सरत्या मे महिन्याचे दिवस! आभाळात हळूहळू ढगांचे येणे सुरू झाले आहे. घामाच्या धारा वाहत आहेत! असं वाटतंय, यावी एकदा पावसाची मोठी सर आणि भिजून जावे अंगभर!पण अजून थोडी कळ काढायला हवी! मृगाच्या आधीची ही तृषार्तता! ग्रीष्माच्या झळांनी तप्त झालेल्या सृष्टीला आता ओढ लागली आहे ती नवचैतन्य देणाऱ्या वर्षेची!कायम आठवतात ते बालपणापासूनचे दिवस! एप्रिल मध्ये कधी एकदा परीक्षा संपते आणि मोकळे होतोय याची वाट पहायची! आणि मग दोन महिने नुसता आनंदाचा जल्लोष! सुट्टीत कधी मामाच्या घरी जायचं तर कधी काकाच्या घरी जायचं!कधी आत्याकडे मुक्काम ठोकायचा! उन्हाच्या वेळी घरात पंखा गरगर फिरत असायचा,उकाडा असायचा, पण तरीही खेळण्या कुदण्यात बाकीचं भान नसायचं! आंबे, फणस, काजू, कलिंगडं, खरबूज, जांभळे अशा फळांची लयलूट सगळीकडे त्या त्या प्रदेशानुसार असे! सगळ्याचा आनंद घ्यायचा! अगदी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईसकांडीचा सुद्धा! उसाचा थंड रस प्यायचा, भेळ खायची..असे ते उडा- बागडायचे दिवस कधी सरायचे कळायचे सुद्धा नाही! नेमेची येतो मग पावसाळा, तो जसा येतो तशीच शाळा सुरू व्हायची वेळ येते.. आमच्या वेळची सुट्टी अशी जात असे आणि जून महिना येत असे. त्याकाळी अगदी नवी पुस्तकं मिळायची नाहीत. सेकंड हॅन्ड पुस्तके गोळा करायची. काही पुस्तकांना बाइंडिंग करून घ्यायचं, जुन्या वहीचे उरलेले कोरे कागद काढून त्या पानांची वही करायची. दप्तर धुऊन पुन्हा नव्या सारखं करायचं आणि शाळेच्या दिवसाची वाट पाहायची! नवीन वर्ग, नवीन वर्ष असले तरी मैत्रिणी मात्र आधीच्या वर्गातल्याच असायच्या! कधी एकदा सर्वांच्या भेटी गाठी घेतो असं वाटे. गेले ते दिवस म्हणता म्हणता आमची लग्न होऊन मुले बाळे झाली. काळ थोडा बदलला. मुलांसाठी नवीन पुस्तके, नव्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग अशा खरेद्या होऊ लागल्या. आणि जून महिन्यात छत्र्या, रेनकोट यांनी पावसाचे स्वागत होऊ लागले. अशा या सर्व संधीकालाचे आम्ही साक्षी! स्वतःचं बालपण आठवताना मुलांचं बालपण कसे गेले ते आठवते. आणि आता नातवंडांचे आधुनिक काळातील बालपणही अनुभवतो आहोत! काळ फार झपाट्याने बदलला.. मजेच्या संकल्पना बदलल्या. हवा तीच !सुट्टी तशीच! पण ती घालवण्याचे मार्ग बदलले. बऱ्याच मुलांना आजोळी जाणे माहित नाही. स्वतःच्या गावी जात नाहीत, जिथे आठ पंधरा दिवस विसावा घ्यायला जाता येईल असं ठिकाण उरले नाही.. उद्योग धंदा, नोकरी यात आई-वडील बिझी, त्यातून काढलेले सुट्टी चे चार दिवस मुलांना घेऊन जातात थंड हवेच्या ठिकाणी! भरपूर पैसा असतो, खर्च करून येतात आणि मुलांना विकतचं मामाच गाव दाखवून येतात. आईस्क्रीम, पिझ्झा च्या पार्ट्या होत असतात. हॉटेलिंग, खरेदीची मजा चालू असते. कारण प्रत्येकाला आपली स्पेस जपायची असते. संकुचित झाली का मनं असं वाटतं! पण तरुण पिढीच्या मर्यादाही कळतात. त्यांचं वेळेचं भान वेगळं असतं. आल्या गेलेल्यांच्या स्वयंपाकाची सरबराई करणारी गृहिणी आता सगळा दिवस घराबाहेर असते. त्यामुळे कशी करणार ती आदरातिथ्य! यंत्रवत् जीवनाचा एक भाग बनतात जणू सगळे! असं असलं तरी मुलांचा सुट्टीचा मूड थोडा वेगळा असतो. त्यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आता आहेत. मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना नेणं- आणणं हा एक आधुनिक काळातील बदल आहे. संस्कार वर्ग, स्विमिंग, नाट्य, गायन असे वेगवेगळे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उघडलेले असतात! जमेल त्या पद्धतीने मुलांचा विकास व्हावा म्हणून हे क्लासेस जॉईन करण्याचा पालकांचा उत्साह असतो. काहीतरी नवीन शिकवण्याचा अट्टाहास असतो. पुन्हा एकदा शाळेच्या चाकोरीला जुंपण्याआधीचे हे मे अखेर चे आणि जूनचे पहिले काही दिवस असतात! आता आगमन होणार असते ते पावसाचे! नव्याच्या निर्मितीसाठी आतूर सृष्टी आणि होणार असते पावसाची वृष्टी! छत्री, रेनकोट घेऊन चालणार माणसांची दुनिया! मग कधी पाऊस करतो सर्वांची दाणादाण! कुठे पाणी साचते तर कुठे झाडे पडतात. सृष्टीची किमया तिच्या तालात चालू असते. माणसाची पुन्हा एकदा ऋतुचक्रातील महत्वाच्या ऋतूला- पावसाला तोंड देण्याची तयारी झालेली असते. मेच्या अखेरचे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस विविध अंगाने आणि वेगळ्या ढंगात येत असतात. परमेश्वरा! तुझ्या अनंत रुपातील हे सृजनाचे रूप मला नेहमीच भुरळ घालते. आकाशातून वर्षणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीची मी चातकासारखी वाट पाहत राहते. तन शांत, मन शांत अशी ती अनुभूती मनाला घ्यायची असते. सरता मे आणि उगवता जून यांच्या संधीकालातील ही तगमग आता वर्षेच्या आगमनाने शांत होणार असते!
