अमीर फोर्ट (राजस्थान) येथील शीश महल मध्ये पाहण्यात आलेले जरा हटके चित्र … हसणाऱ्या सिंहाचे हे चित्र माझे लक्ष वेधून घेऊन गेले… आणि ते कॅमेरात कटीबद्ध करावेसे वाटले… हे पाहताना मला जाणवले फार पूर्वापार अशी व्यंगचित्रकला असावीच आणि ती साकारणारे कलाकारही… अख्खा खांब अगदी बारीक बारीक नक्षीकाम करून त्यावर त्याच पद्धतीने सुंदर काचेचे तुकडे जोडून मंत्रमुग्ध करणारी लयकारातील नक्षी साकारल्यावर खांबाच्या अगदी पायथ्याला हा असा हसणारा वनराज! का बरे असे केले असेल त्याने! मनात दिवसभराचे काम संपल्याचा आनंद तर कलाकाराने व्यक्त केला नसेल चित्राच्या माध्यमातून…. हो नाहीतर सिंह हसतोय ही कल्पनाच गंमतशीर आणि ते चित्रातून प्रकट करणे तेही एवढ्या भव्य दिव्य वास्तू मधील खांबावर… मनात येत आहे कसा असेल बरं तो कलाकार! काय असेल त्याच्या मनात! अख्खा दिवस मनमोहक चित्रे रंगवून मनामध्ये वनराज ही आपली ही कलाकृती पाहण्यासाठी आला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ही आपण साकारलेली सुंदर कलाकृती पाहून हास्य उमटले आहे अशी कल्पना करून त्याने शेवटच्या क्षणी कुंचला ठेवताना रेखाटले असावे.. होते विसंगत पण मला आवडून गेले…
Author: Supriya Joglekar
चैत्र पाडवा
नव वर्ष प्रतिपदा!ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलेला दिवस!मग त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे… गुढी उभारणे हे आपल्या मनातील परमोच्च आनंद गगनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास होय!शुभ सुभग, सुखद दिन..चैत्र मास, चैत्र पालवी सारा सृजनाचा सोहळा… ऋतू जरी शुष्क उन्हाळा..रसदार फळांचा असतो मेळा..अशाच या चैत्र मासातील पहिला नववर्ष सोहळा.. आबाल- वृद्ध आनंदी आनंदी..तरुणाईच्या स्वप्नांची वृद्धी..नवविवाहितांच्या ये आनंदा भरती… सौख्यदारी ,सौख्य घरी….आम्रपर्णी तोरणे, दारी..सुंदर रंगावली रंगली प्रांगणी.. प्रातःकाळी कडूनिंब पानाचे सेवन….हो वरदान सकल वर्ष आरोग्य संपन्न….गोडधोड, मिष्टान्न सुग्रास भोजन… रसना होय तृप्त जरी….बहुगुणी तांबूल मुखी खूमारी….काय वर्णन ते गुढीपाडव्याचे करावे? व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने रूढीस चालत न्यावे…बदलते जग, बदलते विचार…रुपडे बदलले साजरा करण्याचे… हेतू मात्र एकच सदैव..आनंद द्विगुणित करण्याचे…..कोकिल रव पडता कानी…. बहरलेला आम्र तरू मधुमासा ची आठव देतो….चैत्र पाडवा नव्या स्वप्नांचा इमला बांधण्यास सज्ज होतो….
हे स्त्रीये !….
