अतिपरिचयात् अवज्ञा। अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति। मलयेभिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥ अर्थ :- (कोणाशीही) अति ओळख (अति जवळीक) आपला मान (किंमत कमी) करते आणि सारखे सारखे (कोणाकडे) जाण्यामुळे आपल्याविषयीचा आदरभावही कमी होतो. (अहो, आता हेच पहा ना,) मलयपर्वतावर राहणारी भिल्लीण (भिल्ल स्त्री) चंदनाच्या लाकडाचा चुलीसाठी सरपण (इंधन) म्हणून उपयोग करते. टीप :- ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या संस्कृत उक्तीचा मराठीतही सर्रास उपयोग होतो. ‘अतिपरिचयादवज्ञा’ हा शब्द योजलेले अजून काही श्लोक पाहू, अतिपरिचयादवज्ञा संतत गमनादनादरो भवति। लोकः प्रयागवासी कूपे स्नानं समाचरति॥ अति ओळखीने आपली अवज्ञा होते. आपल्या शब्दाचा मान कमी होतो आणि सततच्या येण्याजाण्याने आदर कमी होतो. (हेच बघा ना) प्रयागनिवासी लोक विहिरीतल्या पाण्याने अंघोळ करतात. या श्लोकातही आधीच्या श्लोकाप्रमाणेच अतिपरिचय योग्य नाही असेच सुचवले आहे. प्रयाग हे तिर्थ त्रिवेणीसंगम तिर्थ आहे. तिथे संगमावर अंघोळ करणे हिंदू मान्यतेनुसार पुण्यदायक मानले जाते. देशाच्या सर्वभागातून लोक तिथे संगमस्नानासाठी येतात पण खुद्द प्रयाग वासियांना त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्रिवेणी संगम स्नानाची किंमत त्यांना नाही. ते आपले घराजवळच्या विहिरीच्या पाण्यानेच स्नान करतात. आता आपण जो पुढचा श्लोक पहाणार आहोत तो मात्र आध्यात्मिक आशयाचा आहे. पहा, अतिपरिचयादवज्ञा इति यद्वाक्यं मृषैव तद्भाति। अतिपरिचितेऽप्यनादौ संसारेऽस्मिन्न जायतेऽवज्ञा॥ अतिपरिचयाने मान कमी होतो हे वाक्य खोटं असावं असं वाटतं. कारण आपल्याला अतिपरिचित असणारा अनादी असा हा संसार (अनादी असे हे ब्रह्मांड जिथे आपण कोट्यावधी जन्म येरझार्या घालतो असे म्हणतात), त्या या संसाराचा लोक अतिपरिचयामुळे अनादर (तिरस्कार) करताना दिसत नाहीत. अजून एक श्लोक आहे ज्यात चार सुवचने समाविष्ट आहेत तो असा, अतिपरिचयादवज्ञा। अतिलोभो विनाशाय। अतितृष्णा न कर्तव्या। अति सर्वत्र वर्जयेत् ॥ अतिपरिचयादवज्ञा ‘पिकते तिथे विकत नाही’ हेच खरे. जे आपल्याकडे मुबलक प्रमाणात असते त्याची किंमत आपल्याला नसते किंवा जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिचं खूप अप्रूप असतं एकदा ती गोष्ट प्राप्त झाली की किंमत शून्य. यावरून निदा फाजलींचा एक उर्दू शेर आठवला, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है। मिल जाए तो मिट्टी है खो जाए तो सोना है। हा संसार, ही दुनिया ज्याला म्हटलं जातं ते एक जादूचं (मायावी) खेळणं असावं. कारण जोपर्यंत इथे एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्या वस्तूला सोन्याची किंमत असते आणि एकदा ती वस्तू मिळाली की तिचं मूल्य आपल्या लेखी मातीमोलाचं होतं. माझ्याही एका गझलेत अशाच अर्थाचा एक शेर आहे. तो असा, पाहतो आहेस तू रोखून का शिखरा? संपते स्वारस्य माथा गाठल्यानंतर फेसबुक व व्हॉटस्ऍप वर ‘अतिपरिचयादवज्ञा’ करणार्यांपासून सुटके साठीच तर ब्लॉक, अनफ्रेंड, डिलिट इ. ऑप्शन्स दिलेले असतात.
