अक्षय तृतीयेचा अक्षय ठेवा..आईची आठवण.. नाही नजरेसमोर, नाही कधी भेटणार..अक्षय तिचे माझ्यात असलेलेतिचे गुण ही साठवण.. नाही कधी तिची बरोबरी होणार..अवगुणांची खाण मी, ती माझी हिऱ्याचे कोंदण… किती आठव तुझे करावे,तुझ्याविना सारे सहावे…तुटले बंध संपून गेले माहेरपण.. माहेर या शब्दास मुकले..अंतरी पायीचे घुंगुरवाळे,माहेरच्या आठवणीत लडिवाळे नादावत राहिले… वेणीत माळलेला मोगऱ्याचा गजरा सुकोनी गेला..भिजल्या नयनी अश्रू ओघळले.. सणासुदीला पावडर कुंकू काजळ नटवून रुपडे अपुले..आई मी कशी दिसते?😥तिच्या डोळ्यातले अपार प्रेम अप्सरेस ही लाजवून गेले… आई तुझे नसणे पदोपदी मनास समजावून गेले…तेवढ्याच उत्कटतेने तुझ्या आठवणीत मन रमून गेले.. गढूळलेले थकले मन फिरून प्रफुल्लित होऊन गेले…हे आई चैतन्याच्या खाणीतुझ्या सवे जगायचे अजून राहून गेले….
Author: Supriya Joglekar
आपण साऱ्या आहोत सावित्रीच्या लेकी
कधीच समजू नका स्वतःला एकाकी…नसेल कोणी जरी आपल्या सांगाती,बोलावे मग मनसोक्त स्वतःशी…..सावित्री ती अपुली माता,न डगमगता न घाबरता,आपला प्रवास सुखकर करून गेली,काट्यांची वाट तुडवून स्वतः,आपल्यासाठी साक्षरतेचाअक्षय ठेवा देऊन गेली…..स्मरण करून तिचे आज,पिढ्यानपिढ्या स्त्री शिक्षणाचा लेऊ साज…..
31:12:2023
आयुष्य सरते.. वर्ष संपते…तीच सकाळ. तोच सूर्य…काय बदलते..कालचे असते ते आजचे होते… कालचक्राची गती अधिक गतिमान होते….आयुष्य जगलेले दिवस आठवणीत जाऊन बसतात…आणि येणारा नवीन दिवसतोही भूतकाळ होणार आहे हे विसरून प्रारब्धा प्रमाणे जगत राहतात… काय दिले.. काय घेतले..किती हिशोब केले तरी…गेले ते गेलेच.. परत फिरून येणे नाही… मग ते माणसाच्या बाबतीत आणि अचेतन वस्तूच्या बाबतीतही होते… वर्ष संपले… आपल्या आयुष्यातील या जन्माचा राहण्याचा कालावधी कमी झाला..किती उन्हाळे किती पावसाळे पहाणे बाकी? याचा हिशोब मनात सुरू झाला…सारे कसे अघटीतच.. विज्ञान किती पुढे गेले तरी मानवी मनाचा शोध अपूर्णच राहिला…पृथ्वीची उंची खोली मोजून झाली…साऱ्या चल अचल पंचतत्त्वांची बेरीज करून झाली…पण अजूनही मानवाच्या आयुष्याची मोजमाप अपूर्ण राहिली… ग्रह तारे, ज्योतिषीय भाकिते हस्तरेखा.. सारे सारे ढुंडाळून झाले…पण जगण्याचे अंदाज चुकत गेले…. कोणाला कुठे हवे असते… दुःखाचे, वेदनेचे, अश्रूंचे, गरीबीचे आयुष्य…श्रीमंती, वैभव, सुखासीन ऐश्वर्य संपन्न.. अशीच कामना असते…पण प्रारब्धाप्रमाणे प्राप्तन प्राप्त होते….जीवा सवे आयुष्य येते.. वर्ष सरते तसे आयुष्य सरते… सरासरी आयुष्याचा कालमान पाहताना…जगात अनेक अद्भुत घटना घडून गेल्या…सामान्य जीवाला त्या कोठे स्पर्शून गेल्या…त्याचे आपले जगणे आणि जगण्यासाठी संघर्ष करणे इतकेच काय ते उरले…. सध्या राममय झालेले जग…अयोध्या.. अक्षता कलश..विरोधी पक्षाचा थयथयाट…येत्या वर्षाच्या निवडणुका…आणि संजय राऊत च्या ऐवजी सतत टीव्हीवर दिसणारा जरांगे पाटील …काय काय म्हणून लक्षात ठेवायचे…काही झाले तरी शेतकऱ्यांच्या समस्या…आम्हा नोकरदारांचे काय?कुठे बसतो आम्ही…आरक्षण नाही… रक्षण नाही..आयुष्य जगण्याच्या कल्पना आम्ही करू शकतो….पण त्यासाठी पोषक वातावरण नाही…सरते वर्ष… आशा पल्लवीत ठेवूनच पुढे सरकायचे….आपले आयुष्य आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्याच हिमतीवर आपणच पूर्ण करायच्या…कोणी देईल , कोणी करेल ह्या अपेक्षा नाही ठेवायच्या …. नरदेह सर्वात समृद्ध जन्म..पाप पुण्य.. बरे वाईट याचे आकलन असते…आत्म्याचा परमात्म्याकडे सुरू झालेला प्रवास असतो….म्हणूनच सरत्या वर्षाला बाय बाय करताना… येणाऱ्या वर्षाचे ज्याने त्याने आपल्या परीने आनंदाने स्वागत करावे… प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना, सुखाचा उपभोग घेण्याच्या कल्पना वेगळ्या असतात…म्हणून आपल्या इच्छांचे ओझे दुसऱ्यावर लादू नये…होता होईल तो मनास जपावे…मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची….तू चाल पुढ…. तुला भीती पर्वा कशाची…अगदी अशीच वाटचाल करावी…चला इथेच थांबते….अस्तमानी सूर्य चालला आहे…त्या तेजाला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच माझ्या नेत्र ज्योतींच्या पायघड्या घालण्यास सुरुवात करते….
