गेले कित्येक महिने घरून बाबांचे फोन येत असूनही कामाच्या व्यस्ततेचं कारण देऊन मी येण्याचं टाळायचो. माझ्या लहानपणापासूनच आई-बाबांनी अनाथ म्हणून घरी आणलेल्या त्याच्या जीवावर मी सगळ्याच बाबतीत निर्धास्त होतो. आज बाबांचा निर्वाणीचा फोन आला पण मी घरी पोहोचेपर्यंत सगळंच संपलं होतं. कधीकाळी आईबाबांनी काशीयात्रेहून आणलेला गंगाजलाचा सीलबंद गडू आईच्या मुखी रिता झालेला पहाताच मी पुरता कोलमडून गेलो. मात्र कालपर्यंत अनाथ असलेला तो, आज पुण्यवान सनाथ ठरला होता आणि मी….?
Author: Bipin Kulkarni
अलक (अति लघु कथा)
लक्ष्मीचा वास असलेल्या त्या घरात ते दोघे बंधू जरी गुण्यागोविंदाने रहात असले तरी डाव्या- उजव्याचा फरक एकाला उघडपणे जाणवायचा. आपल्या माउलीला नेहमी तो थाळीभेदा बद्दल पुसायचा. ती माउली कावरी बावरी होऊन त्याची नजर चुकवून निघून जायची. खिन्नतेने आला दिवस ढकलून तक्रार न करता तो परिस्थितीने अजूनच पक्व होत गेला. आपल्याच कुंकवाच्या बाहेर- ख्याली पणामुळे ह्या जगात डोळे उघडणाऱ्या त्याला, त्या माउलीने जीवनाच्या थाळीतून सकस आचार-विचारांचे घास भरवून पोसले होते.
विघ्नहर्ता …
परतीच्या प्रवासात गावाबाहेरच्या घनदाट अश्या रान- सदृश रस्त्यावर येताच गाडी अचानक बंद पडली आणि काळजात धस्स झालं. वेळ आणि रात्र दोन्ही पुढे सरकत असतानाच त्या थंड वातावरणात धडधड, भीती आणि सर्वांगी घर्म-ओघळ अश्या सगळ्यांनीच परिसीमा गाठली. अचानक पोटाला अन्न मिळेल ह्या आशेने एक अत्यंत भुकेला जीव नजरेत अगतिकता आणि लाचारी घेऊन समोर आला. नकळत आमच्याकडे असलेले खाद्यपदार्थ याचकाच्या झोळीत पडताच त्याच भुकेल्या अवस्थेत त्याच्या ओठांवर आशीर्वाद उमटला … दुसऱ्याच मिनिटाला गाडी सुरु झाली होती…
‘ नो ‘ … !!!
“ नाही..! हे कधीच शक्य नाही. नो …“!!! “ अरे, तुझी लायकी काय आणि तू बोलतोस काय…”? “ चालता हो इथून. चल निघ. भीखमंगा कही कां…” !! तिचा थैमानल्यागत ओरडा पाहून तो बिचारा केविलवाणा होऊन खाली मान घालून तिथून निघून गेला. ती आणि तो… शाळेपासून एकत्र. तिचा अभ्यास तो करायचा आणि ती नुसती उंडारायची. अभ्यासापेक्षा नटण्या मुरडण्याकडे जास्त लक्ष. समोरचा तुच्छ आणि मी म्हणजे कोण … हा तिचा स्थायी भाव. बाप गावचा जमीनदार. हेच कारण होतं तिच्या बेमुर्वत स्वभावाचं. घरी एकंदरीत सगळ्याच बाबतीत बोंब. आपल्या आईला घरात किती किंमत आहे हे तिला समज आल्यापासूनच कळलं होतं. तो मात्र तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, प्रेम आंधळं असतं हे माहीत असूनही … एकतर्फी. दिसायला चारचौघांसारखा. गावाकडे बाप आणि माय आपल्यासाठी राबतायत हे त्याच्या डोक्यात ठसलेलं. नसानसांत वाहणारी शिक्षणाची श्रीमंती. त्यामुळेच शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांना त्याच्याकडून फार अपेक्षा. आपल्याला काय करायचंय हे पक्के डोक्यात भिनलेले. पण ती कशी आहे ते ठाऊक असूनही तिच्यावर खूप प्रेम करणारा तो सरळ साधा प्रेमवीर. ती मात्र नेहमीच त्याला झटकण्याच्या मूडमध्ये. आज शाळेतला शेवटचा दिवस. आता शाळा संपणार आणि आपण आपल्या मार्गाला लागणार म्हणून त्याने आजच तिला गाठून धीर करून विचारायचं ठरवलं अन तो तिच्यासमोर जाऊन थडकला. मात्र … सगळ्यांसमोर झालेल्या उघड अपमानाची भळाळती जखम घेऊन तो तिथून बाहेर पडला. अश्वत्थाम्याने जशी कपाळावर कायमची बाळगलेली. पण ह्याची जखम थेट हृदयातच… बहुतेक ती ही कायमची. तिथेच बसलेल्या तिच्या कंपूतली 5-7 टाळकी कुत्सितपणे त्याच्याकडे बघून हसली. त्यातही तिचाच आवाज आणि कुत्सितपणा त्याला जास्त ठळकपणे जाणवला. आला दिवस, महिने… वर्ष सरली. तिच्या जमीनदार बापाला कुठल्यातरी बेकायदेशीर धंद्यात अटक झाली, पोलिसांनी बापाची कुंडली मांडली. त्याची सगळी प्रकरणे बाहेर पडताच तिच्या घराचे… नव्हे,वाड्याचे वासेच फिरले. आई त्या धसक्याने गेली. इतकं सगळं होऊनसुद्धा तिची गुर्मी