कृष्ण सावळी,राधा बावरी !खेळत होती,यमुना तीरी ! मुग्ध होऊनी,मनी तोषूनी!राधा गुंगुनी ,गेली मन्मनी! राधा कृष्णाची,रास रंगली!गोकुळात ती,टिपरी घुमली ! सारे गोकुळ,गाऊ लागले!नाचू लागले,तद्रुप झाले! कृष्ण किमया,वृंदावनी त्या ,कालिंदी काठी,अवतरली !
Author: Ujwala Sahasrabudhe
श्रीकृष्ण
खट्याळ श्रीकृष्णाने,लावला लळा ! जसा मथुरेला,तसा दुनियेला!सगुण रूपात येऊन,अंतरंग हेलावून गेला ! बाललीलात रंगून,गोपीना लोभवून ,दूर गेला मथुरेला,राधेची धून घेऊन ! दुष्ट कंसाचा वध करून,न्याय दिला प्रजेला,मनुष्यत्वात राहून, देवत्व गुण प्रगट गेला ! पांडवांचा सखा बनून,कुरुक्षेत्री अवतरला !असत्य, दुर्गुणांचे,निर्दालन करून,भगवद्गीता तो वदला !
कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….)
कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस ! तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं ! कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात ! पावसाच्या सरी बरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी एक हातचा तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !
ती *वेळ ….
आज गोकुळात नंदा घरी मोठी गडबड उडाली होती! यशोदा अस्वस्थ होती येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत! घरातील मंडळी आणि तिच्या सख्या तिची काळजी घेत होत्या. कधी एकदा ते बाळ जन्माला येतंय याची सारे गोकुळ वाट बघत होते! बाहेर श्रावणाच्या सरीवर सरी येत होत्या. सारं रान कसं हिरवंगार झालं होतं! गोप गोपाल आनंद घेत होते सृष्टीचा!मुक्त, भारलेले, चैतन्यमय वातावरण गोकुळात होते! त्याउलट मथुरेत कंसाच्या कारागृहात वसुदेव- देवकी सचिंत बसले होते. देवकीचे दिवस भरत आले होते. कंसाचे मन अस्वस्थ होते. कंसाने आत्तापर्यंत जन्मलेली सातही बालके जन्माला आल्या क्षणीच मारून टाकली होती. प्रत्येक जन्माला येणारे बाळ त्याचा ‘आठवा’,त्याला मारणारा ‘काळ’असेल का? या भीतीने प्रत्येक बाळ त्याने यमसदनास पाठवले होते. पण खऱ्या ‘आठव्या’ चा जन्म आज होणार होता. तेही बाळ मारलं गेलं तर …म्हणून वसुदेव देवकी दुःखी होते.. पण आज परमेश्वरी लीले चा अवतार होणार होता! बंद कारागृहाच्या आत नवचैतन्य घेऊन ते बाळ जन्माला येणार होते. हुरहुर होती ती अशांना की, येणारा जीव परमेश्वरी अंश असणार आहे हे माहीत नसणाऱ्याना! रात्रीचे बारा वाजले बाहेर पावसाची धुवांधार बरसात चालू होती! देवकीने जन्म दिला होता एका बाळाला ..सुकुमार, सुकोमल अशा… आता कंसाला सुगावा लागण्याच्या आत ते बाळ बाहेर काढायला हवे होते!वसुदेवाने एक टोपली घेतली. त्यांत मऊ शय्या तयार केली. देवकीने ते गोजिरवाणी बाळ हृदयाशी धरले. त्या इवल्याश्या जिवाला तिला सोडवेना! बाळाला कुशीत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मन घट्ट करून तिने बाळाला टोपलीत ठेवले. मऊशार वस्त्राने पांघरले. जणू तिने आपल्या मायेचे आवरण त्याच्यावर घातले, की ज्यामुळे ते कोणत्याही संकटापासून दूर राहणार होते! तो गोंडस जीव तिला हसत होता. जणू म्हणत होता,’ अगं,मी तर जगाचा त्राता! तू काळजी करू नकोस, मी सुरक्षित राहीन!’ वसुदेव बाळाची टोपली घेऊन यमुना तीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. ‘या बाळाला मी कसं नेणार पार?’ असा विचार त्याच्या मनात येत होता. टोपली डोक्यावर घेऊन मोठ्या धीराने त्याने नदीच्या पाण्यात पाय टाकला. समोरचा जलमार्ग कापून जायचे होते त्याला! पण जसा टोपलीतील बाळाच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला तसे पाण्याचा प्रवाह त्याच्यासाठी मार्गच बनला जणू! ती वेळ त्याची होती. दोघेही यमुना पार झाले. तिकडे नंदाच्या घरी यशोदेच्या कुशीत नुकतेच जन्माला आलेले कन्यारत्न होतेच. यशोदेच्या कुशीत त्या बाळाला ठेवून तिच्या बाळाला नंदाने वसुदेवाच्या स्वाधीन केले. आपल्या कुशीत नुकतंच जन्माला आलेला बाळ दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं! किती वाईट वाटलं असेल यशोदेला! आणि हेही माहीत होतं की, हे बाळ आपल्याला परत दिसणार नाहीये! यशोदे ची लाडकी मथुरेत आली वसुदेवा बरोबर! देवकी प्रसूत झाल्याचे कळताच कंस कारागृहात आला. बाळाचा जन्म होऊन दुसरं बाळ तिथे आणण्याच्या या प्रक्रियेत किती वेळ गेला असेल देव जाणे! पण कृष्ण सुरक्षित स्थळी पोचला आणि यशोदेची कन्या देवकीकडे आली! त्यागाची कसोटीची वेळ होती प्रत्येकाच्या! वसुदेव- देवकी ने मनावर दगड ठेवून आपलं बाळ दुसरीकडे सोपवले होते, तर नंद- यशोदेने आपली छोटी लेक दुसऱ्याच्या हाती दिली होती! तो बाल जीवही त्यागासाठी सिद्ध होता जणू! वसुदेव देवकीला उघड्या डोळ्यांनी त्या बालिकेच्या मृत्यूला पहावे लागणार होते! जीवनातील एक कसोटी पूर्ण करावी लागणार होती. या सगळ्यांना खेळवत होता तो ‘परमात्मा’ ज्याचा जन्म, दुष्टांच्या संहारासाठी झाला होता. त्यासाठी बालरूप घेऊन तो पृथ्वीवर अवतरला होता! त्याच्या नवीन जन्माची हीच ती ‘वेळ’ होती. कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना कृष्णाचे हे आश्वासन आपल्या मनात कायम रहाते, ‘यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्..