हे स्त्रीये तू गती आहेस….साऱ्या सृष्टीला चैतन्याचे अमृतपान करणारी सती आहेस…..तुला तुझ्याच साठी फक्त एक दिवस ठेवून मानवाने त्याची अल्पमती दाखविली आहे…..तरी तुला आजच्या दिवसा बरोबर … प्रत्येक दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा प्रदान करते……तूच शुभदायी……तुच सुखदायी….तूच तारा तूच मंथरा….. तूच मंदोदरी तूच शूर्पणखा…..तूच गृहिणी, तुच जगत जननी…तूच निर्मिती तूच विध्वंसीनी…तुझ्या स्वरूप कुरूप सर्व रूपाला कोटी कोटी प्रणाम……🙏🏻तुझ्यात शक्तीतील” मी’ एक
आज हे वर्ष संपणार
आणि उद्याचा दिवस नवीन वर्षाची चाहूल! फरक तो काय एका रात्रीचा….रात्रभर जागून मला पहायचंय खरंच काही वेगळं होतं का वर्ष संपतानाच्या रात्री?तोच तर असणार रात्रीचा काळोख…अवतीभवती नीरव शांतता….मधूनच केकाटणारे कुत्रे…कुठे वॉचमनच्या शिट्टी आणि काठी चा आवाज…..एखाद्या जीवाला आलेली जीवघेणी खोकल्याची उबळ शांतता भंग करून जाते…. मनासारखे घडत गेले की आपण म्हणतो सगळे वर्ष मस्त गेले,आणि बर्याच गोष्टी विरोधात गेल्या की खूप त्रासाचे आणि कटकटीचे गेले म्हणून मोकळे होतो.स्वतःच्या सुखा पलीकडे पहाण्याचे धारिष्ट्य करणे जमतच नाही.कशाला ती प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या वर्षाची मोजमाप करायची? सगळ्या जगाचे कॅलेंडर बदलणार म्हणून! पण निसर्ग करतो का असा जल्लोष?डवरलेल्या झाडाचे एखादे पान गळून पडले तर अगणित पानातील एक पान गळून पडल्याने झाडाला काहीच फरक पडत नाही…तसेच तर या जीवाला मिळालेल्या आयुष्याचे आहे…हे जगातील अव्याहतपणे निसर्गचक्रात फिरणारे मानवी जीवन पुढे पुढे जाणारे…..सरले ते संपले….समोर वाटचाल करत राहायची…. काय दिले काय घेतले याचा हिशोब नको!निदान मी तरी असे ठरवले आहे..बरेच वेळा इच्छा असो वा नसो कठोर शब्द वापरले गेले..त्यामुळे अनेक जण दुखावले गेले असतील…त्यांनी जमलेच तर मला माफ करावे 🙏 कारण माफ करणं न करणं हे त्या व्यक्तीला कितपत खोलवर जखम झालेली आहे यावर अवलंबून असते. तसेच प्रत्येकाच्या मनासारखे मला वागता येणार नाही कारण माझाही एक स्वतःच्या विचारसरणींचा स्वभाव बनवून गेलेला आहे..नवीन वर्ष म्हणजे एक प्रकारचे बोनस आयुष्य सुरू झाले आहे…तो टेक ईट ग्रांटेड करण्यात अर्थ नाही..प्रथमतः आपली तब्येत सांभाळणे म्हणजेच इतरांना त्रासदायक होणार नाही…हे पण फार महत्त्वाचे असते.. कारण घरातील एक व्यक्ती जरी आजारी असेल तरी साऱ्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो..आर्थिक शारीरिक आणि मानसिक..म्हणून हा सल्ला मला मोलाचा वाटतो!प्रत्येकाने पटला तर अमलात आणायचा प्रयत्न करावा 🙏नवीन वर्षाची शुभेच्छा देताना शक्यतो प्रत्येकाने कमी बोलावे…मुद्देसूद बोलावे, वाद विवाद भांडणे शक्यतो टाळावीत…मनात कटूता ठेवू नये..जिभेवर साखर न का ठेवेना कमीत कमी साखरेची चव आठवावी..आणि त्याप्रमाणे मवाळ शब्दांचा वापर करावा 🙏दिवसाच्या चारोप्रहर.. शुभ सकाळ शुभ संध्याकाळ शुभ रात्री असे मेसेज पाठवून आपण ग्रुप मध्ये मानसन्मान मिळवून असतो हा भ्रम दूर करावा. उत्तम वाचलेले, किंवा त्या ग्रुपशी संबंधित विषय असलेले तेवढेच लेखन अथवा माहिती पाठवण्याचा प्रयत्न करावा 🙏गेले ते वर्ष आले तेही वर्षच..स्वागत करूया सहर्ष!स्वतः सहित इतरांचाही होवो उत्कर्ष!कामना करते भरभराटीचे यशाचे जावो सर्वांना होईल मनी हर्ष!
