बंद … बंद … गेले काही दिवस सगळंच बंद . चार कुडाच्या भिंतीत कोंडून घेतलयं स्वतःला. सुरवातीला मजा होती, पण नंतर मात्र हा बंदच अनिश्चिततेच्या काळ-डोहात बुडायला लागला.
एकटा जीव … म्हणजे सदाशिवच की हो..! आपल्या मनाला स्वतःच समजवायचं. “अरे,नशीब समज. तू एकटा. ना आगा … ना पिछा. पण,हे नशीब की त्या सटवीने विस्कटवलेल्या ललाटावरच्या रेघा?” ह्या विचाराबरोबर मात्र डोक्यात भयानक शांतता. “ अरे, किती काळ ही शांतता सोसायची कुणी सांगेल कां? किती दिवस अजून काढायचेत ते कुणास ठाऊक? श्वास चालू आहे तेव्हढे दिवस तरी नक्कीच..!” स्वतःलाच प्रश्न करायचा आणि स्वतःच मान झटकायची … उत्तरादाखल .
खोपटात पडून झरोक्यातून तेवढ्याच मापाचा आकाशाचा तुकडा न्याहाळायचा … दिवसा निळा अन रात्री …?? रात्री झरोकाच दिसायचा नाही. डोळ्यापुढे अंधार …अंधार आणि फक्त अंधारच… साथीला केवळ घुसमट. बंदिस्त घुसमट. “ अजून काही दिवस सरकलेत कां ? आता सगळंच कमी कमी होऊ लागलंय बहुतेक… श्वास सोबतीला आहे पण तो ही थकायला लागलाय. तो तरी किती चालणार म्हणा. त्यालाही काही मर्यादा आहेतच नं ? “
पुन्हा नवीन दिवस. झरोक्याचा निळा तुकडा, पण, रात्री …??? रात्री, फक्त गच्च अंधार आणि एके दिवशी अचानक…
दिवसा झरोकाच अंधारून गेला…