तसा मी देवदेव करणारा नाही, पण नास्तिक ही नाही. कसब्यात वेदपाठशाळा चालत असलेल्या वाड्यात रहात असल्याने संस्कार आणि धारणा बनली पण कर्मकांडापेक्षा भाव आणि विश्वासच कायम महत्त्वाचे वाटले. लहानपणी आषाढी एकादशी म्हणलं की सुट्टी आणि साबुदाणा खिचडी, साबू वडे, दाण्याची आमटी, बटाटयाचे पापड, शिंगाड्याचा शिरा असे उपासाच्या फराळाचे पदार्थ डोळ्यापुढे यायचे. शाळा पासोड्या विठोबाजवळ असल्यामुळे पुण्यात पालखी येण्याच्या दिवशी शाळेला सुट्टी असायची पण घरी पालखी बनवून ग्यानबा-तुकाराम करत मित्रांबरोबर वारकरी व्हायचो. माझे काका कुमठेकर रस्त्यावर रहायचे, त्यांच्या घरासमोरून पालखी जायची तिचे दर्शन घ्यायला जायचो. आठवी नववीनंतर आजोबांबरोबर दोन तीनदा आळंदी पुणे वारीही केली.. छान वाटायचं. पुढे विठ्ठलवाडीजवळ आनंदनगरला राहायला आल्यावर दरवर्षी आषाढीला विठ्ठलाचं दर्शन चुकवलं नाही… पण आजोबा गेल्यावर वारीला जाणं झालं नाही. गेली काही वर्ष कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींबरोबर आळंदी-पुणे, सासवड-जेजुरी असे वारीचे टप्पे केले आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात न्हाऊन निघालो. यावर्षी १८ जूनला वाल्हे ते लोणंद टप्पा करायचा ठरलं आणि हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥ संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥ तुकारामाच्या या अभंगाप्रमाणे जसे लाखो वारकरी आषाढी येण्याची आणि पंढरीच्या वारीची वाट पाहतात साधारण तसंच १८ जून आल्यावर आम्ही वाल्ह्याची वाट धरली पहाटेच्या वातावरणात दिवे घाटातल्या भव्य विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊन सासवड- जेजुरी मार्गे लोणंद कडे निघालो… रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोरगावच्या रस्त्याने मधल्या छोट्या रस्त्यातून पंढरपूर वारी मार्गावर पोचलो आणि तिथल्या वारकऱ्यांच्या वावराने, टाळ, मृदंग, वीणा यांच्या गजराने भक्तीमय झालो. तिथं गेल्यावर आपोआपच वारकरी माऊलींच्या सहवासाने, ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रसन्न अस्तित्वाने लीन होऊन मिसळून गेलो. मनातल्या शंका कुशंका दूर होऊन शुद्ध भावाने वारीचा निर्मळ आनंद घेऊ लागलो. एकमेकांना माऊली म्हणून हाक मारून विठूमाऊलीलाच जणू हाक देतोय असं वाटू लागलं. चालत होतो, पाय दुखत नव्हते, रस्त्यातल्या खाचखळग्यांकडे लक्ष नव्हतं … भजनं ऐकत…म्हणत पालखीपुढे वाटचाल करण्यात खूप समाधान आणि मनःशांती मिळत होती. सुंदर नाम ओढणारे, तुळशीच्या माळा विकणारे, मोबाईल चार्जिंग करून देणारे, वेवेगळ्या वस्तू- खेळणी विकणारे, झुंमका (झुणका) भाकर -सागर (साखरेचा) चहा, ऊसाचा रस विकणारे आणि चक्क रस्त्यावर केशकर्तन, श्मश्रू काम करणारे नाभिक असे अनेक “उद्योजक” ही दिसले. वाटेत वारकऱ्यांना नाश्ता -जेवण-पाणी देऊन एका प्रकारे माऊलींची सेवाच करणारे, रेनकोट, औषधांसारख्या आवश्यक वस्तू देणारे दानशूरही बघायला मिळाले. वारी बरोबर जाताना जितक्या वेळा माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेता आलं तेवढं घेतलं आणि धन्य झालो. “तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू,आम्हा लेकरांची विठू माऊली” असं का म्हणत असावेत याची प्रचितीही आली. खरंच, विठ्ठल या शब्दामुळे, विठ्ठल शब्द उच्चारण्यामुळे, विठ्ठल नामाच्या टाहूमुळे, तनमनात एक विलक्षण आत्मविश्वास जागृत होतो. चैतन्याची निर्मिती होते. हजारो लाखो वारकरी तहान भूक विसरून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीची