रंग पांढरा पावित्र्याचा,
लेऊन आली जगी शारदा!
नवरात्रीच्या रंगांमध्ये,
रंगून जाती साऱ्या प्रमदा!
जास्वंदीसह लाल रंगी,
दुसऱ्या दिवशी देवी सजली!
रक्तवर्णी हा सडा शिंपीत, मांगल्याची उधळण झाली!
आकाशासम निळे वस्त्र ते,
लेऊन आली तिसऱ्या दिवशी!
व्यापून टाकी अंबर सारे,
रूप देवीचे विशालाक्षी !
शेवंतीचा रंगही पिवळा,
मोहक अन् उत्साही !
चौथ्या दिवशी देवी येई,
करुनी शृंगार तो शाही!
चैतन्याचा रंग हिरवा,
सृष्टीचा शालूच असे !
नवरात्रीचा दिवस पाचवा,
,सस्य शामल मूर्ती दिसे!
राखाडी, करड्या, रंगाचे,
वस्त्र तिचे गांभीर्य दाखवी!
रूप देवीचे शांतगंभीर,
सहाव्या दिवशी मन रमवी!
वैराग्याचा रंग केशरी,
खुलून दिसे देवीला!
नवरात्रीचे रूप देखणे,
उजळे सातव्या माळेला!
प्रेमळ सात्विक रंग गुलाबी,
वस्त्र शोभे लक्ष्मीला!
अष्टमीच्या देवीचा हा,
मंदिरी रात्री खेळ रंगला!
उत्साहाचे प्रतिक जणू असे,
रंग गडद जांभळा !
अंबेच्या नवरात्री रंगी ,
आनंद मिळे आम्हा आगळा !
नऊ दिवसाचे नवरात्र संपले,
दहन करू दुष्ट रावणाचे !
सीम्मोलंघन करुनी लुटुया,
सोने आपट्याच्या पानाचे!
दसरा येई वाजत गाजत,
आनंदाचे घेऊन वारे !
दीपावलीच्या स्वागतासही,
सज्ज होई घरदार हे सारे!