पावसाचं धुमशान जोरात चाललंय,परतीचे वेध आकाश मोकळं होऊन आवरायला लागलंय! विजा तांडव नृत्य करून कडाडून घेतायत,ढगांचा गडगडाट हत्ती च्या टकरी चा चित्कार काढत गरजतायतधडकी भरवणारा थयथयाट करून मानवाला नीट राहण्याचा संदेश देतय. धरतीमातेला दिलेले भरभरूनत्याचं असं अस्ताव्यस्त कोसळणं भूमातेला असह्यझालंय.. बळीराजाचे रुदन प्रपातात विरघळून गेलय..तरीही त्या पावसाचे धुमशान जोरात चाललय… वाटेतील सर्व प्राणिमात्र भिजवत तुडवत नाश करत चाललंय… कोसळताना सौदामिनी अनेकांचे जीव घशात घालतेय….राहणारा मागे वेदनेचा दाह सहन करत चाललाय..जळणारे जीवन पुनश्च पावसाच्या आशेने शांत होत चाललय….. असं हे निसर्गाचे ऋतुचक्र अविरत चाललंय….
Author: Supriya Joglekar
*शालीन सोबती*
‘ती’ असता तुझ्या सोबत फिरताना मला कसलीच भीती नसते. तिच्या साथीने मग निवांतपणा लाभल्यासारखे वाटते, तुझे ते बेफाम होणे, क्षणार्धात कोसळणे, चिंब चिंब भिजून जाणे, पण तिच्या साथीने सुसह्य होते. तसं बघायला गेले तर, तुझ्यापुढे ती नाजूक नार ! पण तुझ्यासोबत उघडपणे फिरताना जेवढा संकोच वाटतो ,तेवढेच ती सोबतअसताना आश्वस्त वाटते. तिच्याशिवाय तुझ्यासोबत फिरणे मला मान्य नाही. माझ्यापेक्षा समाजाला, समाजातील नजरांना, ते मान्य होत नाही. त्यांच्या नजराच ते सांगून जातात… तुझे ते बेफाम बेधुंद वार्यासवे धडकणे, मोठमोठाल्या जल बिंदूंनी वाट्टेल तसे भिजवून जाणे, माझं नखशिखांत भिजणे, खरे तर मलाच फार आवडते ❤️ पण ते जनमानसात योग्य नसते ना! म्हणून तिला सोबत घ्यावे लागते. ती असताना बघणाऱ्यांच्या नजरा पार बदललेल्या असतात. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा पारदर्शक पणाचा बुरखा जाणवतो. कारण मग तिच्या सोबत असताना माझे वागणे शालीन, कुलीन व घरंदाज होऊन जाते. स्वैर पणाचा लवलेशही नसतो. आणि हे ही समाजच ठरवतो 😀 कारण’ती’कुलवंत स्त्रीप्रमाणे माझ्यासोबत असते. मग तिच्या अंगावरील वस्त्र जीर्णशीर्ण झालेले का असेना, ते फाटून तिच्या देहाच्या काड्या चारी बाजूंनी दिसल्या तरी चालतील!तिचे फाटके वस्त्र… तुझ्या स्वैराचारी वर्तनाने कोसळताना ! तिच्या देहापासुनी उलटेपालटे झाले तरी चालेल! माझे सर्वांग भिजलेले असले तरी, मी सुरक्षित नजरेने न्याहाळली जाते, कुलीन ठरते, तुझ्यामुळे झालेली माझी परिस्थिती, ही तुझ्यावरच रोष दाखवून निवळली जाते. मला एकदम सुरक्षितता जाणवते 😀😀 ती असताना तुझ्याबरोबर भिजताना कसलीच तमा बाळगण्याचे कारण नसते, तू कितीही लगट केलीस, तरी ते कोणत्याच नजरांना आक्षेपार्ह वाटत नाही. कारण मी घरंदाज ठरते.. पण तिच्या शिवाय तुझ्यासोबत फिरले तर, सारे जगच माझ्याविरुद्ध जाते. माझ्या तुझ्या सोबत फिरण्याला निर्लज्जतेचा साज चढवला जातो. दूषित नजरा मला विद्ध करतात. अनेक बोचरे टोमणे, माझ्या हृदयाला विव्हळ करतात. अगदी लाज सोडली वाटते! थोडे थांबायचे ना.. कुठेतरी आडोसा पाहून, तुझ्या माझ्या ताटातुटीची वाट पाहायची असे सूचित केले जाते…. मनातल्या मनात मी फार आनंदी असते, अगदी तुझा प्रत्येक थेंब अमृताचा भास होत असतो, गोड शिरशिरी, थंडगार वाऱ्यासवे भिजताना मन अगदी प्रफुल्लित उल्हासित होते, मी मस्त एन्जॉय करते (. पण सोबत ती असताना )😀 ती माझी खरी सखी आहे कारण फक्त तिलाच तुझ्या माझ्या प्रेमाचे गुपित माहित आहे. सारी गंमत नाही का? एवढीशी ती माझ्या सोबत असताना, आणि नसताना किती हा समाजातील नजरांचा घोळ आणि तुझा माझा खेळ….. दरवर्षी वर्षांसमयी… फार फार आवडते….
