खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दाराजवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली…! आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं…! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर…! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच. लहानपणी साइकलीवर फिरलेलं असल्यामुळे नागपूरचा भूगोल मला ठावूक आहे. ही माहितीच त्या दिवशी माझ्या कामी आली. 1996 साली एक महिना हैदराबादला राहून मी परत येत होतो. एपी एक्सप्रेसचं तिकिट घेतल्यानंतर खिशांत तीसच रुपए उरले. आता बिलासपुरपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता. मधे नागपूरला उतरुन मामे भावाकडून मदत घेणे. इथे साहजिकच प्रश्न येतो की खिशांत पैसे नसतांना एक्सप्रेस कां निवडली…? एखाद्या पैसेंजर ट्रेननी जायचं. एक्सप्रेस निवडण्याचं कारण सांगताना आज हसूं येतंय, पण तेव्हां मनांत ‘एयर ब्रेक’ असलेल्या पैसेंजर ट्रेन मधे बसायची इच्छा होती. आणि या एपीला एयर ब्रेक होते. त्यांचं काय आहे की मी स्टीम इंजिन मधे 5 वर्ष फायरमैन होतो, म्हणून मला वैक्यूम ब्रेकची माहिती होती. जबलपूर किंवा नागपूरला जाता-येता पैसेंजर/ एक्सप्रेस मधे वैक्यूम ब्रेकची कंट्रोलिंग मी बघून चुकलाे होतो. आमच्या फैक्ट्रीत एयर ब्रेक असलेल्या बीसीएन वैगन सोबतच एन बॉक्स मधे कोळसा, आयरन ओर, जिप्सम येत असे. तेव्हां तिथे छोटे डीजल इंजिन (फैक्ट्रीत 350 एचपी आणि 650 एचपी चे डीजल इंजिन होते) शंटिंग करायचे. त्या इंजिनमधे बसून एयर ब्रेकची कंट्रोलिंग पावर बघितली होती. मालगाडी मधे कंट्रोलिंग पॉवर बघितल्या नंतर मला पैसेंजर ट्रेनमधे एयर ब्रेकची कंट्रोलिंग बघायची होती. तो पर्यंत आमच्या दक्षिण-पूर्व (आता दक्षिण-पूर्व-मध्य रेलवे) रेलवेच्या पैसेंजर ट्रेन मधे एयर ब्रेकची सुविधा नव्हती आणि ‘एपी’ ला एयर ब्रेक होते. म्हणून ‘एपी’ ची निवड केली. मी हैदराबादहून गाडीत चढलो. तिकिट घेऊन फलाटावर आलो. नागपूर पर्यंत दिवसाचा प्रवास, म्हणून मी शेवटची जनरल बोगी निवडली. गार्डचा डबा आमच्या पुढे होता. इंजिनकडे तोंड करुन सिंगल सीट वर बसलो, माझ्या मागे चार सीटनंतर डब्याचं दार होतं. ट्रेन सिकंदराबादहून सकाळी सहा वाजता सुटली आणि मी प्रकृतिचं निरीक्षण करुं लागलो. ‘एपी’ ला 26 डबे हाेते, मी शेवटच्या डब्यांत होतो. आता माझं सगळं लक्ष ड्राइवरच्या ड्राइविंग वर होतं. तो भरधाव जात असलेल्या गाडीचा वेग कमी करायचा, तेव्हां गाडीच्या बदललेल्या आवाजावरुन मी समजून जात असे की ड्राइवरनी ब्रेक लावलाय. तिसरं स्टेशन भुवनगिर येई पर्यंत मी ‘एयर ब्रेक’ ची कंट्रोलिंग समजून चुकलो होतो. भुवनगिर स्टेशनानंतर डब्याच्या दाराजवळ उभा असलेला एक मुलगा माझ्या समाेर लांब सीटवर बसलेल्या लोकांच्या पाया खाली जागा बनवत सीट खाली झोपून गेला. बसलेल्या लोकांच्या पायामागे झाकला गेल्यामुळे तो दिसत नव्हतां. 9 वाजता गाडी काजीपेटला थांबली, तेव्हां टीटीई आला आणि सगळ्यांचे तिकिट चेक करुन निघून गेला, त्या मुलावर त्याची नजर गेलीच नाही. म्हणजेच तो मुलगा डब्ल्यूटी होता आणि टीटीईला चुकवण्यासाठी सीट खाली लपून बसला होता. दहा वाजताच्या जवळपास बल्लारशाॅला ट्रेन थांबली. सडकून भूक लागली होती म्हणून इडली विकत घेऊन खाल्ली, फक्त दहा रुपए…(भूख के सामने किसका बस चलता है?). इथून गाडी सुटल्यावर मी हाच विचार करत होतो की नागपूर मेन स्टेशनला उतरल्या नंतर स्वावलंबी नगर पर्यंत कसं जायचं…? रिक्शातून उतरताच मावशीकडे पैसे मागण्याचा धीर होत नव्हतां. ‘एपी’ वर्ध्यावरुन येते खरी, पण ती वर्ध्याला न जातां सेवाग्राम हून निघून जाते. त्या दिवशी सेवाग्रामला गाडी फलाटावरुन निघाली. (सहसा असं होत नाही, एक्सप्रेस ट्रेनचा स्टाॅप नसला, ती थ्रू असली म्हणजे तिला फलाटावर न घेतां मधल्या लाइनीवरुन जाऊ देतांत.) म्हणून सेवाग्राम स्टेशनावर गाडीची स्पीड बघून कुणांस ठाऊक एक विचार मनांत चमकून गेला की जरी ‘एपी’ अजनीला थांबत नसली तरी मी तिथे गाडीतून उतरु शकेन. तिथून स्वावलंबी नगर नक्कीच जवळ होतं. समोर लांब पल्याच्या सीट खाली लपलेला तो मुलगा आतां बाहेर येऊन माझ्याच शेजारी बसला होता. तो पुटपुटत होता-‘नागपूर में तो साले पकड़ ही लेंगे…जेब में एक पैसा भी नहीं…।’ हे ऐकतांच मी त्याला म्हटलं- ‘अजनी में ड्राइवर ट्रेन की स्पीड कंट्रोल करेगा, वहां उतर जाना…!’ हे ऐकून तो तर चमकलांच, शेजारी बसलेले लोक देखील दचकून माझ्याकडे बघूं लागले. मी पुढे म्हटलं- ‘नागपूर में उतरकर रिस्क लेने से अच्छा है अजनी में रिस्क लेना. और फिर कोशिश करने में क्या हर्ज है…?’ त्याने अविश्वासानं माझ्याकडे बघितलं आणि गप्प राहिला. मला ती हिंदी म्हण आठवली-चोर का दिल कमजोर होता है… खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडली आणि सामान घेऊन दारावर आलो. तो तिथेच उभा हाेता. मी त्याला म्हटलं- ‘अजनी में गाडी धीमी होती है तो उतर जाना. मैं भी उतरुंगा.’ त्याचा विश्वासच बसत नव्हतां. तो माझ्याकडे बघतच राहिला. इतक्यांत गाडीचा वेग कमी झाला होता, म्हणजेच इंजिन अजनी स्टेशनाच्या फलाटापर्यंत पोचलं होतं. अजनी फलाटावरचा पहिला साइन बोर्ड मागे पडताच मी पिशवी खांद्यावर घेतली, सूटकेस डाव्या हातात घेऊन त्याला विचारलंं- ‘उतरतो कां…!’ तो चुप होता. तेव्हां मी त्याला म्हटलं- ‘मग दार सोड…’ उजव्या हाताने दाराचं हैंडल धरुन डाव्या हातांत सूटकेस सावरत मी शेवटच्या पायदानावर आलो…आता गाडीचा वेग वाढू लागला होता…आणि सूटकेस सांभाळत मी उडी घेतली. पाय जमीनीला लागतांच गाडीच्या दिशेने गाडी सोबत पाच-सहा पाउल धावलो आणि थांबता-थांबता गाडी कडे बघून जोराने ओरडलो- ‘ऐसे उतरते हैं चलती गाडी से…!’ मला माहीत होतं की मी जिथे बसलो होतो तिथे बसलेले लोक माझ्याकडेच बघत होते. आता मी चहुकडे बघितलं. दुपारचे पावणे चार वाजले होते. चहुंकडे सगळं व्यवस्थित होतं. मी प्लेटफॉर्मच्या पुढे असलेल्या सिग्नल जवळ उतरलो होतो. सूटकेस घेऊन मी फलाटावर आलो आणि गेटजवळ पोचलो. तिथे स्टेशन मास्तर उभा होता. त्याने इतक्यांतच ‘एपी’ एक्सप्रेस ला लाइन क्लीयर दिला होता, ‘एपी’ तिथे न थांबता पुढे निघून गेली. मग हा वाटसरु कुठून टपकलां असेच काहीसे भाव त्याच्या चेहेरयावर होते. तिकडे दुर्लक्ष करीत मी स्टेशना बाहेर आलो, रिक्षा केला-8 रुपए. रिक्षा मधे मी रिलैक्स होईस्तोवर अजनी चौक आला. रिक्षा तो चौक पार करत असतांना मला जणूं जाग आली…! आणि माझ्या एकदम लक्षांत आलं की मी काय दिव्य केलंय ते. रिक्क्षेवाल्या साठी मावशीला पैसे मागावे लागतील म्हणून मी चक्क चालत्या सुपरफास्ट ‘एपी’ मधून उडी घेतली होती. स्वावलंबी नगर ला मावशीच्या घरी पोचल्यावर मी कुणालाच काही सांगितलं नाही. रात्री मामे भाऊ भेटला तेव्हां त्याला सांगितलं. ते ऐकतांच तो सुन्नपणे मला बघतच राहिलां…मग खूप रागावलां. (माझ्याहून मोठा आहे) पण बिलासपुर पर्यंतचे तिकिटचे पैसे त्यानेच दिले. ड्यूटीवर असतांना यार्डमधे शंटिंग करणारया इंजिन मधून दहादा उतरणं, चढ़णं रुटीनचं काम असूं शकतं. पण ‘एपी’ मधून घेतलेली ती उडी…! त्यानंतर मी असं धाडस कधीच केलं नाही…!