मात्र तशीच. नंतर हळूहळू परिस्थितीचे चटके बसू लागल्यावर ती जमिनीवर आली. पैशाचा माज उतरला, घमेंड मातीमोल झाली आणि उद्या जगण्याची भ्रांत तिला जाणवू लागली. तिच्याच पैश्यामुळे जवळ आलेल्या मित्र- मैत्रिणींनी आता तोंडावर थुंकायला सुरवात केली. तिला सगळं समजून चुकलं आणि पोटा – पाण्यासाठी गावातच नोकरी पत्करून स्वतःलाच जगवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि तो…? आज तो स्वतःला सर्वार्थाने घडवून गावात परत आला होता. शाळेत त्याच्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांची आणि शाळेची मान त्याने समाजात उंचावली होती. शिक्षणाचं तेज त्याच्या डोळ्यांत आणि वृत्तीत दिसत होतं. त्याने माय आणि बापाला गावाकडून आणून शाळेसमोरच्या आपल्या स्वकष्टार्जित आलिशान वास्तूत ठेवले होते.माय बापाने जोडीने खस्ता खाल्लेली गावाकडची 2-4 बिघे जमीन आता 50-60 एकराची झाली होती. लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही त्या वास्तूत आता कायमस्वरूपी मुक्काम ठोकून होत्या. स्वतःची उतुंग ओळख निर्माण करूनही त्याचे पाय अजून जमिनीवरच होते. आपल्या बंगल्यातून समोर शाळेकडे बघताना मात्र तो खिन्नपणे हसायचा. कुणाच्याही नकळत ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसायचा.एकटाच कुठेतरी शून्यात हरवून जायचा. एकतर्फी केलेल्या विशुद्ध प्रेमाची सय उफाळून यायची. काळाचं मार्गक्रमण सुरूच होतं. अश्याच एके दिवशी आपल्या माय बरोबर काही खरेदी करण्यासाठी तो दुकानात गेला आणि अचानकपणे तिला समोर बघताच गलबला. तिचा अवतार बघून कळवळून गेला. त्याला बघून ती ही चमकलीच. ओळख पटली होती. तोच तो… पण आज दुकानात त्याने केलेल्या खरेदीवरून त्याच्या परिस्थितीची तिला चांगलीच जाणीव झाली. आपला पस्तावलेला केविलवाणा चेहरा तिने तोंड पुसण्याचा निमित्ताने झाकून घेतला आणि भानावर येताच त्याच्यामागे दुकानाच्या पायऱ्यांपर्यंत धावली. त्याला हाक मारताच तो थांबला आणि वळला. तिने परत ओळख दाखवली. तो कसनुसं हसला. तिच्याकडून झालेल्या अपमानाची कधीही भरून न येणारी जखम उराशी घेऊन तो जगला होता आणि त्याच अवस्थेत इतक्या वर्षानंतर तिच्याशी बोलत होता. बोलण्याच्या ओघात अचानक तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटलं आणि अनाहूतपणे ती विचारती झाली… “अजून एकटाच आहेस तू ? अजूनही प्रेम करतोस माझ्यावर ?” … एकच क्षण… फक्त एक क्षणच त्याने तिच्या डोळ्यांत बघितलं आणि तो मान फिरवून चालू पडला. तसूभरही मागे वळून न पहाताच उत्तरला…. ‘ नो !’… तो निघून गेला. अनपेक्षितपणे आलेल्या उत्तराने सैरभैर झालेली ती विचारात पडली, काय असेल त्याच्या ‘ नो ‘ चा अर्थ ??? त्ती सरबटली. डोकं गच्च धरून त्याच्या ‘ नो ‘ च्या विचारात तडफडत राहिली. इतकी वर्ष तो तडफडत होता आणि आज ती. मात्र…त्या ‘ नो ‘ चा अर्थ तिला कळलाच नव्हता आणि आता तर कधीच कळणार नव्हता…
विसर्जन …
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले. जड मनाने निरोप देताना मनाबरोबर पायही जडावलेले. बाप्पाला निरोप देऊन सगळे परतले; अन थोड्याच वेळात दहा दिवसांत श्रमलेल्या… दमलेल्या गलितगात्र शरीरास बिछान्यात झोकून दिलं सगळ्यांनी. आणि मी ?… मी मात्र जीवनाच्या पाटावर अजून बसलोय. विषण्ण गलितगात्रांसह. . . विसर्जनाची वाट बघत….
गुणाधिश तो … तोचि विघ्नहर्ता,आगळे वेगळे रूप तयाचे |पाहुणा नसेची तो सकळांचा …जणू मंगल नाते मित्र-सख्याचे ||
श्वासातील गंध केवड्याचा,अवचित उडून गेला |कोरड्या ह्या नेत्र ज्योती …जोजवितात नाजूक मेंदीला ||
चूड लागता जपलेल्या स्वप्नांना,नजरेत दिसते वास्तव भीषण |दाहकतेचे डंख तन- मनास …सोसून उरते वेदनेचे मी पण ||
आगळा वेगळा छंद हा लागला,चोरून क्षणभर तुला बघण्या |रिता पाहता चौकट-उंबरा…भग्न हृदय अन कळा जीवघेण्या ||
बंदिशालेत जन्मला,गोकुळी नांदला |अक्षय गीतेमधुनी…विश्वाला उमगला ||