वारी करतात. गावागावातले आबालवृद्ध विठ्ठलनाम जपत पालखीत सामील होतात व वारकऱ्यांची सेवा करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा तीन वेळा उच्चार केला तरी निर्माण होणारी उर्जा आणि तिची अनुभूतीचे वर्णन अनेकांनी विविध प्रकारे केले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्याने विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर प्रथमोपचार म्हणून करावा असे आपण. वाचले असेल…त्याविषयी सोशल मीडियावरही ऑडियो .. व्हिज्युअल स्वरूपात पाहिले असेल अनेक संत -कवी प्रभूतींनी लिहिलेले आणि भीमसेनजी–लता-आशा- बाबूजी- वसंतराव –किशोरीताई इत्यादि दिग्गजांनी गायलेले विठ्ठलाचे अभंग – भक्तिगीते आपण भावभक्तीने ऐकतो -गुणगुणतो. या विठ्ठल भक्तीगीतांचे, अभंगांचे आणि संत साहित्याचे अध्ययन वर्षानुवर्षे होत आहे होत राहिल. विठ्ठल – या शब्दाचा शब्दशः अर्थ विटेवर स्थल – वीटेवर स्थित. विठ्ठलनामाचा उध्द्घोष ही किती वेगवेगळ्या पध्दतीने होतो – कुणी त्याला विठोबा म्हणतात तर कुणी विठू माऊली, ज्ञानेश्वर त्याला माझी विठाई तर तुकारामांची आवडी त्याला विठ्या आणी काही बाही म्हणते. कुणासाठी तो पांडुरंग आहे तर कुणासाठी पंढरीनाथ आहे. एका रचनेत त्याला पंढरीचा चोर तर एकात चक्क त्याला पंढरीचे भूत म्हटले आहे. विष्णूसहस्रनामाप्रमाणे १६८ श्लोकांचे विठ्ठलसहस्रनाम हस्तलिखितात आहे असे मी कुठेतरी वाचले होते. विठ्ठलाची नावे द्वारकेश्वर, मुरलीधर, गिरीधर, कमलाबंधूसुखदा, पद्मावतीप्रिय:, गोपीजनलवल्लभ अशी कृष्णाशी मिळती जुळती आहेत. कुणी त्याला काही म्हणो , महाराष्ट्रात शेकडो वर्षे विठ्ठलाची आणि विठ्ठलनामाची ऊर्जा जनतेला जागृत करत आहे आणि देश परदेशातील विद्वान विठ्ठलभक्तिने भारावून जाऊन वारीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या लोकयात्रेत राजकारणी जरी आता बाधा आणत असले तरीही वारकऱ्यांत- भक्तांमध्ये जात पात नाही, उच्च- नीच नाही, गरीब- श्रीमंत कुठलाच भेदभाव नाही. विठ्ठल म्हणजे प्रेम,दया, माया,शांती यांचा मिलाफ. विठ्ठल म्हणजे वासनेचा नाश आणि विकारांवर विजय. विठ्ठल म्हणजेच बंधुभाव विठ्ठल म्हणजेच सुखसमाधान, समता व समृद्धी. विठ्ठल विठ्ठल गजरात आज पंढरीच काय आख्खा महाराष्ट्र- प्रत्येक मराठी आणि अमराठी विठ्ठलभक्त बुडून गेला आहे. आणि प्रत्येक वारकरी पुढची शेकडो वर्षे भजत रहाणार आहे…. आतां कोठें धांवे मन ।तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला ।अवघा जाला आनंद ॥२॥ प्रेमरसें बैसली मिठी ।आवडी लाठी मुखाशी ॥३॥ तुका म्हणे आम्हांजोगें ।विठ्ठला घोगें खरें माप॥४॥
Author: Rahul Lale
विठूची रखुमाई…
रखुमाई नाजूकशीसावळा रांगडा विठ्ठलजोडी जमली कशीमला पडे नवल नाथांच्या घरीहा भरे पाणीजनीच्या मागे धावेशेण्या उचलूनी कबिर गाई दोहेहा विणतो शेलानाम्यासाठी हाउष्टावतो काला ज्ञानोबांसाठी हाभिंत चालवतोतुकोबांचे बुडलेलेअभंग वाचवतो दामाजीनी गरीबांसाठीरीती केली कोठारेविठू महार होऊनीहा परत ती भरे चोखामेळा , गोरा कुंभारयाच्या भक्तांची किती गणतीआस लागलेल्या बायकोचीयाला नसे काही भ्रांती काळाचेही रहात नाहीयाला काही भानवाटेकडे डोळे रख्माईचेलावूनी तनमन भक्तांच्या हाकेलाहा सदा धावून जातोशेजारच्या रखमाईलामात्र विसरुनी जातो मुलखाची भाबडीमाय भोळ्या भक्तांचीभाळली काळ्यावरयुगत ना कळली तयाची विठूसंगे नाव सदायेते रखुमाईबरोबर असून नसे जवळरुसतसे बाई याच्यासंगे राबे हीसर्व भक्तांच्या घरीबोल कोणा लावावातिचाच तो सावळा हरी….
