युगपुरुष तू पूर्णपुरुष तू विश्ववंद्य सन्मान
कृष्णजयंती गाऊ आरती तव गुण गौरवगान।।ध्रृ।।
जन्मचि कारागृही पहारा
कंस वादळी वास
लीला गोपांसवे गोकुळी
रक्षणार्थ गोधनास
सखे सोबती सर्वांसाठीकार्य तुझे वरदान
तव गुण गौरव गान।।१।।
वृत्ती राक्षसी वैरी ते ते
निर्दालन केले
गरीब गांजली प्रजाही सज्जन
हित रक्षण झाले
दीनानाथ तू भगवंता रे तूचि आशास्थान
…..तव गुण गौरवगान।।२।।
सत्त्यवादी तू न्याय नीतीचा
पक्ष पांडवांचा
कौरव पांडव युद्ध प्रसंगी
सारथी पार्थाचा
अवतारी या कार्य आदर्शचि हाचि तव सन्मान
……तव गुण गौरवगान।।३।।
कर्म भक्ती नि ज्ञान मार्ग ते
पार्था बोधियले
जन्म मृत्यूचे तत्व अगम्यचि
सावध त्यां केले
पार्थ मनीचा किंत सारुनी दे युद्धा आव्हान
……तव गुण गौरवगान।।४।।
कार्य करोनी भगवंता ते
प्रेमे अर्पूनीही
कर्म दोष ना त्या भक्ताते
अनन्यभक्ती ही
भगवत् गीता त्याग तत्व ते कृष्णा, कार्य महान
…….तव गुण गौरवगान।।५।।