कलंकित कळी
क्षणिक मोहा पायी आयुष्य बाटले गेले..आयुष्याचे दान मग पसा पसा वाटत गेले…लक्तरे होताना देहाची,काळीज दगडाचे करू लागले..तारुण्य ओघळले, नजर थिजली …अवशेष या प्राक्तनाचे मीच गोळा करू लागले….नित्य सरणावर जाताना मरणाचे दान मागु लागले…
शुभ दीपावली
झाले आगमन आनंदाचे,होता लक्ष्मीपूजन …घरे-दारे सजली..नर-नारी, बाल-वृद्ध,भरजरी पोशाखी नटली…ओसंडूनी आनंद वाहतसे…तल्लीन सारी सृष्टी,पाहुनी लखलखते सौंदर्य …पहाटे समयी गार वारेsssफुलत्या कळ्यांचे गंध सारेssउबदार किरणांची,शाल पांघरूनी…निसर्गाने दाखविले औदार्य…आतषबाजी फटाक्यांची,रोषणाई दिव्यांची,रेलचेल मिठाईची,आनंदा उधाण आले,लक्ष्मी सवे नारायण आले…घरी-दारी आनंदात रममाण होताना…सख्यांनो! लक्ष वेळा तुम्हा आठवले…जिथे-जिथे असाल तिथे,तेज दिव्यांचे पाठविले…तेज अलंकार लेऊनी,तेजोमय होऊनी साऱ्याजणी,काव्य शलाका तळपत राहोsदीपावली सर्वांना,आनंददायी, यशोदायी होवो..
सहज मिळते आयुष्य!सुख आपण शोधायचे..आनंद देताना, आनंद घ्यायला शिकायचे!दसरा सण मोठा!रागाचे लोभाचे उच्चाटन करायचे!समाधानी राहताना…इतरांचे समाधानी हास्य पाहायचे….सोने लुटायचे!सोने मिळवायचे…बाकी आयुष्य!सोन्यासारखी माणसे, जोडायचे….
मुरलेलं लोणचं
आज वासंतीच्या घरात बरीच गडबड चाललेली होती.. कारणही तसेच होते, तिच्या लाडक्या लेकीची ‘ चोर चोळी ‘भरण्याचा कार्यक्रम होता, तसे बघायला गेले तर साधेच कारण… पण आजकाल छोट्याशा कुटुंबात आनंद साजरा करण्यासाठी आणि जी काही दोन-चार नातेवाईक मंडळी जमू शकतात यांच्यासाठी हे कारण फारच मोठे वाटत होते… त्यानिमित्ताने तिच्या सासरची मंडळी म्हणजे इन मीन तीन माणसे, स्वतः नवरा म्हणजे ती चा लाडका जावई अजय आणि त्याचे आई-वडील… आणि वासंती कडे म्हणाल तर.. ती स्वतः तिचा नवरा रमण आणि मुलगा चिन्मय झाली फक्त सहा डोकी.. वासंतीची मोठी बहीण येतेच म्हणाली आणि व्याह्यांचीही मोठी बहीण जवळच रहात असल्याने ती पण आली.. फार हौशी बाई… सगळे तिला अक्का म्हणतात.. अशी एकंदर आठ माणसे जमली.. पण घरामध्ये आनंदाला नुसते उधाण आलेले होते वासंती ची मुलगी मयुरी अतिशय आनंदात होती, कारणही तसेच होते म्हणा लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर ही गोड बातमी तीच्या सार्या देहबोलीतून आणि टवटवीत फुललेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती, तिच्या सासूबाई म्हणजेच नीलाताई त्यांना तर सुनेचे कौतुक किती करू आणि किती नको असे झालेले.. संध्याकाळी सोसायटीमधील पाच सवाष्ण बायका बोलावून त्यांनी ‘चोर-चोळीचे ‘हळदी कुंकू थाटात करून घेतले…. दिवसभराचा शिणवटा घालवायला म्हणून सगळेजण’ लॉंग ड्राईव्हला ‘बाहेर जायचे म्हणून तयारी करू लागले.. इतक्यात व्याही बुवांची मोठी बहीण अक्का वय वर्षे 77 ती म्हणू लागली की, आता बाहेर जाणे नको, घरातच राहू.. पहिलटकरीण आहे, दृष्ट लागेल माझ्या परीला… फार लाडकी होती ना ती!