*मैत्री*
जन्मा सवे येते मैत्री,नात्यांच्या विणीतुनी,सम विचारधारेतुनी,कधी शत्रू मैत्री,कधी विशुद्ध मैत्री. मैत्री कधी ठरवून का होते?मैत्री ला वयाचे बंधन नसते.मैत्री दिनी काव्य करायचे,मैत्री वरच बोलायचे.मैत्री तर अखंड वाहणारा निर्मळ झरा…..जिथे मिळतो आनंदाचा निखळ सहारा…… मैत्री असावी जन्मजन्मांतरी ची,मैत्री खरी संकट घडीला टिकणारी,मैत्री असावी आश्वस्त शब्दांची, बालवयी जरी पांगलो,यौवनात जरी दूर गेलो,वृद्धत्वी जरी निजधामी गेलो,मागे राहिलेल्या मैत्रेयाला आठव असणारी…..
*उडते फुलपाखरू*
त्या लहानशा बागेत फुललेली विविधरंगी फुले, आणि त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, अगदी लहान मुलापासून ते वृद्धत्व आलेल्या जीवाला मोहित करणारे नेहमीचे दृश्य. किती त्यांचे या फुलांवरून त्या फुलांवर भराभर उडणे, ते नाजूक इवले इवले पंख पसरले की, क्षणभर नक्षी…. अति नेत्रसुखद. अगदी परमेश्वराने निसर्गावर चितारलेली विलक्षण कलाकृती… अल्पकाळाचे आयुष्य भरभरून आनंद देणे घेणे, शिकावे फुलपाखरां कडून. क्षणिक दर्शनाने आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, आयुष्यभर मनात सुंदर दृश्य ठेवून जातात. असंच वागावे आपण! जिथे जातो तिथे मधूर आठवणींचा प्रकाशमान कवडसा सदैव परावर्तित होत रहावा.. हेवेदावे, उपदेश, तुलना, हेटाळणी आणि नजरेचे निखारे, सारे सोडून उडते फुलपाखरू व्हावे… फक्त मधू सिंचन आणि आनंद पसरवावा…. असे असावे आयुष्य आपले उडते फुलपाखरू… मोहापासून दूsssर……
*फिसकारणारी मांजरी*
सकाळची वेळ! भरपूर कामाचा पसारा, पण दहा मिनिटे रिकामा वेळ होता, काय करायचं? सगळ्या घरात फेऱ्या मारून झाल्या, प्रत्येक खिडकीमधून बाहेर डोकावून झाले, सगळीकडे नवीन काय नजरेला पडते का हे पण पाहून झाले, तरीपण वेळ उरलाच, मग म्हटले चला काहीतरी लिहुयात, म्हणून पेन वही घेतली, पण ना विषय आणि डोक्यात कल्पना, लिहिणार काय माझं कप्पाळ! आणि हे असं विचित्र काहीतरी लिहून ठेवलं…. आणि असल्या लिखाणाला आता व्हाट्सअप वर पाठवणार! आणि मग माझ्या मैत्रिणी मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला एकदम तत्पर! त्या म्हणणार, ग्रेट काय मस्त ग.. माझी कॉलर एकदम ताठ 😀 अरे हो कॉलर कुठेय? गाऊन तर आहे अंगावर, मग काय? असं म्हणायला हवं माझा गाउन काय मस्त घेरदार आहे….. स्वतःच्या आकारामुळे तो वाटतोय हे काही भान नाही…. आहे ना गंमत? चला आता आठ वाजायला आले, सकाळचा ब्रेकफास्ट मिळावा म्हणून घरातील मंडळी चार वेळा इथे डोकावून गेली, बिचारे बोलू, विचारू पण शकत नाहीत. काही विचारलं तर मांजरीसारखे फिसकारेल! अन् मिळणाऱ्या ताज्या नाश्त्याला मुकावे लागेल, बिस्किट टोस्ट किंवा पाव खाऊन रहावे लागेल, ही भीती डोळ्यातून ओसंडून वाहत होती…. तिरक्या डोळ्यांनी त्यांचा भुकेने आणि शंकेने व्याकूळ झालेला चेहरा पाहिला, मनातल्या मनात जरा आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कसे आता गप्प बसतात? पूर्वी आपण असेच गप्प बसत होतो, आता रोल बदलला…. केवढी वाढली आपली हिम्मत! अगदी मनातल्या मनात आपण काय वट निर्माण केली, इथपासून ते सगळेजण कसे घरातील कोणताही निर्णय घेताना आपल्या तोंडाकडे बघतात … आपला शब्द रास्त मानतात याची पुरेपूर खात्री पटलेली असते…. उगीचच हसू आले मला, हो आपण बदललो आहोत असे वाटते. पण यामध्ये स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. याचीही जाणीव आहे. सार्या कुटुंबाला शिस्त लावण्यासाठी आपल्याला हा असा रणचंडीकेचा अवतार अधून मधून धारण करावाच लागतो. नाहीतर घरातील सगळे जण लगाम नसलेल्या घोड्यासारखे स्वैर उधळतील, कधीही, केव्हाही बाहेर जावे, मनाला वाटेल तेव्हा घरी यावे, कसलाही, कोणाचाही विचार न करता आवडले ते खाऊन टाकावे. पसारा करून ठेवावा, मन मानेल तेव्हा आंघोळ करावी, हे काही कुटुंब म्हणून राहणाऱ्या घरातील व्यक्तींना शोभत नाही म्हणून ते असे महिन्या दोन महिन्यांनी अवतार धारण करणे गरजेचे असते….. चला आता बराच वेळ झाला, आता इतका अंत पाहणे बरे नाही…. आता स्वयंपाक घरात जाऊन अन्नपूर्णेचा रोल करणे गरजेचे आहे… बरेच काही लिहावे असे आहे, तूर्तास एवढेच! जरा गंमत हो… नाहीतर निष्कर्ष काढून मोकळे व्हाल? असं आहे तर तिच्या घरात!… काय? बहुतेक स्वत:पण असेच अवतार कार्य करत असाल ना? सतत पाऊस पाणी चिखल, आणि ठिकठिकाणी झालेला विध्वंस, आक्रोश वेदना पाहून मनाला विषण्णता आली होती म्हणून जरा असे हलकेफुलके लिहून.. रिलॅक्स होत आहे….
