एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………“तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुनजातोस रे ???” देव हसला आणि म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात नं त्यांना या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…” मी म्हणाले….“याचा अर्थ, मी तुला आवडत नाही कां ???” देव म्हणाला, “तसं नाही गं ! तु पण तुझ्या साधेपणामुळे प्रेमळपणामुळे मला खुपआवडतेस !” नक्की …? मी म्हणाले. हो गं … नक्की. देव म्हणाला. “मग मी या पृथ्वीवर अजुन कशी आहे???” मी विचारलं . देव प्रसन्न हसला आणि म्हणाला, “तु पृथ्वीवर आहेस कारण………माझ्या पेक्षाही कुणालातरी तू जास्त आवडतेस म्हणुन …..
Author: Bipin Kulkarni
जगलेले ते क्षण सोनेरी,संगे तुझिया अल्पकाळा साठी |विखुरलेल्या आज त्या सयी…जणू सुटलेल्या रेशीम गाठी ||
निर्माल्य …
देवपूजेला आणलेली फुलं अचानकपणे तिच्या देहावर मालकी हक्क गाजवणाऱ्या त्या नराधमाच्या कलेवरावर टाकायला लागली. इतकी वर्ष तिच्या मनाचीच काय पण देहाचीही फुलबाग कधीच उमलून फुललीच नव्हती. कायम कुस्करलेली आणि सुकलेली. कदाचित त्या मुळेच की काय… ती नेहमीच स्वतःची तुलना त्या निर्माल्यागत अवस्थेतल्या फुलांशी करायची… संधी मिळताच त्या नराधमाला आयुष्यातूनच मोकळं करून समाजाच्या विखारी नजरेतून कायमची मुक्त होण्यासाठी ती … आज स्वतःच नदीच्या विशाल आणि रौद्र पात्रात निर्माल्यागत वाहत होती…
घाव काळजातले की भाव डोळ्यांतले,समजावून देतात खरा अर्थ नात्याला |माझी माझी म्हणून नाती बाकीची…असतात फक्त ओझी वाहायला ||
दान …
“ दे … दान … सुटे गिरानं …!! रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बाईच्या तोंडून अशी खणखणीत हाळी ऐकू आली आणि मागोमाग आईचा आवाज कानावर आला … “अमु …जा रे …! त्या बाईंना ह्या सुपात ठेवलंय ते देऊन ये..” मी गुमान उठलो आणि सूप घेऊन बाहेर आलो. ती बाई कडेवर छोटंसं मूल आणि डोक्यावर परफेक्ट बॅलन्सड केलेली टोपली घेऊन दोन पावलं पुढं आली. मी त्या सुपातलं सगळं तिच्या ओटीत घातलं आणि वळणार इतक्यात ती बाई हात जोडून म्हणाली, “ दादा , पोर सकाळ पास्न उपाशी हाय. वाईच थोडं दूध मिळंल का? “ आरं भाऊ, हे गिरान सुटपातूर कोनी बी खायला दिलं नाय बग.” मी तिला हातानेच थांबायची खूण केली. आत जाऊन ग्लासभर दूध घेऊन बाहेर आलो. त्या बाळाने आणलेले दूध घटघट पिऊन टाकलं आणि तो लहानगा जीव शांत झाला. त्या बाईच्या डोळ्यांत कमालीचं ओशाळलेपण होतं आणि माझ्या… ??? घरात आलो तर आईचा चेहरा रागाने लाल झालेला. मला कळेना कीं काय चुकलं ते ? एक होतं … आईला न विचारता मी दूध नेऊन बाळाला दिलं होतं. आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात असताना आई म्हणाली “ तू दूध नेऊन दिलंस त्याचं मला काहीच वाटलं नाही. उलट तुझ्या ह्या कृतीने मला आनंदच झाला. पण…? “ आता मात्र मी गोंधळलो. पण ? नक्कीच काहीतरी चुकलं होतं. “ पण काय आई..? मी दूध तुला सांगून द्यायला हवं होतं का?” आई काही बोलेल म्हणून मी तिच्याकडे नजर टाकली. आता तिच्या डोळ्यांत रागाच्या ऐवजी एक वेगळीच चमक होती. माझा हात धरून ती उद्गारली… “ बस इथे.” एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली ..” अमित, तू दूध देताना मी पहात होते. ती भिक्षा मागायला आलेली बाई लाचार नसली तरी अगतिक मात्र नक्कीच होती. तिच्या डोळ्यांत तू देत असलेलं दान घेताना मला अगतिकता दिसली आणि तुझ्या डोळ्यांत दानशूरतेचा अहंभाव. मी म्हणजे किती मोठा दाता आणि ती घेणारी बाई… ती तर फक्त याचक??? अमित… दुधाचं दान करतेवेळी तुझ्या चेहऱ्यावर मला उन्मत्तपणाचा भाव दिसला. मी म्हणजे कोण..? आज माझ्यामुळेच त्या बाईच्या मुलाला दूध मिळालं असा गर्व दिसत होता तुझ्या अंगोपांगी. अमु, अरे जरा महारथी कर्णाला आठव.अजूनही त्याच्यासारखा श्रेष्ठ दाता झाला नाही आणि ह्या जगाच्या अंतापर्यंत होणारही नाही. कधीच नाही. अरे त्या दानश्रेष्ठ कर्णाकडून दान स्वीकारताना याचकसुद्धा स्वतःला भाग्यवान समजायचा.” आई बोलून शांतपणे उठून आत गेली. मी शून्यावस्थेत तिथेच बसलो होतो. आईने अचूक घाव घातला होता…थेट वर्मावरच. क्षणात आठवला तो कर्ण … अंगराज कर्ण. त्याहीपेक्षा मित्रत्वाचं अमूल्य असं दान दुर्योधनाच्या पदरात टाकून आपल्या मृत्यूपर्यंत निभावून नेणारा चिरंजीव मित्र. एकदा दान दिल्यावर काय दिलं आणि त्यात आपला फायदा काय ह्याचा क्षणमात्रही विचार मनात न आणणारा महान… उत्तुंग… दिलदार आणि सच्चा वीरदाता. स्वतःच्या मृत्यूचेही दान प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या ओंजळीत आपल्या अंग- कवचाच्या रूपाने देणारा अतुल्य श्रेष्ठ दाता. अख्ख कर्णायन डोळ्यासमोरून सरकलं आणि अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आठवलं … कर्ण दान देत असताना ते घेणाऱ्या त्या याचकाकडे कधीही पहात नसे. आपली दृष्टी जमिनीकडे स्थिर ठेवून कर्ण दानधर्म करीत असे. हृदयात केवळ एकच भाव… मी दान करीत असताना त्या याचकाच्या नजरेतला अगतिकतेचा ओशाळेपणा न दिसावा आणि माझ्या नजरेत दान करीत असतानाचा गर्व- अहंकार नसावा. अहाहा… काय हा भाव. किती थोर विचार आणि आचरण. मी उठलो. धावत जाऊन आईच्या कुशीत शिरलो. “ आई..! मी चुकलो. मला माझी चूक समजली. तुझी शप्पथ घेऊन सांगतो पुन्हा असं होणार नाही.” आई प्रसन्न हसली. माझ्या केसांत बोटं फिरवत मला नुसतीच थोपटत राहिली. मला तिचा क्षमेचा स्पर्श समजला. त्या जगनियंत्याने आपल्यावरचा क्षमाशीलनाचा भार हलका करण्यासाठीच तर आईच्या रूपाने स्त्रीला पृथ्वीवर पाठवलं होतं … बरोबर मातृ- कर्तृत्वाचे दान देऊन … कायमचं.
पाळताही येत नाही,नाही जवळी ठेवता |सवे तिच्या जगूनही …‘ वेदना ‘… न येई जगता ||
रंग बरसले,तनूवर सजले |मनात झिरपताच …श्रीरंग अवतरले ||
अलक (अति लघु कथा)
सुतकातल्या दिवसात त्या बंगल्यात तिघा भावंडांची इस्टेटीच्या वाटणी बद्दल वकीलांशी बोलणी सुरु होती. एकंदरीत प्रकरण हातघाईवर येऊ पहाताच त्यांनी मालकाचे मृत्युपत्र वाचून दाखवले आणि त्या भावंडांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. शांतपणे वकिलाने त्या घरच्या प्रामाणिक, विश्वासू आणि एकनिष्ठ नोकराला हाक मारली. मातेसमान मानलेल्या मालकीण बाईंना स्वतःच्या घरी नेऊन त्या नोकराने त्याच्या मालकाला दिलेले वचन पूर्ण केले आणि … आज तो सगळ्यात श्रीमंत सनाथ म्हणून अभिमानाने मिरवू लागला होता …
दिवा वंशाचा उजळला घरी,अन,आयुष्य ओवाळिले दुसऱ्यासाठी |स्मरण व्हावे आज सकल तयांचे …जिथे न चिरा … न तेवते पणती ||
जलता इश्क …
डोळ्यासमोरचं अविश्वसनीय चित्र…. आप्तेष्ट, मित्र सगळ्यांची धावपळ. कानावर मौलवी साहेबांचे गंभीर आवाजातले कुराण पठण आणि समोर एक पडदा. त्यामागे सेहऱ्यातला लाजरा चौदवी के चांद सा मासूम मुखडा.… मेरे मेहबूब का … वल्लाह … क्या हसीन शाम थी वो. इतक्यात अचानक समोर धाडकन काहीतरी आपटल्याचा आवाज आला आणि डोळ्यासमोरचं सगळं नाहीसं झालं. क्षणभर काहीच उमजेना. कळतच नव्हतं काय झालं आणि मी कुठे आहे तो. अरे… हे काय…! इतके लोक कां जमलेत? ओळखीचे तर सगळेच होते. आप्तेष्ट आणि मित्र सुद्धा. पण हे सगळे इतके गंभीर आणि दुःखी चेहरे घेऊन का वावरतायत …? मला कुठे घेऊन चाललेत ? कानावर काही अस्फुटसं पडत होतं. परवरदिगार … या अल्लाह… यह क्या हुआ? गलती किसकी और सजा के हकदार कौन …? इतने जिंदादिल लडके कां कसूर क्या था ..? बस, उस लडकी से इश्क किया था. इतने बेदर्दीसे इस बच्चे के प्यार को ठुकराकर वह तो चली गयी और इसे भेज दिया कब्रस्तान के रास्ते पर… मला काहीच कळत नव्हतं. कळणार तरी कसं …? डोळ्यापुढे अंधार आणि सोबतीला मातीचा वास. किती वेळ गेला कोण जाणे. अचानक पैंजणांचा ओळखीचा आवाज आणि मेहंदीचा सुगंध जाणवला. होय…तीच ती …!! बंद आंखो से पहचाना मैने … कैसा भूलता मैं ? आज मेरा इष्क मेरे ही कब्रपर फूलों की चद्दर लेके आया था. मेरे मरने के बाद … मेरे लिये दुआ मांगने और वह भी अपने हमसफर के साथ… या अल्लाह… मेरे आका …मेरे परवरदिगार… यह कैसा इन्साफ है तेरा… ?? मैं अंदर ही अंदर तडपता रह गया … जलता रहा मेरे हसीन सपनों के साथ… कम्बख्त… कौन कहता है की दफ़नाने के बाद, जलाया नही जाता…