी दोन टेबले होती, जिथे गणेश मूर्ती ठेवून लोक बाप्पाची आरती म्हणणे, नारळ फोडणे, पुन्हा पुन्हा देवाला ‘लवकर ये पुढच्या वर्षी’ अशी प्रार्थना करून मगच गणपतीला उचलत होते! आज सकाळी ते मोठे पाण्याचे टॅंक ग्राउंड वरच ओतले गेले. तळाशी राहिलेली माती खोऱ्याने काढली जात होती. रंगीबेरंगी पाण्याचे ओघळ बाहेर लांब पर्यंत वाहत होते. गेले २/३ पाऊस असल्याने आधीच भिजलेले ते मैदान आता आणखी चिखलमय दिसत होते.जणू काही सगळ्याचेच विसर्जन झाले होते. शेवटी गणेशाच्या मूर्तीची माती या जमिनीतच मिसळून जात होती. मन भरून आले! कालपर्यंत देव्हाऱ्यात विराजमान झालेल्या या मूर्ती आज पुन्हा मातीत मिसळल्या! मातीचा होतो, मातीत मिसळलो याप्रमाणे! मधला काळ म्हणजे फक्त रंगमंचावरील काही काळाचे आगमन असंच वाटलं मला! नकळत मनात आलं, शेवटी आपण म्हणजे तरी काय जन्माला येतो ते मातीचा गोळा म्हणून! त्याला घडवत आकार देत वाढवले जाते. आयुष्याच्या बालपण, तरुणपण, वृद्धत्व अशा अवस्था अनुभवत शेवटी मातीलाच मिळतो. पार्थिव गणेश आपल्याला हेच सांगतो. ‘या जगाचा मोह करू नका, हे तर सोडून जायचंच आहे, पण जोपर्यंत देहात आहात, तेव्हा चांगलं काही करा. प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा उत्सव असू दे!.’ जगण्याची ही उर्मी, आनंद आपण या गणेशा कडून शिकला पाहिजे…. कालच वाचनात एक कविता आली…. तळाशी जाता जाता, आधी अंगावर लागलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची.. मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर.. अलंकाराचे ओझं हलकं करायचं, कालांतराने.. स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे.. इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका, दैवत्वाची झालर सोडून द्यायची, आणि त्याच मातीचा भाग व्हायचं, जिथून आपण आलो होतो.. पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी, बाप्पा जाता जाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो…’ अशी एक सुंदर कविता आज व्हाट्सअप वर वाचायला मिळाली. कवी कोण आहे ते लिहिले नव्हते, पण अगदी सुंदर शब्दात बाप्पाच्या जाण्याच्या रूपाची सांगता या कवितेत व्यक्त झाली आहे, ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते! ‘गणेशोत्सव’ हा आता आपल्या सामाजिक जीवनाचे एक अंग झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्रती जागरूकता आणि एकत्र येण्याची वृत्ती वाढावी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. स्वातंत्र्य तर मिळाले, पण सार्वजनिक गणेशोत्सव मात्र वाढत्या प्रमाणात साजरा होऊ लागला.. त्याचे काही चांगले, काही वाईट असे रूप आता आपल्याला बघायला मिळते. गेला महिनाभर सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते राबत असतात. आपला देखावा अधिकाधिक चांगला, नाविन्यपूर्ण होण्यासाठी धडपडत असतात. तात्कालीन नवनवीन विषयांचा विचार करून त्यावर आधारित देखावे, जसे यंदा चांद्रयान मोहीम, पुण्याची मेट्रो यासारखे उत्तम उत्तम देखावे उभारले गेले. काही मंडळे समाजोपयोगी कार्यक्रम यानिमित्ताने आखतात. जसे रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत, वेगवेगळ्या स्पर्धा…. या उत्सवामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना काम मिळते. उद्योग धंदा वाढतो, त्यामुळे पैसा खेळता राहतो. नवीन पिढीसाठी हे उत्साहाचे टॉनिक असते. शाळा शाळातून गणपती पूजा, अथर्वशीर्ष या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. शाळेतील गणपतीचेही चांगले डेकोरेशन केले जाते. मुलांच्या रोजच्या शाळेच्या चाकोरीबद्ध जीवनात हा एक चांगला बदल असतो. आनंददायी अशा या गणेशोत्सवाची सांगता आज झाली. या बुद्धी दात्या गणेशाला आनंदाने निरोप घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा त्याच्याकडून घेऊया, म्हणजेच या गणेशोत्सवाची खरी सांगता झाली असे म्हणता येईल! जय गजानन!
ओल्या आठवणी
आषाढ -श्रावणा ची वाटचाल चालू झाली की माझ्या मनात अनेक ओल्या आठवणी पिंगा घालू लागतात! कधी पाऊस लवकर येतो तर कधी त्याची सुरुवात उशिरा होते, पण जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपोआपच मन आठवणीच्या पावसात चिंब भिजवून निघतं आणि आठवतात त्या छोट्या मोठ्या सफरी! अगदी अलीकडे म्हणजे साठी ओलांडल्यावरही माझ्या असं लक्षात आलं की अजूनही पावसाचं तितकंच आकर्षण आपल्याला आहे! खिडकीतून पाऊस बघताना छोटे छोटे वाहणारे पाण्याचे प्रवाह, पाण्यात खेळणारी मुलं आणि साठलेल्या पाण्यात सोडलेल्या कागदाच्या होड्या आपल्या ला आकर्षित करत असतात. असंच एक वर्षी आम्ही लवासाची छोटीशी सफर केली. माझी बहीण , तिचे मिस्टर, आणि आम्ही दोघे कारने लवासाला जायला निघालो होतो. आभाळ भरून आले होते, पण पावसाची सुरुवात नव्हती. लवकर जाऊन येऊ या म्हणून चहा घेण्यात सुद्धा वेळ न घालवता, आम्ही थर्मास मध्ये चहा भरून घेतला आणि तीन वाजता निघालो! जसजसे आम्ही माले गावापर्यंत आलो तसं बाहेरचं वातावरण बदलत चालले होते .पाऊस नव्हता.. हिरवाई मनाला प्रसन्न करत होती. आल्हाददायक निसर्ग दिसत होता. डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे मनाला उत्साह देत होते. हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि झिमझिम पडणाऱ्या पावसाने बऱ्यापैकी जोर धरला. पुढे पाऊस इतका वाढला की, गाडीतून आता उतरताच येणार नाही असं आम्हाला दिसून आलं. डोंगर उतारावर सगळीकडे लवासाची बांधलेली घरं ,पण हालचाल कुठेच दिसत नव्हती .शेवटी आम्ही लवासाच्या रस्त्यावरून दोन-तीन फेऱ्या मारल्या. गाडीत बसूनच चहा पिण्याचा स्वर्गसुख अनुभवलं! एकीकडे पावसाची मजा वाटत होती तर दुसरीकडे आपण बाहेर उतरून फिरू शकत नाहीये याचं वाईट वाटत होतं! पण निसर्गापुढे आपलं काही चालत नाही! आता रस्त्यावर पाण्याचे प्रवाह मोठे दिसत होते.बाहेर गार वारा सुटला होता, पण जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे, अशा विचारांने पावसाचा आनंद घेत होतो. पाऊस जरासा थांबला. खिडकीच्या काचा उघडल्या. तेव्हा एका झाडाखाली लहानशा खोपटा जवळ एक मुलगी कणसे विकत बसली होती.शेजारी छोट्याशा पाटीत निखारे फुलवून ती कणसं भाजत होती अर्थातच त्या तिथे आम्ही थांबलो. शाळेत जाणारी ती मुलगी सुट्टी असल्याने कणसं भाजून विकत होती. ती घेतली. कणसाचा आस्वाद घेत पुढे चाललो आणि भज्याची गाडी दिसली. भजी खाण्याचा आनंद घेतला आणि पुण्याकडे परतलो. जसे पुण्याकडे येऊ लागलो होतो, तस तसे वातावरण शहरी झाले. लवासाच्या ट्रीप मध्ये दिसलेला निसर्ग मनाच्या कोपऱ्यामध्ये ठेवून आम्ही पुन्हा एकदा शहरातील पावसाकडे परतलो. आठवणींचा एक पाऊस असा होता! हे अनुभवतानाच लहानपणचे अनेक आठवणींचे पाऊस माझ्या मनामध्ये रिमझिम करू लागले! रत्नागिरीत असताना पाऊस भरपूर! शाळा जवळ असली तरी छत्री, रेनकोट घ्यावा लागतच असे. शाळेत असताना शाळेच्या मैदानावरच छत्री उलटली आणि नखशिखांत भिजत घरी यावे लागले. त्यानंतर मात्र लाल, निळा आणि हिरवा असे तिरंगी रेनकोट घालून आम्ही तिघी मैत्रिणी पावसातून घरी येत असू ती ओली आठवण आली की अजूनही डोळ्यासमोर धूसर असे शाळेचे ग्राउंड दिसायला लागते!कॉलेजच्या काळात घाटावर सांगली सारख्या शहरात आले आणि पावसाची मजा कमी झाली. रस्ते अगदी घाण करणारा तो पाऊस झिमझिमत आला की अजिबात आवडत नसे, कारण कोकणात कितीही पाऊस पडला तरी तो डोंगर उतारावरून आलेला पाऊस क्षणात रस्ता कोरडा करत असे. पण घाटावर मात्र रस्त्यावर अगदी रपरपाट होत असे! पण घाटावरचा वळवाचा पाऊस मात्र खूप आवडला, कारण त्या पावसात गारा वेचत भिजायला मिळाले आणि गारांची एक ओली आठवण मनामध्ये रुतून बसली ! पण खरी मजा आली ती लग्नानंतर प्रथमच कोयना नगरच्या डॅम वर पावसात फिरताना! त्यावेळी डॅम वर जाण्यासाठी फारशी परवानगी लागत नसे त्यामुळे आम्ही छत्र्या हातात घेऊन डॅमवरून चालत फिरत होतो. नव्या नवलाईच लग्न आणि पावसातून फिरताना होणारा त्यांचा ओला स्पर्श, चाळीस-पंचेचाळीस वर्ष होत आली तरी ती ओली आठवण विसरू म्हणता विसरत नाही!संसारात मुलांच्या आगमनानंतर मात्र हे पाऊस प्रेम थोडं कमी करावं लागलं! पावसात भिजलं की होणारे परिणाम स्वतःबरोबर सर्वांनाच भोगावे लागत! पण अजूनही पाऊस आला की गरमागरम भजी करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर येते. आभाळात ढग दिसू लागले की, रानात मोर नाचू लागतात, तसं पहिला पाऊस आला की माझ्या मनमोराचा पिसारा फुलून येतो! या पहिल्या पावसाला भज्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो. उन्हाळ्याच्या दाहकतेनंतर येणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणींची उजळणी करणारा असतो असं मला वाटतं! मंगेश पाडगावकर दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला ‘लिज्जत’ पापडाच्या जाहिरातीत पावसाचे एखादे गाणे लिहीत! ती पावसाची गाणी वाचत आपण मोठे झालो. सर्व ऋतूंचे आगमन हे जरी आपापल्या परीने आल्हाददायक असले तरी पाऊस हा त्यात खूप महत्त्वाचा आहे! 27 नक्षत्रातील नऊ गेली तर किती उरली? असं कोडं आम्ही लहानपणी घालत असू. नऊ नक्षत्रे पावसाची गेली तर उरली किती? शून्य असं उत्तर असे. असा हा पाऊस! ओल्या आठवणींच्या पाऊसगारा वेचताना किती वेचू अन् किती नको असे होते! पण शेवटी गारच ती! जमिनीवर पडली की काही वेळातच ती विरघळते! तसं माझ्या मनात होतं!” ओल्या आठवणी” वेचता वेचता मन किती आणि कुठे भरकटत जातं कळतच नाही!
पाऊस आणि आठवणी…
पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो. त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात. पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….