२८ मे..२०२०…’ती ‘
भूतकाळ इतिहास जमा झालेला, भविष्य काहीच नाही, आणि वर्तमान काळ व्यतीत होत नाही, मग करायचे काय? तारुण्याची उतरंड झालेली, अंगातील रग तोंडावाटे बाहेर पडणारी आणि स्वतःच्या प्राक्तनाने सगळे असून एकाकी जीवन जगत असलेली, तिरसट, अर्धवट, मूर्ख, सरकलेली आणि डोक्यावर परिणाम झालेली अशी बिरुदे तिच्या नावाआधी लागलेली’ ती ‘.. समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून अनाठाई पण’ तिच्या’ दृष्टीने मोलाचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत असते, तिला स्वतःचे असे नाव नाही. पण या टेक्नोसॅव्ही जगात अशा कितीतरी ( ती ) नावाच्या स्त्रिया असहाय जिणे जगत आहेत, कशाला करतात ह्या इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड,? शांत बसवत नाही का?, पण नाही… वयाचा फायदा घेऊन आम्ही तर काय चांगला सल्ला देण्याचे किंवा चांगले सांगण्याचे काम करतो तुम्हाला ऐकायचे तर ऐका असे त्यांचे म्हणणे… आपले ऐकावे हाच हेका असतोच.. असो, एकंदरीत ती स्वतःही अन साऊंड असते आणि दुसऱ्याना पण आपल्याच रेषेत आणून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे या कोणी तथाकथित, सो कॉल्ड, ‘ती’ आहेत, त्या सर्व समाजव्यवस्थेमध्ये मोठी ‘ समस्या ‘ आहेत, यांचे प्रश्न कोण सोडवणार? कोणीच नाही ! कारण समाजाला म्हणजेच त्यात आपणही येतोच, एक घटक म्हणून आपणही आपला ‘नाकर्तेपणा ‘लपवु शकत नाही. आणि मग’ ती’ नावाची समाजामध्ये अक्राळ विक्राळ रूप धारण करून सतत समोर येत राहते, तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे तिच्या जगण्यासाठी असलेले एकमेव हत्यार म्हणजे जे तिला मिळालेले एकाकी जगण्याचा शाप, आणि त्यातून मुक्त न होता तेच धारदार शस्त्र म्हणून इतरांचे आयुष्य सपासप’ वार’ करून इथे’ वार ‘म्हणजे सल्ला, अनुभव आणि स्वतः दिलेला अन्यायाविरुद्ध लढा, किंवा केलेली धडपड हे तिचे ‘वार ‘होत.. ‘ ती ‘तिच्याच सारख्या तिच्या दृष्टिकोनातून, हा मुद्दा महत्वाचा… पीडित असलेल्या तिला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते, वेळप्रसंगी स्वतःची दमछाक करून घेते, अपमान सहन करते, आणि मग जेव्हा हाच समाज’ तिला ‘तुझे आयुष्य तु जग.. आमच्या भानगडी मध्ये हे पडू नकोस म्हणून तिला धुडकावून लावतो.. आणि ‘ ती ‘ परत आपल्याच कोषात एकाकी जीवन कंठत रहाते, सतत विचार करते की,’ मीच चुकले का?, माझेच चुकले का? बिचारी.. या प्रश्नांच्या भेंडोळ्यात एक त्यातीलच ‘ चीटोरा ‘कस्पट म्हणून भिरभिरत रहाते…
*पाऊस पाऊस, पाणीच पाणी*
पाऊस पाऊस, पाणीच पाणीवळचणीला ओला कावळा ओली चिमणी….इथे तिथे विसावा शोधू लागले,घर बांधायाचे राहून गेले… पाऊस पाऊस, पाणीच पाणीबाजारी रमलेले नरनारी,दुकानाच्या आडोशाला उभे राहिले,विस्मरण छत्रीचे आज जाहले ,पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले,हाती धरिल्या पिशव्यांचे ओझे वाटू लागले… पाऊस पाऊस, पाणीच पाणीआठवुनी शैशव अपुले, वृद्ध पलंगी दबकून बसले,गवाक्षातील शिडकाव्याने अंग तयांचे गारठु लागले,ओढुनी शाल अंगावरी घोटभर चहाची वाट पाहू लागले….. पाऊस पाऊस, पाणीच पाणीओहोळ, नाले पिसाट जाहले,उन्मत्त होऊनी नदीस मलीन करू लागले….. पाऊस पाऊस, पाणीच पाणीगढूळली सरिताअश्रूभरीत डोळ्यांनी, सागराकवेत जाण्यासाठी आसुसली,झरझर वाहुनी खळाळत सागरास मिळाली,सरितेचे अश्रू पिऊनी सागर खारट जाहला,होता बाष्प जल थेंबांचे पाऊस होऊनी कोसळू लागला…… पाऊस पाऊस, पाणीच पाणीधांदल गडबड, भिन्न विचार अन् भिन्न गाणी…….
*भाषांची राणी*
माझी मराठी विश्वजननी केली तिजला लुळी – पांगळी आम्ही स्वकियांनी…. परभाषेची घुसखोरी, सदा अपुल्या ओठांवरी, हाय फाय शब्दांना भुलतो माय मराठीस अपमानीतो असूनी मराठी, नांदी बोलण्याची, परभाषेत करतो….. मराठी भाषेचे गोडवे, मराठी भाषा दिनीच गातो….. अन्य दिनी, पॉप, झाज, सालसा यातच रमतो…. मराठी भाषा मरते आहे, आपणच ओरडतो, अनन्वित अत्याचार करूनी तिज अनादरितो … मराठी जगली पाहिजे असे फतवे काढतो, किती आत्मीयता मराठीची आपण जपतो? एवढेच सांगणे विश्वाला, माझी मराठी विश्वजननी…. गावंढळ म्हणा खुशाल तिला आहे ती खरी साऱ्या भाषांची राणी…..
