नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे.
लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन!
लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते. सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून, पाट रांगोळी करून
सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच! मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!
मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क, तर मुली रांगोळी काढण्यात! मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम! आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ हे चालू राही.!
फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते! असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली…