स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं एक वाक्य खूप प्रचलित आहे. ते म्हणजे, “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो.” वाह! अंगात रक्त सळसळेल असं हे वाक्य. हो ना? अगदी ऐकलं किंवा वाचल्या बरोबर एक वेगळीच ऊर्जा आपल्यात संचारून जाते. असं वाटायला लागतं की, आत्ताच उठावं आणि देशात चाललेल्या साऱ्या समस्यांवर एका झटक्यात तोडगा काढून तात्यारावांना आदरांजली वाहावी. असं जर आपण केलं तर ते “मृत्युंजय”, वरून आपल्याला बघून आशीर्वाद देतील, अश्या सार्या भावना अगदी उफाळून येऊ लागतात. यासोबतच सावरकरांचा विरोध करणाऱ्यांचा राग देखील येऊ लागतो. आणि गंमत म्हणजे, फक्त आपणच विनायकरावांच्या वाक्याला समजू शकलो आहे असा उगाच अतीविश्वास आपल्याला येऊ लागतो. . खरं तर सावरकरांचे विचार, कार्य, उपदेश, मार्ग, इत्यादी सारंच खूप प्रेरणा देणारे आहे. त्यांचं सारं आयुष्यच प्रेरणा देणारं आहे. पण त्यांचे हेच विचार, उपदेश आपणच समजू शकलो आहे हा खरं तर प्रत्येकाचाच एक गैरसमज आहे. सावरकरांवर अभ्यास करणारे चांगले चांगले लोकं देखील आज त्यांना पूर्ण समजू शकले नाहीत. तात्याराव जेव्हा म्हणतात की, या देशाचे, या मातृभूमीचे आपण देणे लागतो म्हणजे देशात असलेल्या समस्यांचेच निवारण करणे इतकेच होत नाही. या भूमीने आपल्याला जे जे दिले त्यापेक्षा जास्त आपण त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा असा त्याचा अर्थ होतो, असं मला वाटतं. भारत किंवा तेंव्हाचा अखंड हिंदुस्थान हा अनेक वर्ष पारतंत्र्यात राहीला आहे. मुघलांनी तर आपल्या संस्कृतीवर घाव घातला पण इंग्रजांनी आपल्या विचारांवर घाव घातला. आपल्या राहण्यावर, वागण्यावर, एकात्मतेवर घाव केला. तोडा आणि राज्य करा या धोरणेनुसार आपल्यावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. भारतात लोकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भावना निर्माण केली, जातीयवाद वाढवला. हा अखंड भारत ज्या ज्या गोष्टींनी कधी काळी विश्वगुरू होता त्या त्या सार्या गोष्टींचा नाश मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि आपल्याच काही लोकांनी मिळून वेळोवेळी केला. सावरकर जेव्हा ह्या वाक्यातून ‘देणे’ या शब्दाचा वापर करतात तेव्हा या भारताने गमावलेल्या प्रत्येक ख्यातीला, प्रत्येक संस्कृतीला, एकात्मतेला, अखंडत्वाला पुनः स्थापित करण्याचे आपल्यावर ऋण आहे, हे ठळकपणे सांगतात आहे. . तात्यारावांची जयंती असो किंवा आत्मर्पण दिवस असो, फक्त त्याच दोन दिवशी आपल्यात ही उर्जा संचारते आणि दुसर्याच दिवशी ती सहज शांत होऊन जाते. आपल्याला विसर पडतो असं मुळीच नाही. पण आपल्या आयुष्यात आपल्या मागे लागलेले प्रपंच आपल्याला ती उर्जा शांत करायला लावते. ‘हम सब एक है।’ आपण असा नारा लावतो पण मुळात मी ब्राम्हण, मी मराठा, मी कुणबी, तू क्षत्रीय, तो क्षूद्र, हा हे, तो ते, या जातीयवादात आपण आजपण घिरट्या घालत असतो. राजकारणात तर आजकाल आमचं हिंदुत्व महान की, तुमचं हिंदुत्व लहान, हे सांगायची एक खोड लागली आहे. आपणच आपल्या इतिहासाला लोकांसमोर आपल्याला हवं तसं रंगवतो आहे. भ्रष्टाचारावर तर काही अंकुश नाहीच. शिक्षणात देखील आपल्या देशाचा मूळ इतिहास तसेच आपली मूळ संस्कृती आणि भाषा ह्यावर देखील प्रत्येकाने त्यांना हवा तसा ताबा मिळवला आहे. या मातृभूमीला प्रत्येकानेच गृहीत धरून यावर स्वतःचाच हक्क गाजवायचा प्रयत्न दिवसरात्र चालवला आहे. मग हे ‘देणं’ कसं फेडल्या जाईल? . वीर सावरकर जेव्हा ह्या ऋणाबद्दल आपल्याला सांगतात तेव्हा ते ह्या मातृभूमीला पुनश्च विश्वगुरू बनवण्यासाठी प्रत्येकाने आपलं संपूर्ण योगदान द्यावं, त्यासाठी झिजावं आणि वेळ आलीच तर प्राणार्पण करावं हे सांगतात आहे. ही भारतमाता जगाची ज्ञानगंगा आहे, विश्वाचा केंद्र बिंदू आहे, प्रत्येक जागतिक समस्येचा तोडगा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचं उगम स्थान आहे. ही किर्ती जी आज हारवली आहे ती पुनः प्रस्थापित करणे हे आपलं सगळ्यांच प्रथम कर्तव्य आहे आणि हेच ते ‘देणं’ आहे. जर हे ऋण न फेडताच आपण निघून गेलो तर पुनः हे ऋण फेडायला आपल्याला इथेच यावं लागेल हे माझ्या दृष्टीने निश्चित आहे. . म्हणून आपला देह हा देवाला देण्या आधी हे ‘देणं’ याच जन्मात फेडून जा हेच भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांगतात आहे आणि त्याला अमलात आणणं हेच आपलं परम कर्तव्य आहे. . जय हिंद !!!
