स्वातंत्र्याच्या वेदीवरती,किती आहुती पडल्या होत्या !नाही त्यांची गणती काहीच,आज घडीला स्मरूया त्या! आद्य जनक ते स्वातंत्र्याचे,लक्ष्मीबाई अन तात्या टोपे!त्यांचीच धुरा हाती घेती,शूरवीर वासुदेव फडके! टिळक, आगरकर जगी या आले,स्वातंत्र्य सूर्याची आस घेऊनी!गांधीजींचे आगमन झाले ,सत्त्याची ती कास धरूनी ! स्वातंत्र्यनभी सावरकर तळपले,क्रांतीची ती मशाल घेऊनी !भगत, राजगुरू, सुखदेव गेले,फासा वरती दान टाकुनी ! पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची,कशी उलटली वेगाने !घोडदौड देशाच्या प्रगतीची,चाले लोकशाही मार्गाने ! देशाची सर्वांगीण प्रगती,ध्येय हेच धरू या उरी !शतकाकडे जाई वाटचाल ही,जगास दाऊ स्वप्ने खरी!
Author: Ujwala Sahasrabudhe
ओल्या आठवणी
आषाढ -श्रावणा ची वाटचाल चालू झाली की माझ्या मनात अनेक ओल्या आठवणी पिंगा घालू लागतात! कधी पाऊस लवकर येतो तर कधी त्याची सुरुवात उशिरा होते, पण जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपोआपच मन आठवणीच्या पावसात चिंब भिजवून निघतं आणि आठवतात त्या छोट्या मोठ्या सफरी! अगदी अलीकडे म्हणजे साठी ओलांडल्यावरही माझ्या असं लक्षात आलं की अजूनही पावसाचं तितकंच आकर्षण आपल्याला आहे! खिडकीतून पाऊस बघताना छोटे छोटे वाहणारे पाण्याचे प्रवाह, पाण्यात खेळणारी मुलं आणि साठलेल्या पाण्यात सोडलेल्या कागदाच्या होड्या आपल्या ला आकर्षित करत असतात. असंच एक वर्षी आम्ही लवासाची छोटीशी सफर केली. माझी बहीण , तिचे मिस्टर, आणि आम्ही दोघे कारने लवासाला जायला निघालो होतो. आभाळ भरून आले होते, पण पावसाची सुरुवात नव्हती. लवकर जाऊन येऊ या म्हणून चहा घेण्यात सुद्धा वेळ न घालवता, आम्ही थर्मास मध्ये चहा भरून घेतला आणि तीन वाजता निघालो! जसजसे आम्ही माले गावापर्यंत आलो तसं बाहेरचं वातावरण बदलत चालले होते .पाऊस नव्हता.. हिरवाई मनाला प्रसन्न करत होती. आल्हाददायक निसर्ग दिसत होता. डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे मनाला उत्साह देत होते. हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि झिमझिम पडणाऱ्या पावसाने बऱ्यापैकी जोर धरला. पुढे पाऊस इतका वाढला की, गाडीतून आता उतरताच येणार नाही असं आम्हाला दिसून आलं. डोंगर उतारावर सगळीकडे लवासाची बांधलेली घरं ,पण हालचाल कुठेच दिसत नव्हती .शेवटी आम्ही लवासाच्या रस्त्यावरून दोन-तीन फेऱ्या मारल्या. गाडीत बसूनच चहा पिण्याचा स्वर्गसुख अनुभवलं! एकीकडे पावसाची मजा वाटत होती तर दुसरीकडे आपण बाहेर उतरून फिरू शकत नाहीये याचं वाईट वाटत होतं! पण निसर्गापुढे आपलं काही चालत नाही! आता रस्त्यावर पाण्याचे प्रवाह मोठे दिसत होते.बाहेर गार वारा सुटला होता, पण जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे, अशा विचारांने पावसाचा आनंद घेत होतो. पाऊस जरासा थांबला. खिडकीच्या काचा उघडल्या. तेव्हा एका झाडाखाली लहानशा खोपटा जवळ एक मुलगी कणसे विकत बसली होती.शेजारी छोट्याशा पाटीत निखारे फुलवून ती कणसं भाजत होती अर्थातच त्या तिथे आम्ही थांबलो. शाळेत जाणारी ती मुलगी सुट्टी असल्याने कणसं भाजून विकत होती. ती घेतली. कणसाचा आस्वाद घेत पुढे चाललो आणि भज्याची गाडी दिसली. भजी खाण्याचा आनंद घेतला आणि पुण्याकडे परतलो. जसे पुण्याकडे येऊ लागलो होतो, तस तसे वातावरण शहरी झाले. लवासाच्या ट्रीप मध्ये दिसलेला निसर्ग मनाच्या कोपऱ्यामध्ये ठेवून आम्ही पुन्हा एकदा शहरातील पावसाकडे परतलो. आठवणींचा एक पाऊस असा होता! हे अनुभवतानाच लहानपणचे अनेक आठवणींचे पाऊस माझ्या मनामध्ये रिमझिम करू लागले! रत्नागिरीत असताना पाऊस भरपूर! शाळा जवळ असली तरी छत्री, रेनकोट घ्यावा लागतच असे. शाळेत असताना शाळेच्या मैदानावरच छत्री उलटली आणि नखशिखांत भिजत घरी यावे लागले. त्यानंतर मात्र लाल, निळा आणि हिरवा असे तिरंगी रेनकोट घालून आम्ही तिघी मैत्रिणी पावसातून घरी येत असू ती ओली आठवण आली की अजूनही डोळ्यासमोर धूसर असे शाळेचे ग्राउंड दिसायला लागते!