नदीच्या काठावर,झऱ्याच्या पाण्यात ,निळाई अंगावर,पांघरून संगत ….१ मनाला भुरळ,घाली तो सतत!देतोस तू जणू,कृष्णसख्या साथ!….२ झाडांची सावली,पाण्यात हिरवाई,जळाच्या आरशात,मोरपिसे कृष्णाई!…३ गोपी येती साथीला,दंग झाल्या लीलेत,कृष्णाच्या संगतीत,धुंद होऊन नाचत!….४ रास रंगे गोकुळी ,गोकुळ होई सुखी!नवनीत देती गोपी,कृष्णाच्या गोड मुखी.!…५ येई सांज सकाळ,घेऊन रंग सोनेरी,आनंद देई मला,कृष्णाची बासरी!….६
Author: Ujwala Sahasrabudhe
सत्य….
दुःखालाही कंटाळा आला,वास्तव्याला राहण्याचा !सतत प्रश्न अन् कटु सत्याला,संगत घेऊन जगण्याचा !…..१ कोण तू अन् कोण मी,आपण सारे भाग सृष्टीचेउत्पत्ती अन् लय यांचे,साक्षी निसर्ग किमयेचे !….२ कुठे, कसे, कधी जन्मा यावे,हे तर आपल्या हाती नाहीलक्ष योनीतून फिरता फिरता,जगी काळ घालवतो काही !…३ धागे सारे मोह मायेचे ,उगीच बांधतो स्वतःभोवतीमोहवणाऱ्या जगी जिवाला,गुंफून घेतो अवतीभवती !….४ सत्य चिरंतन मना उमगते,जेव्हा येते कधी आपदानिमित्त मात्र ही असतो आपण,भू वरी या सदा सर्वदा !…५
विश्वास…
चालले होते विश्वासावर,साथ आहे कायमची !कधी मनात आले नाही,वेळ येईल ताटातुटीची ! सप्तपदी ची गाठ आपली,शेल्याची अन् शालूची!रेशीम धागे मुलायम त्यांचे,भीती नव्हती तुटण्याची! आज अचानक सोडून गेलात,राहिले एकटी मी या जगी !राहील का हो तुमचा आधार,अद्रुष्य पणे माझ्या पाठी ! विश्वास आहे पुनर्जन्मावर,गाठ पडेल पुढील जन्मी!त्या क्षणाची वाट मी पाहीन,सात जन्माची साथी मी !
जागतिक कविता दिन….
कविता माझी येई अचानक,काळजाच्या त्या गाभ्यातुन …अलगद कोमल शब्दछटातुन …भावनेच्या शब्द झऱ्यातुन…. कधी असते ती कल्पना भरारी..कधी ती देते दुःख वेदना उरी..कधी ती असते हसरी साजरी..तर कधी उमटे व्यथेतून खरी! मनीच्या गर्भी रुजून रहाते…चैतन्यावर ते बीज पोसते…अंकुरे जेव्हा मनात तेव्हा…इवल्याशा रोपात बहरते ! जशी उमलते , तशीच फुलते..कविता जगी अशीच जन्मते..मी न कधी ती सांगू शकते..कविता मज ती कशी स्फुरते !
असंच सुचलेलं नातं – सासु- सुनेचं..
