‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते! पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे. श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो. काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना! अपूर्ण….
Author: Ujwala Sahasrabudhe
आयुष्याची उतरंड
आयुष्याच्या उतरंडी मधली,किती गाडगी मडकी उरली!मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने,किती दिली अन् कशी रचली! जन्माला येतानाच मृत्तिका,घेऊन आली तिचे काही गुण!फिरता गारा चाका वरती,आकारा येई तिचे हे रांजण! आयुष्याच्या भट्टीमध्ये,भाजून निघते पक्के मडके!असेल जरी ते मनाजोगते,कधी लहान तर कधी मोठे! मंद आच ही आता होईल,वाटे शांत होईल ही भट्टी!एक एक मडके सरतच जाई,हाती राहील त्याची गट्टी! नकळत कधीतरी संपून जाईल,उरात भरली ही आग!शांत मना सह निघून जाईल,मडक्यांची ही सारी रांग ! बनले मडके ज्या मातीचे,त्यातच तिचा असेल शेवट!मिसळून जाईल मातीत माती,ती तर असेल त्याचीच भेट!
प्रेम लता…
सहजची भेटता तू आणि मी,काही चमकले हृदयीच्या हृदयी!बीज अचानक मनी पेरलेप्रीतीचे का ते काहीतरी!तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,बीज अंकुरे मम हृदयी!प्रेम पाण्याचे सिंचन करिता,अंकुर वाढे दिवसांमाशी!मनी वाढली प्रेम न् आशा,रोप वाढता पाचव्या दिवशी!प्रीतफूल उमलले त्यावरी,‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी!फूल प्रीतीचे मिळे मला,‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,फूल बदलले फळात तेव्हा,परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
विसाव्याचे क्षण…
उरात रुतले काटे काही,शल्य त्याचे टाकून देऊ!आयुष्याच्या अंतिम अंकी,रिक्त, मुक्त होऊन जाऊ! जरी अंत हा माहीत नाही,मरणाचे राही मनात स्मरण!किती दिवस अन् किती वर्षेही,मनात मोजी प्रत्येक क्षण क्षण! मानव देह हा दिला प्रभूने,काही करावे त्याचे सोने!येता विसाव्याचे क्षण हे,संपत जाई कणाकणाने! स्मृतीत चिरंतन क्षण वेचावे,मनीची खळबळ मनी रहावी!एकांताच्या क्षणी रमावे,अंतर्यामी गुंतून जावे!
स्वरलतास श्रद्धांजली
शब्द भावना दाटल्या,काहूर माजले अंतरंगी!सोडून गेली काया ,लताचे सूर राहिले जगी! स्वर लता होती ती ,दीनानाथांची कन्या !सूर संगत घेऊन आली,या पृथ्वीतलावर गाण्या! जरी अटल सत्य होते,जन्म-मृत्यूचे चक्र !परी मनास उमजेना,कशी आली मृत्यूची हाक! जगी येणारा प्रत्येक,घेऊन येई जीवनरेषा!त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,आंदोलती आशा- निराशा! मृत्यूचा अटळ तो घाला,कधी नकळत घाव घाली!कृतार्थ जीवन जगता जगता,अलगद तो उचलून नेई !
स्त्री- शक्ती..
तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच रूप सरस्वतीचे! त्या तिरंग्यास पेलण्याचे, अतुल्य आहे सामर्थ्य तुझे! कोणतेही क्षेत्र नाही, वर्ज्य तुजला या जगी! जाऊ दे तुझ्या यशाची, पताका ती उंच नभी! तूच आहेस सरितेपरी, साथ देण्या राष्ट्रासही ! ओघ तुझा अखंड वाहे, कोमल असुनी सामर्थ्यशाली! कर्तृत्व तुझे अनमोल, आहेस तू नारी अजोड! असशी माता, कन्या,जाया, नाही तुझ्या कर्तृत्वास तोड!
तिरंगा
तीन रंगात फडकत राहील, माझ्या देशाचा सन्मान ! आकाशातून विहरत जगभर जाई, भारताचा अभिमान ! केशरी, पांढरा,अन् हिरवा रंगध्वजाचे येत क्रमाने.! वैराग्याला प्रथम स्थान ते.. ..दिलेअसे देशाने! पावित्र्य जयाचे दावून सर्वा, शुभ्र पांढरा मध्ये असे! हिरव्या रंगाने ती अपुली, सस्यशामल भूमी दिसे. ! विजयचक्र हे मधोमध दावी ‘विजयी भव’ चे रूप सर्वा! चक्रा वरच्या आऱ्या दाखवती, देशभक्तांच्या शौर्या! उंच लहरता तिरंगा अपुला, स्वातंत्र्याची ग्वाही देतसे! दरवर्षी नव जोशाने हा, स्वातंत्र्यनभी फडकतसे! गर्वाने आम्ही पुजितो, जो देशाचा मानबिंदू खरा! त्याच्या छत्राखाली भोगतो, स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा! स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन असो! आमचा तिरंगा, फडकत राहील! या तिरंग्याच्या, रक्षणासाठी! प्रत्येक बांधव, सज्ज राहील!