कॉलेजच्या काळात घाटावर सांगली सारख्या शहरात आले आणि पावसाची मजा कमी झाली. रस्ते अगदी घाण करणारा तो पाऊस झिमझिमत आला की अजिबात आवडत नसे, कारण कोकणात कितीही पाऊस पडला तरी तो डोंगर उतारावरून आलेला पाऊस क्षणात रस्ता कोरडा करत असे. पण घाटावर मात्र रस्त्यावर अगदी रपरपाट होत असे! पण घाटावरचा वळवाचा पाऊस मात्र खूप आवडला, कारण त्या पावसात गारा वेचत भिजायला मिळाले आणि गारांची एक ओली आठवण मनामध्ये रुतून बसली ! पण खरी मजा आली ती लग्नानंतर प्रथमच कोयना नगरच्या डॅम वर पावसात फिरताना! त्यावेळी डॅम वर जाण्यासाठी फारशी परवानगी लागत नसे त्यामुळे आम्ही छत्र्या हातात घेऊन डॅमवरून चालत फिरत होतो. नव्या नवलाईच लग्न आणि पावसातून फिरताना होणारा त्यांचा ओला स्पर्श, चाळीस-पंचेचाळीस वर्ष होत आली तरी ती ओली आठवण विसरू म्हणता विसरत नाही!संसारात मुलांच्या आगमनानंतर मात्र हे पाऊस प्रेम थोडं कमी करावं लागलं! पावसात भिजलं की होणारे परिणाम स्वतःबरोबर सर्वांनाच भोगावे लागत! पण अजूनही पाऊस आला की गरमागरम भजी करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर येते. आभाळात ढग दिसू लागले की, रानात मोर नाचू लागतात, तसं पहिला पाऊस आला की माझ्या मनमोराचा पिसारा फुलून येतो! या पहिल्या पावसाला भज्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो. उन्हाळ्याच्या दाहकतेनंतर येणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणींची उजळणी करणारा असतो असं मला वाटतं! मंगेश पाडगावकर दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला ‘लिज्जत’ पापडाच्या जाहिरातीत पावसाचे एखादे गाणे लिहीत! ती पावसाची गाणी वाचत आपण मोठे झालो. सर्व ऋतूंचे आगमन हे जरी आपापल्या परीने आल्हाददायक असले तरी पाऊस हा त्यात खूप महत्त्वाचा आहे! 27 नक्षत्रातील नऊ गेली तर किती उरली? असं कोडं आम्ही लहानपणी घालत असू. नऊ नक्षत्रे पावसाची गेली तर उरली किती? शून्य असं उत्तर असे. असा हा पाऊस! ओल्या आठवणींच्या पाऊसगारा वेचताना किती वेचू अन् किती नको असे होते! पण शेवटी गारच ती! जमिनीवर पडली की काही वेळातच ती विरघळते! तसं माझ्या मनात होतं!” ओल्या आठवणी” वेचता वेचता मन किती आणि कुठे भरकटत जातं कळतच नाही!
आयुष्याची भूमिती
आयुष्याच्या गणितामध्ये, एक भाग असे भूमिती ! प्रमेय त्यातील सोडवताना, येई काठिण्याची प्रचीती!…..१ समानतेच्या संधी शोधी, त्रिकोणाची संगती लावता! दोन त्रिकोण जोडताना, लक्षात घे एकरूपता !…..२ वर्तुळाच्या त्रिज्या न् जीवा, एकीपेक्षा दुसरी दुप्पट ! लक्षात आपल्या येते तेव्हा, संसाराची सारी खटपट !….३ त्रिकोण चौकोन काढून जाता, मध्यबिंदू तो गाठावा लागे! क्षेत्रफळाचे मापन करता, जोडून घ्यावे लागती धागे !…..४ आयुष्याची भूमिती होती, काहीशी किचकट अन् अफाट! प्रमेय त्यातील सोडवत होते, जिंकण्या संसाराचा सारीपाट!….५
पाऊस आणि आठवणी…
पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो. त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात. पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….