श्रावणा रे! तू हिरवा गार..
इंद्रधनुच्या रंगी झुलणारा..नवविवाहितांच्या स्वप्नांना फुलविणारा..नवयौवनांना स्वप्नात झुलविणारा…तुझी ओढच लागे जीवा फार..श्रावणा रे! तू हिरवा गार… श्रावणा रे! व्रतवैकल्य सणांचा तू झालास भ्रतार,सुगंधित फुलांनी सृष्टी बहरलीनवथर तारुण्याची काया मोहरली..रूप तुझे हे असे सदाबहार..श्रावणा रे! तू हिरवा गार… जीव रंगले, मन दंगले..तुझे रुप याच डोळी पाहिले,मन मयूर नृत्य करू लागले,लावण्य तव हे असेच राहो अपरंपार…श्रावणा रे! तू हिरवा गार… हिरव्या श्रावणाची हिरवाई,धरे ने पांघरली पाचु चीदुलई…उबदार दुलईतुनी कोवळे डीरडोलती.. नव स्वप्नांचा घेऊन झोका…आकाशा चुंबु पाहती…खेळ तव चाले होऊनी मेघा स्वार…श्रावणा रे! तू हिरवा गार….
सोनियाचे दिन आज मिळाले..ज्या मातेच्या पुत्रांनी इथे रक्त सांडले..वंदन त्या वीर मातेला…देशसेवा घडावी हेच ध्येय असावेनवीन पिढीने निदान हे व्रत आचरणात ठेवावे..
मैत्री
जन्मा सवे येते मैत्री,नात्यांच्या विणीतुनी,सम विचारधारेतुनी,कधी शत्रू मैत्री,कधी विशुद्ध मैत्री. मैत्री कधी ठरवून का होते?मैत्री ला वयाचे बंधन नसते.मैत्री दिनी काव्य करायचे,मैत्री वरच बोलायचे.मैत्री तर अखंड वाहणारा निर्मळ झरा…..जिथे मिळतो आनंदाचा निखळ सहारा…… मैत्री असावी जन्मजन्मांतरी ची,मैत्री खरी संकट घडीला टिकणारी,मैत्री असावी आश्वस्त शब्दांची, बालवयी जरी पांगलो,यौवनात जरी दूर गेलो,वृद्धत्वी जरी निजधामी गेलो,मागे राहिलेल्या मैत्रेयाला आठव असणारी…..
मिळतील उत्तरे…
तणावाचं आयुष्य जगताना हलकेफुलके क्षण यावेत… त्या क्षणांची प्राजक्त फुले होऊन… मन उमेदीने भरून जावे… नित्य नव्या समस्यांना सामोरे जाताना, कोणाचे तरी आश्वासक शब्द, कलकलत्या जीवास शांतवून जावे… धाव धाव धावणाऱ्या थकल्या गात्रांना, क्षणभर निवांत बस जरा या शब्दांचे अत्तर शिंपडावे…. काळ कोणासाठी थांबत नाही, माणसानेच माणसासाठी थोडे थांबावे… समाधानाचे कुंपण मनास घालून हव्यासाचे क्षण रिते करावे…अगदी काहीच नाही जमले तर, मौन साध्य करून घ्यावे… निश्चय निग्रह मग जुळून येतील, पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुटून जातील….
