आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावी खरच आई बाळाची माउलीआई भर उन्हात शांत सावली आई दुधातली मलईआई भांड्यांना तेजावणारी कल्हई आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!!
Author: Rahul Lale
उभारू या गुढी!
कर्तव्याची ही गुढीतिला धैर्याची फांदी, माधुर्याची साखरमाळ,आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ सर्वसमावेशक गडूलासद्विचारांचा शेला लावूआरोग्याची मानसगुढी ही उभारुजीवन अधिकाधिक समृद्ध बनवू
चंद्र
चंद्र यांचा 🌙चंद्र त्यांचा🌕चंद्र तुमचा 🌛चंद्र आमचा🌜चंद्र पौर्णिमेचा🌝चंद्र बीजेचा🌙चंद्र कोजागिरी त्रिपुरारीचा🌝चंद्र ईदचाचंद्र आज होळीचा चंद्र नाही कुठल्याही धर्मांचाआहे मात्र सर्वांच्या प्रेमाचा
मराठी दिन का दीन? …
दीन नक्कीच नाही
गेली काही वर्षे, जागतिक मराठी दिन २७ फेब्रुवारीला किंवा जागतिक मातृभाषा दिनी अनेक चांगल्या पोस्ट्स, कविता, चित्रं पहायला मिळतात. छान वाटतं. एक मैत्रीण म्हणाली आजच का मराठी… रोज का नाही? खरंच मराठी रोजच का नाही?…..कमीत कमी मराठी माणसासाठी तरी? आणि असंही वाटलं… की काय हरकत आहे? मराठी दिन साजरा करायला ? आपण रोज थोडेसे वाढत असतो- मोठे होत असतो पण तरी वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस आपण साजरा करतोच ना ? मग मराठी रोज बोलणाऱ्या आपण मराठी जनांनी “गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!!!” असं लिहिणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून मराठी भाषेची पताका गगनाला भिडवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यकार “कुसुमाग्रज” वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवशी २७ फेब्रुवारीला जर मराठी दिन साजरा करणं ही तर अभिमानाचीच गोष्ट आहे की ? पण तरीही काही प्रश्न, विचार डोक्यात आले… “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठा तितुका मिळवावा , मराठी पाऊल पडते पुढे, इये मराठीचिये नगरी ” इत्यादी फक्त काही जणांनी म्हणून , लिहून मराठीचा झेंडा खरंच किती फडकत राहील ? खरंच वर्षातून एका २७ फेब्रुवारीला काही पोस्ट टाकून, गाणी ऐकून, शुभेच्छा देऊन खरोखर मराठी दिन साजरा होईल? इंग्रजी,जर्मन ,फ्रेंच ,जॅपनीज इत्यादी अनेक जागतिक भाषांच्या गराड्यात रेट्यात आपली मराठी तिचं वैभव टिकवू शकेल का? भारताच्या अनेक राज्यात, उदा. गुजराथी, राजस्थानी, तामिळ, कानडी, बंगाली अशा तिथल्या भाषेचा मातृभाषा , रोजची बोलण्यातली भाषा म्हणून जशा बोलल्या जातात तशा आपल्या महाराष्टार्त मराठी बोलली जाते का ? का इतर वेळी इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिश नाहीतर अगदीच नाईलाज झालाच तर इतर भाषेतले शब्द मिसळून धेडगुजरी मराठी बोलायची आणि मराठीत बोलणाऱ्यांना व्हर्नाक्युलर म्हणून क्षुल्लक समजायचं ? किंवा मराठीत बोलले तरी व्याकरण , शुद्धता धाब्यावर ठेऊन ? जगभरात ९-१० कोटी लोक जी भाषा बोलू शकतात आणि महाराष्ट्राची राज्यभाषा व भारतातही मान्यताप्राप्त असलेल्या मराठीला भविष्य काय ? कुठलंही शिक्षण मग ते प्राथमिक-माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा पदवी-उच्चशिक्षण घेताना इंग्रजी शिक्षण आवश्यक आहेच पण हे करताना मराठी दुर्लक्षित राहणार नाही ना ? मराठी मातृभाषा असूनही चार वाक्य मराठीत बोलता येत नाही किंवा साधं मराठी वाचताही येत नाही हे किती जणांना लाजिरवाणं वाटतं ? ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ, रामदासांसारख्या संत मंडळींपासून राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर, वसंत बापट, पुल देशपांडे, गदिमा , शांता शेळके, सुरेश भट आणि इत्यादी अनेक प्रभुतींनी समृद्ध केलेल्या मराठीचं आयुष्य किती ? ग्यानबा तुकाराम -जय हरी विठ्ठल करत पंढरीची वारी करणारे मराठीची पालखी किती दिवस वाहतील ? हे आणि असे प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडत असतील पण नुसते प्रश्न पडून , वाईट वाटून काहीच होणार नाही हेही खरंच. यापेक्षा मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो? असा विचार प्रत्येक मराठी माणसाने केला तर? आपण दिवसातून अनेक वेळेस ‘सॉरी’ , हॅलो, थँक्स , प्लीज म्हणत असतो, या ऐवजी मराठी शब्द धन्यवाद, नमस्कार, वगैरे शब्द सहज वापरु शकतो का? विविध कारणास्तव आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. अशावेळी भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके / काव्यसंग्रह / नाटय़कृती यांचा आपण विचार करु शकतो का? महिन्या दोन महिन्यांत किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचतो का? बँका, विमा कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती-सूचना पुस्तिका-प्रपत्रे (फॉर्म्स) इत्यादी देण्याचा आग्रह नाही पण ती असतील तर ती वापरु शकतो का? मराठी विषय शिक्षणासाठी शाळेत दहावीपर्यंतच तेही फक्त मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी, कारण मी त्यातला एक… ११-१२वीत इलेक्ट्रॉनिक्स हा व्यावसायिक विषय स्वीकारल्यामुळे मराठी नाही.. कला किंवा वाणिज्य शाखा स्विकारली तर मराठी शिकायचं तेही परत एक विकल्प म्हणूनच. शास्त्र घेणारे नाराजीनेच हा विषय घेतात, कारण गणितासारखे वा संस्कृतसारखे मराठी विषयाला भरपूर गुण मिळत नाहीत हा गैरसमज. बाकी कला..वाणिज्य शाखेतली विद्यार्थी सुध्दा मराठी घेतात कारण इंग्रजीच्या तुलनेत मराठी समजायला सोपी वाटते , मराठीची, मराठी साहित्याची आवड आहे म्हणून नाहीच. मला स्वतःला शास्त्र… इंजीनियरींगला गेल्याने दहावीनंतर मराठीचा विषय म्हणून अभ्यासला न गेल्याची खंत आहे. पध्दतशीर शास्त्रोक्तपणे आणि विषयात रस घेऊन अभ्यास केल्यास मराठी ही चांगले गुण मिळवून देते याचा अनुभव मला स्वतःला दहावीच्या परिक्षेत आला आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही या विषयावर. बौध्दिक घेतले गेले पाहिजे. मराठी विषयाच्या पदवीधराला ..काही ठिकाणी शिक्षक प्राध्यापक वगळता इतरत्र कोणतीच नोकरी मिळत नाही, हेही मराठी न निवडण्याचे कारण. मराठी योग्य पध्दतीने शिकल्यामुळे मिळणाऱ्या संधी वाढल्या पाहिजेत. मराठीचा इंटरनेटवर वापर वाढतो आहे त्यादृष्टीने इंग्रजी साईट्सप्रमाणे स्पेलचेकस किंवा इतर सोयी वाढवणे हा एक उपाय आणि व्यावसायिक संधीही … यासाठी इ-मराठीचा विस्तार होतोय, तो वाढला पाहिजे. टोकाची मराठी अस्मिता किंवा अगदी विरुध्द भूमिका म्हणजे मराठी टिकणार का नाही असे विचार आणण्यापेक्षा आजच्या हाय- टेक युगात मराठी मागे पडतेय हे स्वीकारले तरच भाषेच्या उत्कर्षाचे नवीन मार्ग सापडतील. ते सापडण्यासाठी समविचारी आधार समूह तयार व्हायला होतील. मराठी चिरंतर राहावी ही आपली सर्वांचीच मनापासून इच्छा आहे तर प्रयत्नही आपणच करायला हवेत – आपल्या स्वतःपासून , आपल्या घरापासून , मित्रपरिवारापासून सर्वांनी – प्रत्येक मराठी माणसाने – मग मराठी दीन तर राहणार नाहीच पण मराठी भाषा ही चिरायू होईल . मराठी दिन तर साजरा करूच मराठी बरोबर आपणा मराठी माणसांचीही मन कशी उंच राहील ते ही पाहू !!! मग खरंच सुरेश भटांनी लिहून ठेवलेलं ” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एव्हढ्या जगात माय मानतो मराठी ।।” ही रचना फक्त २७ फेब्रुवारीला नाही तर रोज जगातला प्रत्येक मराठी माणूस आनंदाने अभिमानाने म्हणेल – ऐकेल !!!