काळी चंद्रकळा नेसू कशी?
महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या वेषभूषेत नऊवारी, पाचवारी साडीची खासियत असते. पंजाबी ड्रेसचे प्रमाण वाढले असले तरी लग्नात मिरवायला शालू, पैठणीच आवडते. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती नुसार लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी घेण्याची पद्धत होती. काळ्या साडीवर पांढरी खडी असलेली चंद्रकळा उठून दिसत असे. त्यावर हलव्याचे दागिने घातले की चंद्र कळा अधिकच खुलून दिसे. लग्नानंतर पहिल्या वर्षी हौसेने हळदीकुंकू करून नवीन सुनेला काळी साडी नेसायला लावणे आणि हलव्याचे दागिने घालून तिचा सण करणे हे सासू ला आवडत असे तसेच सुनेलाही त्यात कौतुक वाटत असे. आमच्या लग्नानंतर माझ्या मोठ्या नणंदेने हलव्याचे सर्व दागिने करून आणले होते. बिंदीपासून ते पायातल्या जोडव्या पर्यंत! अगदी कंबर पट्टा सुद्धा केला होता हे सर्व दागिने काळ्या चंद्र कळेवर खूपच खुलत होते.इतकी वर्ष झाली तरी तेव्हाचा तो चंद्रकळेचा स्पर्श मनाला आठवतो आणि अजूनही मी अधून मधून संक्रांतीला काळी साडी खरेदी करते. जानेवारी महिन्यात येणारा संक्रांत सण हा विविध गोष्टीने सजलेला असतो शेतकऱ्यांसाठी शेतात पिकणारी दौलत- बाजरी वांगी, तीळ,सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या -अशा स्वरूपात दिसत असते. भारतात सगळीकडे हा सण विविध रुपात साजरा केला जातो. दक्षिणेत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.तर उत्तरेकडे हा संक्रांतीचा सण ‘पतंगाचा सण’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसात हवा स्वच्छ असते. आकाश निरभ्र असते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच उंच जाणारे पतंग मनोहारी दिसतात.! या सणाला दानाचे महत्त्व आहे.त्यामुळे आपल्या जवळ असलेले दुसऱ्याला देणे ह्याचे संक्रांतीला महत्व आहे.हळदीकुंकू करून त्या निमित्ताने सवाष्णी ला दान करणे हा मूळ हेतू होता,तो कमी होऊन आता कोणी काय वस्तू लुटल्या हे सांगणे आणि आपले वैभव दाखवणे यासाठीच हळदीकुंकू समारंभ करतात की काय असे वाटते! पूर्वी सुगड दान करत असत.त्या सुगडात उसाचे करवे, तीळगुळ,वाटाणा हरभरा,पावटा,यासारखे त्या दिवसांत मिळणाऱ्या गोष्टी घालत असत.आता सुगडाची पध्दत शहरात फारशी दिसत नाही,पण गावाकडे मात्र अजूनही सुगडांचे पूजन केले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत आपले सणवार हे कालानुरूप साजरे केले जातात.या थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थ जास्त खावेत या हेतूने तीळगुळ, तूप, लोणी,बाजरी यांसारख्या गोष्टींचा उपयोग आहारात केला जातो.संक्रांतीनंतर सूर्याचे संक्रमण होऊन दिवस मोठा होऊ लागतो.उष्णता वाढू लागते.उन्हाळ्यात काळे कपडे आपण घालू शकत नाही.पण संक्रांतीला आपण आवर्जून काळे कपडे वापरतो.लहान बाळांना बोरन्हाण घालणे,काळी झबली,फ्राॅक घालणे हे सर्व कौतुकाने करतो,कारण पुढील चार महिने काळा कपडा अंगावर नको वाटेल! प्रत्येक सण असा काही हेतू ने साजरा केला जातो. आज काळी साडी कपाटातून बाहेर काढल्यावर आपोआपच असे काही विचार, आठवणी मनात जाग्या झाल्या, त्या शब्द रूपात प्रकट केल्या.. इतकेच!
