Author: Ujwala Sahasrabudhe
वळीव..
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं! लहानपण डोळ्यासमोर आले, परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणाततर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती. सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू! आंबे बाजारातसुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वहात असायच्या, पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा. बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूपअसे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे. दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे!हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडांवर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे! अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरेलगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे. डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते. पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग! असा ओथंबून येतो की, त्याची होणारीबरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की, ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरीकधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे! काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटूनयेते आणि काळे बनतात. योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!
सोनसळी बहावा
एका रात्री पाहिला बहावा,चंद्र प्रकाशी बहरताना!गुंतुन गेले हळवे मन माझे,पिवळे झुंबर न्याहाळताना! निळ्याशार नभिच्या छत्राखाली ,लोलक पिवळे सोनसावळे!हिरव्या पानी गुंतुन लोलक ,सौंदर्य अधिकच खुलून आले! शांत नीरव रात भासली,जणू स्वप्नवत् स्वर्ग नगरी!कधी न संपावे ते अपूर्व क्षण,आस लागली मनास खरी! फुलल्या बहाव्याच्या मिठीत,सामावून अलगद जावे!मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,अंगोपागी बहरुन यावे !
तोरण
चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे. तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो. पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते. तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे मिळतात. त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते. नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्दकळांचे तोरण बांधत आहे.
पाडव्याच्या शुभेच्छा!
कडुलिंबाचा टाळा ..सोबत फुलांच्या माळा!चमके साडी जरतारीची,अन् गोडी साखर माळेची!कळस चांदीच्या गडूचा,सण साजरा करु चैत्र गुढीचा!
जागतिक चिमणी दिन..
चिमणी म्हटलं की मला वि. स. खांडेकर यांच्या एका कादंबरीतील, बहुतेक ‘अमृतवेल’ या कादंबरीतील वाक्य आठवते, ‘मुली म्हणजे माहेरच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्या! कधी भुरकन उडून जातील सांगता येत नाही!’लग्न झालं की मुली दुसऱ्या घरी जातात.खरंच, मुलीचा लहान असल्यापासून चिमणीसारखा चिवचिवाट, नाजूकपणा, अंगणात खेळणं बागडणं डोळ्यासमोर येतं! मुलं मात्र पोपटासारखी वाटतात असं मला उगीचच वाटतं! पण मुलगी मात्र चिमणी सारखीच असते. छोट्या चणीच्या मुलीला लहानपणी ‘चिऊ’म्हटलं जातं, मग ती चाळीशीची झाली तरी आपल्यासाठीच ‘चिऊ’च रहाते! साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी अशा करड्या रंगाच्या छोट्या दिसणाऱ्या चिमण्या खूप होत्या. अंगणात काही धान्याचं वाळवण घातलं की या चिमण्यांचे ‘ चिमण घास’ चालू असायचे पण त्यांना हाकलायला नको वाटायचं! माझी मुलगी लहान असताना आम्ही शिरपूरला होतो .तिथे इतक्या चिमण्या असत की त्या चिमण्यांसाठी म्हणून आम्ही खास बाजरी आणून ठेवली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलांना बसवायचं आणि समोर बाजरी फेकायची! की तेथे चिमण्या गोळा होत असत, माझी छोटी त्या चिमण्या बघत आनंदाने तिच्या चिमण्या हाताने टाळ्या पिटायची! आता त्या चिमण्या गेल्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या! शहरात सिमेंटच्या घराच्या जंगलात चिमण्या आता दिसतच नाहीत. चिमणीच्या आकाराचे, चॉकलेटी रंगाचे, ऐटबाज पंखांचे, छोटे पक्षी दिसतात पण त्या खऱ्या चिमणीची सर काही त्यांना येत नाही! कावळा चिमणीच्या गोष्टीतील चिमणी हुशार असे, ती नेहमीच कावळ्या पेक्षा अधिक समंजस आणि शहाणी, त्यामुळे कावळ्याचे शेणा चे घर वाहून गेले तरी चिमणी आपल्या मेणाच्या मऊ मुलायम, न भिजणार्या घरट्यात राही!’