Author: Ujwala Sahasrabudhe
आईस….
निघून गेलीस तू दूरच्या प्रवासाला! संस्काराची शिदोरी देऊन ती आम्हाला! माहित होते की हा प्रवास आहे अटळ .. पण माहीत नव्हते हीच आहे ती वेळ! किती वर्षांच्या, दिवसांच्या, क्षणांच्याच साक्षी! मनी बघता फोटोत दृश्यरुप तेची! डोळ्यासमोर येते ती तुझीच मूर्ती! पाणीदार तुझे डोळे येती नजरे पुढती! दिवस जातील, पुन्हा रुळून जाऊ जीवनाशी! काव्यरूपी ही श्रद्धांजली तुझ्या चरणाशी!
सोनसळी बहावा
एका रात्री पाहिला बहावा,चंद्र प्रकाशी बहरताना !गुंतून गेले हळवे मन माझे,पिवळे झुंबर न्याहाळताना! निळ्याशार नभिच्या छत्राखालीलोलक पिवळे सोनसावळे!हिरव्या पानी गुंतुन लोलक,सौंदर्य अधिकच खुलून आले. ! शांत नीरव रात भासली,जणू स्वप्नवत स्वर्ग नगरी!कधी न संपावे ते अपूर्व क्षण,आस लागली मनास खरी! फुलवल्या बहाव्याच्या मिठीतसामावून अलगद जावे!मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,अंगोपांगी बहरून यावे!
नववर्षाची गुढी…
आयुष्याची गुढी..
आयुष्याच्या उंच गुढीवर,सद्भावनांचे वस्त्र ! सुखदुःखाच्या आठवणींची,कडुलिंबाची फांदी ! आनंदाचे क्षण वेचणारी,रंगीबिरंगी फुलमाळ ! त्यावरी शोभे निरोगी,आरोग्याची साखरमाळ ! सर्वांस बांधतो धागा,आपल्या संचिताचा ! वरती चमके सोनेरी,सुंदर गडू रामभक्तीचा !
कोकणातील- रत्नागिरीची होळी
होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींची निगडित आहेत! लहानपणी मार्च महिना आला की घरात अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमाने या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात खेळे यायचे! ‘खेळे’ म्हणजे वेगवेगळे नाच करणारे ठराविक लोक असायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे पण पारंपारिक गीतांबरोबरच नवीन नवीन सिनेमातले तसेच कोळी गीते, शेतकरी गीते यावर आधारित नाचायचे. त्यात उत्साह व जोश इतका असे की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने उत्साहाने गोळा व्हायचे. तेव्हा टीव्ही नव्हता त्यामुळे ही जिवंत उत्साहाची करमणूक सर्वांनाच फार आवडायची. या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच! होळीच्या खुंटावर होळी उभी करण्यात येत असे आणि भैरीचे पालखी पाच दिवस असे दरवर्षी एखाद्याच्या बागेतील माडाचे झाड होळीसाठी निवडले जाईल ते तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणले जाईल मुख्य म्हणजे ते माणसे वाहून आणत असेल त्यामुळे त्यासाठी चार-पाच तास लागत असत आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासूनच ते बघण्यात दंग असायचो. एकदा का होळी उभी राहिली की चार-पाच दिवस तिथे जत्रा असे. रोज देवीची पालखी मंदिरापासून मिरवणुकीने येई तेव्हा खूपच गर्दी उसळत असे. होळीच्या खुंटावर उभे राहणाऱ्या होळीसाठी सुरमाडा चा उपयोग केला जातो. हा सुरमाड जिथे असेल तिथे देवीची पालखी जाते आणि मिरवणुकीने होळीच्या सुरमाडाबरोबरच खुंटावर येते. रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्या बहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते, पण उत्साह तेवढा जास्तच असतो! पाच दिवस देवीच्या पालखीचे असतात. देवीची पालखी उठली तरी होळी मात्र पंधरा दिवस उभी असते. पाडव्याला ती होळी उतरवतात. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात, तिचा कौल मिळाला की ते काम होते असे मनापासून वाटत असते. मग ते काम झाले की पुढच्या वर्षी नारळाची तोरणे बांधली जातात!होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ, लोणचं यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते, पण कोकणात मात्र रंगपंचमीची मजा जास्त येते! परीक्षा तोंडावर आलेली असते. पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची आणि कोकणातील होळी अशीच माझ्या डोळ्यासमोर येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत! काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे! पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळी सणाला अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहूया!