अल्बम
दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत. अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले. आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते! स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले! शाळेत असताना माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली. कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला. अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले, परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले! मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती! आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला! कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे .खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया! आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….
आला आषाढ -श्रावण🌦️🌦️
चैत्र वैशाखात उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते! ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘नेमेची येतो मग पावसाळा’ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे, करवंदे, जांभळे, फणस हा उन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते. पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते! लगेच पाणी नियोजन सुरू होते! पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात. ‘ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस गाण्यापर्यंत! सकाळच्या अधून मधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं! ‘जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी’ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टी च्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो. वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची ऑर्डर येते. कांदे नवमी साजरी होते. आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो. गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात भिजत च साजरी होते. आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते! आठ पंधरा दिवसातच सृष्टीबालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे.. कविता आठवायला लागते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते! पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधून मधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे, तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो.’ रिमझिम पाऊस पडे सारखा’…’ असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘श्रावणात घन निळा बरस ना’ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सव प्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो!’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं! कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची, आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो. सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते. बघता बघता नारळी पौर्णिमा येते. पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो. कोळी लोक समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते. सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते.मग ओढ लागते ती भाद्रपदाची!श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पा ची चाहूल लागते. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो. पण तो मनात मुरलेला, भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो. त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो. .’अस्सा श्रावण सुरेख बाई’…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…
वारी….
पंढरपुरी वारी जाई ,विठ्ठलाच्या दर्शनाला lजाती पाय वेगे वेगे,आतुरले ते भेटीला …..१ विठू राहे पंढरीत ,जमे भक्तांचा मेळावा lमाहेराची ओढ जशी,लागते लेकीच्या जीवा …..२ चहूबाजू येती सारे,टाळ, चिपळ्या घेऊन lविठ्ठलाची गाणी गाता,मन जाई हे रंगून …३ आषाढाची वारी येता ,वारकऱी मन जागे lभेटीस आतुर होई,पांडुरंगी ओढ लागे …४ वारी निघे पंढरीला,कानी टाळांचा गजर lवेग येई पावलांना,राऊळी लागे नजर ….५ जसा जसा मार्ग सरे,मन होई वेडे पिसे lडोळ्यापुढे मूर्ती येई,विठ्ठल सर्वत्र दिसे ….६
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने….
गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करता क्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या. त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला. घरी येताना मन सहज विचार करू लागले की 50 एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला! पर्यावरण म्हणजे काय? ही सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, मातीआणि जमीन या सर्वांचे संतुलन! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार! आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे! हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली! माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले, ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे.. 5 जून 1973 साली अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची आपण काळजी करतो हे दिसून येईल!
सांजवेळ….
“सांज ये गोकुळी, सावळी सावळी…” गाण्याच्या ओळी कानावर पडल्या की संध्याकाळ झालेली आपोआपच डोळ्यासमोर येते. सूर्याची उतरतीची उन्हं अंगावर घेत अलगदपणे ही सांजवेळ पश्चिम क्षितिजावर येऊ लागली की मग आपोआपच अस्वस्थ होतं,कातर होतं! सकाळची उभारी माध्यांन्ही पर्यंत राहते आणि मग तिला कधी कलाटणी मिळते ते कळत नाही. मन उतरणीला लागते! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही वेळ जणू काळजाचा तुकडा असते. रात्रीच्या विश्रांतीनंतर उगवणारी सकाळ नवीन आशा आकांक्षा घेऊन येते. दिवसभर आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की सांजवेळ इतकी लवकर डोकावते याचे भानच राहत नाही!पहाटे पूर्वेला आभाळभर पसरलेल्या लाल केसरी रंगाच्या गालीच्या वरून कोवळ्या सूर्यकिरणांना घेऊन बाल रवी अवतरतो. तेव्हा त्याच्या तप्त किरणांचे अस्त्र गुप्तच असते जणू! जसजसं आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते, तस तसे त्या बाल रवीचे रूप सर्वांगाने तेजस्वी होत जाते. कालक्रमानुसार ते कधी सौम्य तर कधी दाहक रूप दाखवते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होत जाते तेव्हा तो पुन्हा क्षितिजाशी दोस्ती करायला वेगाने जाऊ लागतो. आपली सौम्य झालेली किरणे घेऊन निशेला भेटायला! तेव्हा ती संध्या लाजेने लालबुंद दिसते तर चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात निशेचा प्रवास सुरू होतो! या अदलाबदलीच्या काळात ही सांजवेळ येते. निसर्गाचे हे रूप घराच्या गच्चीवरूनच मी अनुभवत असते. अशावेळी मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात. कधी सागरात बुडत जाणारे लाल केसरी सूर्यबिंब तर कधी डोंगरांच्या रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे ते सूर्याचे लाल केशरी रूप! अशावेळी आभाळातील रंगांची उधळण मनाला मंत्रमुग्ध करते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात आपले मुक्त फिरणे संपले असले तरी सूर्याचे फिरणे थांबले आहे का? तो तर आपल्या गतीने जात असतोच पण तरीही ही सांजवेळ रोज मनाला हुरहुर लावून जाते! आयुष्याच्या उतरणीचा काळ हा असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बाळरूप बदलत बदलत तारुण्य येते. ज्या काळात मनुष्य कर्तव्य तत्पर असतो. आयुष्याच्या माध्यांन्ही ला तळपत्या सूर्याप्रमाणे मनुष्य कार्यरत असतो. जमेल तितक्या कर्तुत्वाने तळपत, पण त्यानंतर येणारी आयुष्याची उतरण तीव्र स्वरूपाची असते. ही सांजवेळ कधी येते कळतच नाही! खूप काही करायचे बाकी राहिले आहे असे वाटते! पण गेलेला काळ परत येत नाही. कोरोनाच्या काळात तर मन अंतर्मुख झाले. जीवनाची नश्वरता अधिकच जाणवू लागली! जणू काही जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवरील ही सांजवेळ आहे, ती संयमानेच संपवायला हवी असंच काळ आपल्याला सांगत आहे का? रोज ही सांजवेळ दिवे लागण्याची असते. सांजेला दिवा लावून आपण पुन्हा एकदा उद्याच्या आशेचे स्वप्न डोळ्यासमोर आणत असतो. अंधाराकडे नेणाऱ्या सांज वेळेला दिव्याचा प्रकाश दाखवून उद्याच्या आशादायी दिवसाकडे वाटचाल करायची असते. या सांजवेळी नंतर येणारी ही रात्र आपल्याला “रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल” अशी आशा दाखवते. तसेच हेही दिवस जाऊन पुन्हा एकदा आपण निसर्गाची प्रसन्न पहाट अनुभवणार आहोत., त्यासाठी या सांजवेळीच्या काळाला सामोरे जायला पाहिजे आणि विश्वासाने प्रत्येक दिवस संयमाने घालवायला हवा तरच निराशेची काजळी त्यावर धरणार नाही. रात्र आणि दिवस यांना जोडणारी ही ‘सांजवेळ’ देवासमोर दिवा लावून आपण मांगल्यमय केली की ही हुरहुर नाहीशी होऊन मन प्रसन्न होते! आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध मानवी जीवनाशी जोडून हे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत!
आला सण वटपौर्णिमेचा ..!
