कृष्णावळ म्हणजे कांदा! हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि मनात त्याचा अर्थ लावत बसले! सहजच व्हाट्सअप डिक्शनरीत सापडले ते असं!कांदा उभा चिरला की तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला तर तो चक्राकृती दिसतो! ही दोन्ही आयुधे कृष्णाची म्हणून कांद्याला गमतीने कृष्णावळ म्हणतात! किती छान शब्द मिळाला कांद्याला! आपल्या रोजच्या जीवनात कांद्याला खूप महत्त्व आहे हे आपण जाणतोच! झुणका- भाकरी, कांदा, असं गरिबांचे जेवण! कांदा -भाकर म्हटले की मस्तपैकी भाकरी, फोडून ठेवलेला कांदा आणि झुणका हे पदार्थ डोळ्यासमोर येतात. खरं तर आता सर्वांनाच या पदार्थांची अपूर्वाई झाली आहे! बाकीचे पदार्थ हॉटेलच मिळतातच, पण अलीकडच्या काळात गरमागरम झुणका- भाकर केंद्र ही तेवढ्यात जोरात चालते! जेवणात कांदा नसेल तर ते जेवण अळणी वाटतं! फार पूर्वी काही समाजात कांदा लसूण हे पदार्थ निषिद्ध मानले जात. इतकं काय वाईट होतं त्यांत हे मला माहित नाही, पण माझं आजोळ कर्नाटकात, तिथे या गोष्टी घरात सुद्धा आणल्या जात नसत! कांदा लसूण औषधासाठी म्हणून आणलं तर त्याची टोपली अगदी कोपऱ्यात एका बाजूला ठेवली जात असे. त्यामुळे माझी आई सांगत असे तिला कांदा लसूण याची अजिबात सवय नव्हती. अगदी त्याचा वास सुद्धा सहन होत नसे! पण सासरी आल्यावर हे पदार्थ सर्वांनाच लागत त्यामुळे ती हळूहळू शिजलेला कांदा, लसूण तरी खाऊ लागली. खरंतर कांदा किती गुणदायी! एक तर कोणत्याही सीझन मध्ये मिळणारा आणि बटाट्याप्रमाणेच सर्वांशी मिळतेजुळते घेणारा! असा हा कांदा चातुर्मासात खात नाहीत.. पण मला वाटतं या गोष्टीला पूर्वजांनी एक वेगळा संदर्भ दिला होता. चातुर्मासाचे दिवस हे पावसाळ्याचे दिवस असतात. या दिवसात कांदा पचनासाठी योग्य नसतो तसेच तो बेसन पिठासह भजी, झुणका यात वापरला तर पोटाला आणखीच त्रासदायक! त्यामुळे तामसी आहारात कांदा- लसूण अधिक वापरला जातो असे आजी म्हणे.. अशा संस्कारात वाढलेली मी अजूनही कच्चा कांदा, लसूण फारसं खात नाही! कांदा उभा पातळ कापून त्यात डाळीचे पीठ घालून केलेली गरमागरम खेकडा भजी , पावसाळ्यात तर अगदी तोंडाला पाणी आणतात! कांदा भजी हा तसा सर्वांच्या चावडीचा पदार्थ. तसेच कोणत्याही तोंडी लावण्यात कांदा घातला की तो पदार्थ टेस्टी बनतो. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने म्हणजे चातुर्मास! या काळात आपल्याकडे कांदा लसूण खात नाहीत. म्हणून आषाढ आतील नवमीला आपण कांदे नवमी करतो. आमच्याकडे जवळपासच्या सर्व बायका मिळून कांदे नवमी साजरी करत असत. कांदा भज्यांबरोबरच इतरही कांदे घातलेले पदार्थ घालून बनवलेले चमचमीत पदार्थ एकत्र जमून खाण्यात आणखीनच मजा येई. अर्थात कांदे नवमी केली तरी नंतर चार महिने कांदा खायचा नाही हे व्रत काही फारसं पाळलं जात नाही. कांदा हा रोजच्या जेवणाचा भाग झाल्याने त्याच्या दराबद्दलही आपण विचार करतो. एरवी शंभर रुपयांला तीन किलो कांदे हा भाव एकदम कडाडतो तेव्हा शंभर रुपये किलो ही कांदा असतो. तेव्हा पावशेर कांद्यातच आपण भागवतो आणि प्रत्येक कांद्याची किंमत कळते! मध्यंतरीच्या काळात हे आपण अनुभवले आहे. तसा कांदा हा रुचीवर्धक आणि पाचक प्रकृतीचा आहे. कांदा आणि आलं बारीक करून त्याचं मिश्रण घेतले की पोटाच्या तक्रारी कमी होतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने ही कांदा औषधी आहे. त्यातही पांढरा कांदा हा कांद्याचा विशिष्ट प्रकार उन्हाळ्यात पोटाला थंड म्हणून वापरला जातो. त्याच्या छान माळा बांधून भोर, लोणावळा या भागात विक्रीसाठी दिसतात. कोवळी कांद्याची पात ही आपण भाजीसाठी वापरतो. थंडीच्या दिवसात कांद्याची पात, छोटे कोवळे कांदे बाजारात दिसू लागतात. महाराष्ट्रात कांद्याचे पीक बरेच घेतले जाते. लोणंद, नीरा या भागात तसेच नाशिक जवळच्या भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एक ‘कृष्णावळ’शब्द वाचला आणि तो कांद्यासाठी हे कळले. लक्षात आले की कृष्णाने या निसर्गाची निर्मिती करताना किती विचारपूर्वक केली आहे. मानवाला आवश्यक असे सर्व धान्य, भाजी, फळे यांची निर्मिती त्या त्या ठिकाणी केली आहे. ही निसर्ग किमया आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. आमचे एक स्नेही म्हणतात,” प्रत्येक गोष्टीत तुम्ही कृष्ण पहा म्हणजे सारे जगत कृष्णमय वाटू लागेल” आज तरी मला कांद्याची कृष्णावळ पाहताना मनात विचार आला, “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी” हे सावता माळ्याने म्हटले आहे ते खरेच आहे! सर्व गोष्टीत हा ‘कृष्ण’ आहेच की!
Author: Ujwala Sahasrabudhe
चांदोबास
चांदोबाच्या गोष्टीतला चांदोबा तू !माझे सारे बालपण व्यापून टाकलेस !कधी भाकरी सारखा गोल गोल,तर कधी चवथीच्या कोरी सारखा !मामाचा वाडा चिरेबंदी ठेवणारा,आणि लिंबा मागे जाऊन लपणारा ! तारुण्यात येताना तुझ्या साक्षीने,आणाभाका घेतल्या,तर लग्नानंतर मधुचंद्राततू मिरवलास ! नंतर मात्र…माझ्या बाळाच्या संगतीतमी तुझ्याशी भावाचे नाते जोडले!आणि तू चंदा मामा झालास ! पुढे पौर्णिमा ते संकष्टी..दिसलास तू आभाळी ..बदलत्या रूपात, आकारात...तुझे सहस्रचंद्र बघणाराकिती भाग्यवान ! म्हणून सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात,तुझा किती मान! असा तू चांदोबा,सगळ्यांचा लाडोबा ! बालपणापासून वार्धक्यापर्यंत,सर्वांना लोभवणारा….आणि मला भुलवणारा ….
सरली दिवाळी
सरली दिवाळी,जपू मनी आनंदाचे क्षण!प्रत्येक दिवाळीची,मनी असे वेगळी आठवण! वसुबारस ते भाऊबीज,दिवस असती प्रकाशाचे!तोच प्रकाश मनात राहो,दिवे उजळीत अंतरीचे ! स्नेहभाव वाढीस लागे,उणी दुणी विरघळून जाती!दीपावलीच्या आनंदात,झरती स्नेहाच्या बरसाती! रेखते अंगणी रांगोळी,ठिपक्यांची अन् नक्षीची!तशी राखावी सर्वांची अंतरे,रेखीव, सुंदर नात्यांची! असेच राहो मन आनंदी,निमित्त कशाला दिवाळीचे?प्रार्थना करू ईश्वराची,निरंतर राहो सौख्य मनाचे!
वेध दिवाळीचे
आली दिवाळी दिवाळी,सणांची माला सोबतीला !दारी पणत्यांच्या ओळीआनंदात सकल बाला ! गोड आवडीचे पदार्थ करतो,खमंग चकली, चिवडा बनतो !घरभर त्यांचा स्वाद दरवळतो,सर्व घराला आनंद तो देतो ! दारासमोर सडा शिंपला,सुंदर रांगोळी ती रेखली !रंग भरूनी त्यातच सुंदर,दिवाळी आनंदाने नटली ! नवीन कोरे कपडे खरेदी,फटाक्यांची आतषबाजी !दर दिवशी नवीन भेटी,आठवणींना करते ताजी ! भाऊबीज अन् पाडवा,भाऊ,पतीचा आठव देतो,प्रेमाची ती भेट घेऊनी,स्त्रियांस सणाचे मूल्य सांगतो ! दिवाळी आनंद सौख्य आणते,सर्वांना मनास विसावा देते!वर्षभराच्या श्रमतापातुन,दिवाळी आपणास मनी सुखवते!
वसुबारस
दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..
भाऊबीज
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहिण भावाच्या आनंदाचा दिवस! यानिमित्ताने मुली माहेरी येतात आणि आई वडील भावंडां बरोबर सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद आता शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकालाच काही ना काही भेटी मिळालेल्या असतात तसेच एकमेकांच्या भेटी ही होतात. सणाचे दिवस कसे संपतात कळत नाही पण चार दिवसाची दिवाळी आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जाते! तसेही आता आपण वर्षभर फराळाचे पदार्थ खातोच, कपडे खरेदी तर कायमच चालू असते त्यामुळे याचे महत्त्व फारसे वाटत नाही. पण पूर्वीच्या काळी फराळाचे पदार्थ, कपडा खरेदी या गोष्टी प्रासंगिक असत. त्यामुळे दिवाळी कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. तरीही अजूनही आपल्याकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा सण म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत असतो…
बलिप्रतिपदा किंवा पाडवा
तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा ! या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होते. पाडवा हा एक चांगला मुहूर्त असतो, त्यामुळे सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेद्या या दिवशी केल्या जातात. पती-पत्नीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्याचे काम पाडव्याच्या निमित्ताने होते. त्यामुळे बायकांना या दिवशी नवऱ्याकडून मनासारख्या भेटी मिळवता येतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळून मिळणाऱ्या ओवाळण्याची आतुरतेने वाट बघत असतात! असा हा आनंदाचा पाडवा असतो….
लक्ष्मीपूजन
काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात…. व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो….
नरकचतुर्दशी
नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे. लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते. सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून, पाट रांगोळी करूनसर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच! मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही! मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क, तर मुली रांगोळी काढण्यात! मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम! आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते! असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली…
धनत्रयोदशी
दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वैद्य लोक धन्वंतरी ची पूजा करतात धने गुळ याचा नैवेद्य दाखवतात ज्या वैद्यकीय बुद्धीच्या जोरावर आपण रोग्याला बरे करू शकतो, त्या धन्वंतरी बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी! आता दिवाळी अगदी दारात आलेली असते. पूर्वीच्या काळी घराला अंगण असे त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अंगणात सडा मारून, दारात रांगोळी काढणे, पणत्या लावणे असा कार्यक्रम होत असे. आता फ्लॅट सिस्टीम मुळे ही मजा गेली, तरीही आपल्या छोट्याशा ब्लॉकच्या आत आनंदोत्सव साजरा करायचा म्हणजे आनंदालाच बंधन घातल्यासारखे वाटते! पण कालाय तस्मै नमः !