Author: Ketan Kulkarni
मनाचे श्लोक आणि आपण
श्लोक १ गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा| मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा| नमूं शारदा मूळ चत्वार वाचा| गमूं पंथ आनंत या राघवचा|| अर्थ: जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. मनुष्य मन हे अतिशय चंचल असतं. वाईट गोष्टी किंवा चुकीच्या मार्गावर ते लवकर आणि सहज भटकून जातं. विकारांना बळी पडतं. कितीही प्रयत्न केला तरी काम, क्रोध, मद, मत्सर याकडे त्याला आकर्षित व्हायला वेळ लागत नाही. पण यामुळेच मनुष्य अनेक वेळा आयुष्यात गोंधळलेल्या स्थितीत अडकतो. काय करावे? कसे करावे? काय उपाय असेल? असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात आणि मनात घर करू लागतात. यावर समर्थ रामदासस्वामी म्हणतात, “भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे लागतात. मनाची शक्तीच मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते.” म्हणून समर्थांनी मनाला ‘सज्जन’ असे संबोधले आहे. आजचं जीवन अतिशय धकाधकीचं झालेलं आहे. प्रत्येक मनुष्य कोणता ना कोणता मानसिक त्रास भोगत जगतो आहे. असंख्य प्रश्नांच्या गोंधळांचा पसरा त्याच्या डोक्यात आणि मनात साचला आहे. उत्तर काही मिळत नाही. पण मुळात मनुष्य अश्या बिकट परिस्थितीत अडकतोच कसा? हा सुद्धा मनात गोंधळ घालणाराच प्रश्न आहे. हो ना? मी सुद्धा रोजच्या जीवनात असंख्य मानसिक त्रासातून जात असतो किंवा जात आलेलो आहे. त्यामुळे हे प्रश्न जे आज समजातल्या असंख्य देहांना पडत असतील, ते मलासुद्धा पडतात. म्हणून मनाचे श्लोक याची मदत घ्यावी असं मी ठरवलं. पण हे श्लोक वाचत असताना आणि त्याचा अर्थ समजून घेताना मला काही गोष्टी सुचल्या. त्या गोष्टी काय आहे? कोणत्या आहे? कश्या प्रकारच्या आहे? ह्याचा उलगडा करायलाच मी हा एक प्रयत्न करून बघतो आहे. ह्या प्रयत्नाला मी ‘मनाचे श्लोक आणि आपण’ असे नाव दिले आहे. मुळात का आपण अश्या स्थितीतीत अडकतो ह्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन मी तुमच्या समोर मांडतो आहे. एक एक श्लोकाचा अर्थ आणि माझा दृष्टीकोन असे याचे स्वरूप असेल. हिंदुस्थानात कोणत्याही कामाच्या किंवा नवीन गोष्टीच्या आरंभी देवांची पुजा केली जाते. आपलं कार्य सफल व्हावं, कार्य करताना मन एकाग्रचित्त असावं आणि ध्येय किंवा उदेश्य पूर्ण व्हावं म्हणून प्रथम गणेशाला आणि नंतर आपल्या इष्ट देवाची पुजा केल्या जाते. ह्या प्रयत्नाचा आरंभ करताना मी त्या गजननाला आणि आई शारदेला नमस्कार करतो आणि माझा हा प्रयत्न त्यांच्याच आणि रामदास स्वामींच्या आशीर्वादाने सफल होईल अशीच आशा करतो. जय जय रघुवीर समर्थ|
गरीबांतले अमीर