सुनेने सासूशी कसे वागावे यावर बरंच काही लिहिले वाचले गेलं !अगदी पूर्वीपासून लहानपणी मुलीला हेच सांगितले जायचे की, नीट वाग, पुढे सासरी नांदायला जायचंय! दुसऱ्या घरी कायमचं राहायला जावं लागतं ते मुलीलाच! माहेर आणि सासर दोन्हीचे नाव राखण्याचे काम मुलीचेच असे. तो काळ असा होता की मुलींची लग्न लवकर होत असत. साधारणपणे दहा-बारा वर्षाची मुलगी झाली की लग्न होत असे. मुलींचे शिक्षण हा दुय्यम विषय होता. लिहायला वाचायला आलं थोडाफार, हिशोब समजायला लागला की खूप झाले शिक्षण, असा घरातील मोठ्यांचा मुलीच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. लवकर लग्न झाल्यामुळे या मुली सासरी आपोआपच लवकर रुळून जात! माझी आजी सांगत असे की, तिचे लग्न दहाव्या वर्षी झाले. सासरी लहान नणंद होती. त्यांचे नाते मैत्रीचे होते. काळ बदलला, मुलीच्या लग्नाचे वय बदलले. शिक्षण झाल्यावर म्हणजे साधारणपणे ग्रॅज्युएशन झाल्यावर, कधी थोडीफार नोकरी करून मग लग्न होऊ लागली. शिक्षण हे आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे, वेळप्रसंगी अर्थार्जनासाठी उपयोगी म्हणून मुलींना मिळू लागले. दुसऱ्या घरात एकत्र कुटुंबातही मुली आनंदाने राहत असत.सुना नोकरी करू लागल्या आणि घरही सांभाळायला लागल्या.घरचे रीतीरिवाज , सणवार, अडीअडचणी सांभाळून करताना बाईवर दुप्पट ताण येऊ लागला. तरीही ही पिढी आनंदात जगत होती, कारण स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू लागले. स्वतःच्या हौशी मौजी करता येऊ लागल्या. स्वतः चे घर करण्याची स्वप्न पूर्ण होऊ लागली. नोकरी नसली तरी घरी काहीतरी करून बायका संसाराला हातभार लावू लागल्या. त्यांनी सूनपणाच्या मर्यादा सांभाळून स्वतःला एक गृहिणी म्हणून सुशिक्षित, कर्तृत्ववान हे बिरूद पटकावलं! यानंतरच्या काळात मात्र खूप बदल झाला. एक किंवा दोन मुले असल्यामुळे शिक्षण, पैसा सगळंच पाहिजे ते मुलांना मिळत गेले. छोट्या कुटुंबातून सासरी गेलेल्या मुलींना सासरची जबाबदारी सांभाळणे अवघड वाटू लागले. प्रत्येक घरी असंच होतं असे नाही, पण मनाचा लवचिकपणा कमी झाल्याने जुळवून घेता येणे जड जाते हे बऱ्याच कुटुंबातून दिसू लागले. मधल्या फळीने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायची तयारी दाखवली. तरुण वयात सासू-सासऱ्यांसकट संसार करण्याची आणि आता सुनांच्या नोकरीच्या काळात नातवंडांबरोबर आनंदाने राहायची! इथेच नातेसंबंधांचा कस लागतो. कालची सून आज सासू बनते. नवीन जीवनाला ती सामोरी जाते, तेव्हा सुने इतकीच सासूची जबाबदारी असते हे शिवधनुष्य पेलण्याची! याच काळात जागतिकीकरणामुळे मुले- मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशी जाऊ लागली. ती मुले तिथेच स्थिरावली. आणि आई-वडिलांच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढल्या. त्यांना सुना- मुलींचे बाळंतपणे करण्याच्या निमित्ताने परदेशवारी घडू लागली. ते आयुष्यही त्यांना छान सुटसुटीत वाटू लागले. या सगळ्या उस्तवारीत आत्ता असलेल्या 50 ते 70 वयोगटातील लोकांना, विशेषतः स्त्रियांना विविध अनुभव घेता आले. कधीकाळी सून बनून आलेल्या या स्त्रिया पुन्हा नव्या जोमाने आईची, सासूची भूमिका वठवू लागल्या, आणि सासु सुनेचे नातं खरंच थोडं फार विरघळू लागले. काळाबरोबर स्त्री स्वतःला जुळवून घेते. मुलांच्या लग्नानंतर आम्ही दोघांनीही मुलांना पाठिंबा देऊन राहायचे ठरवले होते. सासू- सून या दोघीत पिढीचा फरक असतो. शिवाय दोघी दोन वेगवेगळ्या घरातून येतात. सासूचे ध्येय मुलाचा संसार हसता खेळता राहू दे म्हणून तर सुनेला नवरा आणि मुलांबरोबर तिचा संसार छान करायचा असतो म्हणून! या दोन्हींच्या आनंदाच्या सीमा रेषा जर एकत्र जोडल्या तर सासू काय आणि सून काय, दोघी एकमेकींच्यासाठी करत राहतील आणि एकत्र जगण्याचा आनंद घेतील!वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी सासूला कधी त्रास देतील तर आताच्या धकाधकीच्या जीवनात कधी सूनेची दमछाक होईल पण एकमेकींना समजून घेणे गरजेचे असते. तडजोड हाच या सर्वांचा पाया आहे. माझ्यासारख्या अनेक जणींना वृद्ध आई-वडील आहेत आणि त्याचबरोबर सून- नातवंडे ही आहेत. या सगळ्याचा समन्वय घालताना थोडी ओढाताण ही होणारच! पण आपणही कधीतरी या वृद्धत्वाला तोंड देणार आहोत याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे ना! म्हणजे आपोआपच मन तडजोडीकडे अधिक झुकेल आणि घरातील वातावरण आनंददायक राहण्यास मदत होईल! त्या दृष्टीने पाहिले तर खेड्यातील एकत्र कुटुंबातील वातावरण जास्त चांगले असते. मोठ्यांना मान देणे,कष्ट करणे,आणि कुटुंब जोडून रहाणे हे खेड्यातील कुटुंबात अधिक असते असे वाटते. अर्थात आर्थिक दृष्ट्या तिथे स्त्रियांना फारसे अधिकार नसतात, हे कारण ही असेल! एकमेकांना समजून घेऊन खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती अनुभवण्याचे दिवस आता बरेच जवळ आले आहेत असं मला वाटतं !अर्थात हा समाजातील एक स्तर आहे. अजून खूप बाकी आहे, पण क्षितिजावर स्त्रियांसाठी आनंदाचा सूर्य उगवू लागणार आहे हे निश्चित!