वळीव
आला वळीव वळीव,विझवी होळीच्या ज्वाळा!धरती ही थंडावली,पिऊन पाऊस धारा ! मृदगंध हा सुटला,वारा साथीने फिरला!सृष्टीच्या अंतरीचा,स्वर आनंदे घुमला! गेली सूर्याची किरणे,झाकोळून या नभाला !आज शांतवन केले,माणसाच्या अंतराला! तप्त झालेले ते मन,अंतर्यामी तृप्त तृप्त !सूर्या, दाहकता नको,मना करी शांत शांत !
माय मराठी
जन्म कुसुमाग्रजांचा ,सौभाग्य महाराष्ट्रा चे!लाभे कृपा शारदेची ,भाग्यवंत आम्ही येथे ! माय मराठी रुजली,अमुच्या तनामनात!दूध माय माऊलीचे,प्राशिले कृतज्ञतेत ! साहित्य अंकी खेळले,लेख, कथा अन् काव्य!माऊलीने उजळले ,ज्ञानदीप भव्य- दिव्य! घेतली मशाल हाती ,स्फुरे महाराष्ट्र गान !भक्तीचे अन् शौर्याचे,राखले जनी हे भान! ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,सोपी भाषा तुकयाची!मराठी रामदासांची ,समृद्धी माय मराठीची! सौंदर्यखनी मराठी,कौतुक तिचे करू या!मी महाराष्ट्रीय याचा,अभिमान बाळगू या!
प्रेम लता…
सहजची भेटता तू आणि मी,काही चमकले हृदयीच्या हृदयी! बीज अचानक मनी पेरलेप्रीतीचे का ते काहीतरी! तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,बीज अंकुरे मम हृदयी! प्रेम पाण्याचे सिंचन करिता,अंकुर वाढे दिवसांमाशी! मनी वाढली प्रेम न् आशा,रोप वाढता पाचव्या दिवशी! प्रीतफूल उमलले त्यावरी,‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी! फूल प्रीतीचे मिळे मला,‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,फूल बदलले फळात तेव्हा,परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
ऋतूंची फुलमाला..
वसंत येईल राजा बनुनी,चैतन्याने भरली अवनी !नवसृजनाचे दालन उघडुनी,नवल उमटले माझिया मनी! ग्रीष्म झळा त्या येता भुवनी,तगमग होई सजिव जीवनी!शोधित जाई गारवाही मनी,चाहुल घेई वर्षे ची आंतुनी! वर्षेचा पहिला शिडकावा,चराचराला देई गारवा !वाट पहातो ऋतू हिरवा,दिसेल तेव्हा बदल नवा! शरदाचे दिसताच चांदणे,आनंदाला काय उणे !चंद्रचकोरी नभात बघणे,धरतीवर स्वप्नात रंगणे! हेमंता ची लागताच चाहुल,पडे थंडीचे घरात पाऊल!दाट धुक्याची घेऊन शाल,निद्रिस्त राही निसर्ग विशाल! शिशिराची ती थंडी बोचरी,पान फुलां ना निद्रिस्त करी!जोजवते आपल्या अंकावरी,शांत मनोरम सृष्टी साजरी ! सहा ऋतूंची ही फुलमाला,निसर्ग वेढितो ती सृष्टीला!प्रत्येक ऋतू बहरून आला,अस्तित्वाने मनात फुलला!
सरते वर्ष
गतसालाच्या आठवणींची,सुंदर अन् रंगीत कमान !डोळ्यापुढती बघताना ती,मनीचे माझ्या हरपले भान! गतसालाच्या खुणा उमटल्या,देई उजाळा आठवणीना !कसे वर्ष गेले काही न कळले,आठवता त्या मधुर क्षणांना! मेळ घातला लेखिका सख्यांचा,वेगवेगळ्या उत्सव निमित्ताने!नवीन काही मला गवसले,मन भरले त्या आनंदाने! काव्य, कथा अन् ललीत लेखन,अधिकच माझ्या मना भावले!साहित्याच्या नवनवीन रंगी,मन माझे हे गुंतून गेले ! अखंड राहो आपली मैत्री,सर्व सख्यांच्या प्रेम ज्योती!व्हाट्सअपच्या माध्यमातूनही,जुळली आपली प्रेमळ नाती! निरोप देऊ या सरत्या वर्षाला,स्वागत करू या नववर्षाचे !आनंदाचे, सौहार्दाचे वर्ष आले,दिवस येऊ द्या भाग्याचे !