तिरंगा
तीन रंगात फडकत राहील,माझ्या देशाचा सन्मान !आकाशातून विहरत जाई,भारताचा अभिमान ! केशरी, पांढरा,अन् हिरवा, रंगध्वजाचे येत क्रमाने.!वैराग्याला प्रथम स्थान ते.. .. दिले असे देशाने! पावित्र्य जयाचे दावून सर्वा,शुभ्र पांढरा मध्ये असे!हिरव्या रंगाने ती अपुली, सस्यशामल भूमी दिसे. ! विजयचक्र हे मधोमध दावी‘विजयी भव’ चे रूप सर्वा!चक्रा वरच्या आऱ्या दावती, देशभक्तांच्या शौर्या! उंच लहरता तिरंगा अपुला,स्वातंत्र्याची ग्वाही देतसे!दरवर्षी नव जोशाने हा,स्वातंत्र्यनभी फडकतसे! गर्वाने आम्ही पुजितो,जो देशाचा मानबिंदू खरा!त्याच्या छत्राखाली भोगतो,स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा! स्वातंत्र्यदिन, असो वा प्रजासत्ताक दिन असो!आमचा तिरंगा, फडकत राहील !तिरंग्याच्या रक्षणासाठीप्रत्येक बांधव,सज्ज राहील!
बंध राखीचे….
रक्षाबंधन निमित्ताने विवेक ची…माझ्या भावाची आठवण येते.सण साजरा होतो. भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो.भाऊही भेटवस्तू देऊन बहिणी ला खूश करतो.राखीपौर्णिमा साजरी होते! पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेक ने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते! जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वी ची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते. आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरी ला लागला होता. मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूर ला होता. आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते. वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरी हून नांदेड ला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीला च होते.दिवाळीच्या सुट्टी त घरी जायला मिळत असे. त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टी साठी नांदेड ला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर – नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९-३०/१० पर्यंत नांदेड ला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीद चा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. बरोबर मिरजेच्या स्टॅण्ड वर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवांधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं! एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस् टीत बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते..अधूनमधून माझी उंची कमी असल्याने पाण्यात पूर्ण डोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई.पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅग मधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो.भावाचं नातं आणखीनच ध्रुढ करतो…इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो! आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो..आता विवेक पंचाहत्तरी कडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणी चे नाते तितकेच घट्ट आहे! ….
आला आषाढ -श्रावण
चैत्र वैशाखात उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते! ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘नेमेची येतो मग पावसाळा’ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे,करवंदे,जांभळे, फणस हाउन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते. पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते! लगेच पाणी नियोजन सुरू होते!पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात.’ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस गाण्यापर्यंत! सकाळच्या अधून मधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं! ‘जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी’ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टी च्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो.वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची आॅर्डर येते.कांदे नवमी साजरी होते.आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो.गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात भिजत च साजरी होते.आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते! आठ पंधरा दिवसातच सृष्टी बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे.. कविता आठवायला लागते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते!पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधून मधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे,तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो.’ रिमझिम पाऊस पडे सारखा’…’ असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘श्रावणात घन निळा बरस ना’ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सव प्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो!’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं! कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची,आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो.सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते.बघता बघता नारळी पौर्णिमा येते.पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो.कोळी लोकसमुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते.सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते.मग ओढ लागते ती भाद्रपदाची!श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पा ची चाहूल लागते.पावसाचा जोर कमी होऊ लागतो.सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो. पण तो मनात मुरलेला,भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो.त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो. .’अस्सा श्रावण सुरेख बाई’…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…
ऋतू वर्षा
हसरा श्रावण,गातच येईल,वर्षे चे गायन,आनंद देईल! पाऊस बरसे,डोंगर तळ्यात,तुडुंब वहाते ,जीवन डोहात! पोपटी पानां चीनक्षी खुलली ,रंगीत फुलांची,बाग सजली ! अर्पण करण्या,आतुर झालेली,सृष्टीची ओंजळ ,तृप्त भरलेली ! चराचरामध्ये,निसर्ग निर्मळ!आनंदे पहातो,सृष्टीचा हा खेळ! वर्षा ऋतू येतो,सृष्टी ला वेढितो!सर्व ऋतूनाही ,संजीवन देतो !
गुरूविण आधार जगी या नाही lहात गुरूचा मज मस्तकी सदैव राही lहीच प्रार्थना करतसे मी गुरूकडे lपार करीन गुरुकृपेने संकटांचे कडे l
चैतन्य
तू एक अंकूर चैतन्याचा, तू पाईक हो ईश चरणांचा, एकरूप हो त्या तत्त्वाशी, चैतन्य पूर्ण हो