जाऊ देवाचिया गावा…
‘जाऊ देवाचिया गावा’ गुणगुणतच शेगावच्या प्रवासाला प्रारंभ केला. पुण्याहून शेगावला जाण्याचा प्रवास साधारणपणे १२ तास,अगदी ए.सी.मधून प्रवास केला तरी बाहेर उन्हाच्या जवळा जाणवत होत्या. खूप दिवसांपासून शेगाव चे वर्णन ऐकत होते. महाराज जरी अगदी साधेपणाने राहणारे संत होते तरी, आताचे शेगाव, महाराजांची कर्मभूमी खरंच एखाद्या सुंदर राजधानी सारखी नटलेली आहे. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने भरपूर देणग्या मिळत आहेत आणि त्याची व्यवस्था खूपच छान केली आहे. शेगाव स्टेशनवर उतरल्यावर संस्थाना पर्यंतचे अंतर २/३ कि.मी.आहे. संस्थांची मर्यादित बस सेवा ही आहे आणि रिक्षाही आहेत आम्ही आनंद विहार मध्ये जाऊन खोली बुक केली चार जणांसाठी एसी खोलीचे भाडे एका दिवसासाठी फक्त 950 रुपये! इतर सर्वच सोयी छान होत्या. सकाळी लवकर मंदिरात गेलो असता खूपच सुखद अनुभव आला. सर्व सेवेकरी अतिशय नम्रतेने मार्गदर्शन करत होते. रांगे मध्ये बसण्याची व्यवस्था, वाटेत पाण्याचे कूलर, पंखे होते. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा डिस्प्ले, सर्वत्र व्यवस्थित माहिती देणारे बोर्ड यामुळे कुठे तक्रारीला जागाच नव्हती. कित्येक देवस्थानच्या ठिकाणी अस्वच्छता गोंधळ दिसतो तो इथे अजिबात नाही. सर्व सेवेकरी सतत स्वच्छता करताना दिसत होते. परिसरात एकही झाडाचे पान किंवा कागदाचा कपटा पडलेला दिसत नव्हता! त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. आम्ही दर्शन घेऊन नंतर कारंजा येथे दत्तमंदिर पाहून आलो. येताना नागझरी जवळ गोमाजी बाबांची समाधी पाहिली. ते गजानन महाराजांचे गुरु होते. मठा पासून काही अंतरावर आनंद सागर नावाचे उद्यान छान प्रेक्षणीय केले आहे. पाण्याची कमतरता असूनही नदीचे पाणी लांबून उद्यानाजवळ वळवले आहे. सगळीकडे झाडांची वाढ करून परिसरात गारवा आणला आहे. गुरुवारी दिवशी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी खूप रांग असते, पण कोठेही गैर शिस्त दिसत नाही. ध्यान मंदिरात पोथी वाचनासाठी सुंदर व्यवस्था आहे. एकंदरीत शेगावच्या या पुण्यमय वातावरणात दोन दिवस मन समाधानाने भरून गेले. आधुनिक काळात संतांचा महिमा हा श्रद्धेचा विषय व्यक्तिगणिक बदलतो. पण सामाजिक स्वास्थ्याचा तो पूर्वी एक अविभाज्य भाग होता. गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा, शेगाव चे गजानन महाराज या सारख्या संतांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य केले ते खरोखरच अपूर्व होते. समाजात एकरसता आणण्यासाठी संतांनी गरीब-श्रीमंत, जातिभेद या सर्व गोष्टी बाजूला सारून, क्वचित समाजाचा विरोध पत्करून अध्यात्मिक पातळीवर काम केले.ते स्वतः कफनीवर राहिले असतील, पण आज त्यांच्या नावावर श्रध्देने हजारो लोक पोसू शकतील एवढे ऐश्वर्य त्यांनी या स्थानाला मिळवून दिले. हेही अफाट कार्यच आहे. गोंदवले, शेगाव,शिर्डी ही खेडी होती.पाण्याची टंचाई होती, काही शी दुष्काळ ग्रस्त च होती, अशा ठिकाणी संतांच्या वास्तव्याने कार्य सुरू झाले. या संस्थानाने ही आरोग्य, शिक्षण कार्यही तिथे चालू केले. असे सर्व बघितल्यावर वाटते की अध्यात्मिक आणि भौतिकतेचा चांगला समन्वय साधला तर काय निर्माण होऊ शकत नाही? तिथे काम करणारा प्रत्येक जण ‘हे महाराजांचे काम आहे, आपण खोटं काम करता कामा नये’ या जाणिवेने थोडा जरी वागला तरी बरीचशी सुधारणा होऊ शकते. राजकारणाचे स्वार्थ कारण झाले की तिथे विवेक बुद्धी कशी कमी होत जाते ते आपण पहातोच आहोत, पण अशा तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि वातावरण पाहिले की वाटते, अजूनही कुठेतरी चांगुलपणा शिल्लक आहे. श्रद्धा आहे जी आपले मनोबल वाढवते. बाह्य जगात, विशेष करून शहरीकरणात, जो दिखाऊपणा, एकमेकांशी सतत स्पर्धा व त्यामुळे आलेली अस्वस्थता दिसते इथे दिसत नाही. दोन दिवसाच्या शेगाव वास्तव्यात मन खरंच शांत झालं! प्रवास लांबचा असला तरी भौतिक सुखाचा (…) थोडा का होईना सात्विक आनंद मिळाला हेच या छोट्याशा ट्रीपचे फलित!
भरजरी शालू….
हे भरजरी वस्त्र आयुष्याचे,वरदान मिळे जणू ईशाचे!ह्या शालू सम वसना वरचे,बुट्टे जरतारी निमिषां चे ! मृदू , रेशमी क्षणाक्षणांची,काढली नक्षी रंग बिरंगी!उभ्या-आडव्या जरतारी नी,ती खुलून जडली मन रंगी ! चंदेरी जरीच्या स्मृती तारा,चमकती किती काठा वरती!संचित ,कोमल ,सान क्षणांचे,नर्तन करिती मोर किती ! हा वार्धक्याचा रंग पांढरा,मिसळला असे शालूत जरी!जीर्ण शीर्ण हा शालू आगळा,अधिक प्रौढ अन् मनहारी!