… त्यातच आता उशीर झालेला आहे.. घरातच थोडासा वरण भात खाऊ आणि आराम करू…. मग काय! जावई, मुलगी तिचा भाऊ आणि बाकीचे सारे हिरमुसले, अक्काबाई ना म्हणू लागले तुम्ही बसा घरात आम्ही जाऊन येतो.. त्यावर अक्काबाई म्हणाल्या माझे जरा ऐका! हवे तर उद्या आपण सकाळ पासून बाहेर पिकनिकला जाऊ, पण आता नको.. असे त्या वारंवार सांगू लागल्या, त्यांना कशाची जाणीव होत होती बरे! त्यामुळे थोडाश्या नाराजीने सगळ्यांनी जाणे रहित केले… आणि वासंती अनिच्छेने स्वयंपाक घरात पोट पूजेच्या तयारीला लागली… मयुरी पण कपडे बदलायला म्हणून तिच्या खोलीत गेली आणि पाच मिनिटात मयुरीच्या रडण्याच्या आवाजाने सारे तिच्या खोलीकडे धावले.. पाहतात तर काय तिच्या खोलीतील वॉशरूम चा दरवाजा सताड उघडा होता, आणि मयुरी सिंक जवळ आधार घेऊन अस्ताव्यस्त बसून रडत होती… चेहरा पार घाबरलेला होता, वासंती तिच्याजवळ धावली तर तिला जाणवले मयुरी चे सर्व अंग थरथरत असून तिला धड उभे देखील राहवत नाही.. अजयने म्हणजेच तिच्या जावयाने अलगद उचलून मयुरीला बेडवर आणून बसविले, त्याआधीच तिच्या बाबांनी ऑलरेडी एसी चालू करून ठेवला होता.. वासंतीने मयुरीचा चेहरा आपल्या ओढणीने पुसून आणि चिंतेने व्याकुळ होऊन तिला विचारले.. मयुरी बाळा काय झाले? तर तिने आईला सांगितले काही नाही… मला बाहेर जायचे नाही म्हणून खूप राग आला होता म्हणून मी रागानेच कपडे बदलत असताना, मला मळमळायला लागले आणि उलटी झाली, चेहरा धुवून आरशात पहात असताना, माझी मीच घाबरले… आणि परत तोंडावर पाणी मारून आरशात पाहिले तर काय! माझ्यासारखीच एक छोटीशी मुलगी मागून डोके काढून माझ्या चेहऱ्याला चेहरा घासत मला म्हणाली..’ आई मला मुरलेले लोणचे हवे ‘… आणि मयुरी वासंतीला आत्ताच्या आत्ता मला मुरलेले लोणचे लिंबाचे दे तूss माझी मुलगी मागते आहे… आणि आईला म्हणजेच वासंतीला गच्च मिठी मारून रडू लागली… आईने म्हणजेच वासंतीने तिची मिठी अलगद सोडवून मयुरी चा चेहरा आपल्याकडे वळवून प्रेमभराने तिला म्हणाली, मयुरी बाळा! अगं अक्काआत्या तुझ्यावर अतिशय माया करतात ग. माझ्यापेक्षाही तुझ्याशी त्यांनी अंतरंगाने जिव्हाळ्याची नाळ जोडलेली आहे, तू त्यांच्याकडे आत्या बाई म्हणून किती हट्ट करतेस आणि पुरवुन घेतेस ! मग त्यांनी बाहेर जाऊ नकोस, असे उगीच नाही सांगितले, अगं ही जुनी अनुभवी माणसं.. जुन्या मुरलेल्या लोणच्यासारखी असतात, लक्षात येते का बाळा तुझ्या? म्हणजेच लोणचे मुरल की, त्याचे औषधी गुण जास्त वाढतात… त्याच बरोबर चवही वाढते.. तसेच ह्या अक्का आत्याचे… तिने तुला झालेली दिवसभराची धावपळ, दगदग अनुभवी नजरेने ओळखली होती, आणि तुला लागलेले कडक डोहाळे, जाणून होती म्हणूनच थोडासा धाक दाखवून तिने घरात बसविले… हे सारे मायेपटीच बरं… एरवी सर्वात मोठी म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावरच टाकून आपण निर्धास्त असतो ना! मग त्यांनी एखादी गोष्ट अधिकाराने सांगितली तर त्यामागे सुद्धा आपल्याबद्दल असलेली काळजीत असते ग.. आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो! आत्ताच पहा बरं..’