Author: Ravindra Telang
*आणि आषाढी पावली…*
12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती… उपासाचा दिवस… मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो… गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी… स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या. सात-आठ तासांचा प्रवास… लोअर बर्थ मिळाली म्हणून आम्ही खुशीत होतो… 11 वाजता घरून निघालो… पिल्लू (मुलगी) घरीच झोपून गेलं होतं. स्टेशनावर गाडी पार्क करून उतरलो तर पिल्लू कडेवरून खाली उतरायला तयार नव्हती. प्लेटफार्म वर एंट्री घेताच समाेर पहिले एसी कोच, नंतर थ्री टायरचे कोच होते. तिला घेऊन वैन पासून एस-9 पर्यंत पोचता पोचता चांगलीच दमछाक झाली… (ती 9 वर्षांची झाली यावर्षी) बर्थवर मंडळी स्थानापन्न झाली. आम्हाला सोडायला माझ्या बहिणीचा मुलगा हेरंब वसंत धुमाळ आला होता… सोबत माझी मामी होती-सुनंदा पात्रीकर… वय वर्षे 77. मी हेरंबला म्हटलं देखील इतक्या रात्री मामीला का बरं घेऊन आलास… या वयात इतकं पायी चालणं… जड जाइल तिला… तर हेरंब म्हणाला काय सांगू मामा… मी जाेपर्यंत घरी पोचणार नाही, ही जागीच राहणार एकटी… बाकी सगळे झोपलेले… त्यापेक्षा मी म्हटलं सोबत चल, स्टेशनावरून दोघं सोबतच परत येऊ… तेवढंच तिचं फिरणं होईल… म्हणून सोबत आणलंय… तर… गाडी सुटायला थोडा उशीर होता. घड्याळात पावणे बारा होत होते… हेरंब म्हणाला मामा, आम्ही निघतो… मी त्यांना सोडायला सोबत निघालो… दोन कोचपर्यंत गेलो… त्यांना सोडून परत आलो… तर आमच्या बर्थवर एक बंगाली कुटुंब येऊन बसलं होतं. ते म्हणत होते की आमच्या बर्थचा नंबर देखील एस-9 मधे 65, 68 आहे… *झाली ना गडबड…* मी आनलाइन रिजर्वेशन करवून घेतलं होतं. तो मैसेज मी पुन्हां बघितला… त्यांना देखील मैसेज दाखवला… आणि टीटीईच्या शोधात निघालो… तो मला एस-4 च्या जवळ दिसला. तिकडे निघालो आणि फोन वाजला… बायकोचा होता. ती म्हणत होती बर्थ नंबर सेम आहे… पण आपलं तिकिट एक दिवसापूर्वीचं म्हणजे 11 जुलैचं आहे… अरेच्चा… असं कसं झालं… इतकी मोठी चूक… काहीच सुचेना… आता काय करायचं…? तिला मी म्हणालो- त्यांना सांग बर्थ तुमचीच आहे… तुम्ही बसा… टीटीई जसं सांगेल आम्ही तसं करू… मग मी विचारलं पर्स मधे काही पैसे आहेत की नाही… ती म्हणाली एक-दीड असतील… इतकं बोलता बोलता मी टीटीई जवळ पोचलो देखील. मी घाबरत घाबरत त्याला विचारलं… बिलासपुर के लिए दो बर्थ मिलेगी क्या…? तो हिंदी साइडर होता… म्हणाला बिलकुल मिलेगी साहब… मग मी त्याला माझा प्राब्लम सांगितला… मेरे पास टिकट नहीं है… मेरा टिकट एक दिन पहले का था। मैंने देखा नहीं और रिजर्वेशन आज का ही है, समझकर आ गया… अभी गलती समझ में आई। अब 11.50 हो गए हैं। जनरल टिकट लाने का भी समय नहीं है। (मी विसरूनच