वटपौर्णिमा…
तो वड एक महानघालून प्रदक्षिणा ज्यालापरत मिळवले सावित्रीनेआपल्या प्रिय पतीचे प्राण तो आणि असे अनेक वडअजूनही उभे आहेतपाय जमिनीत रोवून घट्टऐकतात दरवर्षी तेनवसावित्रींचें पतीहट्ट वडाला फेऱ्या मारणाऱ्यादोरीचे बंध बांधणाऱ्यासगळ्या स्त्रिया का सावित्री असतात ?ज्यांच्यासाठी त्या व्रत करतातसगळे का ते सत्यवान असतात ? सात जन्मी हाच मिळावा जोडीदारयासाठीच होते जरी प्रार्थनामनात दोघांच्या असतात कानक्की तशाच भावना ? सावित्रीला आजच्या हवा आहे खरंच कातो सत्यवान जन्मोजन्मी ?आणि ज्याच्यासाठी उपास करतातसत्यवानाला त्या हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!! सावित्री -सत्यवान महती त्यांची थोरत्यांच्यापुढे आपण सारे लहानथोरमहत्वाची आहे तरी प्रेम -भावना सात जन्म कोणी पाहिलेत ?हाच जन्म महत्वाचामिळाली ती सावित्रीआहे तो सत्यवान जपायचा संस्कार म्हणून वटपौर्णिमासण साजरा करत राहूया …पतीपत्नी सारे विश्वास अन् प्रेमाचं रोप सतत फुलवत ठेऊया
वटपौर्णिमा….
सगळी व्रतवैकल्य पूजाअर्चा फक्त बायकोनेच नवऱ्यासाठी करायच्या.. मग नवरा बायकोसाठी चार शब्द तर निश्चितच लिहू शकतो… श्रमतेस दिवसभर तूथकतेस माझ्या पायीप्रेमिका होतेस कधीकधी होतेस आई असतेस माझ्या मागेखंबीरपणे सदा तूसांभाळतेस कुटुंब सारेविसरून देहभान तू जोडी तुझी माझी, विधात्याने सांधलीफुलबाग संसाराची, आपुल्या प्रेमातून सजली कृतज्ञ आहे मी, नित्य त्याच्या पायीविश्वास प्रेम माझे, सदा तुझ्या ठायी
*आई **
आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावी खरच आई बाळाची माउलीआई भर उन्हात शांत सावली आई दुधातली मलईआई भांड्यांना तेजावणारी कल्हई आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!!