लता…श्रध्दांजली
” ल य आणि ता ल म्हणजे लता ” शांत भक्तिगीते जिची ऐकून, सकाळ जागी होते ती … लताआश्वासक आवाजाने जिच्या दिवस उजाडू लागतो ती … लता मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते ती … लताहळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते ती … लता बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती … लतादूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते ती … लता झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती … लतानदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती … लता ग्रीष्मात तळपते श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते ती … लताथंडगार हवेत मस्त गाण्यातून पश्मीना शालीची उब देते ती … लता कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती … लतामीरेचं भजन, ज्ञानोबाचं पसायदान गाणारी ती … लताआईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते ती … लता उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते ती … लताआकाशाची निळाई मीनेवर चढवून हृदयनाथवर सावली धरते ती … लता कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी ती … लताती सदा गातच रहावी, अशी कामना खुद्द गानदेवताच करेल ती … लता स्वरसूर, ल य, ता ल, मेलडीची अनिभिषिक्त सम्राज्ञी लता अशी लुप्त होणार नाहीभारतरत्नांच्या मांदियाळीतील हा ल खलखता ध्रुव ता रा लता कायमच चमकत राहील भावपूर्ण श्रद्धांजली
प्रजासत्ताक दिन
असो उणे 30°ची थंडी….! वा असो ५०℃ ची गर्मी…..! क्षणभराचीही नसे विश्रांती ऋतुकाळाची मला नसे क्षिती तमा कुठलीच मी बाळगत नाही टापूतल्या शत्रूला टिपल्याशिवाय मी रहात नाही माझ्या पवित्र मायभूमीला कधी मी नराधमांचा स्पर्शही करू देत नाही आईवडील, भाऊबहीण, पत्नी-मुलं सगळीच नाती तुमच्या सारखी सीमेचे रक्षण करता मनात मात्र भारतमाताच सारखी उरी असूदे वा असो कारगिल आम्ही नसतो कधीच गाफील शत्रूची कागाळी आम्ही सहन करत नाही जीवासंसाराची ची पर्वा आम्ही करत नाही भारतमातेची सीमा राखतो आम्ही भारतमातेची सीमा राखतो आम्ही प्रजासत्ताकाची हीच महती देशाची वाढवू यशोगाथा कीर्ती
तिळगुळ घ्या गोड बोला
तिळगुळ घेऊन गोड बोलुनीजिंकून घ्यावे मन साऱ्यांचेसंक्रांत केवळ निमित्त असावेव्रत असू द्यावे हे आयुष्यभराचे कुणास टोचू नये काटेहलव्यासारखे हसत रहावेकोणी टोचले जरी काटेआपण हास्यच फुलवत रहावे हलवा- तिळगुळ देऊन कधीकटुता मनातली जात नसतेबोल प्रेमाचे द्यावे घ्यावेआनंदाचे वाण लुटावे नुसते हाच खरा तिळगुळ समजावागोड बोलणं सोडू नकाकाहीही झालं तरी यापुढेघेतला वसा टाकू नका
नववर्ष
सरत्या वर्षाला दाखवून पाठचालुया आता नववर्षाची वाट करूया थोडासा थाट-माटआली पहा रम्य पहाट नवचैत्यन्याचे वाहतील वारेनको विसरु या जुने सारे चैत्यन्याचे नवे धुमारेउजवून टाकू आयुष्य सारे नवीन स्वप्ने , नव्या आशानवीन आभा , अन नव्या दिशा जुन्या आठवणी, नव्या अपेक्षाउमेद नवी, अन नव्या आकांक्षासगळेच बरोबर घेऊन जाणेमागील दुःखे सोडून देणे नवा श्वास , नवा उत्साहनव्या जोमाने पुढे जाणे सारे डाव नव्याने मांडू, जुनी नाती सुदृढ करू नवे खेळ चालू करू अन नवे सवंगडी जमा करू
जरा विसावू या वळणावर…