गेलो होतो की भाचा आणि मामी अजून पार्किंगपर्यंत पोहचले देखील नसतील. तो तिकिट आणून देऊ शकतो…) टीटीई म्हणाला अरे… यानी आप बेटिकट हो… मी म्हटलं – होय… काय म्हणाला असेल तो… तो म्हणाला – मी असं करतो… तुमचं जनरल टिकट बनवून देतो…। … इतके पैसे लागतील… मी म्हटलं तो प्रश्न नाहीये… चूक झाली आहे तर परिणाम भोगायला मी तयार आहे… जनरल तिकिट… ठीक आहे… मग रिजर्वेशन चार्ज किती लागेल… एकूण किती लागतील… तो म्हणाला दोघांचं जनरल तिकीट 740 रुपए… मी विचारलं रिजर्वेशन चार्ज… तो म्हणाला – छोड़िए ना… इतना ही लगेगा… मी पर्समधून हजार रुपए दिले… तर तो म्हणाला चिल्लर नहीं है… अच्छा रहने दीजिए… त्याने उरलेले पैसे परत केले… मी त्याला म्हणालो साइड लोअर बर्थ मिल सकेगी क्या… हां… हां… क्यों नहीं… मी म्हणालो दो लोअर बर्थ चाहिए… मिसेस कैंसर पेशेंट आहे… त्याचं पुढचं वाक्य ऐकून मी सर्दच झालो… आणि टचकन डोळयात पाणीच आलं… तो म्हणाला… अरे साहब… तो ये बात पहले बतानी चाहिए थी न… हम आपसे कोई चार्ज ही नहीं लेते… आप भी गजब करते हैं… अगल बगल की साइड लोअर चलेगी… मी म्हणालो – चलेगी… चार्ट बघून तो म्हणाला आप ऐसा कीजिए एस-5 में जाकर …/… पर बैठ जाइए… ठीक है… मी त्याला थैंक्यू म्हटलं… मला गहिवरून आलं होतं… तो दुसरयाचं तिकिट करू लागला… मी हिला फोन केला एस-5 मधे यायचंय… एस-9 पर्यंत आलो… त्या बंगाली कुटुंबाला म्हटलं सॉरी… आपकी ही बर्थ है… मुझसे चूक हुई… हिला आणि पिल्लूला कंपार्टमेंटच्या आतून एस-5 मधे यायला सांगितलं आणि मी सामान घेऊन प्लेटफार्म वरून एस-5 पर्यंत आलो… पुन्हां घोळ झालाच… मी त्याने दिलेले बर्थ नंबर विसरलो. कारण त्या बर्थवर कुणीतरी बसलेलं होतं… सामान एका बर्थवर ठेवून मी पुन्हा त्याला गाठलं आणि बर्थचा नंबर विचारला… त्याने सांगितला आणि मी परत येऊन त्या बर्थवर सामान ठेवलं. ही दोघं आली नव्हती म्हणून बघायला गेलो… हिने सांगितलं पिल्लू इतकी झोपेत आहे की वाटेत दोन जागी खाली बर्थ दिसताच त्यावर झोपून गेली… बर्थवर स्थानापन्न होईस्तोवर गाडी सुटायची वेळ झाली होती… वेळेवर गाडी सुटली… खिडकीतून येणारया थंड वारयामुळे ही आणि पिल्लू झोपून गेले होते. सोबतीचे प्रवासी देखील झोपले. सामसूम झाल्यावर मी कानाला इयरफोन लावून वसंतरावांची ‘अब ना सहूंगी…’ ‘रंग भरन दे मोहे श्याम…’ चीज ऐकत होतो… रूटीन चेक वर ताे आला… तेव्हां साडे बारा होऊन गेले होते. तो म्हणाला अरे, सोये नहीं अब तक… मी म्हणालो रात्री अडीच नंतर झोपायची सवय आहे… मी हात जोडले आणि त्याचं नाव विचारलं… त्याने हसून माझ्याकडे बघितलं… म्हणाला बंदे को लालसिंह कहते हैं… बिलासपुर डिवीजन या नागपुर डिवीजन… तो म्हणाला नागपुर डिवीजन… आणि हसत हसत निघून गेला…आषाढी एकादशी सरता-सरता मला देव पावला होता…