कोरोना काळात अनेक वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला आले. प्रत्येकाने आर्थिक समस्या तर झेलल्याच आहे. त्यावेळेत सौभाग्याने अनेक गरजू लोकांची मला मदत करता आली, ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आणि त्यादरम्यान नागपूरला, माझ्या रहात्या शहरी, रस्यावर राहणारे अंदाजे किती गरीब लोकं आहे याचा अनुभव आला. बघायला गेलो तर बहुतेक हि संख्या लाखाच्या घरात सहज जाईल. नागपूर हे शहर खुप मोठं आहे. त्यामुळे असे रस्यावर राहणारे लोकांची संख्यासुद्धा जास्तच आहे. त्याकाळात आम्ही, म्हणजे मी आणि माझे काही मित्र अन्न, पाणी आणि गरजू वस्तूंचं वाटप या गरीबांमध्ये करत होतो. एप्रिलचा महिना आणि नागपूरची गर्मी! अश्या स्थितीत हे लाॅकडाउन. मला प्रश्नच पडायचा की, हे लोकं कसे राहतात या अवस्थेत? बहुतेक जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती! असंच एकदा नागपूरच्या प्रताप नगरला मला नेहमी एक गरीब दिसायचा, मला त्याची आठवण झाली आणि त्याला अन्न, पाणी आणि इतर गोष्टी त्याला मिळतात आहे का हे बघायला मी गेलो. तो नेहमी दिसायचा तो तिथेच बसलेला मला आढळला. तो दोन रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर बसलेला असतो. एक खुप जुना कोट, कानाला माकड टोपी, पायात फाटके जोडे, तोंडात नेहमी एक बीडी आणि त्याच्यासोबत एक गाठोडं आणि एक पिशवी. मी त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ गेलो. त्याला विचारलं, “काका, जेवले का?” तो हिंदीत बोलला, “परसों खाया था।“ म्हणजे तो उपाशी आहे हे कळलं. त्याला लगेच मी माझ्याजवळ असलेल्या दोन अन्नाच्या थैल्या दिल्या. “खाना है। खा लेना।“, मी त्याला म्हटलं आणि पुढे निघालो. मग पुढे काही दिवस सतत त्याला ही अन्नाची थैली देत राहीलो. एक दिवस जेव्हा सगळेच रस्ते सुनसान झाले तेव्हा त्याने मला विचारलं, “सब लोग कहां मर गये? कोई दिख नहीं रहा।“ मग त्याला जी परिस्थिती आहे ती सांगितली. ते ऐकून तो हसला आणि म्हणाला, “यह जिंदगी ही एक बीमारी है। एक दिन सबको मारेगी। तो यह विषाणू से क्या डरना?” आणि तो हासला. मग म्हणे, “पर जिंदगी मिली हैं, तो उसे पुरा जीना यहीं इस बीमारी का इलाज है। चाहे जैसा जीना पडे।“ तो जे त्या दिवशी बोलला ते आजपण कानात फिरत असतं. आयुष्य मिळालं आहे तर ते पुर्ण जगलं पाहीजे. मग ते कसं ही का नसो. आज अनेकांवर अनेक संकटं, परिस्थिती, वेळ येते जेव्हा अनेक लोकं हताश, निराश होऊन जातात. आयुष्यात काहीच उरलं नाही आहे किंवा आहे ती स्थिती ते हाताळू शकत नाही, म्हणून आत्महत्येस प्रेरित होतात आणि आयुष्य ससंपवतात. हा मुर्खपणा आहे. पण तरी काही लोकं हेच करतात. अशी काही बातमी वृत्तपत्रातून किंवा समाज माध्यमांवर ऐकली किंवा आपल्याच ओळखीच्याने हे पाऊल उचललं असं कळलं की, मला हे गरीब लोकं आठवतात. यांच्याजवळ पैसा नाही, डोक्यावर छत नाही, कोणी विचारणारं नाही, खायला दोन वेळचं अन्न नाही, कोणतंच सुख नाही. तरीसुद्धा हे लोकं जगतात. रोज भीक मागतात. तरी देखील स्वतःला संपवायचा मार्ग नाही अवलंबवत. मग ज्यांच्या जवळ काहीतरी तर आहे फक्त परिस्थिती अवघड आहे, ते लोकं का असा मृत्यूचा मार्ग वापरतात? आणि अश्या लोकांमध्ये तर काही धनवान लोकं देखील आढळून येतात. आश्चर्य आहे. म्हणून मला कधी कधी ह्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरीबात अमीर लोकं दिसतात. हे गरीबातले अमीर लोकं आहे. तुम्हाला काय वाटतं?