भले बुरे जे…घडुन गेले…विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…जरा विसावु…या वळणावर…या वळणावर….! अकरावी बारावीत असताना ” तुझ्या वाचून करमेना ” या चित्रपटातलं…… रेडिओवर……. हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…! हळूहळू ते गाणं कानात झिरपायचं आणि मस्त निवांत ऐकत रहावसं वाटायचं … … सुधीर मोघेंच्या गाण्यातलीसगळी अर्थपूर्ण कडवी … सुहासचंद्र कुलकर्णींची सुरेख चाल…! अनुराधा पौंडवालांचा मधुर आवाज…. तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातंच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्यातलं, समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…! खूप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! या आधीच्या वर्षानं करोनाचा महाभयंकर राक्षस आपल्यापुढे उभा करत आपल्या सर्वांच्या जीवन प्रवासात फारच बिकट वाट दाखवली – सरत्या वर्षानंही करोनाच्या दुसऱ्या लाटेची त्सुनामी आणली आणि आपल्या सर्वांची जरा जास्तंच परीक्षा घेतली. याही वर्षात आपण आपण अजूनही करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो आहोत, जात आहोत. याच कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरे गेलेलो आहोत. अनेक सुहृदांना गमावूनही बसलो आहोत आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणींतून गेलेलो आहोत – जात आहोत -अनेकांना आर्थिक दृष्टया फटका बसलाय. पहिली लाट, दुसरी लाट – डेल्टा-ओमिक्रोन अशी वेगवेगळी भुतं अजून थैमान घालतायत . करोनाचं सावट अजूनही पूर्णपणे दूर झालं नसलं तरी न्यू नॉर्मल का काय म्हणतात तेही अनेक जणांचे आधीच सुरु झाले आहे – काही ते सुरु होण्याच्या अजूनही प्रतिक्षेत आहेत. अनेक बंधनं आहेत – त्यांचा आता कंटाळा यायला लागला आहे – पण तरीही धीर सुटून देऊन चालणार नाही हेही पटतंय अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं गाणं मला आठवतं – “कई बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंसके पीछे … मन दौडने लगता है “ सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी – रोज हेच व्हायला पाहिजे – असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो – आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा सांभाळून , भीती ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले. गेली अनेक वर्ष आली-गेली , बरंच काही शिकवून गेली , तसंच हे एक वर्ष … एक वळण आज एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपतय, नवीन चालू होतंय… आणि तसंही सर्वच काही निराशाजनक नाहीये.. सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – घरातली -घरात बसून किंवा प्रत्यक्ष जाऊनही ऑफिसची कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? – संक्रांती-पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी सारे सणवार आपण साजरे करतोच आहोत त्यामुळे हे स्लो डाऊन कायमचं राहणार नाही “There is still life and still there is a hope “ मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता – उनकी यादे जरूर रहती है – जीवन चालू रहता है ! जीवन है चलने का नाम !! दोन पावलं मागे आलोत – पण आता मोठा पल्ला गाठावा लागणार आहे – नक्कीच गाठू- अजून बरंच काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात – परिस्थिती नक्कीच बदलेल – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी… रिता जरी दिन वाटेमन भरलेले ठेवू धीर धरून सदाआशा जागती ठेवू भले बुरे ते विसरुनी जाऊधैर्य -आनंदाने पुढे जाऊ