मास्क.(मुखवटे)
२०२० साला ची सुरूवातच कोरोनाने झाली आणि आपण मास्क वापरू लागलो. आज पर्यंत मुखवटा म्हणजे चेहऱ्यावरील एक काही काळापुरते घेतलेले रूप हाच अर्थ डोळ्यासमोर येत होता, पण ‘मास्क’ या शब्दाचा खराखुरा अर्थ आपल्याला आता कळला! उन्हापासून संरक्षण करायला पूर्वी मोठा रूमाल वापरला जात असे पण जीवाचे संरक्षण करण्यासाठी सतत मास्क वापरावा लागेल असे आपल्याला स्वप्नात सुध्दा कधी वाटले नव्हते! सध्यातरी ‘मास्क’ हा शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. या ‘मुखवटे’ किंवा ‘मास्क’ या शब्दावरून मला माणसांचे वेगवेगळे मुखवटे आठवायला लागले! चेहऱ्यावरील भावना लपवण्यासाठी काहीवेळा असे वेगवेगळे मुखवटे वापरले जातात. राग, लोभ, मत्सर किंवा भीती यासारखे भाव चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून माणसे समाजात वावरताना मुखवटे वापरत असतात. ‘चेहरा हा माणसाच्या भावनांचा आरसा असतो’ असं म्हटलं जातं, ते खरंच आहे पण बरेचदा एखाद्याच्या आतील भावना वेगळ्याच असतात पण चेहऱ्यावर मात्र वेगळाच मुखवटा चढवलेला असतो! नाटकामध्ये कलाकार भावनाविष्कार करतात तेव्हा त्यांनी तो खोटाच मुखवटा चेहऱ्यावर चढवलेला असतो. काहीवेळा वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून नटाला नाटक वठवावे लागते. यासंदर्भात बालगंधर्वांची एक गोष्ट मला आठवते. त्यांचे मूल खूप आजारी अवस्थेत असताना त्यांना ठरल्याप्रमाणे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी जावे लागते आणि काही वेळातच ते मुल गेल्याची बातमी कळूनही आपल्या ‘मायबाप’ प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर नाटक करावे लागते. अशावेळी मुखवट्याआडचे दुःख दिसू न देता ते सादर करणे केवढे कठीण असेल! श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, स्मिता पाटील, सुलभा देशपांडे या सारख्या अनेक नाट्य-चित्र क्षेत्रातील कलाकारांनी भूमिका जगल्या. वैयक्तिक सुखदुःखाकडे लक्ष न देता कामात झोकून देऊन भूमिका सजीव केल्या. असे हे मुखवटे त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर साकार केले! साध्या जीवनातही आपल्याला कित्येकदां मुखवटे घेऊन जगावे लागते. अनपेक्षित आलेले, कधी नको असलेले किंवा अवेळी आलेले पाहुणे असले तरी घरच्या स्त्रीला हसतमुख चेहरा करून स्वागत करावे लागते. तोही एकप्रकारचा मुखवटा असतो. प्रत्येकाला आपली जीवनातली भूमिका बजावण्यासाठी मुखवट्याचा आधार घ्यावा लागतो! आजच्या ‘करोना’ च्या काळातमुखवट्याने ‘मास्क’चे वेगळेच रूप धारण केले आहे. लोकांपासून विलग रहाताना, एकमेकांशी कमी संपर्क ठेवताना ‘मास्क’ वापरावा लागतोय! जीवनाच्या या रूपाला सामोरे जाताना आपला जीव सुरक्षित राहावा म्हणून हे मुखवटयाचे रूप आपण धारण केले आहे. पल्याला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातही ‘मुखवट्या चें जग’ प्रामुख्याने दिसते. स्वार्थ आणि सत्ता याचा ध्यास घेऊन या क्षेत्रातील कित्येक लोक सतत मुखवटे बदलत असतात. त्यामुळे त्यांची कृती आणि वृत्ती यात