माझी लेक मुरलेलं लोणचं मागते म्हणून कळवळून रडलीस ना! अगदी तसेच अक्का आत्याला वाटले… अगं त्या पण मुरलेल्या लोणच्या सारख्या आहेत… आयुष्याचे अनुभव घेऊन, त्यांच्या मुरलेल्या नजरेने तुझे कडक डोहाळे जाणून त्या तुला जपत आहेत … आईच्या सांगण्याने मयुरीला गलबलून आले.. तिचे डोळे पाणावले आणि म्हणाली खरंच ग आई, आपल्या अक्का आत्या मुरलेलं लोणचं आहेत…. सगळ्यांचे उतरलेले चेहरे जादूची कांडी फिरवल्यासारखे हास्याने फुलले… आणि सगळ्यांनी एकच गलका केला आम्हाला पण पाहिजे… मुरलेले लोणचे 😀😀.. तेवढ्यात आक्का बाई म्हणाल्या चला आता पान घेतलीत, आणि येताना मी लिंबाचं मुरलेलं लोणचं पण आणलय बरणी भर… अन काय परत एकदा साऱ्या घरात हास्याचे कारंजे फुलले… सगळ्यांनी वरण-भात तूप आणि लिंबाचे मुरलेले लोणचे यावर ताव मारला आणि मयुरी ला म्हणाले, ‘बघ बाई आता! खुश झालीस ना तू!… अजय म्हणजेच मयुरीचा नवरा तिच्याकडे सहेतुक हसला… मयुरी खूपच लाजली… अन हळूच त्याला म्हणाली, मला कुठे रे हवे होते मुरलेले लोणचे! तुझ्याचं लेकीला हवं होतं’ मुरलेलं लोणचं ‘… बघ आता! असे रोज रोज हट्ट करेल ह़ ती… असं हे अक्का आत्या सारखंच,.. मुरलेलं लोणचं, चोर-चोळीची लज्जत वाढवून गेलं….
*झुला*
पहाता झुला वयाचे भान हरपते झुला झुलण्याला वयाचे बंधन नसते उंच उंच घेता झुला मन आभाळ होते करपाशा पसरुनी नभा तोलू पाहते उंच जाता झुला यायचे धरणी माघारा, भान सदैव जपायचे मानवाचा जन्म सखा झुला जन्मा येता झुल्यात ठेवती.. ममतेने देऊनी हिंदोळा, अंगाई गाती.. असाच राहू दे आयुष्याचा झुला, होत राहो सदैव खाली वरती…..
*अनोखे रक्षाबंधन*
भावाला सुट्टी नसल्याने रात्रभर खपून त्याला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या डबा भर करून घेऊन अति आनंदाने ती भावाकडे जायला निघाली, मुलांना आणि नवऱ्याला सांगितले जेवायच्या वेळेपर्यंत येते, लगेच राखी बांधून. असे म्हणून लगबगीने आनंद तरंगात निघाली…. लक्षात आले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, अर्धवट ग्लानीत, दादाs … राखी…. करंज्या…. असे म्हटले आणि परत भानावर येऊन डोळे उघडून पाहिले. तिचा नवरा व मुले अवतीभवती दिसली आणि बाजूच्या कॉटवर तिचा दादा सलाईन ड्रीप लावून झोपलेला दिसला! ती धडपडून मी इथे कशी म्हणून उठू लागली…. पण तिच्या पायात जोरात कळ आली आणि ती रडू लागली, नवऱ्याने सांगितले तुला जाताना एक्सीडेंट झाला, पाय फॅक्चर.. खूपच रक्त वाहून गेले…. रक्ताची तात्काळ गरज होती… दादानेच रक्त दिले….. त्यांना अशक्तपणा आल्यामुळे सलाईन लावली होती…. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले…. तेवढ्यात भाऊ उठून तिच्या जवळ आला, आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाला पुढच्या आठवड्यात उड्या मारायला टुणटुणीत होशील… ती हसली…. मुलीने तिच्या हातात राखी दिली आणि तिने भावाच्या मनगटाला पडल्यापडल्याच राखी बांधली., आणी म्हणाली हे माझे अमूल्य रक्षाबंधन…. भाऊराया ❤️❤️ अजून काही नको 🙏 तुझे माझे अखंड बंधन असेच राहू दे ! आनंदाश्रुच्या महापुरात सारे कुटुंब अधिक मजबूत धाग्यात बांधले गेले……