ओष्ठपर्ण
मनातले गाणे माझेशब्दात उतरणार होते एकटाच इथे मीआशेने काळीज झुरत होते वाट तुझी पाहतानामाझाच मी ना राहिलो गाण्यासाठी गीत तुझे तेओष्ठपर्ण बनून रंगलो
मानसगुढी
उभारू या गुढी! कर्तव्याची ही गुढीतिला धैर्याची फांदी, माधुर्याची साखरमाळ,आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ सर्वसमावेशक गडूलासद्विचारांचा शेला लावू आरोग्याची मानसगुढी ही उभारुजीवन अधिकाधिक समृद्ध बनवू
जागतिक महिला दिन
“यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता”(जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वासअसतो) थोडक्यात स्त्रियांची कार्य शैली, त्यांचे जीवन, चरित्र जेंव्हा एक आदर्श म्हणून आपण मानतो आणि तेथे दैवी अनुभूतीचा अनुभव घेतो . मी कर्मकांड मानणारा नाही त्यामुळे कदाचित दैवी नसेल तरी एका निर्मळ वातावरणाची निर्मिती मात्र आपण अनुभवतो. स्त्रीची लज्जा, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हि तिची आभूषणे आहेत तर अश्रू तिचे अस्त्र . पण कोणाही स्त्रीच्या डोळ्यात आलेले अश्रू जीव हेलावून टाकतात. ते आनंदाचे असले तरी आणि ते वेदनेचे- अपमानाचे- अवहेलनेचे असले तरी . ज्या घरातील स्त्री आनंदी ते घर समाधानी आणि ज्या समाजातील स्त्री सन्मानित तो समाज प्रगतिशील हे नक्की . तरी देखील स्त्रीवरील अत्याचार, तिचे शोषण पिढ्यान पिढ्या चालत आले आहे . आपण आज स्वतःला प्रगत- सुशिक्षित समजतो , पुरोगामी मानतो , पाश्चात्य संस्कृती अंगीकारून modern. म्हणवूंन घेतो. पण समाजातला बराचसा भाग अजूनही रूढीवादी (CONSERVATIVE) आहे , बराचसा अशिक्षित आणि मागासलेला देखील आहे . थोड्याफार प्रमाणात पहिला वर्ग सोडला तर सर्व ठिकाणी स्त्री हि फक्त “रांधा वाढा उष्टी काढा ” यातच अजूनही अडकली आहे . तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणेही सगळीकडे सारखेच. निर्भया, हैदराबाद, सारख्या घटना घडतात आणि आपण त्या मूग गिळून बघत बसतो, किंवा त्यावर आपल्या परीने निषेध व टिपणे नोंदवतो आणि media त्या मीठ मसाला लावून दाखवत बसते . . यातून आपण काय शिकणार ? पालक आपल्या मुलींना मर्यादेत राहण्याचे शिक्षण आणि संस्कार देतातच पण तेच संस्कार मुलांनाही द्यायला पाहिजेत . प्रत्येक स्त्री ही आई किंवा बहीण मानणे शक्य नसले तरी एक मैत्रीण असू शकते -एक व्यक्ती म्हणून तिची स्वतःची व्यक्तिगत तसेच सामाजिक ओळख आणि मान आहे आणि तो ठेवला पाहिजे हि जाण आणि भान लहानपणापासून आणून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे आणि वेळोवेळी त्यांनी त्याची खात्री करून घेतली पाहिजे . मुली आज सगळ्याच क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात , काही वेळा त्यांच्या पुढेही असतात . क्षेत्र corporate. असो किंवा जाहिरातींचे , entertainmaint. चे असो त्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. वेळ प्रसंगी त्यांचा पेहराव , वावरणे काही सो कॉल्ड सुधारकांना किंवा समाज संरक्षकांना आक्षेपार्ह वाटत असेल आणि त्याबद्दल ते संस्कार आणि संस्कृतीच्या नावाने व्यर्थ आरडाओरडही करतात. पण तीच गोष्ट मुलांनी केलेली चालते – हे दुटप्पी पणाचे आहे. भान सर्वांनी ठेवले पाहिजे मुलांनी , पालकांनी , समाजाने , मुलींनी आणि स्त्रियांनीही. बऱ्याच वेळेला एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या अवहेलनेला असुरक्षिततेला कारणीभूत असते , हे थांबायला हवे स्त्री ही कायमच जननी राहणार आहे त्या भूमिकेतून तिला बाहेर काढणे हे तिलाही शक्य नाही आणि त्या स्वातंत्र्याचा तिनेही अट्टाहास करुही नाही कारण त्याने unbalance. तयार होईल .तिच्या कार्यक्षेत्राचा आवाका वाढतोय आणि तिचा आत्मविश्वास वाढतोय व तो समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे हेही तेवढेच खरे व तिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत स्त्री केवळ सुरक्षित पणे नाही तर मनमोकळेपणाने समाजात वावरली पाहिजे तरच आपल्या पुरोगामी म्हणण्याला अर्थ आहे निर्भया व तशा हिडीस गोष्टी घडू नयेत यासाठी या गुन्हेगारांना लवकरात लवकर मोठी शिक्षा हवीच, जेणेकरून असे प्रसंग परत होणार नाहीत. पण त्याबरोबरच एक नवी दृष्टी असलेली सामाजिक जाणीव आणि संस्कार घडवण्याची ही तेवढीच गरज आहे मगच त्या यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता (जिथे स्त्रीची पूजा होते किंवा जिथे स्त्री पूजनीय असते तिथे देवाचा वास असतो) उक्तीला अर्थ आहे महिला दिनाच्या सर्व माता-भगिनी, मैत्रिणींना शुभेच्छा !!!