बरीच तफावत दिसत असते. या मुखवट्या मागे त्यांना त्यांचे भावही लपवता येतात. कोरोना च्या काळात हे ‘मास्क’बाजारात सुंदर आकारात, रंगात, मॅचिंगचे मिळू लागले आहेत. त्यातही मनुष्याची कलात्मकता दिसून येत आहे. आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे, आनंदाने सामोरे जाण्याची माणसाची वृत्ती दिसून येते. हे मुखवटे ‘कोरोना’ पासून संरक्षण करतील या विश्वासाने जगायचे बळही त्यामुळे वाढले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीने माणूस कोरोना चा सामना करत आहे. कोरोना रोगाचा प्रतिकार केला जाईल, काही काळातच तो रोग जाईलही पण या ‘मास्क’ मध्ये वावरायची माणसाची सवय जाईल का? एकूण समाजात जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी होईल का? चेहऱ्यावरचा ‘कापडी मास्क’ दूर करणे एक वेळ सोपे आहे पण मनावर जे अनेक प्रकारचे ‘मास्क’आपण चढवतो ते दूर करणे माणसाला शक्य होईल का?
अरूंधती….
शिक्षण संपले आणि अरुंधती पुण्यात नोकरीच्या शोधात आली.तिने इकाॅनाॅमिक्स विषय घेऊन बी ए पूर्ण केले होते. काॅम्प्युटरचा कोर्स ही केला होता. तिला नोकरी करत करत पुढे शिकायचे होते. एम बी ए करायची तिची इच्छा होती.त्यासाठी ती गावाकडून पुण्याला आली. तेव्हा एवढ्या मोठ्या शहरात आपला कसा निभाव लागेल अशीच भीती तिला वाटत होती. तिचे गाव फार मोठे शहर नव्हते, पण कॉलेज शिक्षणाची सुविधा होती. अरुंधतीचे शाळा, कॉलेजचे शिक्षण गावातच झाले. शाळेत असतानाही अरुंधती अभ्यासात हुशार तसेच इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यात पुढे असे .दिसायला खूप सुंदर नसली तरी तिचा चेहरा तरतरीत प्रसन्न असा होता. प्रत्येकाला ती एक आदर्श मुलगी वाटत असे.बी ए पूर्ण झाल्यावर अरुंधती पुण्यात आली. सुदैवानं २/३ इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिला एका ठिकाणी नोकरीचा काॅल आला. नोकरीसाठी ती एका वुमेन्स होस्टेलवर राहत होती. तिचा रोजचा दिनक्रम ठरलेला असे. सकाळी उठले की रूमवर चहा घ्यायचा. आपलं आवरायचे.. जाता जाता मेस मध्ये जेवण करायचे आणि कामाला जायचे. संध्याकाळी परत आले की मेल बॉक्स बघायचा घरचे, मैत्रिणीचे, किंवा कामासंदर्भात काही पत्र आहे का ते बघायचं आणि रूमवर यायचे. अरुंधती चे कुटुंब लहानसेच होते. आई, ती आणि तिच्या पाठचा भाऊ. वडील लवकर गेल्याने अरुंधतीवर नकळतच जबाबदारी पडली होती. आई नोकरी करत होती, तोपर्यंत काळजी नव्हती. पण अचानक आईचे आजारपण उद्भवले. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यामुळे दवाखान्याचा खर्च, घरातील खर्च वाढला. आईची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने निवृत्ती घेतली. तरी पेन्शनचा आधार होता. त्यानंतर अरुंधतीने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. पाठचा भाऊ इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकत होता.