जागतिक चहा दिन २१में
गरमागरम चहा द्या मज आणुनी…पिऊन टाकीन मी आनंदाने…किती किती प्रकार त्याचे,कधी आल्याचा, कधी वेलचीचा, तर कधी दालचिनीचा… दरवळ दरवळ पसरे..कधी बशीतून, फुर् करोनी,कधी गरम गरम घोट घेऊनीआस्वाद त्याचा घेतच रहावा,कधी कटिंग तर कधी फुल… कधी खारी सवे,तर कधी पाव बुडवून…मनसोक्त चहा पिऊन घ्यावा…जागोजागी अमृततुल्य चहालज्जत आणतो भारी… चहा पिण्याची तर तऱ्हाच न्यारी….असती जगात अनेक व्यसने..चहाचे व्यसन जगात लय भारी…..पाहुण्याचे आदरातिथ्य,चहाच देतो पोचपावती…. फुळुक पाणी, पांचट, काळाकुट्ट, कडवट…किती किती विशेषणे लावती तयाला….तरी सदैव तयार तुमच्या स्वागताला….म्हणूनच म्हणते…गरमागरम चहा द्या मज आणुनी..,पिऊन टाकीन मी आनंदाने….☕☕☕
माय गंss
आठवतो स्पर्श तिचा येथील प्रत्येक ठिकाणी,उगीचच मग स्वतः हात फिरवुनीघेते तो अनुभवुनी….कुठे हरवला तो स्पर्श?ते श्वास ते मायेने पाहणारे डोळे!साऱ्या सुखाच्या राशी,केल्या जरी रित्या तरी,ते प्रेम ना मिळे!आठव आठव आठवांचा,पिंगा घालुनी साद घालीते अंतरातुनी…होतीस तोवरी न जाणले,महत्व तुझ्या असण्याचे..प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आता,या जिवाला सलते तुझ्या नसण्याचे…..काय सांगावे दुःख बापुडे होऊन गेले….माय तुझ्यासवे जगण्याचे आयुष्य राहून गेले……
मळकी नोट
आज सकाळचीच गोष्ट. शिवाजी चौकात ताजी पालेभाजी आणि सलाड साठी लागणारे साहित्य मी घेतले… भाजीवाली ला पैसे देऊन, तिने दिलेल्या टोपलीतील भाजी मी माझ्या पिशवीत भरून घेत असता.. ‘ए बाई ही नोट नको! दुसरी दे स्वच्छ नोट ‘ म्हणून बाजूला भाजी घेणाऱ्या बाईने भाजीवाली ला ठणकावले… ती बिचारी भाजी खाली अंथरलेल्या गोणी घालून सर्व नोटा आणि चिल्लर समोर करून म्हणाली ‘ताई बघा! संमद्या अशाच मळक्या हायती … घ्या यातील तुम्हास कोणती साफ सुदरी दिसत असंल ती….” क्षणात माझ्या मनात विचार चमकला! कशा असतील तिच्याजवळ? दहा.. वीस च्या स्वच्छ नोटा ! कष्टकरी हात त्यांचे, दिवसभर उन्हातान्हात राबणारे! तेव्हा कुठे हातात रोकडा येतो त्यातून त्यांचा दिवसाचा चरितार्थ चालतो. या नोटा मळक्या जुनाट असतात पण त्याला कुठेही भ्रष्टाचाराचा डाग नसतो…. खरोखर फक्त स्वाभिमानाचा, कष्टाचा आणि जीवन जगण्यासाठी व कुटुंबाचा जीव जगवण्यासाठी केलेल्या अविश्रांत मेहनतीचा त्या नोटेला वास असेल, उद्याच्या उज्वल भविष्याची चिंता मनात आणून आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी राबणाऱ्या हातांचा स्पर्श या सर्व नोटांना झालेला असेल त्याचे मोल ..अनमोल आहे… एसीमध्ये गुबगुबीत सोफ्यावर बसून साधा चहाचा कप उचलून ठेवण्याचे कष्ट न करणाऱ्या हातातील नोटा! तशाच स्वच्छ परीटघडीच्या रहातील… आणि तशाच तिजोरीत कुलपात बंद राहतील, त्यांची एकावर एक रचलेली चळत स्वतःच्याच ओझ्यांनी दबत असेल! त्या नोटांना कसला आलाय स्वप्नांचा कष्टाचा गंध? कायमच्या आपल्या कोऱ्या करकरीत…… मग तुम्ही नाही ना खळखळ करणार त्या जुन्या मळक्या नोटा घ्यायला?.. हो पण त्यासाठी तर आपल्याला थोडे फार कष्ट होतील, बँकेत जाऊन बदलून आणाव्या लागतील.. पण त्यांना निदान समाधान तरी मिळेल!! आपण उगीचच शिकलेल्यांनी दहा-वीस रुपयासाठी तुझ्याकडे पेटीएम आहे का? तुला गुगल करू का? म्हणून बिचार्यांना पेचात पाडू नये, असं मला वाटलं हं.. पन्नास-शंभर रुपयांसाठी स्वतःचं काम संपल्यावर कधी बँकेत खेटे घालतील…. आणि तिथे तरी त्यांना कोण लवकर दाद देते?… जिकडे तिकडे त्यांची अवहेलनाच!.. म्हणून तिच्या जवळच्या मळक्या नोटेचे महत्त्व मला अधिक वाटले!!