Author: Abhijeet Kale
संस्कृत सुवचनानि २
सुवचन – अति सर्वत्र वर्जयेत। अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:। विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत॥ अर्थ :- अत्यधिक दानशील असल्याने दैत्यराज बळीला पाताळात बंदी होऊन रहावं लागलं. अतिशय अभिमानी अगदी दुराभिमानी असल्याने सुयोधनही दुर्योधन म्हणून कुख्यात झाला व शेवटी भीमसेनाकडून वधला गेला. अति लोलंगतेमुळे असुरराज महाबळी रावणाचाही नाश झाला म्हणूनच कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत अतिरेक करणे टाळावेच. टीप- ‘अती तिथे माती’ अशी मराठीमध्ये म्हण आहेच परंतु संस्कृतमधील ‘अति सर्वत्र वर्जयेत’ ही उक्ती आपण मराठीतही व्यवहारात बोलताना वापरतो. वरील श्लोकाच्या बाबतीत एक पाठभेदही आढळतो तो असा, अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:। अति दानात् बलिर्बद्धः अभिमानात् सुयोधनः | याच श्लोकाचे ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे चौथे चरण ठेऊन लिहिलेले इतरही श्लोक संस्कृतमधे आहेत. ते पाहूयात, अतिदानात बलिर्बद्धः अतिमानात सुयोधनः। रावणोति मदान्नष्टः अति सर्वत्र वर्जयेत्।। या श्लोकात अति मदाने (अति माज केल्याने) रावण नष्ट झाला असे म्हटले आहे. अतिदानाद्धतः कर्णस्त्वतिलोभात् सुयोधनः। अतिकामाद्दशग्रीवस्त्वति सर्वत्र वर्जयेत्॥ अतिदानशूरतेमुळे कर्णाचा नाश झाला (दानशूरतेला कलंक लागू नये म्हणून याचकरुपात आलेल्या इंद्राला कवचकुंडले दान करावी लागली.) अतिलोभाने (राज्यलोभाने) दुर्योधनाचा नाश झाला. अतिकामामुळे दशानन (दशग्रीव) रावणाचा वध झाला खरोखर अतिरेक सर्वत्र टाळायलाच हवा. अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद्बलिर्बद्धोह्यति सर्वत्र वर्जयेत्।। अतिसुंदरता या गुणामुळे सीतेचे हरण झाले आणि अत्यंत गर्विष्ठतेमुळे रावणचा अंत झाला. अति दानशूरपणाच्या गुणामुळे बळीराजाला आपलं राज्य गमावून पाताळात अडकून पडावं लागलं त्यामुळे अतिरेक सर्वत्र त्यागावा. या श्लोकातून हे सुद्धा लक्षात येतं की अवगुणच नव्हे तर चांगले गुणही अतिप्रमाणात असतील तर त्यानेही मनुष्य धोक्यात येतो म्हणून विवेक-विचार चातुर्य महत्त्वपूर्ण होय. एक हिंदी दोहासुद्धा अतिप्रमाण त्रासदायक असते असे सांगतो. अति भली न बरसना अति भली न धूप। अति भली न बोलना अति भली न चुप॥ अती पाऊसही वाईट आणि अती ऊनही चांगले नाही. अती बोलणेही चुकीचे आणि अतिमौनही नुकसानदायकच.
आजची लोकोक्ती – परदु:खं शीतलं
महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु: प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥– ‘विक्रमोर्वशीय’, कालिदास. अर्थ :- दुसर्याचे दु:ख (कितीही) मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. (आता हेच पहा ना) ही मदांध (कोकिळा) माझ्यासारख्या संकटात पडलेल्या (माणसाच्या) मनधरणीला दाद न देता (आर्जवांकडे दुर्लक्ष करून) नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा (सौंदर्यवती तरुणीच्या अधरांचे) चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्यात गुंतली आहे. टिप –संस्कृत काव्य, महाकाव्य, नाटक इत्यादींमधील श्लोकाचा काही भाग अथवा श्लोकातील आशयसमृद्ध चरण पुढे संस्कृत व तिच्यापासून निर्माण झालेल्या भाषांमध्ये वाक्प्रचार, म्हण (उक्ती), अथवा संस्थांचे बोधवाक्य म्हणून वापरले गेले. असे काही श्लोक व त्यांपासून मराठी भाषेमध्ये रूढ झालेल्या उक्ती अथवा विविध संस्थांनी संस्कृत श्लोकांपासून स्वीकारलेली बोधवाक्ये आपण काही दिवस अभ्यासणार आहोत. महाकवी कालिदास रचित विक्रमोर्वशीय नाटकातील राजा विक्रमाचा हा स्वगत संवाद आहे. उर्वशीचा शोध घेणारा राजा विक्रम कोकिळाला उर्वशीविषयी महिती विचारतो परंतु त्याच्याकडून काही उत्तर न मिळाल्याने वरील उद्गार काढतो. यावरूनच संस्कृत भाषेत परदुःखं शीतलं ही उक्ती प्रचलित झाली असावी आणि त्यातूनच तो संस्कृतपासून निर्माण झालेल्या हिंदी, मराठी इ. भाषांमध्ये परदुःख शीतल असते अशा अर्थाचा वाक्प्रचार रूढ झाला असावा. विरलः परदुःखदुःखितो जनः।खरंय की दुसर्याच्या दुःखाने दुःखी होणार्यस माणसांची या जगात वानवाच आहे.आप दुःख भारी, परदुःख शीतळ