त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी अरुंधतीला तिचा स्वतःचा काही विचार करता येणार नव्हता. तसं 26/ 27 वय म्हणजे ती फार काही मोठी नव्हती. अलीकडच्या काळात तीशी पर्यंत मुलींची लग्न होतच असतात. आता तर नोकरी करत करत तिचे एम बी ए चे वर्ष ही पूर्ण झाले होते. एमबीए झाले की तिला प्रमोशन ही मिळाले असते आणि पगारही वाढला असता! तिची स्वप्नांची मालिका इथपर्यंत येऊनच थांबत होती! एक दिवस मेल बॉक्स मध्ये एक पत्र तिला मिळालं! त्या पत्राचा चेहरा मोहरा अपरिचित होता. म्हणजे नेहमीच्या व्यक्तीकडून येणाऱ्यापैकी ते खचितच नव्हतं.. पत्त्याच्या जागी नुसतेच आडनाव लिहिले होते आणि बाकीचा पत्ताही अंदाजे लिहिला होता. अक्षर निराळे होते. पत्र हातात घेतल्यावरच ते अनोळखी अपरिचित असल्याचे जाणवले. पत्र ही एक कागदी निर्जीव वस्तू असते पण ते उलगडण्यापूर्वीच त्यात असणाऱ्या मजकुराशी आपले मन उत्सुकतेने बांधले जाते. ते हातात उचलताना एक संवाद मूकपणे आपोआपच घडतो. नुसती घडी मोडत असतानाच अनेक प्रश्न, कल्पना, अंदाज, तर्क यांची गर्दी मनात उसळते! अरूंधतीचेही तसेच झाले.. कुणाचं असेल हे पत्र! ती रूमवर आली, काही उत्सुकतेने तिने ते पत्र उघडले. ते पत्र होते एका अनोळख्या व्यक्तीचे! पत्रामधील व्यक्ती अरुंधती ला पहात होती, तिचे निरीक्षण करत होती, प्रत्यक्ष ओळख नव्हती तरी त्याने तिच्याबद्दल बरीच माहिती जमवली आहे असे दिसत होते. कधी कशाच्या अधेमध्ये नसणारी ही सरळ मार्गी मुलगी आहे हे त्याने ओळखले होते. अरुंधतीच्या लक्षात आले की, ही व्यक्ती बहुतेक आपल्या जवळपास राहणारी आहे आणि आपले निरीक्षण करीत असावी. त्या पत्रात त्याने स्वतःची माहितीही दिली होती. प्रशांत सबनीस, शिक्षण बी. ई. पुण्यातील चांगल्या कंपनीत नोकरी, मूळ गाव बार्शी, आई वडील आणि एक बहीण गावाकडे राहतात, शेती आणि घर आहे, त्यांनी ही सर्व माहिती देऊन शेवटी लिहिले होते की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर संपर्क साधा.. अरुंधतीला हे सर्व वाचून धक्काच बसला आत्तापर्यंत सरळ चाललेल्या आयुष्यात हे कोणते वळण असावे तिला कळेना! तिला फारशा मैत्रिणीही नव्हत्या की ज्यांच्याशी ते शेअर करू शकेल! तरीही इथे आल्यावर कंपनीतील जान्हवीशी तिची वेव्ह लेंग्थ चांगली जुळली होती. जान्हवी ही अशीच हुशार, गावाकडून आलेली, शिकलेली चांगली मुलगी होती. उद्या आपण तिच्याशी बोलूया, असा अरुंधतीने विचार केला. रात्री तिला झोप लागेना !हाच असेल का आपला परीकथेतील राजकुमार? प्रत्येक तरुण मुलीला पडते तसेच स्वप्न अरुंधतीला पडले! दुसरा दिवस कधी उजाडतो आणि जान्हवी शी मन मोकळं करतो असं तिला झालं! दुसऱ्या दिवशी कॉफी टाईम मध्ये तिने जान्हवी ला हे सर्व सांगितले. जान्हवीची पहिली प्रतिक्रिया आली की ‘हे पुणे आहे, इथे असे फसवणारे ही बरेच असतात. लगेच हुरळून जाऊ नकोस, हे सर्व खरे आहे की खोटे याची शहानिशा केली पाहिजे ना?’