*सहज आले मनी…*
अवतीभवती सगळे इमोजी🤗… गंमतच नाही का ही! ईमोजी हा शब्द अगदी नवीन नवीन आलाय माझ्या डोक्यात…. म्हणजे शिरलाय….. जसे मोबाईल फ्रेंडली झाले तेव्हापासून, सुरुवातीला असे काहीतरी चित्रविचित्र तोंडे कोणीतरी व्हाट्सअप वर पाठवली की कळायचेच नाही! हे काय? असले तोंड काय? मग मुले सांगायची’ अग हे इमोजी आहेत’म्हणजे तुमच्या भावना व्यक्त होणारे चेहरे! रडके, हसणारे, रागावलेले आणि त्यातील असंख्य प्रकार…. म्हणजे त्या त्या कृतीची किती खोली आहे असे दाखवणारे…. मग काय लागला मला चाळा😀 …. कुठे गेले की प्रत्येकाचे चेहरे न्याहाळण्याची खोड लागली…. आणखी समोरील चेहऱ्यासाठी कोणता ईमोजी योग्य आहे याचा शोध सुरू व्हायचा सापडला की स्वतःचे स्वतःला अफाट हसू यायचे…. बरे तर बरे माझा चेहरा मला कोणत्या इमोजी सारखा आहे हे कोणी सांगितले नाही आणि माझे मला पण कळले नाही…. एकदा खूप वेळ आरशासमोर उभे राहून तोंड वेडेवाकडे करून, डोळे तिरळे मोठे करून, चित्र विचित्र हावभाव करून पाहिले, पण ओळखणे शून्य….. माझ्या मनात आले बहुतेक आपल्या सारखा चेहरा असलेला इमोजी अजून सापडलाच नसेल…. एकदम युनिक…. आणि परत एकदा माझे मला तुफान हसू आले… तसं असा विचार आणि असले प्रकार करायचे माझे वय नाही… तरीपण कृती तर केली… खरे तर बरेच काही लिहावेसे वाटते या इमोजी वर. अगदी आपल्या घरातला मेंबर असल्यासारखे झाले आहे. पण जरा आवरते घेते, नाहीतर कोणी’बकवास’ ‘ओकारी’ सारखा ईमोजी टाकून मोकळे होतील…. कसा जोक केला म्हणून स्वतः चे हसतेय हा हा हा… आज काल सगळी लहान मुले अगदी हुबेहूब इमोजी सारखी तोंडे करून आपले म्हणणे न बोलता व्यक्त होत असतात. आश्चर्य आहे हे इतके सुंदर कसब कसे काय आत्मसात केले असेल त्यांनी. पण बरे झाले, शब्दांचे पाल्हाळ लावून आपल्या मनातील तगमग, आनंद, मनातील विचार पटकन एका इमोजीत व्यक्त करता येतात…. फॉरवर्ड करायला सोपे…. समजणाऱ्याला समजायला सोपे…. नुसते आपले इकडून तिकडे इमोजी गडे….. शब्द गेले कुणीकडे…..
नको माझे
माझे व्यक्त होणे म्हणजे लेखन…. माझे लेखन इतरांना आवडणे ही पुढची पायरी…. माझ्या लेखनाला दाद देणे कौतुकास्पद….. माझे लेखन चतुरस्त्र होणे हे वाचकांवर अवलंबून असते… लेखन यशस्वी कधी वाटते जेव्हा वाचक वृंद वाढत जातो…. स्वतःसाठी लिहिणे…. स्वतःचेच वाचणे….. स्वतःचे कौतुक करणे…. स्वकेंद्रित लिखाण…. हे लिखाण होते का? या सर्व मुद्द्यांवरून, ‘माझे हा शब्द काढून टाकला तर’… किती छान वाटतं ते! कारण ते मग आपले होऊन जाते…… आणि मग त्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो…..