मिठी …
आयुष्यात सोबतकायम तिचीच असावीबाहूंच्या कवेत येण्यातिची कधी ना नसावी ॥ १ ॥ नजरेत नजर खिळून राहावी. जरी दुभंगे धरणीविसरून जाव्या सर्व यातनात्या मोहक क्षणी ॥२॥ आलिंगनात या रुसवे- फुगवेसारे विरून जावेगालावरच्या खळीत तिच्यामी स्वतःला हरवून जावे ॥३॥ करकमलांची ही मिठीराहो वा ना राहोदेह वेगळे झाले तरीजीव एकमेकांत गुंतून राहो II४॥
जरा विसावू या वळणावर….!
लहानपणापासून…… रेडिओवर…”भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर”… हे गाणं अनेकदा कानावर पडत आलंय…! जेव्हांही हे गाणं ऐकतो ..हळूहळू ते गाणं कानात झिरपतं आणि ऐकत रहावसं वाटतं…… अर्थपूर्ण कडवे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश दाखवणारं असतं…! भलं बुरं.. घडामोडी घडून गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो …क्षणिक या वळणावर…! खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापूर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात असतं तसंच जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ, पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! या वर्षाआधीच्या दोन वर्षांत आपण करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो होतो. याच कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरेही गेलो होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणीं ना सामोरे गेलो होतो – आर्थिक दृष्टया फटका बसला होता. पण या सरत्या वर्षानं आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात आलेल्या बिकट वाटेतही आशेचा किरण दाखवला. – आपल्या सर्वांची काळाने जरा जास्तंच परीक्षा घेतली. पण त्यातही आपण तावून सुलाखून बाहेर आलो आहोत. करोनाचं सावट आता परत येईल अशा बातम्या येत आहेत, पण न्यू नॉर्मल का काय म्हणतात त्याची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे – थोडीफार ती गेली असेल तर परत ती लावायला लागेल . अनेक बंधनं कंटाळा न करता आपल्यावर घालून घेऊन संयमाने वागायला लागेल. अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं गाणं मला आठवतं – “कई बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंसके पीछे … मन दौडने लगता है “ सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी – रोज हेच व्हायला पाहिजे – असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो – आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले. लवकरच एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपून नवीन सुरु होईल…. आणि असंख्य अडचणी – खडतर मार्ग येऊन गेले असले तरी सर्वच काही निराशजनक नाहीये.. सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – ऑफिसची -व्यवसायाची दैनंदिन व्यावहारिक -कौटुंबिक अगदी सामाजिक- सांस्कृतिकही कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? – यावर्षी अगदी संक्रांती- पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी पर्यंत सगळे सण जोशात साजरे झाले स्लो डाऊन कायमचं राहणारं नाही आणि ” As long as life is there, there is a hope ” याचीखात्री पटली. मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता –उनकी यादे जरूर रहती है –जीवन का सफर चालू रहता है ! शेवटी जीवन है चलने का नाम !चलते रहो सुबह-ओ-शाम !! दोन पावलं मागं सरकलो होतो …आता चार पावलं परत पुढे आलोय – रोज पुढंच जायचंय- मोठा पल्ला गाठायचाय – नक्कीच गाठू. बरंच काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात – परिस्थिती नक्कीच बदलतीय – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी… रिता जरी दिन वाटेमन भरलेले ठेवू धीर धरून सदाआशा जागती ठेवू भले बुरे ते विसरुनी जाऊधैर्य -आनंदाने पुढे जाऊ येणाऱ्या नववर्ष २०२3च्या हार्दिक शुभेच्छा !!