अरुंधतीलाही तसेच वाटत होते. आता जान्हवीची मदत घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा होता. जान्हवी सोलापूर कडची होती. तिने त्याचा पत्ता वगैरे घेऊन त्याचा शोध लावायचे मनावर घेतले. अरुंधतीला ‘आठ दहा दिवसात तुला नक्की काय ते सांगते’ असं जान्हवीने आश्वासन दिले! अरुंधती रोजच्याप्रमाणे नोकरीसाठी जात येत होती. ती व्यक्ती कशी असेल, कोण असेल यासंबंधी अरुंधती अंदाज घेत होती. पण तिच्या पाठलागवर कोणी दिसले नव्हते तिला ! मात्र ती घरी येण्याच्या वेळी एक जण रोज कोपऱ्यावर उभा असलेला दिसत असे. पण इकडे तिकडे फारसे बघण्याचा अरुंधतीचा स्वभाव नव्हता. लक्ष दिले नाही. चार आठ दिवसातच जान्हवी ने त्या व्यक्तीची खरी माहिती काढून अरुंधतीला दिली. तो माणूस असाच सुशिक्षित असलेला पण लफंगा होता. मुलींना जाळ्यात ओढणे, स्वतः सुशिक्षित पणाचा बुरखा पांघरून अलगद जाळे टाकणारा असा होता. अनेक मुलींना त्याने फसवले होते. जान्हवी ला हे कळल्यावर अरुंधतीला सावध राहण्याचा सल्ला दिला. अरुंधती वाचली पण तिच्या मनात आलं,’ ‘सुदैवाने आपल्याला हे लवकर कळले, पण त्याला याचा धडा शिकवलाच पाहिजे’. त्याला रिस्पॉन्स देण्याचे नाटक केले. गोड गोड बोलून त्याची सर्व माहिती रेकॉर्ड केली आणि योग्य वेळ येताच त्याला साक्षी पुराव्यासह पोलिसांच्या ताब्यात दिले. समाजातील अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना धैर्याने आणि सावध पणाने तोंड दिले पाहिजे, जे अरुंधतीने केले होते. तिच्या या कामाचे पोलीस खात्याकडून कौतुक केले गेले. अरूंधती सारख्या तरूणींची समाजात आता गरज आहे.सुशिक्षित बेकारी मुळे ही असे अनेक तरूण वाईट मार्गाला लागतात.फसवणूक करतात, अशा गोष्टीना आपणच आळा घातला पाहिजे हे मुलींना कळले पाहिजे, हाच धडा यातून मिळतो ना!
क्रांती ज्योतीसावित्रीबाई फुले…
ज्योत लाविलीस तू,मनामनात सर्वांच्या!शिक्षणाची कास तू,धरलीस स्त्रियांच्या ! ज्योतिराव, सावित्री,गाठ बांधली स्वर्गात!एकरुप होऊनी,मग्न झाले कार्यात! दीनदुबळया दलितांना,आधार त्यांचा मिळाला!अनाथ,सान बाळांना,मायेचा झरा लाभला! अस्पृश्यतेस दूर सारूनी,दीप समानतेचा लावला!मुलामुलींना शिक्षणाचा,ध्यास तुम्ही लावला! शेणगोळे आणि शिव्याशापझेलले तिने धैर्याने !तिच्या त्यागाची फळे,आज चाखतात मानाने! ममता, समता यांचे नाते,जोडले समाजात त्यांनी!ऋण त्यांचे विसरू नये,हीच इच्छा मन्मनी !
नवीन वर्ष….
नवीन दिवस, नवीन वर्ष ,कालचक्रातील पुढची आरी !कितीक गेल्या फिरत फिरत,आत्ताची ही आहे न्यारी !….१ काळाच्या गतीतील एक वर्ष,देऊन गेले कितीक गोष्टी ,जगण्यासाठी समृद्ध अनुभव,बांधला गेला अपुल्या गाठी !…२ रहाटगाडगे कालचक्राचे,विश्वामध्ये फिरत रहाते !प्रत्येक पोहरा भरून येतो,अनुभव त्याचे करित रिते !….३ कालचक्रावर असतो आपण,एक अस्तित्व ते बिंदू मात्र !त्या बिंदू चे नाते असते,परमात्म्याशी परम पवित्र!….४
अवतार दत्तगुरूंचा…..
श्री दत्तगुरु अवतारा ,त्रिगुणात्मक जगतारका !अवतरला तुम्ही जगती ,तारण्या सकल दुःखकारका!….१ उत्पत्ती, स्थिती, लय जाणू,त्रिगुण हे या जगताचे !ब्रह्मा,विष्णू, महेश ,साक्षी भूत त्या लीलेचे !…..२ सती अनुसये चे सत्व ,इथे लागले पणाला !तिन्ही बालके सृष्टीची ,जागवले तिने मातृत्वाला!….३ गौरव झाला जगी या,अनुसया मातृभावाचा !दिगंबरा तुझा अवतार,न्याय देई अजब हा साचा!…४