नकळत पाहता मागे,
अंतर सरलेल्या वाटेचा..
मनी अंथरला गालीचा,
नक्षीदार आठवणींचा !
दिसे फिकट फिकट रंगात,
जरा विटका अन् जुनाट !
परी नक्षीची ती संगत,
अन् वीण त्याची नीट !
जीर्ण गालीचा हा भासे,
जणू जीवनाचा सारीपाट!
नियतीने मांडला होता ,
रंग भरून चौकोनात!
किती ऊन पाऊस झेलले,
या गालीचाने सोसले !
मनाच्या मखमली वरती,
जीव किती अंथरले !
दिली साजरी बैठक त्याने,
प्रत्येक त्या क्षणाला !
स्मृतीत क्षण अन् क्षण,
चिरंतन रुतून मनाला!
आता पुरे त्याची ही आस,
क्षणोक्षणी हे वाटे !
उसवलेल्या गालीचा चे,
उरी बोचतात काटे !!