घर माझं शेणाचं पावसानं मोडलं, मेणाचं घर तुझं छान छान राहिलं’ म्हणणाऱ्या कावळ्याला चिमणी तात्पुरता आसरा सुद्धा देत असे. देवाण-घेवाणीचं हे प्रेम निसर्गातील पक्षी आणि प्राण्यात सुद्धा असं दिसतं! पूर्वी पहाटे जाग येई ती चिमण्यांच्या कलकलाटाने! लहान गावातून निसर्ग हा सखा असे. शहरात येऊन या निसर्गाच्या मैत्री ला आपण मुकलो असंच मला वाटतं! सकाळ होते तीच मुळी गाड्यांचा खडखडाट ऐकत आणि कामाची गडबड मागे लावून घेत.. स्वच्छंदी आयुष्य जगायचंच विसरलो जणू! कोरोना च्या काळात माणसं बंदिस्त झाली पण पक्षी थोडे मुक्त झाले. सकाळचा पक्षांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. निसर्गात असणार्या प्रत्येक जिवाचे काहीतरी वेगळेपण असते! तसेच या चिमणीचे! चिमणीचा एवढासा जीव थोड्याशा पाण्यात पंख फडफडवून स्वच्छ आंघोळ करताना दिसतो तेव्हा मन कसं प्रसन्न होतं तिला बघून! कोणत्याही गोष्टीला छोटी किंवा लहान सांगताना आपण चिमणीची उपमा देतो. नोकरीवरून येणाऱ्या आईची वाट बघत असणारी मुलं चिमणी एवढं तोंड करून बसलेली असतात तर या छोट्यांच्या तोंडचे बोल हे ‘ चिमणे बोल ‘ असतात. लहान बाळाचे पहिले बोल,चिमखडे, चिमणीच्या चिवचिवाटासारखे वाटतात. नव्याने अन्न खाणाऱ्या बाळाला आपण ‘हा घास काऊचा, हा घास *चिऊचा म्हणून’ भरवतो आणि बाळ मटामटा जेऊ लागते! कोणत्याही छोट्या गोष्टीचं प्रतीक म्हणजे चिमणी! रानात एक नाजूक गवत असतं त्याला आपण ‘ चिमणचारा’ म्हणतो.लहान बाळाचे लाहया, चुरमुर्याचे छोटे घास म्हणजे चिमणचाराच असतो. पूर्वी वीज नसायच्या काळात कंदीला बरोबर चिमणी असायची. छोट्या आकारातील हा दिवा म्हणजे चिमणीसारखा! आज जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी ही छोटीशी चिमणी विविध रुपात आठवणीत आली. आपल्या साहित्यरुपी प्रचंड विश्वात मी दिलेला हा छोटासा चिमणाघास !
जागतिक कविता दिन….
कविता माझी येई अचानक ,काळजाच्या त्या गाभ्यातुन …अलगद कोमल शब्दछटातुन …भावनेच्या शब्द झऱ्यातुन…. कधी असते ती कल्पना भरारी..कधी ती देते दुःख वेदना उरी..कधी ती असते हसरी साजरी..तर कधी उमटे व्यथेतून खरी! मनीच्या गर्भी रुजून रहाते…चैतन्यावर ते बीज पोसते…अंकुरे जेव्हा मनात तेव्हा…इवल्याशा रोपात बहरते ! जशी उमलते , तशीच फुलते..कविता जगी अशीच जन्मते..मी न कधी ती सांगू शकते..कविता मज ती कशी स्फुरते !
रंगपंचमी
अशाच एका सायंकाळी,अवचित गेली नजर आभाळी!दिसला मज तो वनमाळी ,खेळत रंगांची ही होळी ! करी घेऊनी ती पिचकारी,होई उधळण ती मनहारी !सप्तरंगांची किमया सारी,रंगपंचमी दिसे भूवरी ! सांज रंगांची ती रांगोळी,चितारतो तो कृष्ण सावळी !क्षितिजी उमटे संध्यालाली,पश्चिमेवर तो सूर्य मावळी ! फाल्गुनाच्या उंबरठ्यापाशी,सृष्टी अशी रंगात बरसली !घेऊन नवचैतन्याच्या राशी,चैत्र गुढी ही उभी राहिली !
प्रवास स्त्री – जीवनाचा
शतकानुशतकांचा होता स्त्रीस बंदिवास !स्त्री मुक्तीचा तिने घेतला सतत ध्यास !घेऊ लागली आता जरा मोकळा श्वास !उपभोगीत आहे स्त्री म्हणून मुक्त वास! स्त्री आणि पुरुष निर्मिले त्या ब्रह्माने !विभागून दिली कामे त्यास अनुरूपतेने!जनन संगोपन यांचे दायित्व दिले स्त्री ला!आधार पोषणाचे कार्य मिळे पुरुषाला ! काळ बदलला अन् पुरुषी अहंकार वाढला!पुरुष सत्तेचा जुलूम जगी दिसू लागला !स्त्री अबला म्हणून जनी मान्य झाली!अगतिक दासी म्हणून संसारी ती जगली !……………………………. स्त्री शिक्षणाचा ओघ जगी या आला!स्त्री चा चौफेर वावर जनी वाढला!चिकाटी, संयम जन्मजात लेणे तिचे !चहू अंगाने बहरले व्यक्तिमत्व स्त्रीचे ! सर्व क्षेत्रात मान्य झाली स्त्री पुरुष बरोबरी !दोन पावले पुढेच गेली पण नारी!न करी कधी ती कर्तव्यात कसूर !जीवन जगण्याचा मिळाला तिलाच सूर! स्त्री आणि पुरुष दोन चाके संसाराची !समान असता वेगेची धाव घेती !एकमेकास पूरक राहुनी आज संसारी!दोघेही प्रयत्ने उंच नभी घेती भरारी !
स्त्री कालची आणि आजची!(भाग २)
‘कशी आहे ती?’ शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना! आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते! त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात. स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे. काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!