गेल्या दहा वर्षात वटपौर्णिमेला वडाला जाऊन पूजा करणे बंद झाले माझे! लग्नाची चाळीशी उलटून गेली आणि या पूजे बाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदलही होत गेला. लग्न झाल्यावर नवीन सून म्हणून सासूबाई बरोबर नटून-थटून पूजेला गेले होते ते आठवलं! जरीची साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर सगळा नव्या नवती चा साज घेऊन नदीकाठी असलेल्या वडावर पूजेला गेले होते. थोडा पाऊस पडल्यावरचे रम्य, प्रसन्न वातावरण, समोर कृष्णेचा घाट आणि वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळत फिरणाऱ्या उत्साही, नटलेल्या बायका असं ते वातावरण होतं! धार्मिकतेची गोष्ट सोडली तरी त्या निसर्गातील अल्हाददायक वातावरणात चैतन्य भरून राहिलेले होते, त्यामुळे मन खरोखरच प्रसन्न झाले! अशी काही वर्षे गेली आणि लहान मुलांच्या व्यापात वडावर जाणे जमेना. घराची जागा बदलली, त्यामुळे नदीकाठ आता दूर गेला होता. वडाची फांदी आणून त्याची पूजा करणे आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणे एवढाच वटपौर्णिमेचा कार्यक्रम होऊ लागला! हळूहळू या सर्वातून मन बाहेर येऊ लागले. पतीचे आयुष्य वाढावे आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करणे ही गोष्ट अंधश्रद्धेचा भाग वाटू लागली. हिंदू धर्मात त्या त्या काळाचा विचार करून सणावाराच्या रूढी समाजात रुजलेल्या! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला लहानपणी पिता, मोठेपणी पती आणि वृद्धापकाळी पुत्र अशा व्यक्तीचाच आधार आहे ही गोष्ट मनावर ठसलेली! स्त्रीचा बराचसा काळ संसारात पतीबरोबर व्यतीत होत असल्याने पति वरील निष्ठा सतत मनात राहणे हेही अशा पूजेला पूरक होते. पूर्वीच्या काळी स्त्रीला घराबाहेर पडणे फारसे मिळत नव्हते. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाच्या सहवासात मैत्रिणी, नातलगांसह अशा सणाचा आनंद घेता येत असे. यानंतरच्या काळात पावसाला जोरात सुरुवात होते. आषाढ, श्रावण महिन्यापर्यंत पावसाचा जोर असतो. हवामान प्रकृतीसाठी पोषक असतेच असे नाही, त्यामुळे उपवासाची सुरुवातही ज्येष्ठी पौर्णिमेपासूनच केली जाते आणि चातुर्मासात विविध नेम, उपास केले जातात. ‘वड’हे चिरंजीवीत्त्वाचे प्रतीक आहे. या झाडाचे आयुष्य खूप! तसेच वडाचे झाड छाया देणारे, जमिनीत मुळे घट्ट धरणारे आणि पर्यावरण पूरक असल्याने ते जंगलाची शोभा असते. वडाच्या पारंब्या त्याचे वंश सातत्यही दाखवतात. पारंबी रुजून वृक्ष तयार होतो. वडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. या सर्वांमुळे आपल्याकडे वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा यासारख्या मोठ्या झाडांचे संवर्धन केले गेले. या सर्वाला धार्मिकतेचे पाठबळ दिले की या प्रथा समाजात जास्त चांगल्या रुजतात.जसे हिंदू धर्मात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, तुलसी विवाह यासारखे सण निसर्गातील प्राणी, वनस्पती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. तशीच ही वडपौर्णिमा आपण पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाबरोबर साजरी करतो. वटपौर्णिमेच्या पूजेमागे सत्यवान- सावित्रीची पौराणिक कथा सांगितली जाते. सत्यवान अल्पायुषी आहे हे सत्य सावित्रीला समजल्यावर सत्यवानाचे आयुष्य मिळवण्यासाठी सावित्रीने तप केले.हे तप तिने वडाच्या झाडाखाली बसून केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने एका वराने सासू-सासऱ्यांचे आयुष्य मागितले, तर दुसऱ्या वराने त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिसऱ्या वराने मी अखंड सौभाग्यवती राहावे हा वर मागितला. या वरामुळे सत्यवानाचे आयुष्य तिने परत मागून घेतले. सावित्रीचे हे बुद्धीचातुर्य आपल्यात यावे ही इच्छा प्रत्येक स्त्रीने या दिवशी व्यक्त केली पाहिजे! अरविंद घोष यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य एम्. ए. ला असताना अभ्यासले. तेव्हा या सावित्रीची अधिक ओढ लागली. ‘सावित्री’ ही आपल्या जीवनाचे प्रतीकात्मक रूप आहे. एका शाश्वत ध्येयाकडे जात असताना कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा ढळता कामा नये हेच ‘सावित्री’ सांगते. प्रत्येकाचे एक आत्मिक आणि वैश्विक वलय असते. जीवन जगताना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत साधत हे जगच परमात्मा स्वरूप असून आपण त्याचा एक अंशात्मक भाग आहोत हे चिरंतन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या ‘सावित्री’ त आहे. कधीकधी मनात येतं की, स्त्रियांनीच का अशी व्रते करावी? उपास का करावे? पण अधिक विचार केला की वाटते, निसर्गाने स्त्रीला अधिक संयमी, सोशिक आणि बुद्धी रूप मानले आहे. स्त्री जननी आहे, त्यामुळे वंशसातत्याची जबाबदारी तिच्यावर आहे. सात जन्म हाच पती मिळावा ही भावना मनात ठेवली तरी स्त्री-पुरुष किंवा नवरा बायकोचे साहचर्य ह्या जन्मी तरी चांगल्या तऱ्हेने राहण्यास मदतच होते. पुनर्जन्म आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी आत्ताच्या जन्मात संसार सुखाचा होवो यासाठी तरी हे व्रत पाळायला किंवा एक सुसंस्कार मनात ठेवायला हरकत नाही ना?